agricultural stories in Marathi, Dr. Nagesh Tekale, climate change,Sikkim terrace farming | Agrowon

सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदान

डॉ. नागेश टेकाळे
सोमवार, 17 मे 2021

आशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान. आपल्या देशात ‘‘आनंदी शेतकऱ्यांचे राज्य कोणते?’’ असा प्रश्‍न कोणी विचारला तर ओठावर नाव येते, ते म्हणजेच सिक्कीमचे!

आशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान. आपल्या देशात ‘‘आनंदी शेतकऱ्यांचे राज्य कोणते?’’ असा प्रश्‍न कोणी विचारला तर ओठावर नाव येते, ते म्हणजेच सिक्कीमचे! भूतानने आपल्या नागरिकांचे आनंदीपण मोजण्यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे. तिला तशी जागतिक मान्यता मिळाली आहे. मात्र सिक्कीम राज्यामध्ये आनंदीपणाचे मोजमाप करण्याची कोणतीही पद्धत वापरली गेलेली नाही. तरीही त्यांचे आनंदी चेहरे लपत नाहीत.

आनंद हा तुमच्याकडे चालत येत नाही, तो तुम्हाला शोधावा लागतो. त्यासाठी नकारात्मक विचारांनी भरलेली गाठोड्यांची ओझी फेकून द्यावी लागतात. सकारात्मक विचार आणावे लागतात. सकारात्मक विचारांचे ओझे होत नाही, ते प्रेरणादायी असतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘चित्ती असो द्यावे समाधान’ ही वृत्ती असावी लागते. केवळ अप्पलपोटा विचार करून चालत नाही. आपल्या भवतालातील जंगलाचा, वृक्षांचा सन्मान करत, जलदेवतेचे पूजन करत शेतीची कास धरावी. अशा पद्धतीने केलेली पारंपरिक सेंद्रिय शेती तुम्हाला कधीही दुःखी करत नाही. सिक्कीममध्ये नेमके मला हेच दिसले. खऱ्या आनंदाचा शोध मला येथील शेतीत सापडला. तो शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील हास्यामधून पाझरलेला दिसतो. भूतान किंवा सिक्कीम या सख्ख्या शेजाऱ्यांच्या नागरिकांचे किंवा शेतकऱ्यांचे हास्य मला तरी एकसारखेच दिसले. भूतानमधील सकारात्मक वातावरणाचे अनुकरण शेजारी असलेल्या सिक्कीममध्ये केले जाते. म्हणूनच भूतान हे राष्ट्र संपूर्ण सेंद्रिय झाल्यानंतर त्या पाठोपाठ भारतामधील सिक्कीमनं पहिल्या संपूर्ण सेंद्रिय राज्याची ओळख मिळवली. स्पर्धा आणि अनुकरण एवढे सुंदर आणि निकोप असू शकते. नाहीतर आपल्याकडे तू पाच एकर ऊस लावला, मीही चार बोअर घेतो आणि दहा एकर लावतो अशी स्पर्धा काय कामाची. अशी बेभान व विचारहीन स्पर्धा वाताहतीच्या महामार्गाने वेगाने प्रवास करते.

भारतामध्ये २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत. यामध्ये सर्वांत कमी लोकसंख्या सिक्कीमची. काही वर्षांपूर्वी येथील कृषी मंत्र्यांनी पत्रकारांना आवर्जून सांगितले होते, की अनेकांच्या शेतावर गेलो आहे आणि हजारो शेतकऱ्यांना मी नावाने ओळखतो. यात असत्य वाटण्यासारखे असे काही नाही. लोकसंख्या जेमतेम साडेसहा लाख, राज्याचा विस्तार ७०९६ चौ. किमी. त्यात ८२ टक्के जंगल, १० टक्के मानवी वस्तीची गावे आणि मोजकीच शहरे. जेमतेम ८ टक्के भूभागावर शेती हा व्यवसाय केला जातो. थोडक्यात, राज्याचे भौगोलिक क्षेत्र ९५,४०० हेक्टर, त्यात शेतीचा हिस्सा १०,५०० हेक्टर आणि गवताळ कुरणे १६५० हेक्टर. बाकी सर्व निसर्ग श्रीमंतीच!

