राखेतून भरारी घेणारा कंबोडियन फिनिक्स

कंबोडियाची अमेरिकेबरोबरच्या युद्धातील फरफट, त्यानंतर त्यांचाच भूमिपुत्र ‘पोल पॉट’ने दिलेल्या घावातून, दुःस्वप्नातून हा देश कसाबसा सावरतोय. भूतकाळातील भुतं कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वर्तमानात त्यांच्यासमोर उभी राहतात आणि त्यांच्या आयुष्यात अडचणी निर्माण करतात. रोजच्या जगण्यातही मृत्यूची छाया घेऊन शेतकरी शेती करतोय, माणूस सकारात्मकतेनं पुढे जातोय.
राखेतून भरारी घेणारा कंबोडियन फिनिक्स
राखेतून भरारी घेणारा कंबोडियन फिनिक्स

‘खमेर रूज’च्या काळात ‘पोल पॉट’ने देशातील बहुसंख्य लोकसंख्या संपवली होती. कंबोडियातील ७५ लाख लोकांपैकी २० लाख लोकांना त्याने मृत्यूच्या खाईत लोटलं होत. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के लोकांच्या हत्येचं पाप त्यानं डोक्यावर घेतलं होतं. परिणामी, आता कंबोडिया हा सर्वात लहान वयाच्या लोकांचा देश आहे. या देशातील ६५ टक्के लोकांचं वय ३० वर्षांखाली आहे. ‘खमेर रूज’च्या अत्याचारातून वाचलेली ही दुसरी-तिसरी पिढी आहे. कंबोडियावर अमेरिकेने १९६५ ते १९७३ दरम्यान साडेसत्तावीस लाख टन बॉम्बचा वर्षाव केला होता. सोप्या भाषेत, अंदाज येण्यासाठी सांगायचे झाल्यास, जवळपास पावणेतीन लाख ट्रक भरून बॉम्ब कंबोडियावर टाकले. त्याच्या जोडीला तोफगोळे होतेच. संपूर्ण दुसऱ्या जागतिक महायुद्धात मित्रदेशांनी टाकलेल्या बॉम्बपेक्षा ही संख्या जास्त होती. हे बॉम्ब नदीनाल्यात, शेतात, जंगलात आणि डोंगरदऱ्यात पडले. काही फुटले, काही न फुटताच मातीत, पाण्यात, चिखलात रुतून राहिले. गावागावांत आणि गावाबाहेर न फुटलेले बॉम्ब आणि तोफगोळे आजही सापडतात. सुपीक, काळी, भुसभुशीत माती शेतकऱ्यांसाठी चांगली असते. प्रत्येक शेतकरी अशी सुपीक जमीन मिळावी म्हणून धडपडत असतो. पण हीच सुपीक माती कंबोडियन शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलेय. सुपीक माती भुसभुशीत असते. अमेरिकेने विमानातून टाकलेले बॉम्ब टणक जमिनीवर आदळून फुटले. मात्र या भुसभुशीत शेतातील मातीत न फुटलेले लाखो बॉम्ब रुतून बसले. इथल्या शेतकऱ्यांसाठी हे बॉम्बगोळे डोकेदुखी ठरत आहेत. शेतात काम करणारा शेतकरी आणि प्राणी, खेळणारी लहान मुले यांचा पाय पडून हे बॉम्ब फुटतात. आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांना या बॉम्बमुळे आपले प्राण गमावावे लागले आहेत. अजूनही असे न फुटलेले लाखो बॉम्ब कंबोडियाच्या शेतजमिनीत असून, ते कधीही फुटू शकतात. या भीतीमुळे हजारो एकर सुपीक जमीन मशागतीअभावी पडीक झालेय. काही शेतकरी त्याही परिस्थितीत जिवावर उदार होऊन या जमिनी वापरायचा प्रयत्न करतात. कोणत्याही क्षणी बॉम्बवर पाय पडेल अशी धाकधूक कायम मनात असते. शेतात गेलेला आपला धनी संध्याकाळी सुखरूप परत येईल का? या काळजीत सैनिकाच्या पत्नीसारखी, शेतकऱ्याची बायको डोळ्यात जीव आणून त्याची वाट पाहत असते. ज्या शेतात अमेरिकी सैनिकांनी विध्वंसाचं बीज पेरलंय, त्याच मातीत कंबोडियन शेतकरी आशेचं बीज पेरू पाहतोय. कंबोडियन माणसातील सकारात्मक जिद्दीची काही उदाहरणे पाहूया. विषारी वेलीचे अमृतमयी फळ अकिरा नावाचा एक मिसरूडही न फुटलेला पोरगा ‘पोल पॉट’च्या सैन्यात होता. ‘खमेर रूज’च्या काळात त्याचे आईवडील मारले गेले. एका बाईने त्याला अनाथाश्रमात नेले. तिथून ‘पोल पॉट’च्या सैन्यात दाखल व्हावे लागले. सैनिक म्हणून त्याला स्वतःला बॉम्ब पेरावे व निकामी करावे लागले. या काळात या लहानग्याने मोठा नरसंहार पहिला. युद्ध संपल्यावर बॉम्ब निकामी करण्याचा कसबामुळे अकिराला संयुक्त राष्ट्रसंघाच्या बॉम्ब निकामी करायच्या पथकात काम मिळाले. काही वर्षे काम केल्यावर तो आपल्या गावी परतला. गावोगावी, शेतात बॉम्ब फुटून लोक मेल्याच्या बातम्या त्याला अस्वस्थ करत. मग त्याने पैसे न घेता बॉम्ब निकामी करायची सेवा सुरू केली. कुणीही बॉम्ब सापडल्याची माहिती दिली, तिथे स्वखर्चाने पोहोचून बॉम्ब निकामी करायचा. असे पन्नास हजारांपेक्षाही जास्त बॉम्ब त्याने निकामी केले असून, त्यांचे एक म्युझियम बनवलेय. वास्तविक अकिराने बॉम्ब निकामी करण्याचे कोणतेही ट्रेनिंग घेतलेले नव्हते. मात्र एके दिवशी अशा अप्रक्षिशित बॉम्ब निकामी करणाऱ्यांवर सरकारने बंदी घातली. मात्र तरीही अकिरा आपले काम सेवा म्हणून करत राहिला. शेवटी २००१ मध्ये सरकारने त्याला जेलमध्ये टाकले. आपल्या ध्येयाने झपाटलेल्या अकिराने जेलमधून बाहेर आल्यावर पुन्हा तेच काम सुरू ठेवले. तो ऐकत नाही हे पाहून सरकारने २००६ मध्ये त्याला परत जेलमध्ये डांबले. या वेळी जेलमधून बाहेर आल्यावर तो लंडनला गेला आणि बॉम्ब निकामी करायचं प्रशिक्षण घेऊन आला.

