agricultural stories in Marathi, Dr. Nagesh Tekale, climate change, Madhyapradesh | Page 3 ||| Agrowon

वातावरण बदलाविरुद्ध क्रांतीच्या तीन दिशा

डॉ. नागेश टेकाळे
सोमवार, 8 नोव्हेंबर 2021

बुंदेलखंड हा भूभाग मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये विभागलेला आहे. मध्य प्रदेशातील वातावरण बदलाविरुद्ध लढणारे दोन शेतकरी वीर हे पीक बदल, सेंद्रिय शेती प्रसारातून मार्ग शोधत आहेत. तर उत्तर प्रदेशातील अग्रोहातील महिलांनी केलेली जलक्रांती आपल्याला नक्कीच विचार करण्यास भाग पाडेल.

भारताच्या उत्तर भागामधील सर्वांत जास्त लोकसंख्येचे राज्य म्हणजेच उत्तर प्रदेश. क्षेत्रफळामध्ये ब्रिटनएवढ्या आकाराचे राज्य पर्वत, नद्या, शेती आणि शेतकऱ्यांनी समृद्ध आहे. या राज्याने २०१४ मध्ये वातावरण बदल व त्याचा भविष्यामध्ये शेतीवर होणारा परिणाम याविषयी सविस्तर अहवाल तयार केला.
या अहवालात दिलेल्या माहितीनुसार,

  • २०५० पर्यंत राज्याच्या पावसामध्ये १५ ते २० टक्के वाढ होणार आहे. तापमान १.८ ते २.१ अंश सेल्सिअसने वाढणार आहे. वाढलेल्या तापमानाच्या प्रमाणात पाऊसही मुसळधार होतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
  • विंध्य पर्वत रांगा व गंगा नदीचे विस्तीर्ण खोरे वातावरण बदलास संवेदनशील राहणार आहे.
  • भारताच्या एकूण हरितगृह उत्सर्जनापैकी उत्तर प्रदेश हे राज्य १४ टक्के हरितगृह वायू वातावरणात सोडते. त्यामध्ये शेतीचा हिस्सा ५० टक्के आहे. सोनभद्र, रायबरेली आणि गौतम बुद्ध नगर हे तीन जिल्हे सर्वाधिक हरितगृह वायू उत्सर्जित करतात.

अहवालानुसार प्रत्यक्ष कृतीसाठी सक्षम पावले उचलण्यास राज्य शासनाने सुरुवात केली आहे. त्यासाठी शाश्‍वत शेती, सौरऊर्जा, वृक्ष संवर्धन व संरक्षण, हवामान बदलाच्या परिणामाचे लोक शिक्षण, हिमालय संरक्षण अशा विषयावरील सात कृतिशील कार्यक्रमाची आखणी केली आहे. राज्यामधील ८० टक्के शेतकरी आणि त्यांची शेती यांना केंद्रबिंदू ठेवून कृषी क्षेत्राचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये सुद्धा एकूण अकरा कार्यक्रम निश्‍चित केले आहेत. त्यानुसार हवामान बदल आणि कृषी यासंदर्भात जिल्हा पातळीवर स्वतंत्र कार्यालय करून तेथून या कार्यक्रमावर नियंत्रण ठेवण्यात आले. हवामान बदलाचे संवेदनशील भाग, हवामान बदलांचे प्रशिक्षण, कर्ब साठवणूक प्रक्रिया त्यानुसार वृक्ष आणि पिकांची निवड, सेंद्रिय शेती प्रसार कार्यक्रम, प्रत्येक तालुक्यामधील एक गाव संपूर्ण सेंद्रिय करणे, शेत जमीन प्रक्रिया त्यासाठी लागणारे यांत्रिकीकरण, खरीप आणि रब्बीमध्ये पारंपरिक पिकांची शेती आणि त्यासाठी खास अनुदान, दुष्काळ आणि पूरस्थिती तसेच उष्णता सहन करणारी संकरित वाणे, भात शेतीमधून मिथेनचे उत्सर्जन कमी करणे, ॲग्रो फॉरेस्ट्रीला प्रोत्साहन आणि विद्यापीठांना हवामान बदल आणि कृषी संबंधी संशोधनासाठी स्वतंत्र आर्थिक मदत इ. गोष्टीवर काम केले जात आहे.