भारतातील ईशान्येकडील सात राज्ये म्हणजे सात बहिणी आणि सिक्कीम हा लहान भाऊ. एकमेकांना खेटून असलेल्या या राज्यामध्ये प. बंगालचा एक मोठा पट्टा मध्ये आल्याने सिक्कीम पलीकडे भूतान, नेपाळ आणि चीनव्याप्त तिबेटच्या सीमांना जोडले गेले. हिमालयाच्या सावलीतील या चिमुकल्या राज्यात जगामधील तिसऱ्या क्रमांकावरील उंच बर्फाच्छादित शिखर ‘कांचनगंगा’ आहे. सिक्कीममध्ये कोठूनही पाहिले तरी तुम्हाला कांचनगंगाचे दर्शन घडणारच. तब्बल ८० हिमनद्या, २८ बर्फाच्छादित हिमशिखरे, १०० च्या आसपास स्वच्छ शुभ्र फेसाळ पाण्याने बाराही महिने वाहणाऱ्या लहान मोठ्या नद्या, पाच उष्ण पाण्याचे झरे हे या राज्याचे निसर्ग वैभव. ते येथील शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या पारंपरिक सेंद्रिय शेतीने टिकवले आहे. या राज्यात वाळूउपसा, वृक्षतोड, प्लॅस्टिकला पूर्ण बंदी आहे. पशुधन बंदिस्त ठेवून खाऊ पिऊ घालण्यास परवानगी नाही. त्यांना मोकळ्या गवताळ कुरणात चरावयास घेऊन जाणे बंधनकारक आहे. या पशुधनासाठी तब्बल १६५० हेक्टर क्षेत्र चारा संवर्धन आणि संरक्षणासाठी आहे. मिथेन वायू मुक्त असलेले हे राज्य नागरिकांना सेंद्रिय आरोग्यदायी दूध भांड्यामधून पुरविते. शेळी, मेंढी, याक, वराह याबरोबरच कुक्कुटपालनसुद्धा होते.

सिक्कीममध्ये भूतानमधील सेंद्रिय शेतीचे मॉडेल २००३ पासून राबवायला सुरू झाले. रासायनिक खतावर संपूर्ण बंदी गावपातळीवर राबविण्यात आली. रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळताना शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई शासनाने विविध
योजनांतून केली. अनुदानही दिले. तब्बल १३ वर्षांच्या अथक प्रयत्नांमधून २०१५ मध्ये राज्य संपूर्ण सेंद्रिय झाले. याचा सर्वांत जास्त फायदा मसाल्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना झाला. विलायची व अन्य मसाले उत्पादनात सिक्कीम हे राज्य ग्वाटेमालानंतर दुसऱ्या क्रमांकावर येते. या सर्व पदार्थांना येणारा विशिष्ट ‘गंध’ हा सेंद्रिय शेतीमुळे आहे. म्हणूनच सिक्कीमच्या विलायचीची चव आणि सुगंध जगभर वाखाणली जाते.

