दर्जेदार ‘अर्ली’ द्राक्ष उत्पादनात देवरेंचा हातखंडा

दर्जेदार ‘अर्ली’ द्राक्ष उत्पादनात देवरेंचा हातखंडा
दर्जेदार ‘अर्ली’ द्राक्ष उत्पादनात देवरेंचा हातखंडा

नाशिक जिल्ह्यात देवळा, सटाणा भाग ‘अर्ली’ (आगाप) द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. देवळा तालुक्यातील वाजेगाव येथील बळीराम नथू देवरे यांनी या शेतीत मोठा अनुभव मिळवत आपल्या दर्जेदार द्राक्षांची परदेशी बाजारपेठेत ओळख तयार केली आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन व नियोजनातून उत्पादित द्राक्षे रशिया, दुबईत निर्यात होत असून, त्यास किलोला ८० ते कमाल ११० रुपयांपर्यंत दर मिळवण्यात देवरे यशस्वी झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात कसमादे पट्टा डाळिंबाचे आगर म्हणून ओळखला जातो. देवळा तालुक्यातील वाजगाव भागातील प्रयोगशील डाळिंब उत्पादकांची सर्वत्र ख्याती होती. डाळिंबाचे सुमारे अडीचशे हेक्टर तरी क्षेत्र असावे, असा अंदाज होता. साहजिकच एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात दर्जेदार डाळिंबे मिळण्याची सोय व्यापाऱ्यांना होत असल्याने मोठ्या प्रमाणावर व्यापारी या परिसरात असत. सन २००७-०८ च्या दरम्यान तेलकट डाग रोगाने बागेत शिरकाव केला. हळूहळू कसमादे आगारातून डाळिंब कमी झाले. देवरे यांची बदललेली शेती वाजगाव येथीलच प्रयोगशील डाळिंब उत्पादक बळीराम नथू देवरे यांनीदेखील डाळिंबाकडून आपला मोर्चा द्राक्ष शेतीकडे वळवला. त्यांचे एकत्रित कुटुंब होते त्या वेळी चाळीस एकरांवर डाळिंबाची लागवड व्हायची. उत्तम व्यवस्थापन व्हायचे. पण तेलकट डाग, मर सारख्या रोगांचा प्रादुर्भाव हाताबाहेर जाऊ लागल्यानंतर संपूर्ण बाग उपटून टाकण्यापलीकडे दुसरा मार्ग राहिला नाही. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी अर्ली द्राक्षे, कांदा, मका, मिरची, अन्य भाजीपाला पिकांकडे मोर्चा वळवला. देवरे यांनीही काळाची व बाजारपेठेची गरज लक्षात घेत द्राक्ष बागेकडे आपला मोर्चा वळवला. संघर्ष काही थांबला नाही बळीराम यांचा द्राक्षात अनुभव नव्हता. मात्र, मुलगा राजेंद्र व अक्षय यांच्या मदतीने अर्ली द्राक्षाचे (आगाप) तंत्र समजावून घेण्यास त्यांनी सुरुवात केली. पाच एकरांत थॉमसन व क्लोन या वाणांची लागवड केली. सटाणा, देवळा भागात अर्ली द्राक्षे घेण्याची पद्धत आहे. देवरे यांनीही हे तंत्र हळूहळू आत्मसात करण्यास सुरुवात केली. लागवडीच्या दुसऱ्या वर्षी बाग काढणी सुरू असताना नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. यात बागेचे मोठे नुकसान झाले. अर्ली बहार असल्याने खर्च मोठ्या प्रमाणावर होऊन तोटा सहन करावा लागला. पण, त्यातूनही मनोबल कायम ठेवले. अनुभवातून पिकात कुशलता

  • देवरे यांची एकूण २० एकर शेती आहे. त्यापैकी १५ एकरांत द्राक्ष पीक असते. सुमारे सात ते आठ वर्षांपासून त्यांनी अर्ली द्राक्षांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. आज या पिकात त्यांनी हातखंडा तयार केला आहे. चालू हंगामात सुरुवातीपासून सुयोग्य नियोजन करत पाच एकर क्षेत्राचे चार प्लॉट तयार केले. या प्लॉटसमधून योग्य नियोजन राखत व चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती असतांनाही द्राक्षांचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे. देवरे म्हणाले, की दर वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये आम्ही गोडी छाटणी घेतो.
  • पावसाळा हंगामात फवारण्यांचे नियोजन रसायनांचे ‘पीएचआय’ पाहून अत्यंत काटेकोर कले जाते.
  • साधारण नोव्हेंबर ते डिसेंबरच्या अखेरीपर्यंत काढणी पूर्ण होते. त्यानंतर फेब्रुवारीदरम्यान छाटणीची कामे सुरू होतात.
  • किलोला ८० रुपये दराचा फायदा

