शेतकरी नियोजन पीक तूर

शेतकरी ः ओंकारनाथ शिंदे गाव ः सनपुरी, ता.जि. परभणी एकूण क्षेत्र ः ४० एकर तूर क्षेत्र ः ८ एकर
शेतकरी नियोजन पीक तूर
शेतकरी नियोजन पीक तूर

शेतकरी ः ओंकारनाथ शिंदे गाव ः सनपुरी, ता.जि. परभणी एकूण क्षेत्र ः ४० एकर तूर क्षेत्र ः ८ एकर

माझी सनपुरी (ता. परभणी) येथे ४० एकर मध्यम ते भारी प्रकारची जमीन आहे. त्यापैकी ३० एकरांवर खरीप हंगामात सोयाबीन, तूर, मूग, हळद आदी पिके घेत असतो. उर्वरित क्षेत्रावर पेरू, सीताफळ, आंबा अशी एकूण १० एकर क्षेत्रावर फळबाग लागवड केलेली आहे.

  • मागील २० ते २५ वर्षांपासून ‘महाबीज’च्या बीजोत्पादन कार्यक्रमांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तुरीच्या विविध वाणांचे बीजोत्पादन मी घेत आहे. त्यामुळे खुल्या बाजाराच्या तुलनेत साधारणपणे २५ टक्के जादा दर मिळतो. त्यामुळे अधिक फायदा होतो. आजपर्यंत मी तुरीमध्ये विविध आंतरपीक पद्धतीचे प्रयोग केलेले आहेत. तीन वर्षांपूर्वी ठिबक सिंचन पद्धतीवर तुरीची लागवड केली होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून तूर अधिक सोयाबीन ही आंतरपीक पद्धती किफायतशीर ठरत असल्याचा माझा अनुभव आहे. त्यामुळे आता दरवर्षी साधारणतः ८ एकर तुरीमध्ये सोयाबीनचे आंतरपीक घेत असतो.
  • २०१७ मध्ये बीडीएन-७०८ या वाणाची ठिबक सिंचन पद्धतीने लागवड केली होती. त्यापासून एकरी १ ते २ क्विंटलपर्यंत अधिक उत्पादन मिळाले. त्यानंतर २०१९ मध्ये तुरीच्या बीडीएन-७११ (पांढरी) या वाणाचे बीजोत्पादन घेण्यात आले.
  • या वर्षीचे नियोजन 

  • या वर्षी बीडीएन-७१६ (लाल) या वाणांचे बीजोत्पादन घेण्याचे नियोजन केले आहे.
  • पेरणीपूर्वी बियाण्यांस ट्रायकोडर्मा बुरशीनाशक, रायझोबिअम आणि पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रकिया करण्यात आली.
  • ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राद्वारे दोन ओळींतील अंतर १८ इंच ठेवून तुरीच्या एक किंवा दोन ओळींनंतर सोयाबीनच्या ८ ओळींची पेरणी करत होतो. गतवर्षी तुरीच्या एका ओळीनंतर सोयाबीनच्या ६ ओळी अशी पेरणी केली होती. 
  • पेरणी १६ जून रोजी तुरीच्या दोन ओळींनंतर सोयाबीनच्या ८ ओळी या पद्धतीने करण्यात आली. पेरणीसाठी एकरी ३ ते ४ किलो बियाणे लागले. 
  • पेरणी करताना एकरी २ बॅग सिंगल सुपर फॉस्फेट खत देण्यात आले. त्यानंतर फवारणी यंत्राद्वारे १९ः१९ः१९ विद्राव्य खते देण्यात आली.
  • पीक सध्या ३१ दिवसांचे झाले आहे. तणनियंत्रणासाठी एक कोळपणी करण्यात आली आहे.
  • मागील आठवड्यात चक्री भुंगा आणि पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकाची पहिली फवारणी घेण्यात आली. फवारणीनंतर विद्राव्य खते देण्यात आली.
  • यासोबतच सेंद्रिय पद्धतीने साधारणतः २ एकर तुरीची लागवड केली आहे. यामध्ये शेणखत तसेच कीड-रोग व्यवस्थापनासाठी संपूर्णपणे जैविक निविष्ठांचा वापर केला जातो. 
  • आगामी नियोजन 

  • तूर पीक गाठी लागण्याच्या फुलोरा अवस्थेत असताना दुसरी फवारणी घेण्यात येईल. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी घेतली जाईल. 
  • कमी पावसामुळे जमिनीत कमी ओलावा झालेल्या परिस्थितीत सोयाबीन काढणीनंतर तुरीच्या दोन जोडओळींमधील मोकळ्या जागेत सऱ्या ओढून एकाआड एक सरीने पाणी दिले जाईल. त्यामुळे एकरी ५ ते ७ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्यास मदत होते. 
  • गरजेनुसार आंतरमशागत करून तण व्यवस्थापन केले जाईल.
  • तूर पीक १ ते दीड फूट उंच झाल्यानंतर शेंडे खुडणार आहे. त्यामुळे फळ फांद्याची संख्या वाढण्यास मदत होते. तसेच शेंगा जास्त लागतात आणि अधिक उत्पादन मिळते.
  • कल्पकतेतून फवारणी यंत्रामध्ये बदल  तूर पीक उंच वाढलेले असताना कीटकनाशकांची फवारणी परिणामकारकरीत्या होणे आवश्‍यक असते. त्यासाठी स्वतःच्या संकल्पनेतून फवारणी यंत्र विकसित केले आहे. बैलगाडीमध्ये एचटीपी पंप ठेवून लोखंडी सांगाड्यावर लावलेल्या ४ नोझलद्वारे तूर  पिकाच्या वरील बाजूने योग्य पद्धतीने फवारणी करता येते. दोन जोडओळींतील मोकळ्या जागेत बैलगाडी चालवता येते. त्यामुळे फवारणीचे काम कमी वेळेत तसेच परिणामकारकरीत्या होण्यास मदत होते. 

    -  ओंकारनाथ शिंदे (कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी),   ७५८८०८१२४८ (शब्दांकन ः माणिक रासवे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com