agricultural stories in Marathi, Dr. Satilal Patil article 30, Thailand's casava crop and its products | Agrowon

भारतीय उपवासाचं थाई पीक

डॉ. सतीलाल पाटील
शनिवार, 24 जुलै 2021

सध्या सत्तर टक्के थायलंडमध्ये हे पीक घेतलं जातं. अख्ख्या थायलंडमध्ये पाच लाख शेतकरी कुटुंबे, कसावाच्या शेतीत राबून त्यातून तीन कोटी टन साबुकंदाचं उत्पादन करतात. या साबुकंदापासून विविध मूल्यवर्धित उत्पादनांची मालिकाच येथे तयार आहे. साबुकंदापासून विविध उपयोगी घटक वेगळे करून विविध उत्पादनामध्ये वापरले जातात.  निर्यातीतून सव्वा दोन लाख कोटी रुपयांचं परकीय चलन डॉलर रूपात मिळतं.

थायलंडच्या हिरव्यागार वातावरणात धकधकत्या बाईकवर माझा प्रवास सुरू आहे. आज बराच प्रवास झालाय. पोटात काहीतरी टाकूया, म्हणत रस्त्याच्या कडेला थांबलो. कॉफीबरोबर खायला काय आहे, हे शोधू लागलो. मला काय हवंय, हे हॉटेलवाल्या थाई बाईला न सांगताच समजलं आणि चिप्सचं एक पाकीट तिने सस्मित चेहऱ्याने माझ्या हातावर ठेवलं. कसले चिप्स आहेत म्हणून वाचायचा प्रयत्न केला, पण थाई गिचमिड अक्षरं माझ्या मराठी मीडियम टाळक्यात घुसेनात. माझी ही चिप्साळचण त्या सस्मित सुंदरीच्या लक्षात आली आणि तिने ‘कसावाऽऽ कसावा चिपऽऽ’ असं सुरेल उत्तर दिलं. सुरवातीला मला कळलं नाही, पण दुसऱ्यांदा तिने तान छेडल्यावर डोक्यात कसावा कसाबसा घुसला. ‘अरे! कसावा म्हणजे साबुदाण्याचा कंद!’

असे हे साबुकंदाचे चिप्स थाईलंडमध्ये जागोजागी दिसले. थायलंडमध्ये बाईक चालवताना, काही ठिकाणी कसावाची शेती दिसली होती, पण हा उपवासकंद, चिप्सच्या माध्यमात पाऊचमध्ये बसून, एवढ्या मोठ्या प्रमाणात देशभरात विकला जातो, हे माहीत नव्हतं. मग गुगलबाईला विचारत, ‘कसावा’ ची माहिती खोदायला सुरवात केली.

कसावा पिकाचं वैशिष्ट्ये म्हणजे, जिथं साधारणतः इतर पिकं तग धरत नाहीत अशा वातावरणात आणि जमिनीत, अगदी कमी खतपाण्यात ते उगवतं. म्हणजे उपवासाचं हे पीक स्वतः उपवास करून, आपण उपवासासाठी किती लायक आहोत, हे सिद्ध करतं. या पिकाला जास्त खते लागत नाहीत, मात्र जिवाणू आणि विषाणूजन्य रोगांना ते बळी पडतं.

आजमितीला जगात ८० हून जास्त देशात कसावाचं पीक घेतलं जातं. ८० कोटींहून जास्त लोकांची मुख्य अन्नाची गरज हे उपवासपीक भागवतंय. काही देशांमध्ये कंदाबरोबरच, कसावाची पानेही खाल्ली जातात. इतर पिकासारखा, काढणीसाठी, साबुकंद शेतकऱ्याला हातघाईवर आणत नाही. कसावाचा कंद जमिनीत २४ महिने साठवता येतो. त्यामुळे योग्य बाजारभाव मिळेपर्यंत थांबायची सवड शेतकऱ्याला मिळते.