टेरेस फर्मिंग ः
सिक्कीममध्ये डोंगर उतारावर रुंद पायऱ्या पद्धतीने (टेरेस फर्मिंग) शेती केली जाते. २ ते ५ गुंठ्यांच्या आकाराच्या शेकडो पायऱ्या उंचावरून पायथ्यापर्यंत येतात. प्रत्येक पायरीला डोंगरामधील दगडाच्या बांधाने बंदिस्त केले जाते. या पद्धतीमध्ये डोंगरांच्या माथ्यावरचे पाणी प्रत्येक पायरी पूर्ण भरल्यावर खाली येते. असे शेवटच्या तळपायरीपर्यंत आल्यावर त्याचे लहान नदीमध्ये रूपांतर होते. सिक्कीममधील शेकडो नद्या शेतकऱ्यांच्या डोंगरमाथ्यावरील शेती व गर्द हिरवाईमधून सपाट भागापर्यंत येतात. काळ्या आईला अमृतप्राशन करून आलेल्या या लहानशा नदी पात्राला सिक्कीमचे शेतकरी ‘गंगामाई’प्रमाणे नमन करतात. या सर्व नद्या पुढे ‘तिस्ता’ आणि ‘रंजीत’ या दोन मोठ्या नद्यांना मिळतात. ही तिस्ता नदी सिक्कीमच्या सेंद्रिय शेतीला समृद्धतेचे आशीर्वाद देते. पुढे बांगलादेशात हजारो हेक्टरवरील भात पिकाला पोसत किंवा वाहून नेत बंगालच्या उपसागराला मिळते. नदीची ही प्रेमळ आणि क्रोधित अशी दोन्ही रूपे मी प्रत्यक्ष पाहिली आहेत.

मुबलक पाऊस तरिही प्रत्येक थेंबाचा सन्मान

  • सिक्कीममधील डोंगर उतारावरील टेरेस फार्मिंग आणि तिला नजरेत समाविष्ट करणे हे निसर्गाचे स्वर्गीय रूप आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा अमृताप्रमाणे वापर करून जमिनीची धूप थांबवणे हा या मागचा उद्देश. वातावरण बदलाचे संकट आज सिक्कीमवरसुद्धा घोंघावत आहे. पूर्वी नियमित पडणारा सलग पाऊस येथे सुद्धा एक दोन दिवसांमध्येच धुवाधार पडून आपली सरासरी पूर्ण करत आहे. या पावसाला पारंपरिक टेरेस फार्मिंग सक्षमपणे सामोरे जाते. भरपूर पाऊस, मुबलक पाणी असूनही सिक्कीमचा शेतकरी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सन्मान करतो.
  • हवामान बदलास सामोरे जाताना डोंगर पर्वतराजीमधील वृक्ष श्रीमंती येथे आजही कायम ठेवली आहे. पूर्ण राज्यामध्ये कुऱ्हाड बंदी आहे. हा नियम शेतकऱ्यांनी स्वतः केला आहे. त्याचे कठोर पालन केले जाते. घरगुती स्वयंपाक व अन्य कामांसाठी लागणारे वाळलेले लाकूड जंगलातून प्राप्त केले जाते. मात्र त्यावर अनेक ठिकाणी बसवलेल्या कॅमेऱ्यांची देखरेख असते.
  • दुभत्या जनावरांसाठी शासनातर्फे ‘मुरघास’ मोफत दिला जातो. सिक्कीममधील शेतकरी विलायची, हळद, अद्रक, बाजरी, मोहरी, गहू, संत्री, अननस, मका, सोयाबीन, बार्ली आणि चहा या पिकांची शेती करतात.

इतर अॅग्रो विशेष
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
हा तर मत्स्य दुष्काळाच! जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
विद्यापीठाच्या वाणांमुळे शेतकऱ्यांना ९५...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
सिंधुदुर्गमध्ये मुसळधारसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
शेतकऱ्यांचे धान बोनसचे १७ कोटी रुपये...चंद्रपूर : गेल्या खरीप हंगामात विक्री केलेल्या...
मॉन्सून उद्या दिल्लीत पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने उत्तरेत...
समुद्रातील माशांचा साठा केवळ ६६ टक्के...रत्नागिरी ः समुद्रातील माशांचा साठा कमी होत असून...
दीडपट हमीभावाचा केंद्राचा दावा फसवा पुणेः किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) माध्यमातून...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची ...नाशिक : अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला...