तरंगणारे‌ ‌म्यानमारी‌ ‌टोमॅटो‌!‌ ‌

भल्या मोठ्या तळ्यामध्ये पाणगवतांवर थोडीशी माती, गाळ पसरून पिकांची लागवड केली जाते. पूर्वीपासून जैवविविधतेने नटलेल्या या तळ्यामध्ये ही तरंगणारी शेती आजवर पर्यावरणाचा आब राखून केली जाई. मात्र गेल्या काही वर्षांत वाढत्या पर्यटकांच्या रेट्यामुळे आणि कॉर्पोरेट हस्तक्षेपामुळे रासायनिक बनू लागली आहे.
तरंगणारे‌ ‌म्यानमारी‌ ‌टोमॅटो‌!‌ ‌
तरंगणारे‌ ‌म्यानमारी‌ ‌टोमॅटो‌!‌ ‌

भल्या मोठ्या तळ्यामध्ये पाणगवतांवर थोडीशी माती, गाळ पसरून पिकांची लागवड केली जाते. पूर्वीपासून जैवविविधतेने नटलेल्या या तळ्यामध्ये ही तरंगणारी शेती आजवर पर्यावरणाचा आब राखून केली जाई. मात्र गेल्या काही वर्षांत वाढत्या पर्यटकांच्या रेट्यामुळे आणि कॉर्पोरेट हस्तक्षेपामुळे रासायनिक बनू लागली आहे. ‌ ‘‘क्यू‌ ‌याम‌ ‌किम‌ ‌सीऽऽ‌ ‌‌सरऽऽ‌ ‌‌क्यू‌ ‌याम‌ ‌किम‌ ‌सीऽऽ’’ ‌‌‌असं‌ ‌न‌ ‌समजणाऱ्या‌ ‌एलियन‌ ‌भाषेत‌ ‌रस्त्यावरल्या बायका‌ ‌ओरडत‌ ‌होत्या.‌ ‌कडेला‌ ‌बरीच‌ ‌गर्दी‌ ‌जमली‌ ‌होती.‌ ‌मी‌ ‌कुतूहलाने‌ ‌बाइक‌ ‌रस्त्याच्या‌ ‌कडेला‌ ‌थांबवली. ‌काय‌ ‌प्रकार‌ ‌आहे‌,‌ ‌‌हे‌ ‌पाहण्याचा‌ ‌प्रयत्न‌ ‌करू‌ ‌लागलो.‌ ‌तोपर्यंत‌ ‌आकर्षक‌,‌ ‌‌गोल‌ ‌चेहरेपट्टीची‌,‌ ‌‌चपळ‌ ठेंगणी‌ ‌म्यानमारी‌ ‌युवती‌ ‌तुरुतुरू‌ ‌चालत‌ ‌माझ्याकडे‌ ‌आली.‌ ‌उन्हातान्हात‌ ‌राबून‌ ‌रापलेला‌ ‌पीतवर्ण‌ ‌गव्हाळ‌ ‌झालेला.‌ ‌डोक्यावर‌ ‌मोठी‌ ‌बांबूची‌ ‌म्यानमारी‌ ‌टोपी.‌ ‌दोन्ही‌ ‌हातांत‌ ‌भलेमोठे‌ ‌रसरशीत‌ ‌टोमॅटो‌ ‌घेऊन‌ ‘‘‌क्यू‌ ‌याम‌ ‌किम‌ ‌सीऽऽ ‌‌सरऽऽ’’‌ ‌‌असं‌ ‌म्हणत‌ ‌ती‌ ‌पुढे‌ ‌आली.‌ ‌रस्त्याच्या‌ ‌बाजूला‌ ‌टोमॅटोचे‌ ‌ढीग‌ ‌मांडून‌ ‌काही‌ ‌बायका बसल्या‌ ‌होत्या.