तीव्र वातावरणात तग धरणारी बाजरी तारते

आरवलीच्या समांतर पर्वतरांगामुळे राजस्थानचे दोन भाग पडतात. एक भाग शेतीसाठी त्यातल्या त्यात पोषक, तर दुसऱ्या भागात थर वाळवंटाचे सावट. तीव्र तापमान, वालुकामय जमीन, खोलवर गेलेले भूजल आणि पावसाचे अत्यल्प प्रमाण अशा स्थितीत बाजरीसारखे काटक पीक येथील शेतकऱ्यांच्या मदतीला येते.
तीव्र वातावरणात तग धरणारी बाजरी तारते
तीव्र वातावरणात तग धरणारी बाजरी तारते

उत्तर पश्‍चिम भारतामधील क्षेत्रफळामध्ये सर्वांत मोठे राज्य म्हणजे राजस्थान. याला ‘राजांची भूमी’ असेही म्हणतात. स्वातंत्र्यपूर्व काळात राजपुतांचे राज्य म्हणून ‘राजपुताना’ म्हणूनही ओळखले जाई. राजस्थान हे पाकिस्तानच्या पंजाब सिंध भागास थरच्या वाळवंटाच्या माध्यमातून जोडले गेले आहे, तर भारतातील पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात ही पाच शेजारी राज्ये आहेत. राज्याच्या जवळपास मधोमध जाणाऱ्या अरवली पर्वताच्या रांगांमुळे भौगोलिकदृष्ट्या राज्याचे उत्तर मध्य आणि दक्षिण पूर्व असे दोन भाग पडतात. उत्तरमध्य भाग हा राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ६० टक्के आहे. हा सर्व भाग संपूर्ण वाळवंटी, कोरडा, शेतीला अयोग्य आणि पाण्याचे दुर्भिक्ष असलेला. जगप्रसिद्ध ‘थर’चे वाळवंटही याच भागात पसरलेले. जोधपूर, जैसलमर, बारमेर, बिकानेर, नागौर ही राज्याच्या दक्षिण पूर्व भागावर शेतीसाठी अवलंबून असलेली प्रमुख शहरे या भागात आहे. अरबी समुद्रावर तयार होणारे दक्षिण पूर्व मॉन्सूनचे ढग अरवली पर्वतरांगांच्या समांतर रचनेमुळे अडवले न जाता तसेच पुढे जातात. परिणामी, राजस्थानमध्ये पावसाचे प्रमाण जेमतेम ४०० मि.मी. किंवा त्यापेक्षाही कमी राहते. कमी पाऊस, संपूर्ण वाळवंटी असलेल्या या भागात सर्वत्र काटेरी झुडपांचे जंगल आहे. ‘लुनी’ नावाची एकच नदी अरवली पर्वतांच्या पुष्कर खोऱ्यामध्ये उगम पावते. ५०० कि.मी. दूर प्रवास करत ‘रन ऑफ कच्छ’ ला जाऊन मिळते. या नदीचे वैशिष्ट्य म्हणजे डोंगर दरीमधून ही पृष्ठभागावर आली की पाण्याची चव बदलून खारवट होते. ‘घागर’ नावाची अजून एक नदी हरियानामधून या थरच्या वाळवंटात येते आणि येथेच वाळूमध्ये जिरून जाते. ही नदी फक्त पावसाळ्यामध्येच पाहावयास मिळते. राजस्थानचा दुसरा भौगोलिक भाग म्हणजे दक्षिण पूर्वमध्ये अंदाजे ४० टक्के आणि तसा उंचावर आहे. मात्र या भागात भरतपूरची सपाट समृद्ध जमीन आहे. चंबळ नदी याच भागामधून वाहते. राजस्थानच्या या भागात उत्तर पश्‍चिमच्या तुलनेत पाऊसही जास्त (६०० मि.मी.), पाणी भरपूर आणि जंगलसुद्धा आहे. चंबळप्रमाणे ‘बनास’ आणि गंगेच्या काही उपनद्या या भागात पाहावयास मिळतात. राजस्थानांमधील जमीन तशी खारवट (saline) आहे. भूगर्भात पाणी पातळी २०० फुटांपेक्षाही खालीच. जमिनीत नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याचा फायदा शेतीला होतो. राजस्थानमधील बहुतांश सर्व शेती दक्षिण पूर्ण भागातील पोषक भूभागामध्ये होते. येथील शेतकरी गहू, जव, ज्वारी, बाजरी, मका, तेलबिया आणि डाळवर्गीय पिके घेतात. खरिपात बाजरीचे पीक राजस्थानमध्ये खरिपामध्ये सर्वांत जास्त घेतले जाते. हे पीक वालुकामय माती, उष्ण तापमान आणि कमी पावसामध्ये येते. वातावरण बदलाचा प्रभावही या राज्यावर जास्त जाणवतो, तो या थरच्या वाळवंटामुळे. इथल्या तीव्र परिस्थितीशी झगडताना सध्या आणि भविष्यातही जुळवून घेऊ शकणारे स्थानिक पीक म्हणजे बाजरी. हे शेतकऱ्यांना चांगलेच माहीत आहे. शासनातर्फे बाजरीचे संकरित बियाणे, लागणारी खते, मिळणाऱ्या उत्पादनाची त्वरित खरेदी, साठवणीसाठी शासनातर्फे अल्प भाड्यामधील साठवणगृहे यामुळे जवळपास प्रत्येक शेतकऱ्याचा कल बाजरीकडेच असतो. राजस्थान शासन दर वर्षी बाजरीची खरेदी करते. अरब राष्ट्रांनाही ती निर्यात केली जाते. कृषी