agricultural stories in Marathi, Dr. Nagesh Tekale, climate change,west Begal | Agrowon

वातावरण बदलात पारंपरिक वाण टिकवतील आपल्याला...

डॉ. नागेश टेकाळे
सोमवार, 26 जुलै 2021

प. बंगालमध्ये दास आणि सरकार यांच्यासारखे ३० उच्चशिक्षित तरुण या पारंपरिक भात वाण संवर्धन आणि संरक्षणात गुंतलेले आहेत. ‘फोरम फॉर इंजिनिअर्स ॲग्रिकल्चरल मिशन’ (FIAM) ही सामाजिक संस्था उत्तर आणि दक्षिण दिनाजपूरमध्ये या क्षेत्रात निसर्ग शेतीला साथ देत मोलाचे कार्य करत आहे.

भारतामधील भूजल साठ्यामध्ये सर्वांत श्रीमंत राज्य म्हणजे प. बंगाल. चार-पाच फूट खोदले तरी येथे पूर्वी पाणी लागत असे. शेतात मुबलक पाणी, सोबतच प्रत्येक शेतकऱ्याच्या घरासमोर अंगणातही स्वत:च्या मालकीचा एक लहान पाण्याचा तलाव असतो. बंगाली लोकांच्या आहारात भात आणि मासे यांचा भरपूर समावेश असतो. अनेक जण घरासमोरील तलावामध्ये गरजेपुरते मासे उत्पादित करतात. ते परसबागही जोपासतात. पूर्वी आपल्याकडे घरी किती बैलजोड्या यावरून श्रीमती व सोयरिक ठरत असे. तसेच येथे प्रत्येक घराचा स्वत:चा तलाव, त्याचा आकार, त्यातील पाणी, बदके आणि मासे यावरून श्रीमंती ठरते. आता ही जलश्रीमंती बऱ्यापैकी लयाला गेली आहे. अनेक जण गाव सोडून गेले आणि तलावांची डबकी झाली. पाणी असल्याने भाताचे उत्पन्न वाढले. हरितक्रांतीनंतर भाताची पाणी पिणारी शेकडो विदेशी वाण आली. त्यांची तहान भागवताना भूगर्भातील पाणी कधी शंभर फुटांच्या खाली गेले, हे कुणाच्याच लक्षात आले नाही. आता हेच पाणी अर्सेनिक हा जडधातू घेऊन वर येत आहे. जसे पंजाबमध्ये वाढत्या रासायनिक खतामुळे कर्करोगाने थैमान घातले, तसेच अर्सेनिकमुळे होणाऱ्या रोगाने प. बंगालला आज विळखा घातला आहे. जेवढे तुम्ही जमिनीमध्ये खोल जाणार तेवढे अर्सेनिक जास्त वर येणार. भात पिकामध्ये, पर्यायाने शिजवलेल्या भातासोबत शरीरात जाणार. आज येथील २० टक्के लोकसंख्या अर्सेनिक प्रदूषणाने बाधित आहे. वांत्या, पोटदुखी, तळहातावर चट्टे घेऊन त्याचा प्रवास आज कर्करोगाकडे वेगाने होत आहे.

प. बंगाल राज्यात गंगा, दामोदर आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांचे समृद्ध खोरे आहे. प. बंगालमध्ये गंगा नदी दोन भागांत विभागली जाते. बांगलादेशमध्ये ती पद्मा म्हणून प्रवेश करते, तर हुगळी म्हणून प. बंगालमध्ये स्थिरावते. या सर्व नद्या तेथील शेती, शेतकरी, पूर, महापूर, वातावरण बदल यांच्याशी जवळून जोडलेल्या आहेत.
प. बंगाल राज्याने स्वत:चा वातावरण बदलासंबंधीचा सविस्तर अहवाल २०१२ मध्ये केंद्राला सादर केला. त्यावर अंमलबजावणीला सुरुवातही केली. या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये भविष्यात येणारी चक्रीवादळे, त्यांचा शेतीवर होणारा परिणाम, पावसाचा अनियमितपणा, समुद्राची पातळी वाढणे, वाढती उष्णता, खारफुटी जंगलाचा नाश, क्षारपड जमिनी आणि भूगर्भामधील घटते जल. याच अहवालात राज्याच्या कृषी विभागाने वातावरण बदलास सामोरे जाण्यासाठी पारंपरिक भातांच्या वाणांचे संवर्धन आणि फलोत्पादन करण्यावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे.