‌ ‌आत्ता‌ ‌कुठं‌ ‌माझ्या‌ ‌हेल्मेटधारी‌ ‌डोक्यात‌ ‌प्रकाश‌ ‌पडला.‌ ‘‌टमाटं‌ ‌घ्या‌ ‌वं‌ ‌सायेब!’‌ ‌‌असं‌ ‌म्यानमारी‌ ‌भाषेत‌ ‌ती‌ ‌ओरडत‌ ‌होती.‌ ‌बाइकवरचा‌ ‌हा‌ ‌परदेशी‌ ‌मासा‌ ‌गळाला‌ ‌लागावा‌ ‌म्हणून‌ ‌तिची‌ ‌लगबग‌ सुरू‌ ‌होती.‌ ‌लालबुंद‌ ‌रसरशीत‌ ‌टोमॅटो‌ ‌पाहून‌ ‌तोंडाला‌ ‌पाणी‌ ‌सुटलं.‌ त्या‌ ‌रसरशीत‌ ‌टोमॅटोचा‌ ‌एक‌ ‌वाटा‌ ‌उचलला‌ ‌आणि‌ ‌कोरे‌ ‌करकरीत‌ ‌म्यानमारी‌ ‌कॅट‌ ‌त्या‌ ‌टोमॅटो‌ ‌सुंदरीच्या‌ हातावर‌ ‌ठेवले.‌ ‌कॅट‌ ‌पाहून‌ ‌टोमॅटोची‌ ‌चमक‌ ‌तिच्या‌ ‌चेहऱ्यावर‌ ‌उमटली.‌ ‌‘‘एवढे‌ ‌रसरशीत‌ ‌टोमॅटो‌ ‌कुठं‌ पिकवले‌ ‌जातात‌?’’‌ ‌‌असं‌ ‌आमच्या‌ गाइड -‘‌ज्यू‌ ‌टिन’‌‌‌ला‌ ‌विचारलं,‌ ‌तेव्हा‌‌ ‘‘‌इथंच‌,‌ ‌‌पाण्यावरच्या‌ तरंगत्या‌ ‌शेतात’’‌ ‌असं‌ ‌उत्तर‌ ‌मिळालं.‌ ‌ ‌ ‘‘‌काय‌?’’‌ ‌‌हेल्मेट‌ ‌खाजवत‌‌ ‌‌मी‌ ‌विचारलं. ‘‘‌सांगतो!’’‌ ‌असं‌ ‌म्हणत‌ ‌टोमॅटोचा‌ ‌एक‌ ‌भलामोठा‌ ‌तुकडा‌ ‌त्याने‌ ‌सफरचंदासारखा‌ ‌दाताने‌ ‌तोडला.‌ ‌पक्षांतर करणाऱ्या‌ ‌आमदारासारखा‌ ‌त्याचा‌ ‌एक‌ ‌थेंब‌ ‌ओठावरून‌ ‌हनुवटीकडे‌ ‌ओघळला.‌ ‌बेडकाने‌ ‌लांब‌ ‌जिभेने किड्याला‌ ‌तोंडात‌ ‌ओढावं‌ ‌तसा‌ ‌तो‌ ‌थेंब‌ ‌सर्रकन‌ ‌स्वगृही‌ ‌परत‌ ‌आणत‌ ‌त्याने‌ ‌‌टोमॅटो‌ ‌आख्यानाला‌‌ ‌‌सुरुवात केली.‌ ‌ ‌ म्यानमारच्या‌ ‌या‌ ‌राजधानीच्या‌ ‌शहरापासून‌ ‌अडीचशे‌ ‌किलोमीटर‌ ‌वर‌ ‌‘इन्ले’‌ ‌नावाचं‌ ‌तळं‌ ‌आहे.‌ या ‌तळ्याचा‌ ‌आकार‌ ‌तरी‌ ‌किती‌ ‌असावा‌,‌ ‌‌तर‌ ‌तब्बल‌ ‌११६‌ ‌वर्ग‌ ‌किलोमीटर.‌ ‌समुद्रसपाटीपासून‌ ‌२९००‌ ‌फूट‌ ‌उंचीवरील‌ ‌त्या‌ ‌तळ्याची‌ ‌सरासरी‌ ‌खोली‌ ‌मात्र ‌फक्त‌ ‌७‌ ‌फूट‌ ‌आहे.