विंचू अन् लाल मुंग्या : थायलंडचं चावणारं पीक

थायलंडच्या बाजारात वाळवलेले पाकिटबंद विंचू मिळतात. विंचू प्रक्रिया कारखानेदेखील ‘हसाप’ आणि ‘जीएमपी’ प्रमाणित आहेत. अन्नपदार्थांच्या निर्यातीत थायलंडने बाजी का मारली याची कल्पना यावरून येते. याचबरोबरीने लाल मुंग्यादेखील थायलंडच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य अंग आहे.
विंचू अन् लाल मुंग्या : थायलंडचं चावणारं पीक
विंचू अन् लाल मुंग्या : थायलंडचं चावणारं पीक

था यलंडच्या दौऱ्यामध्ये झिंगूर म्हणजेच क्रिकेटची चव चाखून पहिली. या देशातील नागरिक झिंगूरबरोबरच, बांबूतल्या अळ्या, रेशीम किड्याच्या अळ्या, पाम विव्हिलच्या अळ्या, नाकतोडे, पाणभुंगा हे किडे खातात. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन झिंगूर, नाकतोड्यांचे संगोपन शेतीला जोडधंदा म्हणून केलं जातं, तर काही किडे सरळ जंगलातून गोळा करतात. जसे पिकांचे हंगाम असतात, तसे किड्यांच्या उत्पादनाचेही हंगाम असतात. त्यानुसार त्यांचे दर वर-खाली होतात. नाकतोड्यांचा हंगाम ऑगस्ट ते ऑक्टोबरमध्ये असतो. किलोस साडेचारशे ते पाचशे रुपये दर मिळतो. पाणभुंग्यांचा हंगाम जुलै ते ऑक्टोबरदरम्यान असतो.  दराच्या बाबतीत पाणकिड्यात नर- मादीनुसार दुजाभाव केला जातो. नर किड्याला प्रति नग २० रुपये आणि मादीला १६ रुपये दर मिळतो. कधी कधी तर नर किडा मादीपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट भावाने विकला जातो. हा लिंगभेद का, असा प्रश्‍न पडला. पण हा पडलेला प्रश्‍न गुगल बाबांनी लगेच सोडवला. हा दुजाभाव व्हायला कारण आहे त्याची चव. कस्तुरीमृगासारखा आपल्या पोटावरील ग्रंथींतून, नर पाणभुंगा हा एक विशिष्ट चवीचा स्राव सोडतो. त्यामुळे जेवणाला वेगळी चव येते. म्हणून नराचा दर वधारतो. येथील कंपन्यांनी स्वयंपाकात वापरता येणारा पाणभुंग्याचा कृत्रिम गंधदेखील तयार केलाय. पण लोक मात्र ‘ये दिल मांगे ओरिजिनल’ असं म्हणत अस्सल नर किड्याला पसंती देतात.     विंचवाची व्यावसायिक शेती   झिंगूर खाल्ल्यानंतर आता वेगळ्या किड्याची टेस्ट मी घेणार होतो. या किड्याच्या द्रोणात मी हात टाकला. आणि त्यातून उसळी मारून एक किडा बाहेर आला. तो होता विंचू. मी दचकलो आणि ज्या वेगाने ‘वृश्‍चिकाला’ द्रोणातून बाहेर काढला, त्याच दुप्पट वेगाने परत द्रोणात टाकला. माझ्याच राशीचा किडा माझ्या राशीला लागला होता. त्याला खायचे जिवावर आले होते. लहानपणी क्रिकेटचा स्टंप ठोकायला उचललेल्या दगडाखालील विंचवाने मला डंख मारला होता. पण तेव्हा पहिल्यांदा कळलं होतं, की मला विंचू चढत नाही ते. विंचू चावल्याने चढत नाही, पण खाल्ल्याने चढला तर? कशाला विषाची चव घ्यायची? डोक्यात नकारात्मक विचारांचे विंचू डंख मारू लागले. एक मन म्हणत होतं ‘फक्त चाखून बघ, चव कशी आहे ते.’ मनाचा हिय्या करून, डोळे बंद करून त्या ‘वृश्‍चिकाला’ दाताखाली दाबला आणि थाई भूमीवरील बाईकर तात्या, विंचूची चव घेते झाले.   या फिरस्तीमध्ये मी विंचवाच्या शेतीची माहिती गोळा केली. थाई लोकं जंगलात फिरून विंचू गोळा करतात. मग हा विषारी रानमेवा, बाजारात जाऊन विकतात. पण बऱ्याच ठिकाणी विंचवाची पारंपरिक आणि व्यावसायिक शेती केली जाते. या विंचवाला कारखान्यात प्रक्रिया करून वाळवतात. हवाबंद पाकिटातून विक्रीसाठी पाठवतात. बाजारात हे वाळवलेले पाकिटबंद विंचू विक्रीला ठेवले जातात. विंचू प्रक्रिया कारखानेदेखील ‘हसाप’ आणि ‘जीएमपी’ प्रमाणित आहेत. अन्नपदार्थांच्या निर्यातीत थायलंडने बाजी का मारली याची कल्पना यावरून येते. विंचवाचे वेगवेगळे पदार्थ येथे बनवले जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या सॉस आणि चटण्यांमध्ये बुडवून विंचू खातात.

खाद्य पदार्थांत लाल मुंग्यांनाही मागणी  विंचवासोबत अजून एक चावणारं पीक थायलंडमध्ये प्रसिद्ध आहे. ते म्हणजे मुंग्या. हो, इथं लाल मुंग्यादेखील खाल्ल्या जातात. या मुंग्या झाडाच्या पानांना एकत्र जोडून घरटं बनवतात. म्हणून त्यांना ‘वेव्हर’ म्हणजे विणकर मुंग्या म्हणतात. झाडावर या मुंग्यांच्या वसाहती पाहायला मिळतात. मुंग्यांच्या विषात फॉर्मिक आम्ल असतं. कदाचित त्याचमुळे शास्त्रज्ञांनी त्यांचं ‘फॉर्मिसिड’ फॅमिलीमध्ये वर्गीकरण केलंय. थायलंडच्या ईशान्य भागात या मुंगी जेवणाची रीत आहे. त्यांच्या पारंपरिक गाण्यात आणि नृत्यात मुंग्यांच्या शिकारीचे संदर्भ येतात. मुंग्यांच्या जीवनातील सर्व अवस्थांचे थाई किचनमध्ये सोनं होतं. मुंग्यांची अंडी, कोष आणि प्रौढ मुंग्या या सर्व अवस्था थाई जेवणात वापरल्या जातात. मुंग्यांपासून भाज्या, सलाड बनवले जातात. पण सर्वांत लोकप्रिय पदार्थ आहे, मुंग्यांच्या अंड्याचे ऑम्लेट. मुंग्यांच्या ऑम्लेटबद्दल ऐकून, नुसत्या विचारानेच जिभेला मुंग्या डसल्यासारखे झाले. हे अन्न खाण्यासाठी लोक, मुंग्यांची डिश घ्यायला मुंग्यांसारखे रांगेत उभे असतात.   लाल मुंग्यांचे संगोपन   लाल मुंग्या जंगलातून गोळा करतात. पण काही दर्दी लोक आपल्या शेतात किंवा बागेत या लाल मुंग्यांची घरटी पाळतात. खासकरून आंब्याच्या झाडावर या वसाहती वाढवितात. त्यासाठी या वसाहतींना परजीवी किड्यांपासून दूर ठेवणे आणि जवळपास पाण्याचा साठा उपलब्ध करून देणे आवश्यक असते. ‘असेटिक आम्ल’ तयार करायला मुंग्यांना पाणी गरजेचं असतं. मुंग्यांच्या व्यवस्थित