उत्तर प्रदेशातून देशाच्या एकूण आवश्यक कृषी उत्पादनापैकी १९ टक्के पुरवठा होतो. येथील ९२ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. आज या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची हमी राज्य शासनाकडून दिली जात आहे. राज्यामध्ये गंगा, यमुना, घागरा, शरयू अशा ३१ वाहत्या नद्या आहेत. परिणामी ऊसशेती मोठी आहे. सध्या वातावरण बदलामुळे या सर्व नद्या सप्टेंबर अखेरपर्यंत दुथडी भरून वाहतात. एकेकाळी शेतीसाठी प्रसिद्ध असे गंगेचे सुपीक खोरे सातत्याने येणाऱ्या पुरांमुळे धोक्यात येत आहे. या नद्यांचा कोप कमी करण्यासाठी तीरावर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड सुरू आहे.
गहू, भात, मका आणि ऊस ही प्रमुख पिके. अलीकडे सोयाबीननेही मोठे क्षेत्र व्यापले आहे. मोहरीचीही लागवड प्रचंड आहे. ऊस हे पीक वातावरण बदलास जास्त संवेदनशील आहे. वातावरणात उष्णता वाढू लागली की उसामधील साखरेचे प्रमाण कमी होऊ लागते. साखरेच्या जास्त उताऱ्यास कडाक्याची थंडी आवश्यक असते. ऊस शेतीमुळे अनेक नद्या प्रदूषित झाल्या आहेत. कारण नद्यांमध्ये येणाऱ्या गाळासोबत रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे अंशही येतात. हे टाळण्यासाठी शासनाने स्थानिक सामाजिक संस्थांच्या
माध्यमातून गंगा किनारी मोठ्या प्रमाणावर जैविक शेती सुरू केली आहे.

अग्रोहातील जलक्रांती

उत्तर प्रदेशमधील बुंदेलखंडच्या भूभाग पाणीटंचाईमुळे भाजून निघत आहे. दोन राज्यात विभागलेल्या १४ जिल्ह्यांची उन्हाळ्यामधील परिस्थिती फारच वाईट असते. दोन दशकांपूर्वी या भागात दहा हजार पाण्याचे साठे होते, आज एकही शिल्लक नाही. वाढती उष्णता यास कारणीभूत आहे. सध्या या भागात इस्राईलच्या साह्याने पाणी उपलब्धता व संवर्धनाचे कार्य शासनाने हाती घेतले आहे. अनेक मृत पाणीसाठे जिवंत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे गावागावांमधील महिल्या यात आघाडीवर आहेत. बबिता या १९ वर्षाच्या मुलीने सत्तर एकर क्षेत्रावर पसरलेल्या कोरड्या तलावात पावसाच्या पाण्याचा साठा केला. ही जलक्रांतीच होय. अग्रोहा या गावात डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा तलाव बबिताने जिवंत केला. डोंगरावरून १०७ मीटर लांब पाट खोदून २०० स्त्रियांच्या मदतीने वन खात्याच्या सहकार्याने तलावात सात महिन्यांच्या परिश्रमाने पाणी आणले. रिकाम्या तलावात अनेक शेतकऱ्यांनी आक्रमण करून तेथील थोड्या उपलब्ध पाण्यावर शेती सुरू केली होती. बबिताने त्यांना पिण्याच्या पाण्याचे महत्त्व समजावून दिले. एक स्त्री संपूर्ण गावाविरुद्ध लढा देत होती. २०१७ पासूनच्या या लढ्यात अखेर स्त्रियांचा विजय झाला. आज या तलावाच्या ४० एकर क्षेत्रात पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे.

मध्य प्रदेशातील दोन योद्धे

१) अल्प कालावधीचे पीक ठरले फायदेशीर

बुंदेलखंड भागातील सागर या दुष्काळी जिल्ह्यातील अलमबीरसिंग रंधवा या शेतकऱ्याची ही यशोगाथा. या पंजाबी शेतकऱ्याची वडिलोपार्जित १६० एकर शेती आहे. १९१२ मध्ये पणजोबांनी खरेदी केलेल्या या जमिनीतून पणजोबा, आजोबा यांनी भरपूर उत्पादन घेतले. १९३० मध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांचा सत्कारही केला होता. कायम शाश्‍वत उत्पादन देणाऱ्या या शेतीचे वातावरण बदलामुळे गेल्या दोन दशकांत हाल झाले. खरीप मिळतच नव्हता, रब्बीतील गव्हाचे उत्पादनही नेहमीच्या अर्धेच मिळे. त्यांच्या शेतीवर कृपा करत पूर्वी शेताजवळून वाहणाऱ्या दोन्ही नद्या कोरड्या पडल्या. २०१६ मध्ये त्यांनी तब्बल १५ विंधन विहिरी घेतल्या. त्यात केवळ दोन विंधन विहिरींना थोडे पाणी लागले. इतक्या अल्प पाण्यावर कसे होणार? रंधवा यांनी गहू आणि सोयाबीन पिकांवर तुळशीपत्र ठेवले. १२० एकरमध्ये धने लावले. एकरी ५ क्विंटल उत्पादन मिळाले. त्याला प्रति क्विंटल १० हजार रु. दर मिळाला. गेल्या पाच वर्षांत गहू आणि सोयाबीनमधून मिळाले नाही, इतके उत्पन्न या एका पिकातून मिळाले. वाढत्या उष्णतेमध्ये धने पिकात अधिक सुवास निर्माण झाला. पीक पद्धतीमध्ये बदल करून वातावरण बदलास कसे तोंड द्यायचे, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