अकिराची अजून एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे लहान मुलांसाठी त्याने केलेले काम. न फुटलेल्या बॉम्बमुळे एक लहान मुलगा जखमी झाला, हे त्याला कळले. कोणतीही चूक नसताना अमेरिकी सैन्याने पेरलेली विषाची फळे या लहान मुलांना भोगावी लागताहेत, हे त्याच्या मनाला फार लागले. तो अशा जखमी, पांगळ्या मुलांना घरी घेऊन आला. अकिरा आणि त्याची बायको या मुलांची काळजी घेऊ लागले. एकेकाळी जीव घेण्यासाठी बॉम्ब पेरणारा अकिरा आता जीव वाचवण्यासाठी बॉम्ब निकामी करणारा म्हणून प्रसिद्ध झालाय. अकिरावर पुस्तके लिहिली गेली, शॉर्ट फिल्म बनली. त्याच्या म्युझियमला दरवर्षी हजारो लोक भेट देतात. खमेर रूजच्या विषारी वेलीला लागलेले हे ‘गोड-अमृतमयी’ फळ देश वाचविण्यासाठी अहोरात्र झगडतेय. विध्वंसक गोष्टींतून फुलू शकते सुंदरता ‘नॉम पेन’च्या दक्षिणेला ‘चांथा थॉन’ नावाचा वल्ली राहतो. त्याचे आईवडील ‘पोल पॉट’च्या खमेर रूजमध्ये मारले गेले होते. लहानगा चांथा थॉन अनाथाश्रमात वाढला. इथंच वयाच्या १४ व्या वर्षी तो तांब्याचे धातूकाम शिकला. स्वतःच लहानसं धातुकामाचं दुकान सुरू केलं. गमावलेल्या आईवडिलांच्या आठवणी त्याला स्वस्थ बसू देत नव्हत्या. युद्धात डागल्या गेलेल्या गोळ्या जागोजागी सापडायच्या. नदीत मासेमारी करताना माशांबरोबर जाळ्यांमध्ये बंदुकीची काडतुसं आणि बॉम्बशेलसुद्धा अडकून यायचे. या गोष्टींमुळे जुन्या जखमेवरील खपली निघायची. एके दिवशी या नकारात्मक भूतकाळाला सकारात्मक वर्तमानकाळात बदलायचं त्यानं ठरवलं. मग त्याने लोकांकडून हे बॉम्बशेल आणि काडतुसं गोळा करून त्यापासून दागिने बनवायला सुरुवात केली. बॉम्ब शेल, रिकामी काडतुसांपासून अंगठी, हार, कडी, पायांतले पैंजण, केसातली पिन असे अनेक सुबक दागिने बनवले. हळूहळू त्याची ही ‘ब्युटी फ्रॉम ट्रॅजेडी’ची कला सर्वत्र प्रसिद्ध झाली. देशी कंबोडियन नक्षीयुक्त दागिन्यांबरोबरच आता परदेशी पर्यटकांच्या विनंतीनुसार विदेशी डिझाइनही तो बनवतो. चांथा थॉन म्हणतो, ‘‘प्रत्येक काळ्या ढगाला रुपेरी किनार असते, तुमच्या वाईट काळात नियतीशी झगडताना, अजाणतेपणे धैर्य आणि शौर्य तुम्ही कमावत असता. वाईट, विध्वंसक गोष्टींपासूनसुद्धा चांगल्या, सुंदर गोष्टी बनू शकतात, हे मला जगाला दाखवायचं.’’ केवढा हा आशावाद. जणू ज्वालामुखीच्या मुखावर धूळमाती साठावी आणि त्यावर रानफुलांचा ताटवा फुलावा, तसा या लोकांनी काही दशकापूर्वीच्या दुःखाचा लाव्हा पचवत आयुष्य फुलवले आहे. संकटावर मात करून उभारी घेणाऱ्या कंबोडियन माणसाला सलाम केला. बाइकला किक मारली. आपल्या बाइकचं चाक बॉम्बवर तर पडणार नाही ना, या काळजीनं कच्चा रास्ता टाळत पुढे निघालो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com