... तेथे लव्हाळे वाचती

हवामान बदलाच्या प्रचंड संकटासमोर कोणी टिकू शकत नाही. त्यामुळे काही वेळा तुम्हाला नतमस्तक व्हावे लागते. कधी जुळवून घ्यावे लागते. सर्वांना सोपा वाटेल असा मार्ग काढावा लागतो.
... तेथे लव्हाळे वाचती
... तेथे लव्हाळे वाचती

हवामान बदलाच्या प्रचंड संकटासमोर कोणी टिकू शकत नाही. त्यामुळे काही वेळा तुम्हाला नतमस्तक व्हावे लागते. कधी जुळवून घ्यावे लागते. सर्वांना सोपा वाटेल असा मार्ग काढावा लागतो. हवामान बदलाचा सर्वांत मोठा परिणाम हा समुद्राची पातळी वाढण्यामध्ये होतो. बेटांच्या समूहापासून तयार झालेल्या राष्ट्रांमध्ये विशेषतः जपान, इंडोनेशिया आणि हॉलंडमध्ये पाण्यावर तरंगणाऱ्या अथवा स्थिर मनुष्यविरहित बेटांचा वापर हवामान बदलाचे दृश्य परिणाम मोजण्यासाठी केला जातो. वाढत्या समुद्र पातळीबरोबर ही बेटे बुडू लागतात अथवा त्यांची सर्व बाजूंनी झीज सुरू होते. उपग्रहाच्या छायाचित्रावरून या बेटांचा पूर्वस्थिती आणि सद्यःस्थिती यांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो. अशा अभ्यासामधून प्राप्त झालेले निष्कर्ष जगाला घाबरुन सोडणारे आहेत. जागतिक स्तरावरील या मापदंडाचा वापर आता आपल्या देशामधील विशेषतः ब्रह्मपुत्रा नदीमधील बेटाच्या अभ्यासासाठी केला जात आहे. आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीतील निसर्गाचे कोंदण असलेले एक सुंदर बेट म्हणजे ‘माजौली’. एक वर्षापूर्वी या बेटावर मला सलग तीन दिवस राहण्याचा योग आला. तेथील आदिवासी, त्यांची पारंपरिक शेती आणि त्यांचे ब्रह्मपुत्रा नदी बरोबर असलेले ‘आईचे नाते’ पाहिल्यावर सुख म्हणजे काय असते, हे मला येथे समजले. या वसुंधरेच्या पृष्ठभागावर नदी पात्रातील सर्वांत मोठे व मानवी वस्ती असलेले बेट असा माजौली बेटाचा गौरव आहे. वातावरण बदलामुळे एखाद्या नदीचा राज्याच्या कृषी आणि शेतकरी स्थलांतरावरील नकारात्मक परिणामाचेसुद्धा हे एकमेव उदाहरण ठरावे. माजौली बेट हे जिल्ह्याचे ठिकाण असून, सध्याचे आसामचे मुख्यमंत्री याच बेटावरून विधानसभेवर निवडून आलेले आहेत. २० व्या शतकाच्या सुरुवातीस या बेटाचा आकार १२५० चौ. कि.मी. म्हणजे १२,५००० हेक्टर होता, तो आता २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर ३५० चौ. कि. म्हणजे ३५२०० हेक्टर एवढा उरलेला आहे. थोडक्यात, ब्रह्मपुत्रा नदी प्रतिदिन या बेटाचा घास घेत आहे. तिची भूक वाढवण्यासाठी मानव स्वतः जबाबदार आहे. आसाममधील जोहरट शहरापासून या बेटावर जाण्यासाठी नदी पात्रामधून तब्बल दोन तासांचा प्रवास करावा लागतो. गेल्या पाच सहा दशकांपासून हे बेट थोडे थोडे म्हणजे हेक्टरमध्ये वाहून जात आहे. या शतकांच्या मध्यापर्यंत तरी हे बेट खरंच राहील का, अशी तज्ज्ञांना भीती वाटत आहे. या बेटाची लोकसंख्या अंदाजे एक लाख सत्तर हजार असून, त्यात मूळचे आदिवासी जेमतेम ४० टक्के उरले आहेत. २४६ गावांचे हे बेट आता २११ वर स्थिरावले आहे. १९९१ च्या ब्रह्मपुत्रेच्या महापुरामध्ये ३५ गावे पूर्णपणे वाहून गेली. आजपर्यंत १२ हजार शेतकरी कुटुंबे ब्रह्मपुत्रेच्या भीतीमुळे जवळच्या जोहरट शहरात स्थलांतरित झाली आहेत. माजौलीमधील आदिवासी शेतकरी भात, पारंपरिक कडधान्य अशा पिकासोबत मत्स्यशेतीही करतात. त्यांच्या शेतीला स्थानिक वैष्णव पंथाकडून प्रोत्साहन मिळते. १५ व्या शतकात स्थापन झालेल्या या पंथाच्या १९०० व्या शतकापर्यंत ६५ शाखा (सत्र)पर्यंत पोहोचला. नदीच्या तीव्र रूपामुळे २२ वर स्थिरावला आहे. या पंथात स्थानिक सुमारे ९० टक्के आदिवासी शेतकरी समाविष्ट असून, पारंपरिक बियाण्यांच्या संवर्धनाचे मोठे काम पंथामार्फत केले जाते. शेतकऱ्यांना निवारा, त्यांच्या मुलांना शिक्षण, मुलींचे विवाह या बरोबर भविष्यामधील वातावरण बदलाला सामोरे जाण्यासाठी शेती शाश्‍वत करण्यासाठी पंथातर्फे मार्गदर्शन केले जाते. कुटुंबापुरते उत्पन्न बाजूला ठेवून उर्वरित धान्याची खरेदी पंथ करतो. अनेक शेतकरी शेती उत्पादन पंथाला मोफतही देतात. मानवनिर्मित