‌ ‌तळ्याच्या‌ ‌पाण्यात‌ ‌वाढणारे‌ पाणफुटी ‌गवत‌ ‌लहानलहान‌ ‌बोटीतून‌ ‌गोळा‌ ‌करून‌ ‌पाण्यावर‌ ‌लांब‌ ‌पट्टीसारखा‌ ‌ढीग‌ ‌केला‌ ‌जातो.‌ ‌मग‌ ‌तरंगणाऱ्या‌ ‌या‌ ढिगावर‌ ‌मातीचा‌ ‌पातळ‌ ‌थर‌ ‌देऊन‌ ‌त्यावर‌ ‌शेती‌ ‌केली‌ ‌जाते.‌ या‌ ‌शेतीला‌ ‌‘येचांग’‌ ‌असं‌ ‌म्हणतात.‌ ‌पाण्याच्या‌ लाटांबरोबर‌ ‌डोलणारी‌ ‌शेतं‌ ‌मनोहारी‌ ‌दिसतात.‌ ‌ही‌ ‌शेतं‌ ‌वाहून‌ ‌जाऊ‌ ‌नयेत‌ ‌म्हणून‌ ‌तळ्यात‌ ‌बांबूच्या ‌खुंट्या ‌गाडून‌ ‌म्हैस‌ ‌बांधावी‌ ‌तशी‌ ‌बांधून‌ ‌ठेवतात.‌ ‌एखाद्या‌ ‌बिलंदर‌ ‌शेतचोराने‌ खुंटीचा‌ ‌दोर‌ ‌कापून‌ ‌म्हैस‌ ‌पळवावी‌ ‌तशी‌ ‌शेती‌ पळविण्याच्या ‌घटनाही‌ ‌अधूनमधून‌ ‌घडतात.‌ ‌आपल्याकडे‌ ‌विहीर‌ ‌चोरीला‌ ‌गेल्याचं‌ ‌ऐकलं‌ ‌होतं.‌ ‌पण‌ ‌शेताची‌ ‌चोरी‌ ‌पहिल्यांदाच‌ ‌ऐकत‌ ‌होतो.‌ ‌ ‌ ‌ पाण्यावरच्या‌ ‌ह्या‌ ‌शेतात‌ ‌म्यानमारी‌ ‌बळीराजा‌ ‌पाण्यासारखा‌ ‌घाम‌ ‌गाळतो.‌ ‌ही‌ ‌शेतं‌ ‌कसताना‌ ‌बरेच‌ ‌शारीरिक‌ ‌श्रम‌ ‌होतात.‌ ‌शेताच्या‌ ‌बाजूला‌ ‌खोपट्यात‌ ‌तो‌ ‌राहतो.‌ ‌लहानग्या‌ ‌निमुळत्या‌ ‌बोटीतून‌ ‌तो‌ ‌शेतीकामात‌ ‌मग्न‌ ‌असतो.‌ ‌त्याची‌ ‌बोट‌ ‌वल्हवायची‌ ‌तऱ्हाही‌ ‌जगावेगळीच.‌ ‌एक‌ ‌पाय‌ ‌बोटीवर‌ ‌ठेवून‌ ‌दुसऱ्या‌ ‌पायाने‌ ‌लांब‌ ‌बांबूचं‌ ‌वल्हं‌ ‌तळ्याच्या‌ ‌पोटात‌ ‌खुपसत‌ ‌तो‌ ‌बोटीला‌ ‌पुढे‌ ‌ढकलत‌ ‌नेतो.‌ ‌हे‌ ‌करताना‌ ‌तो‌ ‌लंगडीलंगडी‌ खेळल्यागत‌ ‌किंवा‌ ‌एका‌ ‌पायाने‌ ‌बांबूवर‌ ‌कसरत‌ ‌करणाऱ्या‌ ‌डोंबाऱ्याच्या‌ ‌पोरागत‌ ‌वाटतो.‌ ‌अशा‌ ‌या‌ ‌पायाळू‌ ‌जलपुत्राचं‌ ‌दोन‌ ‌वरंब्यामधून‌ ‌सराईतपणे‌ ‌फिरत‌ ‌शेतकाम‌ ‌सुरू‌ ‌असतं.‌ ‌ ‌ तुम्ही‌ ‌शेताची‌ ‌सीमा‌ ‌कशी‌ ‌ठरवता‌?‌ ‌‌इथं‌ ‌बांधावरून‌ ‌भांडणं‌ ‌होत‌ ‌नाहीत‌ ‌का‌?