थायलंडचा काटेरी राजा

दिसायला फणसाप्रमाणे पण आकारानं लहान, गोल अशा डुरियन फळाला थायलंडमध्ये फळांचा राजा म्हणतात. एखाद्या राजेमहाराजांभोवती ज्या प्रमाणे वलय, कथा, दंतकथा पसरलेल्या असतात, तशाच या फळांच्या राजाभोवतीही अनेक कथा गुंफलेल्या आढळतात.
थायलंडचा काटेरी राजा
थायलंडचा काटेरी राजा

थायलंडच्या हिरव्यागार वातावरणात बाइकिंगचा स्वर्गीय आनंद घेत प्रवास सुरू आहे. वेगवेगळ्या पिकांचे मळे, जंगलं, खाड्या ओलांडत रस्ता अवखळ मुलांप्रमाणं बेलगाम पळतोय. मधूनच तो डोंगरघाटात चढतो, पुढच्या घडीला उतारावरून झोकून देत थेट समुद्रकाठी बीचवरील वाळूसोबत मस्ती करत धावू लागतो. रस्त्याच्या बाजूला लोकांची लगबग सुरू आहे. प्रत्येक जण आपापल्या लगबगीत व्यस्त आहे. रस्त्याकाठच्या वाड्यावस्त्यांतून पक्ष्यांच्या चिवचिवाटासारखाच मंजुळ ‘थाई थाईठयाट’ कानावर पडतोय. सगळं कसं स्वर्गीय वाटतंय. रस्त्याच्या कडेला फणस विकायला ठेवलेले दिसताहेत. थाईलंडचा फणस चाखून बघूया असं म्हणत थांबलो. जवळ जाऊन पाहिल्यानंतर हा फणस वेगळा असल्याचं जाणवलं. आपल्या फणसापेक्षा बरंच लहान फळ होतं. म्हणजे थाई फणसही बुटका असतो का? असा बुटका विचार मनात तरळून गेला. दुकानदाराला विचारल्यावर ‘‘मित्रा, हा फणस नाही, हा आहे फळांचा राजा, डुरियन फळ’’ असं उत्तर मिळालं. अगदी फणसासारखं दिसणारं डुरिओ’ या पोटजातीतल्या काटेरी डुरियन फळाला फळांचा राजा असं म्हणतात. याच्या एकूण ३० प्रजाती असून, थायलंडमध्ये ३०० आणि मलेशियामध्ये १०० वाण आहेत. तसं हे फळ मूळचं इंडोनेशियातील बोर्निओ आणि सुमात्रा बेटावरचं. तिथून ते मलेशिया, थायलंड मार्गे इतर देशात पोहोचलं. आपल्याकडे दक्षिण भारतात काही ठिकाणी डुरियन फळाचा आढळ आहे. थायलंड हा जगातला सर्वांत जास्त डुरियन फळ पिकविणारा देश आहे. फणसापेक्षा वेगळेपण... फणस आणि डुरियन दिसायले सारखे असले तरी त्यांच्यात बराच फरक आहे. दोघांचीही मोठाली झाडं असली, तरी डुरियनचं झाड १५० फुटांपर्यंत उंच वाढतं. फणसाच्या झाडाची उंची काही अपवाद सोडले, तर ८० फुटांपर्यंत असते. फणसाचे फळ, आईने बाळाला छातीशी घट्ट पकडल्यासारखे झाडाच्या खोडाला चिकटलेले असते. मात्र डुरियन फळ बोट पकडलेल्या शहाण्या मुलागत फांद्यांचा टोकाला पकडून वाढते. फणसाच्या झाडाला जास्तीत जास्त २०० फळं येतात, तर डुरियनच्या पिलावळीची संख्या ८०० पर्यंत जाऊ शकते. दिसण्यावरून अंदाज घ्यायचा, तर फणसाच्या फळाची साल मगरीच्या पाठीसारखी काटेरी पण न टोचणारी असते. डुरियन फळावरील काटे टोकदार असतात. दुरून पाहताक्षणी ते नजरेला टोचतात. फणसाचं फळ लहान मुलाच्या फसलेल्या वर्तुळासारखं लांबुळकं असतं, तर डुरियन त्यामानाने गोल दिसतं. डुरियनची पोषकता... या काटेरी फळात भरपूर पोषक तत्त्वे आहेत. डुरियनमध्ये पोटॅशिअम, लोह, व्हिटॅमिन-सी आणि बी-कॉम्प्लेक्स भरभरून आहेत. स्नायूंची ताकद वाढणे, रक्तदाब नियंत्रित करणे, त्वचेची कांती वाढवणे यासारखे त्याचे भरपूर फायदे मिळतात. म्हणजे थाई सुंदरीच्या तुकतुकीत त्वचेचे रहस्य साबणात नसून या काटेरी सौंदर्यप्रसाधनात आहे तर! या फळात सुक्रोज, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज यांसारख्या साध्या साखर आहेत. अगदीच मधुमेह असलेल्या लोकांव्यतिरिक्त कोणीही खावं. काटेरी साखरेचं देणं त्यांच्या प्रकृतीला टोचत राहू शकतं. डुरियन खाल्ल्याने ताजंतवानं वाटण्यामागील गुपित म्हणजे त्यातील साखर आणि पोटॅशिअम. या साखरेमुळेच त्वरित ताजगीचा अहसास येतो आणि पोटॅशिअममुळे ताणतणाव दूर होण्यास मदत होते. बऱ्याच देशी औषधांमध्ये डुरियन फळाचा वापर केला जातो. डुरियनमध्ये चांगल्या कोलेस्टेरॉलचं प्रमाण मुबलक असून, ते हृदयाच्या तब्बेतीसाठी उत्तम आहे. कार्डिओग्रामच्या आलेखातील काटा हे काटेदार फळ खाली आणू शकतं. मात्र त्यातील बक्कळ कॅलरी