१) आयआयटी, दिल्ली या संस्थेने प. बंगालच्या वातावरण बदलाचा सविस्तर अभ्यास करून २०५० पर्यंत राज्याला सरासरीपेक्षा ४० टक्के जास्त पावसास सामोरे जाण्यासाठी तयार राहण्यास सुचवले आहे.

२) भारतीय विज्ञान संस्था, बंगळूर यांनीही या राज्यातील पावसाचा १९०१ ते २०१२ या दीर्घ कालखंडाच्या अभ्यासाअंती काढलेला निष्कर्ष - जूनमध्ये पाऊस ४८ मिमीने कमी झाला आहे, तर सप्टेंबरमध्ये तो ३३ मि.मी.ने वाढला आहे. याचाच अर्थ राज्याच्या खरीप पेरणीवर मोठा परिणाम होत आहे. एक तर पेरणी पावसाअभावी पुढे ढकलली जात आहे अथवा पेरलेले वाया जात आहे. त्यामुळे भाताचे पीक वाचविण्यासाठी भूगर्भामधून पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. प. बंगालमध्ये सरासरी १२५ ते १७५ सें.मी. पाऊस पडतो. पूर्वी तो जून ते ऑगस्टमध्ये पडत असे. पण हवामानातील बदलामुळे पाऊस तब्बल २७ दिवस पुढे ढकलला आहे. सध्या तो जुलै ते सप्टेंबर असा झाला आहे. सप्टेंबरमधील वाढता पाऊस रब्बीला उशीर करत आहे. यामुळे थंडी कमी होत असल्याने गहू उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे.