‌ ‌‌माझ्या‌ ‌डोक्यातल्या‌ ‌अस्सल भारतीय‌ ‌किड्याने‌ ‌प्रश्‍न‌ ‌कुरतडला.‌ ‌यावर‌ ‘‘नाही!’’‌ ‌असं‌ ‌उत्तर‌ ‌मिळालं.‌ ‌शेजारी‌ ‌सहसा‌ ‌भांडत‌ ‌नाहीत.‌ ‌उलट‌ ‌एकदुसऱ्याला‌ ‌निंदण्या-खुरपण्यात‌ ‌मदत‌ ‌करतात.‌ ‌मी‌ ‌विचार‌ ‌केला‌,‌ ‌‌तसंही‌ ‌पाण्यातल्या‌ ‌शेतातला‌ ‌बांध‌ ‌कोरणार‌ ‌तरी‌ ‌कसा‌?‌ ‌‌आपल्याकडे‌ ‌‘‌शेत‌ ‌विकलं‌ ‌तरी‌ ‌बेहत्तर‌,‌ ‌‌पण‌ ‌बांधाची‌ ‌केस‌ ‌नाही‌ ‌हरणार!’‌ ‌‌अशा‌ ‌निग्रही‌ ‌बांध्याच्या‌ ‌लोकांचं‌ ‌उदाहरण‌ ‌समोर‌ ‌असताना‌,‌‌ ‌दात‌ ‌कोरावा‌ ‌एवढ्या‌ ‌सोप्या‌ ‌पद्धतीने‌ ‌बांध‌ ‌कोरायचा‌ ‌प्रॉब्लेम‌ ‌इथं‌ ‌सुटला‌ ‌होता.‌ ‌पाण्यात‌ ‌शेती‌ ‌करूनही‌ ‌शेजाऱ्याला‌ ‌पाण्यात‌ ‌न‌ ‌पाहणाऱ्या‌ ‌म्यानमारी‌ ‌शेतकऱ्याचं‌ ‌अप्रूप‌ ‌वाटलं.‌ ‌‘‘निंदकाचं‌ ‌घर‌ ‌असावं‌ ‌शेजारी’’‌ ‌ही‌ ‌म्हण‌ ‌इथं‌ ‘‘निंदणाऱ्याचं‌ ‌घर‌ ‌असावं‌ ‌शेजारी’’‌ ‌अशी‌ ‌झाली‌ ‌होती.‌ या‌ ‌तरंगणाऱ्या‌ ‌शेतात‌ ‌सत्तर‌ ‌टक्के‌ ‌पीक‌ ‌टोमॅटोचं‌ ‌घेतलं‌ ‌जातं.‌ ‌उरलेल्या‌ ‌तीस‌ ‌टक्क्यांत‌ ‌बीन्स‌,‌ ‌‌फुलशेती‌ ‌आणि‌ ‌काकडीसारखी ‌वेलवर्गीय‌ ‌पिकं‌ ‌घेतली‌ ‌जातात.‌ ‌या‌ ‌पाण्याचा‌ ‌पीएच‌ ‌म्हणजे‌ ‌सामू‌ ‌आहे‌ ‌तब्ब्ल‌ ‌७.८‌ ‌ते‌ ‌८.०.‌ ‌एवढ्या‌ ‌क्षारीय‌ ‌पाण्यात‌ ‌वाढणारी‌ ‌पिके‌ ‌म्हणजे‌ ‌चमत्कारच‌ ‌म्हणावा‌ ‌लागेल.‌ ‌पण‌ ‌हा‌ ‌मोठा‌ ‌चमत्कार‌ ‌घडवतात‌ ‌सूक्ष्मजीव.‌ ‌पाणगवताच्या‌ ‌सेंद्रिय‌ ‌पदार्थांचं‌ ‌विघटन‌ ‌करून‌,‌ ‌‌सेंद्रिय आम्ले तयार करून ‌पिकाच्या‌ ‌मुळाजवळ‌ ‌ते‌ ‌आम्लता‌ ‌तयार‌ ‌करतात.‌ ‌पाणवनस्पतीचं‌ ‌हळूहळू‌ ‌कंपोस्ट‌ ‌खतात‌ ‌रूपांतर‌ ‌करत‌ ‌हे‌ ‌सूक्ष्मजीव‌ ‌पिकाला‌ ‌अन्नद्रव्याचा‌ ‌आयुष्यभर‌ ‌रतीब‌ ‌घालत‌ ‌असतात.