वादळी वारे, अवकाळी पाऊस स्थितीतील फळबागांचे नियोजन

नुकत्याच आलेल्या तौक्ते या चक्रीवादळाचा मुख्य कोकण किनारपट्टीला बसला असला तरी राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वारे, पाऊस आणि ढगाळ वातावरण अशी स्थिती अनुभवास आली. या स्थितीचे विविध पिकांवर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यांची माहिती घेऊ.
वादळी वारे, अवकाळी पाऊस स्थितीतील फळबागांचे नियोजन
वादळी वारे, अवकाळी पाऊस स्थितीतील फळबागांचे नियोजन

नुकत्याच आलेल्या तौक्ते या चक्रीवादळाचा मुख्य कोकण किनारपट्टीला बसला असला तरी राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वारे, पाऊस आणि ढगाळ वातावरण अशी स्थिती अनुभवास आली. या स्थितीचे विविध पिकांवर होणारे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यांची माहिती घेऊ. केळी :

  • सर्वसाधारणपणे केळी बागांमध्ये पाने फाटणे, झाड उन्मळून पडणे आणि केळांवर डाग असे नुकसान वादळी वारे, पाऊस यामुळे होते.
  • केळीमध्ये घड पोसून बाहेर पडल्यावर नवीन पाने येत नाहीत. घडाचे संपूर्ण पोषण होण्यासाठी झाडावर १० ते १२ हिरव्यागार पानांची आवश्यकता असते. वादळी पावसाने पाने फाटली तरी घडाच्या पोषणासाठी फाटलेल्या पानांचे पोषण करून ती कार्यरत ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी योग्य खत मात्रांचा अवलंब करावा. तसेच मोठ्या प्रमाणात पाने फाटली असल्यास घडातील काही अपरिपक्व फण्यांची संख्या कमी करणे हिताचे ठरते. पानांच्या संख्येनुसार ठेवलेल्या उर्वरित फण्यांचा विकास चांगला करून घेता येईल.
  • केळीवर युरिया १० ग्रॅम अधिक पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. यातून पानाचे पोषण होऊन नवीन घड विकसित होतात. सोबत युरिया आणि म्युरेट ऑफ पोटॅश मातीद्वारे दिल्यास घड वाढीस ते अनुकूल ठरते.
  • अवकाळी पाऊस, गारांचा यांचा मारा बसल्याने पान, केळीचे सोट व घडांवर इजा झाली असल्यास, त्यावर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मँकोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डेझीम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी अशी फवारणी करावी.
  • -सिगाटोका करपा रोगाच्या नियंत्रणासाठी प्रोपिकोनॅझॉल ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी घ्यावी. पुढील फवारणी १५ दिवसांचे अंतराने घ्यावी.
  •  खालून आलेली नवीन फूट, वाळलेली/खराब पाने, केळीचे सोट काढून नष्ट करावेत. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव व प्रसार रोखण्यासाठी मदत होते.
  • अतिरिक्त पाण्याचा निचरा लवकरात लवकर करून बागेत वाफसा आणावा.
  • केळी घड प्लॅस्टिक बॅग किंवा वाळलेली पानाने झाकावेत. त्यातून कीड, रोग व अवकाळी पावसापासून घडाचे संरक्षण होईल.
  • ज्या ज्या वेळी वेधशाळेमार्फत अवकाळी/गारपीट वा वादळाचे अनुमान वर्तविले असेल, तेव्हा त्वरित केळी बागेच्या बाजूने लगेचच हिरवे शेड नेट किंवा नायलॉन जाळीचा वापर करावा.
  • डाळिंब :

  • डाळिंबावर तेलकट डाग किंवा जिवाणूजन्य करपा रोगाचा प्रादूर्भाव सतत ढगाळ व दमट हवामान असल्यास लवकर होतो. यासाठी सुरुवातीपासून एकात्मिक रोग नियंत्रण उपाययोजना करावी.
  • अवकाळी पाऊस अथवा गारपीट झाल्यानंतर इजा झालेली पाने, फांद्या, फळे यांची गळ झालेली असेल तर ती गोळा करून नष्ट करावीत. बागेमध्ये १ टक्का बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* ०.३ ते ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे ताबडतोब फवारणी करावी.
  •  झालेल्या नुकसानीची तीव्रता आणि झाडांचे वय विचारात घेऊन खराब झालेली डाळिंबे काढून ठराविकच निवडक चांगली डाळिंब फळेच झाडावर ठेवावीत.
  • आंबे बहार धरलेल्या बागेत नुकसान तीव्रता १०० टक्क्यांपर्यंत येवू शकते. अशा वेळेस पुढील मृगबहार धरणेचे दृष्टीने नियोजन करावे. त्यासाठी मोडलेल्या खराब फांद्याची छाटणी करून प्रती झाड शिफारस केली खत मात्रा द्यावी.
  • ज्या बागेत ५० टक्क्यांपेक्षा कमी नुकसान असेल तेथे झाडांचा विकास होण्यासाठी शिफारशीत खतमात्रा द्यावी. बागेमध्ये १ टक्का बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन* ०.३ ते ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे ताबडतोब फवारणी करावी.
  • चिकू ः वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात मोहर आणि फळगळ होते, फळांनाही इजा होते. फळामधून पांढरा चीक बाहेर येतो. त्यावर बुरशी येऊन फळकूज सुरू होते. यासाठी मँकोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेंन्डाझीम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी अशी फवारणी करावी. पेरू : हस्त बहार घेतलेल्या बहुतांशी बागेमध्ये फळांची काढणी झाली असेल. मात्र आंबे बहार घेतलेल्या बागेत फळांचा विकास होत असेल. अशा ठिकाणी मार लागलेली, खराब झालेली फळे ताबडतोब काढून नष्ट करावीत. इजा झालेल्या झाडांवर कॉपर ऑक्सिक्लोराईड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी अशी फवारणी करावी. डॉ. अशोक पिसाळ, ९९२१२२८००७ (विस्तार कृषी विद्यावेत्ता, विभागीय विस्तार केंद्र, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com