हवामान बदलाचा पीक उत्पादकतेवर परिणाम

इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल कम्युनिटीज (आय.एस.सी.) या संस्थेने विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या विभागातील आठ जिल्ह्यांतील पर्जन्यमान आणि तापमान यांच्या आकडेवारीचे विश्‍लेषण केले आहे. त्यानुसार त्या अहवाल तयार केला आहे.
हवामान बदलाचा पीक उत्पादकतेवर परिणाम
हवामान बदलाचा पीक उत्पादकतेवर परिणाम

महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोरडवाहू शेतीचे क्षेत्र जास्त असून केवळ १२.२ टक्के पीक क्षेत्र सिंचनाखाली आहे. राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या त्यांच्या उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, कापूस आणि ऊस ही प्रमुख पिके आहेत. मुख्य धान्य पिके ज्वारी, भात, मका, गहू आणि बाजरी आहेत. तसेच हरभरा, तूर, मूग आणि उडीद ही मुख्य डाळ वर्गीय पिके आहेत. तेलबियांमध्ये सोयाबीन, भुईमूग लागवड केली जाते. सध्याची शेती पद्धती ही पूर्वी अस्तित्वात असलेल्या हवामानविषयक पद्धतींवर आधारित आहेत, परंतु आता जागतिक हवामान बदलत आहे. मानवी हस्तक्षेपांच्या परिणामामुळे कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड आणि फ्लोरिनेटेड वायूंसारख्या वाढलेल्या हरितगृह वायूमुळे हवामान बदल आणि त्याचे परिणाम दिसून येत आहेत. पाऊस आणि तापमानाच्या बदलत्या आकृतिबंधाचा नकारात्मक प्रभाव शेतीवर यापूर्वीच दिसून आला आहे. येत्या काही वर्षांत यामुळे पीक उत्पादनावर आणखी परिणाम होण्याचा अंदाज वर्तवला आहे. सध्या शेतीमध्ये, लोकसंख्येचे वाढते प्रमाण, कमी होणारे लागवडीखालील क्षेत्र, पाण्याची कमतरता तसेच बिघडलेले मातीचे आरोग्य या समस्या दिसून येतात. आणि त्याबरोबरच हवामान बदल हा आपल्या पीक प्रणालीसाठी नवीन ताणतणाव आहे. हवामान बदलामुळे पिकांना धोका तर आहेच, पण त्याचबरोबर शेतकरी आणि मजूर जे उदरनिर्वाहासाठी फक्त शेतीवर अवलंबून आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हवामान बदल खूप जोखमीचा ठरू शकतो. अहवालातील प्रमुख मुद्दे  १) हवामान बदलांच्या वाढत्या जोखमीला महाराष्ट्राला सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम राज्यातील प्रमुख पिकांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. ‘हवामान बदलाचा महाराष्ट्रातील कृषी उत्पादकतेवर परिणाम’ या अहवालात इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल कम्युनिटीज (आय.एस.सी.) या संस्थेने राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या विभागातील ८ जिल्ह्यांतील पर्जन्यमान आणि तापमान यांच्या आकडेवारीचे आठवडानिहाय ३० वर्षांचे ऐतिहासिक (१९८९-२०१८) आणि पूर्वानुमान (२०२१-२०५०) परीक्षण केले आहे. तसेच शेतकऱ्यांना सद्य:स्थिती आणि भविष्यात येणाऱ्या धोक्यांविषयी माहिती दिली आहे. २) या अभ्यासामध्ये खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन तसेच रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांचा समावेश आहे. या अहवालात सादर केलेल्या विश्‍लेषणामध्ये, क्लायमेट मॉडेलिंग आणि पूर्वानुमान (ऐतिहासिक आणि भविष्यातील) पीक फेनोलॉजी (प्रत्येक वाढीच्या टप्प्यावर पिकासाठी इष्टतम परिस्थिती) यावर मत व्यक्त करण्यात आले आहे. ३) या परीक्षणामध्ये समुदायावर आधारित सहभाग-मूल्यांकनाचा (शेतकऱ्यांकडून पडताळणी) समावेश आहे. या शिवाय प्रत्येक पिकावर आणि शेतकऱ्यावर हवामान बदलांचा संभाव्य परिणाम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हे मूल्यांकन साप्ताहिक