आणि कर्बामुळे कमरेच्या पट्ट्याला वर्षागणिक पडणारी नवीन छिद्रे आपण थांबवू शकणार नाही. एका डुरियन फळामध्ये नऊशे ते पंधराशे कॅलरी असतात. आपल्या शरीराचं काम रोज साधारणतः २००० कॅलरीच्या रेशन वर भागतं. म्हणजे एका फळातच दिवसाच्या अन्नाच्या पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत गरज भागू शकते. म्हणूनच अधाशाप्रमाणे डुरियन खाणे योग्य नाही. एका वेळेस दोन ते तीन फोडीच घ्याव्यात. काटेरी दणकट आवरणात दाबून भरलेली अन्नद्रव्ये रक्तदाबावर गुणकारी आहेत. आपल्या उसावरील म्हणीप्रमाणे ‘डुरियन गोड लागले म्हणून (काटेरी) सालीसकट खाऊ नये’ अशी म्हण इथं आहे की नाही, माहीत नाही. २०१० मध्ये मलेशियन राजकारणी ‘अहमद लै भुजंग’ म्हणजेच ‘भुजंग’रावांनी डुरियनच्या फोडींवर ‘लै’ हात मारला. मग या काटेरी अन्नानं आपले प्रताप दाखवले. साहेबांचा श्‍वास कोंडला, चक्कर आली आणि हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. थोडक्यात काय, तर ‘लै भुजंग’ माणसालाही हे काटेरी फळ आडवं करू शकतं. मी फारसा विचार न करता या रसरशीत डुरियनची फोड तोंडात टाकली. वासाचं आणि चवीचं विश्लेषण करण्याच्या भानगडीत न पडता, अन्य कोणत्याही फळाची अपेक्षा न करता, एक नवीन फळ चाखतोय या विचाराचा आनंद घेत परत बुलेटाधीश झालो. अंधश्रद्धा आणि गैरसमज ः डुरियन फळाबाबत बऱ्याच अंधश्रद्धा आणि गैरसमज पसरले आहेत. त्यातील एक म्हणजे ‘डुरियन’मध्ये कोलेस्ट्रेरॉल जास्त असतं. पण हे साफ चूक आहे, कारण या फळात वाईट कोलेस्टेरॉल शून्य असतं. त्याऐवजी हृदयासाठी चांगले ‘मोनोसॅच्युरेटेड फॅट’ यामध्ये बक्कळ आहेत. दुसरा गैरसमज असा आहे, की डुरियन हे फार उष्ण फळ आहे आणि यामुळे होणारी उष्णता टाळण्यासाठी सोबत मँगोस्टीन हे फळ खावं. जुन्या चिनी प्रथेनुसार तसं म्हणतात. पण याला काहीही शास्त्रीय आधार नाही. कदाचित दोन्हीही फळांचा मौसम एकत्र येत असल्याने त्यांना एकत्र खाण्याची प्रथा पडली असावी. काही लोकांच्या मते डुरियन आणि बिअर एकत्र घेतल्याने माणूस मरतो. पण यालाही काहीही शास्त्रीय आधार सापडत नाही. कदाचित दोघांचं कॉकटेल केल्याने आणि अति सेवनाने लिव्हरला जास्त अल्कोहोल, साखर आणि तेल असलेले पदार्थ पचवायचा लोड आल्यामुळे त्रास होऊ शकतो. पोट फुगणं आणि अपचन होऊ शकतं. पण फळांसोबत बिअर घायला कोणी सांगितलं? दारू माणसाला मारते हे माहीत असूनही ती फळांसोबत घायची आणि फळांमुळे माणूस मरतो असा कांगावा करायचा, हे जगावेगळंच आहे. डुरियन खाल्ल्यामुळे कामवासना वाढते हा आणखी एक गैरसमज. यामुळे हजारो, लाखो रुपयाला हे फळ विकल्याच्या बातम्या येतात. पण या दाव्यातही शास्त्रीय तथ्य नाही. काम नसलेल्या रिकामटेकड्या लोकांनी कामवासनेसंबंधीची अफवा पसरवली असावी. या फळाची सर्वांत जमेची आणि कमकुवत बाजू म्हणजे त्याचा विशिष्ट वास. तो एवढा तीव्र असतो की तो काटेरी टणक आवरण भेदून बाहेर पडतो. तो फळाभोवती आसमंतात भरून राहतो. फळ त्या जागेवरून हलवलं तरीही बराच काळ तिथं रेंगाळत असतो. हा वास काही लोकांना आवडतो, पण काहींवर त्याचा उलटा परिणाम होऊन पार उलटी होण्यापर्यंत बात पोहोचते. सार्वजनिक वाहनातून नेण्यास बंदी  थायलंड, जपान, हाँगकाँग आणि तैवानमध्ये सार्वजनिक वाहनातून डुरियन नेण्यास बंदी आहे. डुरियनच्या बाबतीत सिंगापूर जरा जास्त कडक आहे. कायद्याने इथं सर्व सार्वजनिक वाहनातून डुरियन नेण्यास सरसकट बंदी आहे. अगदी टॅक्सीमध्येही ‘डुरियनफळ नेण्यास बंदी आहे’ अशा पुणेरी पाट्यांसारख्या पाट्या दिसतात. असा अन्याय या काटेरी फळांच्या राजावर होतोय. सरसकट भाडं नाकारणारे आपल्याकडील रिक्षावाले बरेच पाहिले होते, पण ‘डुरियन असेल तर दुरूनच निघा’ असा इशारा देणाऱ्या सिंगापुरी टॅक्सीवाल्यांबद्दल पहिल्यांदाच ऐकत होतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com