‌ ‌कोणतेही‌ ‌खत‌,‌ ‌‌कीटकनाशक‌ ‌न‌ ‌वापरता‌ ‌वाढलेली‌ ‌लालभडक‌ ‌टोमॅटोची‌ ‌झाडं‌ ‘‌हवा‌ ‌में‌ ‌उडत‌ ‌जाय‌ ‌रे‌,‌ ‌‌मेरा‌ ‌लाल‌ ‌दुपट्टा‌ ‌मलमल‌ ‌का‌’‌ ‌‌असं‌ ‌गात‌ ‌पाण्याच्या‌ ‌लाटेबरोबर‌ ‌आनंदाने‌ ‌डोलत‌ ‌असतात.‌ ‌आपल्याकडे‌ ‌श्रीनगरला‌ ‌दल‌ ‌तळ्यात‌ ‌अशा‌ ‌प्रकारची‌ ‌शेती‌ ‌होते.‌ मणिपूरमध्येही ‌पाण्यावर‌ ‌तरंगणारे‌ ‌गार्डन‌ ‌आहे.‌ ‌पण‌ ‌म्यानमार‌‌मधील‌ ‌ही‌ ‌तरंगती‌ ‌शेती‌ ‌फार‌ ‌मोठ्या‌ ‌प्रमाणात‌ ‌आणि‌ ‌तंत्रशुद्ध‌ ‌प्रकारे‌ ‌केली‌ ‌जाते.‌ ‌ ‌ कार्पोरेट जग पाहतं पाण्यात... जैवविविधतेच्या‌ ‌बाबतीतही‌ ‌हे‌ ‌‌‘‌इन्ले‌’‌ ‌‌तळं‌ ‌जगात‌ ‌भारी‌ ‌आहे.‌ ‌इथं‌ ‌३५‌ ‌प्रकारचे‌ ‌मासे‌ ‌आणि‌ ‌४५‌ ‌गोगलगाईंच्या‌ ‌प्रजाती‌ ‌आढळतात.‌ ‌त्यातील‌ ‌निम्म्या‌ ‌प्रजाती‌ ‌जगात‌ ‌फक्त‌ ‌इथंच‌ ‌वास्तव्याला‌ ‌आहेत.‌ ‌देशविदेशातील‌ ‌२०‌ हजार ‌पक्षी‌ ‌वर्षभरात‌ ‌या‌ ‌तळ्याला‌ ‌भेट‌ ‌देतात.‌ ‌पक्ष्यांचं‌ ‌बरंय‌,‌ ‌‌ते‌ ‌कोणत्याही‌ ‌पक्षात‌ ‌नसल्याने‌ ‌कुठल्याही‌ ‌सीमेच्या‌ ‌बंधनात‌ ‌न‌ ‌अडकता‌,‌ ‌‌पासपोर्ट‌,‌ ‌‌व्हिसाच्या‌ ‌कटकटींशिवाय‌ ‌त्यांना‌ ‌जगभर‌ ‌फिरता ‌येतं.‌ ‌ ‌ एखाद्या‌ ‌स्वर्गसुंदरीचा‌ ‌सुंदर‌ ‌चेहरा‌ ‌कुणीतरी‌ ‌बेपर्दा‌ ‌करावा‌ ‌आणि‌ ‌सर्वांच्या‌ ‌नजर‌ ‌चुंबकासारख्या‌ ‌तिच्याकडे‌ ‌आकर्षित‌ ‌व्हाव्यात‌ ‌अगदी‌ ‌तसंच‌ ‌१९६०‌ ‌मध्ये‌ ‌घडलं.‌ ‌मार्टिन‌ ‌मीचालॉन‌ ‌या‌ ‌भूगोल‌ ‌शास्त्रज्ञानं ‌या‌ ‌तळ्यावरील‌ ‌त्याचा‌ ‌प्रबंध‌ ‌१९६०‌ ‌मध्ये‌ ‌प्रकाशित‌ ‌करून‌ ‌आपलं‌ ‌शास्त्रीय‌ ‌नाक‌ ‌खुपसलं‌ ‌आणि‌ ‌जगाच्या‌ ‌नजरा‌ ‌या व्हर्जिन‌ ‌सौंदर्याकडे‌ ‌वळल्या.