गावच्या मातीने खेचून आणले तरुणाईला

प. बंगालमध्ये भात, मका, डाळवर्गीय पिके, तेलबिया, गहू, बाजरी, बटाटा, तंबाखू, मोहरी, भाजीपाला, ऊस, ताग आणि चहाचे उत्पादन घेतले जाते. भाजीपाला आणि फळ उत्पादनात तसेच भातशेतीमध्ये या राज्याचा देशात प्रथम क्रमांक आहे. राज्याची ६८ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. एकूण कृषी क्षेत्रापैकी प्रतिवर्षी ८ ते १० टक्के क्षेत्र कायम पुराच्या पाण्याखाली असते.
हरितक्रांतीमध्ये सहभाग वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत संकरित बियाणे, रासायनिक खते, कीडनाशके, अवजारे आणि सिंचनाची लालूच दाखवण्यात आली. जे पारंपारिक होते, ते लयाला गेले. अल्पभूधारकांची शोकांतिका सुरू झाली. एका संशोधनानुसार, आपल्या देशात भाताच्या तब्बल ८२ हजार प्रजाती होत्या, त्यातील ५५०० प्रजाती एकट्या प. बंगालमध्ये होत्या. १९६० च्या संकरित आणि परदेशी जातीच्या तडाख्यामुळे आज देशात फक्त १५०० भाताचे वाण शिल्लक राहिले आहेत. त्यांतील ४०० प. बंगालमध्ये कसेबसे उपलब्ध आहेत. प. बंगालमध्ये या शिल्लक पारंपरिक जुन्या भात वाणांना वाचवून पुन्हा त्यांना प्रवाहात आणण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू झाले. FRV (Folk Rice Var) या नावाने हजारो शेतकऱ्यांचे गट तयार झाले असून, नष्ट होत असलेल्या भात वाणांचे संवर्धन करत आहेत. हुगळी जिल्ह्यामधील ‘खोरागारी’ गावामधील तपन अधिकारी या शेतकऱ्याने पुढाकार घेत ‘अग्रानी’ शेतकरी गटाची स्थापना केली आहे. भात वाण संवर्धनाबरोबरच ते शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचेही धडे देत आहेत. असाच एक स्तुत्य उपक्रम मौमिता आणि चंदन मुखर्जी या दांपत्याने केला आहे. त्यांच्या ‘नारायणी ऑरगॅनिक्स’ या कोलकत्तास्थित शेतकरी गटामार्फत १५० भातांच्या वाणांचे एक हजार शेतकऱ्यांच्या मदतीने २०१८ पासून संवर्धन सुरू आहे.
प. बंगालमध्ये FRV ने आज क्रांतिसदृश वातावरण बनवले आहे. अनेक सुशिक्षित तरुण मोठ्या पगाराच्या नोकऱ्या सोडून वडिलोपार्जित शेती व्यवसायामध्ये येत आहेत. २८ वर्षांचा मधुदास हा उत्तर दिनाजपूर जिल्ह्यामधील उच्चशिक्षित संगणक अभियंता आहे. गलेलठ्ठ पगाराला ठोकर मारून तो आज ‘हाटियापौलीबारी’ या लहान गावात वडिलोपार्जित व जुन्या-पुराण्या भाताच्या वाणांची शेती करत आहे. मधुदास म्हणतात, संकरित वाण, रासायनिक खते, वातावरणबदल यामुळे उद्‍ध्वस्त झालेली शेती, शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आणि त्यांच्या आत्महत्या मी जवळून पाहिल्या. हे सर्व कायमचे टाळावयाचे असेल तर पारंपरिक शेती आणि बी बियाण्याकडे पुन्हा वळल्याशिवाय पर्याय नाही, याची मला खात्री पटली. आणि मी गावी परत आलो.”
सलीम सरकार हा दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यामधील ‘नाकीर’ गावचा उच्चशिक्षित तरुणही याच उद्देशाने गावाला परत आला. तो म्हणतो “माझ्या गावच्या मातीच्या सुगंधाने आणि त्यात पिकणाऱ्या सुवासिक भाताच्या वाणाने मला परत गावी खेचून आणले, ते परत न जाण्यासाठीच.” आज दास आणि सरकार सारखे ३० उच्चशिक्षित तरुण या पारंपारिक भात वाण संवर्धन आणि संरक्षणात गुंतलेले आहेत. तेही निसर्ग शेतीला साथ देत, हे महत्त्वाचे. फोरम फॉर इंजिनिअर्स ॲग्रिकल्चरल मिशन (FIAM) ही सामाजिक संस्था उत्तर आणि दक्षिण दिनाजपूरमध्ये या क्षेत्रात मोलाचे कार्य करत आहे. आज त्यांच्याकडे तब्बल १०० दुर्मीळ भातांच्या वाणांचा संग्रह असून, त्यात सातत्याने भर पडत आहे. कृषी शास्त्रज्ञ म्हणतात, की हे सर्व वाण वातावरण बदलामध्ये वाढण्यास सक्षम असून, रोग प्रतिबंधक आहेत. या भागामधील शेतकरी म्हणतात, की मागील वर्षी आम्ही संस्थेने दिलेले पारंपारिक वाण व त्याच्या शेजारी नेहमीचे संकरित भात वाण लावले. प्रचंड पाऊस झाला. शेत पाण्याने भरून गेले. आठवड्याने शेतात जाऊन पाहिले असता, संकरित वाण पूर्णपणे वाहून गेले होते, तर पारंपारिक सेंद्रिय शेतामधील वाण आहे तसेच ताठ उभे होते. हे सर्व साध्य झाले ते जमिनीत गाडलेल्या ‘धैंचा’ आणि ‘ताग’ या हिरवळीच्या खतामुळे. या कुजलेल्या खतावर लावलेल्या भाताच्या वाणांना एक वेगळाच सुवास प्राप्त होत असल्याचा अनुभव शेतकरी सांगतात.


फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...