पैदाशीसाठी त्यांची योग्य वाढ होणे आवश्यक असते. जास्तीत जास्त मुंग्यांच्या घरट्यासाठी, त्यांना एका झाडावरून दुसऱ्या झाडावर पोहोचणं आवश्यक आहे. पण जमिनीवरून जाताना इतर भक्षक किड्यांच्या आक्रमणाला बळी पडण्याचा धोका असतो. मग हुशार थाई शेतकरी शक्कल लढवतो. दोन झाडांमध्ये दोऱ्या किंवा बांबू बांधतो. या पुलावरून मुंग्यांची ट्रॅफिक, कोणत्याही सिग्नल किंवा गतिरोधकांशिवाय सुरू असते. एक विशेष गोष्ट अशी, की या पुलासाठी प्लॅस्टिकची दोरी चालत नाही. मुंग्या या प्लॅस्टिकच्या पुलावरून जाणं टाळतात. रांगेच्या शिस्तीपासून ते प्लॅस्टिक प्रदूषणापर्यंत शिकवण देणाऱ्या मुंग्यांनी माणसाला शिकवावे तरी किती. मुंगी होऊन साखर खाण्याच्या ‘मुंगी सल्ल्याला’ डावलत, हत्ती होऊन लाकडे फोडणारा माणूस, आपल्याच तोऱ्यात निसर्गाचा ऱ्हास करत निघालाय.  फेब्रुवारी ते मे महिन्याच्या कोरड्या हवामानात मुंग्या गोळा करतात. या हंगामात मुंग्यांच्या घरट्यात जास्त कोष तयार होतात. म्हणून या महिन्यात थाई शिकारी मुंग्यांच्या शिकारीला जंगलात निघतात. बांबूचा पाइप, झाडावरील मुंग्यांच्या घरट्यात घुसवतात आणि जोरात हलवतात. या पाइपचे दुसरे टोक पिशवीत घुसवलेले असते. घरटे जोरात हलवल्यावर, मुंग्यांच्या घरट्यातील कोष आणि अळ्या पिशवीत पडतात. एका घरट्यातून तीनशे ते चारशे ग्रॅम कोष आणि अळ्या मिळतात. एक माणूस दिवसाकाठी कमीत कमी एक ते दोन किलो माल गोळा करतो. त्यातून त्याला पाचशे ते हजार रुपये मिळतात. काही तरबेज मुंग्याबहाद्दर, दोन किलोपेक्षा जास्त माल गोळा करू शकतात. ईशान्य थायलंडमधील विक्रेता दिवसाकाठी अडीच ते सहा हजारांचा मुंगेमाल विकतो. भात आणि साबुकंदाच्या शेतीला जोडधंदा म्हणून केला जाणारा हा व्यवसाय मुख्य पिकापेक्षा जास्त नफा देऊन जातो. ऊठसूट मुंग्या गोळा करणाऱ्या लोकांमुळे जंगलातील मुंग्यांची संख्या कमी झाल्याचं स्थानिक लोक सांगतात. दिवसेंदिवस मुंग्यांची शिकार मिळणं दुरापास्त होतंय. निसर्गातून मुंग्या कमी झाल्यामुळे पर्यावरणावर परिणाम दिसू लागलेत. निसर्गातील मुंग्यांची भूमिका मोलाची आहे. कीड-रोगांच्या नियंत्रणात मुंग्यांचा मोलाचा वाटा आहे. ही निसर्गाची हानी टाळायची असेल, तर जंगलातून गोळा करण्यापेक्षा, मुंग्यांची शेती वाढवणे गरजेचे आहे. मुंग्यांच्या शेतीच्या विचाराने डोक्याला आणि बऱ्याच वेळ बसल्याने पायाला मुंग्या आल्या होत्या. त्या झटकल्या आणि पटायामधील आमच्या हॉटेलकडे मी पायी निघालो. (लेखक हे ग्रीन-व्हिजन लाइफ सायन्सेस प्रा. ली. कंपनीचे संचालक  आणि ‘ड्रीमर अँड डुअर्स’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com