‌ ‌१९९२‌ ‌ते‌ ‌२००९‌ ‌या‌ ‌सतरा‌ ‌वर्षांत‌ ‌तळ्यावरच्या‌ ‌तरंगत्या‌ ‌शेतीत‌ ‌५००‌ ‌टक्क्यांनी‌ ‌वाढ‌ ‌झाली.‌ ‌तळ्यातील‌ ‌पाणी‌ ‌सुकलंय‌ ‌असं‌ ‌वाटायला‌ ‌लागलं.‌ ‌आंतरराष्ट्रीय‌ ‌प्रसिद्धी‌ ‌वाढल्याने‌ ‌पर्यटकांचे‌ ‌पाय‌ ‌इकडे‌ ‌वळू‌ ‌लागले.‌ ‌गेल्या‌ ‌शतकात‌ ‌हिऱ्याच्या‌ ‌खाणींसाठी‌ ‌या‌ ‌हिऱ्यासारख्या‌ ‌देशाची‌ ‌वाट‌ ‌लावणारा‌ ‌गोरा‌ ‌साहेब‌ ‌आपल्या‌ ‌मडमेसह‌ ‌सुट्ट्या‌ ‌घालवायला‌ ‌तळ्याच्या‌ ‌गावात‌ ‌येऊ‌ ‌लागला.‌ ‌१९९२‌ मध्ये ‌वर्षाकाठी‌ ‌२६‌ हजार ‌पर्यटक‌ ‌इथं‌ ‌यायचे.‌ ‌ती‌ ‌संख्या‌ ‌२०१३‌ ‌मध्ये‌ ‌८‌,‌४२‌,‌०००‌ ‌एवढी‌ ‌फुगली.‌ ‌साहेब‌ ‌येणार‌ ‌म्हटल्यावर‌ ‌मोठ्ठाली‌ ‌आलिशान‌ ‌हॉटेलं‌ ‌हवीच.‌ ‌मग‌ ‌हॉटेलसाठी‌ ‌२५०‌ ‌एकर‌ ‌जागा‌ ‌जंगल‌ ‌तोडून‌ ‌साफ‌ ‌केली‌ ‌गेली.‌ ‌जास्तीत‌ ‌जास्त‌ ‌उत्पन्न‌ ‌काढण्याच्या‌ ‌शर्यतीत‌ ‌रासायनिक‌ ‌खते‌ ‌आणि‌ ‌कीटकनाशकांचे‌ ‌विषारी‌ ‌फवारे‌ ‌उडू‌ ‌लागले.‌ ‌पिकाबरोबर‌ ‌पाण्यालाही‌ ‌रसायनं‌ ‌पाजली‌ ‌जाऊ‌ ‌लागली.‌ ‌मासेमारीचं‌ ‌प्रमाण‌ ‌वाढलं.‌ ‌माशांच्या‌ ‌काही‌ ‌प्रजाती‌ ‌नष्ट‌ ‌होण्याच्या‌ ‌मार्गावर‌ ‌आहेत.‌ ‌वल्हवणाऱ्या‌ ‌बोटी‌ ‌कमी‌ ‌झाल्या.‌ ‌डिझेलवरील‌ ‌बोटींची‌ ‌घरघर‌ ‌वाढून‌ ‌तळ्याच्या‌ ‌आरोग्याला‌ ‌घरघर‌ ‌लागलीय.‌ ‌हवेचं‌,‌ ‌‌आवाजाचं‌ ‌प्रदूषण‌ ‌वाढतंय.‌ ‌       तरंगणाऱ्या‌ ‌शेतात‌ ‌पाय‌ ‌आणि‌ ‌डोकं‌ ‌जमिनीवर‌ ‌ठेवून‌ ‌आपल्या‌ ‌मेहनतीने‌ ‌बहारदार‌ ‌पिकं‌ ‌काढून‌ ‌आपण‌ ‌किती‌ ‌पाण्यात‌ ‌आहोत‌,‌ ‌‌हे‌ ‌दाखवणाऱ्या‌ ‌बळिराजाला‌ ‌कॉर्पोरेट‌ ‌जग‌ ‌पाण्यात‌ ‌पाहत‌ ‌होतं.‌ ‌या ‌नैसर्गिक‌ ‌सौंदर्याला‌ ‌व्यावसायिक‌ ‌ग्रहण‌ ‌लागलं‌ ‌होतं.‌ ‌

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com