दक्षिण अमेरिकेतील अमेझॉनच्या खोऱ्यात, सहा-सात हजार वर्षांपासून घेतलं जाणारं हे पीक. स्पॅनिश आणि पोर्तुगिजांनी फिलिपाइन्समध्ये नेलं. तिथून व्हाया मलेशिया ते थायलंडला पोहचलं. इथं पश्चिम थायलंडमध्ये रबराच्या पिकात आंतरपीक म्हणून त्याची वर्णी लागली. नंतर रबराची शेती जसजशी ताणली गेली आणि तसंतसं साबुकंदाचं क्षेत्र आकुंचलं. मग उपवासाचं हे अमेरिकन बाळ, पूर्व थायलंडमध्ये, चोनबुरी आणि रेयोंगकडे रांगत गेलं. बाजार वाढला आणि पश्चिमेत उपासमार झालेल्या या बाळानं पूर्वेत बाळसं धरलं. सध्या सत्तर टक्के थायलंडमध्ये हे पीक घेतलं जातं. अख्ख्या थायलंडमध्ये पाच लाख शेतकरी कुटुंबे, कसावाच्या शेतीत राबून त्यातून तीन कोटी टन साबुकंदाचं उत्पादन करतात.

कसावा पिकाचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे कडू कसावा आणि दुसरा गोड. कडू कसावा नावाप्रमाणे कडू असतो. त्यामधील सायनिक आम्लामुळे कसावाला कडवट चव येते. या सायनिक आम्लाची खासियत म्हणजे, ते चवीला कडू आणि विषारी असतं. म्हणून याला सरळ खाता येत नाही. कंदावर प्रक्रिया करून त्यातील सायनिक आम्ल काढून टाकावे लागते. अन्यथा या विषारी आम्लाच्या अंमलामुळे उलटी, पोटदुखीसारखे त्रास होऊ शकतात. बात पुढे जाऊन अगदी कोमा आणि रुग्णाच्या मृत्यूपर्यंतसुद्धा पोहोचू शकते. म्हणजे साबुदाणा खाल्ल्याच्या पुण्याने स्वर्ग मिळेल की नाही हे माहीत नाही, पण उपवासाच्या पिकातील सायनिक आम्ल मात्र आपल्याला स्वर्गाच्या दारात नेऊन ठेवू शकतं.

२००८ मध्ये ऑस्ट्रेलियन बाजारात उपलब्ध असलेल्या कसावा उत्पादनावर संशोधन केलं गेलं. बाजारातून कसावा चिप्सचे एकूण ३७४ नमुने गोळा केले गेले. त्यातील ३१७ नमुन्यात घातक सायनिक आम्लाची मात्रा सापडली. चिप्स उत्पादक कंपन्या गपचिपपणे हा विषाचा धंदा करत होत्या. मग या संशोधनाच्या आधारे ‘ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड फूड कोड’ मध्ये बदल करून सायनिक आम्लाची मात्रा प्रतिकिलो १० मिलिग्रॅमपेक्षा जास्त नको, हे ठरवलं गेलं.

या सायनिक आम्लाबाबत एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे पृथ्वीपासून करोडो किलोमीटर दूर अवकाशातील इन्स्टास्टेलर भागात (म्हणजे तारे आणि आकाशगंगा यामधील पट्ट्यात) हे आयसोसायनीक आम्ल सापडतं. करोडो किलोमीटर अंतरावरील अवकाशातून आयसोसायनिक आम्ल, पृथ्वीवरील उपवासाच्या कंदात कसं आलं, हे अवकाशातला देवच जाणे!