विभागाच्या प्रयत्नाने येथील शेतकरी आज या पिकाची २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टर इतके बाजरीचे उत्पादन घेत आहेत. ही एक प्रकारे वातावरण बदलावर शेतकऱ्यांनी केलेली मातच आहे. बाजरीच्या चाऱ्याला सुद्धा येथे फार मोठी मागणी आहे. पूर्व राजस्थानमध्ये बाजरी मोठ्या प्रमाणावर पिकते. उत्कृष्ट बाजरीची किंमत २२०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत जाते. आपल्या भूभागातील भौगोलिक परिस्थितीमध्ये शेतकरी चांगल्या प्रकारे वाढणाऱ्या स्थानिक वाणांची निवड करून चांगले उत्पादन घेत आहेत. वातावरण बदलाच्या प्रवाहामध्येही राजस्थानचे शेतकरी उत्तम शेती करू शकतात. राजस्थानमध्ये मुबलक पशुधन आहे. दुभत्या जनावरांना बाजरीचा चारा मुरघास तयार करून दिला जातो. त्याचमुळे दूध उत्पादनामध्ये हे राज्य अग्रेसर आहे. गहू आणि बाजरी अन्नधान्य पिकांबरोबरच येथील शेतकरी मोहरी, गवार, ओवा, धने, मेथी, इसबगोल, बडीशेप, लसूण आणि तेलबियांचे उत्पादन घेतात. खाद्य तेलनिर्मितीमध्येही या राज्याने आघाडी घेतली आहे. खरेतर वातावरण बदलामुळे वाढत चाललेली पाण्याची कमतरता, वाढती उष्णता, जमिनीचा खारवटपणा या अडथळ्याच्या शर्यतीतून शेतकरी कष्टाने शेतीमाल उत्पादन करतात. बहुतांश उत्पादनांची शेताच्या बांधावरूनच खरेदी केले जाते. खूप मजल गाठायची आहे ... अन्य राज्यांप्रमाणेच राजस्थाननेही ‘वातावरणबदलविषयक अहवाल’ २०१० मध्येच केंद्र शासनाला सादर केला. त्यातील शिफारशींची राज्यस्तरीय अंमलबजावणीसुद्धा सुरू केली आहे. राजस्थानचा सरासरी पाऊस ५८० मि.मी. असून, तो देशाच्या सरासरीच्या अर्धाही नाही. राज्याचे जंगलक्षेत्र जेमतेम ४ टक्के आहे. भूगर्भामधील पाणीसाठा सरासरी २०० फुटांच्याही खाली आहे. दुष्काळाची संख्या वाढणार आहेत. शेतजमिनीच्या पृष्ठभागामधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची वाफ होत आहे. शेत जमिनीमध्ये वाळूकणांचे प्रमाण वाढत आहे. उष्ण वारे वाहत असून, तापमानात सातत्याने वाढ होत आहे. नद्यांना महापूर येण्याच्या अंदाजाकडे राज्य शासन गंभीरतेने पाहत आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्याचे प्रयत्न, जंगलक्षेत्र वाढविण्यासाठी विविध योजना सध्या राबवल्या जात आहेत. राजस्थानमध्ये वातावरण बदलाचा सर्वांत धक्कादायक परिणाम दिसतो, तो राज्यामधून झालेल्या २८ टक्के लोकांच्या स्थलांतरातून. स्थलांतरविषयक हा अहवाल नोव्हेंबर २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यावरण आणि विकास या इंग्लंडमधील संस्थेने तयार केला आहे. या अहवालानुसार, घरटी एक व्यक्ती वर्षातून दोन वेळा राज्यातून अन्य राज्यात स्थलांतर करते. त्यामागे कारण असते तेही वारंवार पडणाऱ्या दुष्काळाचे. सर्वाधिक स्थलांतर दिल्ली, त्यानंतर मध्य प्रदेश आणि जम्मूमध्ये होते. एकूण स्थलांतरापैकी ३५ टक्के हे वातावरण बदलामुळे आहे, तर २८ टक्के वातावरण बदलाशी जोडलेला दुष्काळ आणि उरलेले नापिकीमुळे झाले आहे. स्थलांतराचे सरासरी वय ४४ वर्षे आणि त्यातील ७६ टक्के पुरुष वर्ग आहे. एकूण स्थलांतरापैकी ५८ टक्के शेतकरी, तर २२ टक्के मनरेगावर अवलंबून असलेले मजूर आहेत. हे स्थलांतर थांबवण्यासाठी राज्य शासनास खूपच प्रयत्न करावे लागणार आहेत, हे निश्‍चित. हे राज्य उत्पन्नांसाठी मुख्यतः शेतीवर अवलंबून आहे. सर्व आर्थिक नाड्या शेतीच्या हातात आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांचेच स्थलांतर होणे राज्याच्या प्रगतीसाठी मोठा अडथळा ठरणार आहे. भविष्यातील वातावरण बदलांचे संकट गडद होत जाण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत राजस्थानला वातावरण बदल आणि कृषी क्षेत्रात अजून भरपूर कार्य करावे लागेल, यात शंका नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com