आकडेवारीनुसार केले आहे. हवामान बदल आणि खरीप हंगाम (सोयाबीन, कापूस)  १) उशिरा सुरू होणारा पावसाळा, अधून मधून पडणारा दुष्काळ आणि पाऊस यामुळे सोयाबीन व कापूस यांच्या उगवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. २) खरीप हंगामाच्या मधोमध पडणारा मुसळधार पाऊस यामुळे बुरशीजन्य रोग, तण आणि किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम सोयाबीनमधील शेंगा उत्पादनावर आणि कपाशीच्या बोंड तयार होण्यावर होण्याची शक्यता आहे. ३) पाण्याचा निचरा न होणारी जमीन आणि दमट परिस्थितीमुळे पिकांची मुळे सडण्यास अनुकूल वातावरण मिळेल. मातीतील पोषकद्रव्ये आणि खतांची परिणामकारकता कमी होईल. ४) सोयाबीन आणि कापूस या खरीप पिकांसाठी शेंगा आणि बोंड तयार होण्याच्या आणि परिपक्वतेच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा एकूण परिणाम उत्पादन आणि गुणवत्तेवर दिसून येईल. हवामान बदल आणि रब्बी हंगाम (गहू, हरभरा) १) येणाऱ्या काही वर्षांत गहू लागवडीसमोरील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे धान्य परिपक्व होण्याच्या वेळी असणारे उच्च तापमान हे आहे. तापमानात वाढ झाल्याने दाण्यांचे वजन कमी होते. २) या अभ्यासादरम्यान असे आढळून आले की, धान्य भरण्याच्या वेळीच तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. ३) हरभरा लागवडीत सुद्धा घाटे भरण्याच्या दरम्यान तापमानात अचानक वाढ दिसून येईल. ज्याचा परिणाम म्हणजे अपेक्षित प्रमाणापेक्षा घाटे कमी भरल्याने उत्पादनात घट होईल. ४) रब्बी हंगामासाठी पावसाचा अंदाज फारच कमी किंवा जवळजवळ नाही. त्यामुळे पिके संपूर्णपणे सिंचनावर अवलंबून असतात. भूजल हे सिंचनासाठी पाण्याचे प्रमुख स्रोत असल्याने भूजल संचय साठ्यावर परिणाम होणार आहे. हवामान बदल आणि पीक व्यवस्थापन  १) हवामानातील बदलत्या वातावरणाचा पीक उत्पादनावरील परिणाम कमी करण्यासाठी तपशीलवार हवामानविषयक आकडेवारी तयार करणे, ही माहिती शेतीविषयक निर्णय घेण्यासाठी उपयोगात आणणे, कृषी निविष्ठांची व साधनांची गुणवत्ता सुधारणे, मृदा आरोग्य व्यवस्थापन करणे, चांगल्या लागवड पद्धतीबद्दल माहिती मिळवणे आणि संसाधनांच्या संवर्धनासाठी उत्तम व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. २) हवामान बदल आणि त्याचा पीकवाढीच्या अवस्थांवर होणाऱ्या दुष्परिणामांबाबतचे आमचे अनुमान मांडत असताना पीक उत्पादनात नक्की किती घट होईल किंवा किती टक्के पिकांवर याचा परिणाम होईल यावर निश्‍चित परिमाणात्मक विधान करणे अवघड आहे, कारण पिकावरील हवामान बदलाचे परिणाम हे गुंतागुंतीचे आणि परस्पर संबंधित आहेत. ३) लागवडीसाठी वापरण्यात येणाऱ्या जाती, जमिनीचा उतार, पेरणीचा कालावधी आणि वापरलेली खते या सर्व बाबींचा परिणाम लक्षात घेऊन त्यावरून हवामान बदलाचा प्रभाव ठरू शकतो. या घटकांबद्दलच्या तपशीलवार माहितीशिवाय हे अनुमान करणे अवघड आहे. ४) भविष्यातील संशोधनात हवामानातील आर्द्रता, पाऊस आणि तापमान निर्देशांक, कीटकांचा प्रादुर्भाव, पीक जाती, लागवडीची तारीख, मातीचा प्रकार, खतांचा वापर, सिंचनाबाबतची तपशीलवार माहिती आणि अशा इतर परिमाणात्मक आकडेवारीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. म्हणजे या माहितीवर आधारित पिकांच्या संभाव्य जोखमीबद्दल शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करता येते. संपर्क ः सुषमा दरणे,९८२३२७७५७६ (लेखिका इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल कम्युनिटीज येथे प्रकल्प सहायक म्हणून कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com