जंगल  माजौली बेटाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या बेटावर भारताचा पहिला मानवनिर्मित जंगलाचा निर्माता राहतो. ब्रह्मपुत्रेच्या पुरापासून बेट वाचविण्यासाठी जाधव मोलाई पायंग या आदिवासी अवलियाने बेटाच्या सर्व बाजूंनी पाण्यालगत वृक्षांची लागवड केली आहे. एकहाती १३६० एकरांवर जंगलनिर्मिती केली. या महान कार्याबद्दल त्यांना २०१५ मध्ये पद्मश्री देण्यात आली. माजौलीच्या ३५,२०० हेक्टर क्षेत्रातील सुमारे ५५० हेक्टरवर घनदाट जंगल झाले. त्यात आता शेकडो हत्ती, वाघ, हरीण, गिधाडेही रहिवासास आली आहेत. एक झाड लावणारेही जिथे आपला उदो उदो करून घेतात, तिथं पायंग यांनी झाडे लावलीच नाहीत, तर स्वतः पाणी घालून जगवत जंगल उभारले. या अरण्यक माणसाच्या महान कार्यासमोर उभे राहण्याचीही आपली पात्रता नाही. वातावरण बदल आणि चहा मळे भारतामधील ५० टक्के चहा आसाममध्ये तयार होतो. राज्याची १७ टक्के लोकसंख्या ८०० मोठे आणि ४३०० लहान चहा मळ्यांमध्ये काम करते. या क्षेत्राला वातावरण बदल सतावत आहे. अनेक शेतकरी बांबू, संत्रा, अननस आणि लिंबू शेती सोडून चहा मळ्याकडे वळले आहेत. पूर्वी चहा मळ्यातून चांगला नफा मिळाला असला तरी गेल्या दोन दशकांपासून पानांचे उत्पादन कमी होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. १९९० पर्यंत हेक्टरी १७०० किलो चहापत्तीचे उत्पादन आज १४०० पर्यंत घसरले आहे. पूर्वी मॉन्सूनमध्ये चारही महिने सलग सारखा पाऊस पडे. आता पावसाचे दिवस कमी झाले आहे. काही वेळा एकाच दिवसात पावसाकडून महिन्याची सरासरी पूर्ण होते. एकाच दिवशी कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पर्वत उतारावरील चहाचे मळे वाहून जातात. मुळाजवळची माती वाहून जाऊन ती उघडी पडतात. पानांची संख्या कमी होते. हवामान बदलावर मात करण्यासाठी अलीकडे ‘मल्चिंग’चा वापर होत आहे. अर्थात, या वातावरण बदलाचा वेगळाच फायदा चहा मळ्यांना झाला आहे. चहाच्या पानात पन्नास प्रकारची नैसर्गिक रसायने असतात. हवामानातील बदलामुळे ग्रीन हॉपर कीटकाकडून चहाची कोवळी पाने फस्त होत. त्यांना प्रतिकार करण्यासाठी पानात अधिक रसायने तयार केली जातात. त्यामुळे उत्पादन कमी झाले तरी चहाचा दर्जा सुधारला. उत्कृष्ट चहामुळे नफा वाढला. चीन, तैवानप्रमाणे आसामही या क्षेत्रात आता प्रगती करत आहे. काळा भात  वातावरण बदलास सामोरे जाताना अन्य ईशान्येकडील राज्याप्रमाणे आसामनेही पारंपरिक वाणांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. मणिपूर राज्याकडून आसामला मिळालेल्या काळ्या भाताचे बियाणे. मणिपूरमधील हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या वाणाने आसाममध्ये चांगलेच बस्तान बसवले आहे. आसाम कृषी विद्यापीठ आणि केंद्र शासनाच्या योजनांतून असामी शेतकरी ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांच्या खोऱ्यात या भाताचे उत्पादन घेतता. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे स्थलांतर थांबू लागले. गोहत्ती शहरांमधील रेनफिल्ड, लॉलंड भात संशोधन केंद्रातून शेतकऱ्याना संपूर्ण मार्गदर्शनाबरोबरच बियाणेसुद्धा दिले जाते. हा काळा भात जीवनसत्त्व ‘अ’ने परिपूर्ण असून, पूर्वी केवळ राजे महाराजांच्या रसोई खान्यात शिजणाऱ्या खिरीमध्ये सापडे. माझ्या चीन भेटीत ‘फॉरबीडन सिटी’ ऐतिहासिक चिनी महाजांचे वैभव जतन केलेले पाहण्यास मिळाले. त्या संग्रहालयात ‘फॉरबीडन राइस’ म्हणजेच काळा भात दिसला. फक्त राजघराण्यातील लोकांच्या आहारात त्याला स्थान होते. मणिपूरमध्ये सार्वजनिक भोजनात प्रत्येकाच्या ताटात एक चमचा काळा भात वाढला जातो. हा काळा भात ब्रह्मपुत्रेचा महापुरातही लव्हाळ्याप्रमाणे वाकून नतमस्तक होतो आणि पूर ओसरला की पुन्हा ताठ मानेने उभा राहतो. ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती’ या अभंगाप्रमाणे वातावरण बदलास सामोरे जाण्याचा मार्ग आसाम शिकत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com