यशाला आवश्यक पैलू पाडणारे गुजरात

वातावरण बदलावर बंगालच्या उपसागराचा प्रभाव असलेली ओडिशा, प. बंगाल आणि अरबी समुद्राचा प्रभाव असलेली तमिळनाडू आणि गुजरात ही राज्ये वातावरण बदलासाठी अधिक संवेदनशील आहेत. या भागात आपण गुजरात राज्याचा थोडक्यात आढावा घेऊ. रत्नाला पैलू पाडण्यासाठी प्रसिद्ध राज्यात कृषी क्षेत्रातही यशाला पैलू पाडले जातात.
यशाला आवश्यक पैलू पाडणारे गुजरात
यशाला आवश्यक पैलू पाडणारे गुजरात

गुजरात हे भारताच्या प. किनारपट्टीवरील कृषिदृष्ट्या विकसित राज्य आहे. अरबी समुद्राचा तब्बल १६०० किमी लांब किनारा असलेल्या या राज्यात ३३ जिल्हे असून, कृषी हवामानाधारित आठ विभाग आहेत. त्यासाठी कार्यरत अशी चार कृषी विद्यापीठे असून, त्यांचे राज्याच्या कृषी विकास क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रापैकी ५८ टक्के भूभाग शेतीखाली असून, ५० टक्के लोकसंख्या शेतीवर आधारित आहे. कृषी क्षेत्रावरील अवलंबित्व कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे या राज्यात झालेले औद्योगिकीकरण आणि उपलब्ध दळणवळण. गुजरातच्या यशस्वी कृषी क्षेत्राचे सहा मुख्य पैलू १) करारबद्ध शेती २) त्वरित उपलब्ध बाजारपेठ ३) शीतगृहांची विपुलता ४) शेतीमालावरील प्रक्रियांचे जाळे ५) शेतीसाठी वापरलेले उच्च तंत्रज्ञान ६) शेतीमालाचे निर्यातीकरण. या राज्यात शेतीमालाच्या वाहतुकीसाठी लहान खेड्यापर्यंत पोहोचलेले पक्के रस्ते आहेत. विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यांवर लहान मोठी तब्बल ४१ बंदरे असून, निर्यातीस पूरक वातावरण आहे. अशा सर्व सुविधांमुळे येथील शेतकरी योग्य दर मिळेपर्यंत मालाची विक्रीच करत नाहीत.

गुजरात हे राज्य दादरा नगरहवेली, दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशाबरोबरच राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांतास जोडलेले आहे. राज्यामध्ये तब्बल १८५ नद्या आहेत. त्यापैकी फक्त ८ नद्या बारमाही असून, त्याही दक्षिण गुजरातमध्ये आहेत. उरलेल्या ९७ नद्या कच्छ आणि ७१ सौराष्ट्र भागात आहेत. फक्त पावसाळ्यातच वाहणाऱ्या या नद्या हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात कोरड्याठाक असतात. तेथील वृद्ध शेतकरी म्हणतात, ‘‘पूर्वी आम्हाला हिवाळ्यापर्यंत या नद्यांचे पाणी थोडेफार पिण्यासाठी तरी उपलब्ध होई. मात्र गेल्या दोन दशकांपासून कच्छ, सौराष्ट्र भयंकर तापत असून, नद्यांमध्ये पाण्याचा थेंबसुद्धा पाहावयास मिळत नाही.’’ वातावरण बदलाचा या नद्यांवर परिणाम झाला असून, लोकांना पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी झगडायला लावत होता. अलीकडेच सरदार सरोवरामुळे लोकांना निदान पिण्याचे पाणी तरी मिळत आहे. राज्यात नर्मदा, तापी, साबरमती या मोठ्या नद्यांबरोबरच अरवली, सह्याद्री, विंध्य आणि सातपुडा या डोंगररांगा आहेत. त्याचबरोबर ‘रण ऑफ कच्छ’ म्हणजेच वाळवंट आहे. येथील शेतकरी बाजरी, ज्वारी, शेंगदाणा, तंबाखू, कापूस, गहू, तांदूळ, ऊस आणि जवस यांची शेती करतात. नगदी पीक म्हणून बडीशेप आणि इसबगोल यांनाही महत्त्व दिले जाते. वातावरण बदलाचा प्रभाव अन्य पिकांच्या तुलनेत तांदूळ, कापूस आणि गव्हावर जास्त जाणवत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. फळशेतीमध्ये केळी, आंबा, चिकू आणि खजूर शेतकऱ्यांना मालामाल करतात. गुजरातच्या कृषीक्षेत्र सुजलाम् सुफलाम् करण्यात नर्मदा नदीवरील सरदार सरोवराचा मोलाचा वाटा आहे. अन्य राज्यांप्रमाणे गुजरातनेही २०१३ मध्येच २०३० पर्यतचा वातावरण बदलाचा अहवाल तयार केला. त्या सोबतच १९८६ ते २०१९ या ३३ वर्ष कालखंडाचा अभ्यास अहवालही आयआयएम, अहमदाबाद आणि आयआयटी, गांधीनगर या जगप्रसिद्ध शिक्षण संस्थाकडून तयार करून घेण्यात आला. २०२० पासून त्यातील निष्कर्ष व सूचनांवर अंमलबजावणीला सुरुवातही केली. अहवालातील प्रमुख मुद्दे ः १) गेल्या ३३ वर्षांच्या कालखंडामध्ये गुजरातमध्ये २.९ अंश सेल्सिअसने तापमान वाढ झाल्याचे म्हटले असून, २१ व्या शतकाअखेरीस ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची अंदाज वर्तविण्यात आला आहे. २) तापमानातील वाढीसाठी वाढता कर्ब वायू कारणीभूत असून, त्यास जीवाश्म इंधन, जंगलाचा नाश आणि शेत जमिनीवरील औद्योगिकीकरण जबाबदार असल्याचे अधोरेखित केले आहे. ३) यापुढे पाऊस आणि उष्णता दोन्हींमध्ये वाढ होणार असून, पावसाचे प्रमाण १५ ते २५ टक्के जास्त असणार आहे. ४) भविष्यातील संशोधन अंदाजानुसार यापुढे गुजरातमध्ये थंडीचे दिवस आणि गारठ्याच्या रात्री कमी होणार आहेत. उष्ण दिवस आणि उष्ण रात्रीसोबत उष्णतेच्या लाटा वाढणार आहेत. उत्तर पश्‍चिम गुजरातच्या बनासकांठा, साबरकाठा, अरावली, डाहोड, पाटन, मेहसाना, खेडा, पंचमहाल आणि आनंद हे यापुढे वाढत्या तापमानास सामोरे जातील, तर कच्छ, पोरबंदर, द्वारका, जुनागढ, गीर सोमनाथ यांना उष्णतेच्या लाटा त्रस्त करतील. ५) या अभ्यासपूर्ण अहवालास सकारात्मक प्रतिसाद देत येथील शासनाने शेतकऱ्यांना पीक पद्धतीमध्ये बदल सुचवले आहेत. कृषी विद्यापीठांकडून विकसित नवीन पिकांचे वाण स्वीकारण्यास सुचवले जात आहे. राज्याने वातावरण बदलासंदर्भात स्वतंत्र खातेच तयार केले आहे. जो शेतकरी वातावरण बदलानुसार त्याचा शेतीत बदल करेल, त्याला ‘क्लायमेट चेंज फंडातून’ मदत देण्याचे जाहीर केले आहे. ६) राज्यामध्ये ठिबक सिंचनाबरोबरच सौरऊर्जा, पवनऊर्जा यांना प्रोत्साहन व आर्थिक मदत दिली जाते. चक्रीवादळाचा वाढता धोका

विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यांचे फायदे उपभोगणाऱ्या गुजरात राज्याला सर्वाधिक धोकाही तिकडूनच येणाऱ्या मोठ्या चक्रीवादळांचा आहे. कच्छ भागामधील गुजरात वाळवंट परिसंस्था संशोधन संस्थेने या भागामधील वातावरणाचा मागील ५ वर्षांचा अभ्यास केला. त्यानुसार या भागात पूर्वी जून ते सप्टेंबर या काळातच पाऊस पडत असे. तो आता बाराही महिने पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे मते हा अंदाज खरा होत असून, त्यांच्या काळा हरभरा आणि बडीशेपच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. एरंडी पिकांवरही विपरीत परिणाम झाला आहे. या अभ्यासानुसार अनियमित पाऊस, त्याचबरोबर गारा, चक्रीवादळे हे येथे आता कायम राहणार आहेत. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना पीक पद्धतीच बदलावी लागणार आहे. शासनासमोर नियमित येणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना उभारी देण्याचे मोठे आव्हान असणार आहे. हवामान बदलाविरुद्धची लढाई सुरू झाली असून, त्यात अनेक शेतकरी उतरल्याचे दिसते. नवे तंत्रज्ञान स्वीकारण्यामधील येथील शेतकरी आघाडीवर असून, सन २००० च्या उंबरठ्यावर बीटी बियाण्यांनी त्यांना मालामालही केले. मात्र भविष्यामधील वातावरण बदलाचे भयावह संकट, कीड-रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे वाढत चाललेले नुकसान याकडे लक्ष वेधले जात आहे. शेती आणि शेतकऱ्यांना यातून बाहेर काढण्यासाठी पर्यायी पीक पद्धती निवडण्याचा, फळबाग लागवडीचा आग्रह केला जात आहे. त्यासाठी अनुदानात वाढीसह कृषी शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नेले जात असल्याने फरक जाणवत आहे. राज्यपातळीवर राबवला जाणारा कृषी महोत्सव विपरीत वातावरण स्थिती असतानाही गुजरात राज्य कृषी क्षेत्रात आघाडीवर का आहे, याचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय अन्नधान्य धोरण संशोधन संस्था (IFPRI) पुढे आली. त्यांनी केलेल्या अभ्यासातून पुढे आलेले पैलू म्हणजे यशस्वी डेअरी उत्पादन, फळे आणि भाजीपाल्याची शेती, दुष्काळी भागात कायमचा पाणी पुरवठा, कृषी माल वाहतुकीसाठी पक्के रस्ते आणि पावसाच्या प्रत्येक थेंबाचे पाणी जमिनीमध्ये जिरवण्यासाठी विविध योजना. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे येथील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे आणि कृषी संशोधन संस्थांतील संशोधन पोचवण्यासाठी केला जाणारा राज्य पातळीवरील कृषी महोत्सव. नव्या तंत्राची केवळ ओळख करून देऊन थांबण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या शेतीवर प्रात्यक्षिके, प्रयोग राबवले जाते. राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या तालुका पातळीवर एप्रिल, मे महिन्यात हा कृषी महोत्सव आयोजित केला जातो. यामध्ये हजारो शास्त्रज्ञांसोबतच यशस्वी शेतकरीही सहभागी होतात. प्रतिवर्षी जानेवारी महिन्यात भरणाऱ्या ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ सारखेच आयोजन असले तरी शेतकऱ्यांच्या यशाचा गौरव आणि शास्त्रीय मतांचे अनुकरण एकाच वेळी करणाऱ्या या आयोजनाला दाद द्यावी, तेवढी थोडीच!  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com