२) काळ्या आईचा पदर सोडू नका

ताराचंद वेलजी यांच्याकडे ६ एकर शेती. वाडवडिलांपासून २००० पर्यंत रासायनिक खतांचा भरपूर वापर करून पिके घेत. शेतीची शोकांतिका सुरू होतीच. योगायोगाने ते चित्रकुटमध्ये भारतरत्न स्व. नानाजी देशमुखांच्या संपर्कात आले. त्या परिसरामधील सेंद्रिय शेती व तिच्या उत्पन्नावर आधारित विविध प्रकल्प आणि त्यामुळे स्वावलंबी झालेली गावे त्यांनी पाहिली. लोकांचे आरोग्य, आनंद आणि नानाजींची निसर्ग शेतीबद्दलची तळमळ पाहिली. नानाजींनी २००९ मध्ये त्यांना नरसिंगपूर हे संपूर्ण गावच दत्तक दिले. तिथे सेंद्रिय शेती करण्यास सांगितले. त्यात यश मिळाल्यावर ताराचंद यांनी ‘प्राकृतिक खेती शोध संस्था’ स्थापन केली. त्यामार्फत सियोनी, बालाघाट आणि मांडला या वातावरण बदलामुळे प्रभावित जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीच्या प्रसाराला सुरुवात केली. जी. बी. पंत कृषी विद्यापीठात वातावरण बदलामध्ये सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि त्यांच्या यशोगाथा यावर नियमित व्याख्याने दिली. जवळपास २०० परिषदांमध्ये भाग घेतलेले ताराचंद आजही देशामधील १९ राज्यांना या क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करत आहेत. अगदी नेपाळ, बांगलादेशातील शेतकऱ्यांचेही सल्लागार आहेत. त्यांची स्वत:ची सत्तर प्रकारची सेंद्रिय उत्पादने असून ती गाईच्या शेणामध्ये मिसळून पिकांना दिली जातात. ते म्हणतात, “ज्या भौगोलिक प्रदेशात भविष्यामध्ये वातावरण बदलाचा परिणाम तीव्र होणार आहे तेथील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी घाबरून आपल्या काळ्या आईचा पदर सोडू नका, सेंद्रिय शेती आणि पारंपारिक बियाणाची कास धरा. निसर्गाबरोबरच चला, तुमचा विजय निश्चित आहे.”
 


इतर ताज्या घडामोडी
पाणीपट्टी ऊसबिलातून वसूल केल्यास आंदोलनसांगली ः  शेतकऱ्यांकडील पाणीपट्टीची रक्कम...
अकोला जिल्हा परिषदेत नववर्षातही राजकीय...अकोला ः गेले वर्षभर जिल्हा परिषदेत सुरू असलेले...
पुणे विभागात ज्वारी क्षेत्रात...पुणे : परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने...
येल्लकी वाणाच्या केळीला क्विंटलला चार...जळगाव  ः वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील...
घरच्या घरी भाजीपाल्यासाठी ‘जिजाई नॅनो...सोलापूर ः घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने आणि अगदी...
बलून बंधाऱ्यांसाठी गिरणा परिक्रमा सुरू जळगाव ः  गिरणा नदीवर प्रस्तावित बलून...
घाटणे बॅरेजमध्ये गेलेल्या जमीनीची...सोलापूर ः मोहोळ तालुक्यातील आष्टी उपसा सिंचन...
पुणे जिल्ह्यात ९ हजारांवर कुटुंबांना...पुणे ः ‘‘राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जिल्ह्यात...
पाटण तालुक्यात पुराच्या धोक्याकडे...मोरगिरी, जि. सातारा : तालुक्यात वाढत्या पावसाच्या...
मराठवाड्यात २१ लाख २१ हजार हेक्‍टरवर...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा रब्बी पेरणीत आजवर २१...
परभणी, हिंगोलीत ‘शेतमाल तारण’द्वारे दोन...परभणी ः ‘‘शेतीमाल तारणकर्ज योजनेअंतर्गत परभणी...
‘सिद्धेश्वर’ च्या अध्यक्षपदी काडादी, ...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर...
सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळावर... सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
लासलगाव येथे खत विक्रेत्याकडून जादा...नाशिक: रब्बी हंगामातील पेरण्या सुरू असून काही...
उष्णता ताणाचे वासराच्या आरोग्यावर दीर्घ...दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा...
नांदुरा येथे कापसाचे दर नऊ हजार रुपये...नांदुरा, जि. बुलडाणा ः कॉटनबेल्ट म्हणून ओळख...
वाशीम जिल्ह्यात रब्बी हंगाम अर्ध्यावर;...रिसोड, जि. वाशीम ः यंदाचा रब्बी हंगाम अर्ध्यावर...
अमरावती जिल्ह्यातील १९५९ गावांत...अमरावती : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील २ लाख...
कवठेमहांकाळ तालुक्यात पिकाचे पंचनामे...घाटनांद्रे, जि. सांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यात...
पुणे जिल्ह्यातील १ हजार शेतकरी होणार...पुणे ः जिल्ह्यात १ हजार शेतकरी कृषी निर्यातदार...