  • द्राक्षे डिसेंबरदरम्यान बाजारात येत असल्याने दरांचा मोठा फायदा उचलता येतो.
  • डाळिंबाची बाग असल्यापासून व्यापारी जोडले असल्याने जागेवरच येऊनच मालाची खरेदी होते.
  • अलीकडील काळात किलोला ८० रुपये दर मिळत असल्याचे अक्षय देवरे यांनी सांगितले. गेल्या वर्षी कमाल दर ११० रुपये मिळाला होता. याच व्यापाऱ्यांमार्फत रशिया, दुबई या बाजारपेठांत आमची द्राक्षे जातात. दर वर्षी एकरी बारा टनांपर्यंत उत्पादन मिळते. उत्पादन खर्च एकरी सुमारे दोन लाख रुपये असतो.
  • द्राक्षातील साखरेचे प्रमाण १८ टक्क्यांच्या वर, तर मण्यांचा आकार १५ मिमीपेक्षा अधिक असतो. पंधरा एकरांपैकी बहुतांश उत्पादन दर वर्षी निर्यातीसाठीच जात असल्याचे अक्षय म्हणाले.
  • अन्य पिकांची साथ द्राक्षाला देवरे यांनी कांदा, मका या पिकांची साथ दिली आहे. चालू वर्षी त्यांच्याजवळ तीनशे क्विंटल उन्हाळी, तसेच लाल कांदा शिल्लक आहे. कांद्याचे पाच ते सहा एकर क्षेत्र असते. एकरी सुमारे १७ टनांपर्यंत उत्पादन ते घेतात. दोनशे क्विंटल साठवणूकची त्यांची कांदाचाळ आहे. शेततळे देते आधार

  • वाजेगावचा भाग तसा डोंगराकडचा आहे. येथे पाऊसही चांगल्या प्रमाणात पडतो. मात्र, मागील चार-पाच वर्षांपासून उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. ही समस्या लक्षात घेऊन शेतात एक एकर क्षेत्रावर शेततळे उभारले आहे. त्याद्वारे दीड कोटी लिटर पाणीसाठा क्षमता तयार झाली आहे. या शेततळ्यामुळे उन्हाळ्यात बाग वाचवणे शक्य झाले आहे. तीन विहिरी, बोअरवेल्सची सुविधा आहे. या पाण्याच्या आधारे शेततळे भरण्यात येते. त्यात दोन वर्षांपूर्वी सुमारे ३० हजार मासे सोडले आहेत.
  • सध्या ते सात ते आठ किलो वजनाचे झाले आहेत. यंदा त्यापासून अतिरिक्त उत्पन्न सुरू होईल.
  • माशांना किलोला १०० ते १२० रुपये दर सुरू असल्याचे अक्षय म्हणाले.
  • दुभती जनावरे शेतीला घरच्या व मुबलक शेणखाताशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पाच म्हशी व बैल यांची जोपासना केली आहे. त्यापासून मोठ्या प्रमाणावर शेणखत, तसेच स्लरी मिळते. त्यांच्या वापरातून द्राक्षाची गुणवत्ता जपली जाते. सुमारे पाच ते दहा लिटर दूध बाजारात विक्रीसाठी जाते. त्यापासून उत्पन्न वाढण्यास मदत होते. बागेचे टेंडर दर वर्षी बाग कामासाठी टेंडर दिले जाते. त्यासाठी एकरी ३० ते ३५ हजार रुपये दिले जातात. साधारण २० ते २५ मजूर येऊन बागेतील छाटणी वा अन्य कामे करतात. या पद्धतीमुळे मजूरटंचाईची समस्या कमी केली आहे. प्रत्येक वेळी मजुरांचा शोध घेण्याचे काम पडत नाही. ॲग्रोवनचे वाचन गेल्या किमान १० वर्षांपासून ॲग्रोवनचे वाचन हा देवरे यांच्या दिनचर्यातील महत्त्वाचा घटक राहिला आहे. यशकथा, नवे तंत्रज्ञान, जगभरातील बाजारपेठा, हवामान अंदाज आदी माहितींचा त्यांना शेतीत उपयोग होतो. अक्षय देवरे- ९६७३२५५५८७ बळीराम देवरे- ८८८८४१४८२९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com