गोड कसावाची उत्पादने
कडू कसावाचा दुसरा भाऊ, म्हणजे ‘गोड कसावा’. हा मात्र माणसाच्या अन्नाचा गोडवा कायम ठेऊन आहे. याच्या कंदात सायनिक आम्लाचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे प्राणी आणि मनुष्यप्राणी यांच्या सेवनासाठी ते चालतं.
थायलंडमध्ये या उपवासाच्या पिकाला फक्त अन्न म्हणून मर्यादित न ठेवता, त्यावर संशोधन करून वेगवेगळे मूल्यवर्धित उत्पादने बनवली गेलीत. त्यामुळे बिस्कीट, नूडल्स, केक यासारख्या अन्नपदार्थापासून ते जैव-प्लॅस्टिक, कागद, कापड उद्योग, सॉर्बिटॉल, मोनोसोडियम ग्लुटामेट यासारख्या औद्योगिक उत्पादनात कसावा पोहोचलाय.
थायलंडमध्ये पिकवल्या जाणाऱ्या कसावापैकी, ४४ टक्के कसावा कंद हा ‘स्वीटनर’ म्हणजे साखरेला पर्याय म्हणून वापरल्या जाणाऱ्या उत्पादनात वापरला जातो. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या ‘स्वीटनर’ उत्पादनात कसावाचा वाटा ८० टक्के एवढा मोठा आहे. अन्नप्रक्रिया उद्योगात त्याला मानाचं स्थान आहे. शीतपेयं, फळांचा डबाबंद रस, जाम, सिरप यासारख्या अनेक उत्पादनात कसावा स्वीटनर वापरले जाते.
सॉर्बिटॉल हा साखरेला पर्यायी पदार्थ कसावा पासून बनवतात. २०१६ मध्ये थायलंडने सव्वा दोन लाख कोटी रुपयांचं सॉर्बिटॉल निर्यात केलं होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉलर देशात आणून साबुकंदाने देशाचा परकीय चलनाचा उपवास संपवला होता.

भारतीयांची उपासमार रोखण्यासाठी...
कमी खतपाण्यात वाढणारं हे पीक भारतातील काही राज्यापुरतंच मर्यादित आहे. आपल्याकडे याचा मुख्य उपयोग साबुदाणा उत्पादनात होतोय. कसावाच्या या कुजवलेल्या फराळावर कमावलेल्या उपवासाच्या पुण्यावर आपले लोक खूष आहेत. तसे काही कसावावर आधारित स्टार्च उद्योगही आहेत, पण ते वाढणं गरजेचं आहे.
कसावा भारतीय शेतकऱ्यांचं दारिद्र्य मिटवू शकेल का? माझ्या डोक्यात विचारचक्र बाईकच्या चाकाशी स्पर्धा करू लागलं. हे कसं शक्य होईल? आपल्याकडचं उपवासाचं पीक शेतकऱ्याचा आर्थिक उपवास सोडवून डॉलरची गंगा कधी दारी आणतंय, याची मी वाट पाहतोय. यासाठी शासनाला शेतकरी, शास्त्रज्ञ आणि उद्योजक यांची संघबांधणी करावी लागेल. आइपीएलची संघबांधणी करून आर्थिक फटकेबाजी करणाऱ्यांना ही संघबांधणी करायला जड जाऊ नये. या संघातील शेतकऱ्याला कसावाची शेती कसावी लागेल. शास्त्रज्ञ, त्यातील घटक वेगळे करून मूल्यवर्धित उत्पादन तंत्रज्ञान विकसित करतील. उद्योजक त्यात भांडवलाचं खतपाणी घालून देश परदेशात पोहोचवतील. शासकीय अधिकारी टेबलाच्या खणाला कुलूप लावून, या तिघांचं काम कसं सोपं होईल याचा विचार करतील. तेव्हाच, कासवाच्या गतीने निघालेल्या कसावा पिकाला भारतात गती येईल. नाहीतर या उपवासाच्या पिकाची आणि पर्यायाने शेतकऱ्याची उपासमार अटळ आहे.
 


फोटो गॅलरी

इतर ताज्या घडामोडी
‘कृषी’ शिक्षक म्हणून कृषी, संलग्न ...कोल्हापूर : शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश...
शिसोदे समितीची आज तातडीची बैठकपुणे ः जलयुक्त शिवार कामांमध्ये झालेल्या कोट्यवधी...
शेतीमाल, दुग्धजन्य पदार्थ निर्यात...पुणे : कृषी व प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात...
बुडताना दिसले अन् काही क्षणांत दिसेनासे...वरुड, जि. अमरावती : डोळ्यांसमोर सारे बुडताना दिसत...
‘जनधन’मुळे मदत गरजूंपर्यंत : केंद्रीय...औरंगाबाद : जनधन, आधार आणि बँक खात्याशी मोबाईल...
पूर्वसूचना अर्ज भरण्यासाठी निलंग्यात...निलंगा, जि. लातूर : ऑफलाइन पद्धतीने विमा कंपनीस...
शेतकऱ्यांसाठी महावितरणने हप्ते बांधून...पुणे : कोरोनामुळे महावितरण कंपनीवरही आर्थिक ताण...
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...