सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा रुजू

सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा रुजू
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा रुजू

आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागलेला असतो, त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन येणाऱ्या पेन्शनवर सुखासीन घालवण्याचा बहुतेकांचा प्रयत्न असतो. मात्र, धामणगावबढे (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील गजानन पांडुरंग कानडजे या सेवानिवृत्त शिक्षकाने आपले संपूर्ण लक्ष शेतीवर केंद्रित केले. आपल्या मुलाच्या मदतीने पाण्याचा काटकसरीने वापर करत पारंपरिक पिकासह नवी पिके, प्रयोग यातून अधिक उत्पन्न मिळवत आहेत. धामणगावबढे (ता. मोताळा, जि. बुलडाणा) येथील गजानन पांडुरंग कानडजे हे जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. २०१६ मध्ये निवृत्त होण्याआधीपासून त्यांनी शेतीवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्याकडे आठ एकर शेती आहे. त्यात त्यांनी २०१३-१४ मध्येच डाळिंबाची ६०० झाडे लावत सुरवात केली. सेवानिवृत्तीपर्यंत बाग चांगली स्थिर होऊन उत्पादनही सुरू झाले. रासायनिक खतांचा अत्यल्प, तर शेणखत, गांडूळ खत, कोंबडी खत अशा सेंद्रिय खतांचा भरपूर वापर हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. वेळोवेळी जिवामृताची फवारणी करतात. सध्या योग्य व्यवस्थापनामुळे प्रतिझाड १५ किलोपर्यंत दर्जेदार डाळिंब फळे मिळत आहेत, त्याला प्रतिकिलो ६० रुपये दरही मिळाला. पारंपरिक कपाशी, मका पीकपद्धती ः धामणगाव बढे परिसर कपाशी व मका पिकासाठी प्रसिद्ध आहे. २०१८ मध्ये खरिपात त्यांनी चार एकर क्षेत्रामध्ये कपाशीची लागवड केली होती. त्यातून ५० क्विंटल उत्पादन झाले. त्याला ६००० रु. प्रतिक्विंटल दर मिळाला. त्यानंतर कपाशीची फरदड घेण्याऐवजी कपाशी काढून रब्बीमध्ये दोन एकर क्षेत्रामध्ये मक्याची लागवड केली. मक्याचे ८० क्विंटल उत्पादन मिळाले असून, त्याला प्रतिक्विंटल २००० रुपये दर मिळाला. या दुहेरी पीक पद्धतीमुळे किडींचा प्रादुर्भाव कमी राहून दुहेरी उत्पन्न मिळते. कलिंगड, काकडीचा प्रयोग ः कलिंगड हे पीक त्यांच्यासाठी नवीन होते, तरीही न डगमगता गावातील कृषी पदवीधर रमेश चौरे यांची मदत घेत कलिंगड लागवडीचे नियोजन केले. पहिल्याच हंगामात चांगले उत्पन्न मिळाल्याने हुरूप वाढला. सप्टेंबर महिन्यात त्यांनी एक एकर क्षेत्रात कलिंगडाची गादीवाफ्यावर लागवड केली. वेळेवर कीड- रोग नियंत्रणासोबत योग्य व्यवस्थापनामुळे १७.५ टन उत्पादन मिळाले. त्याला सरासरी सात रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला. कलिंगड काढल्यावर त्याच बेड व मल्चिंगचा वापर करून एक महिन्याने काकडीची लागवड केली. उत्पादन ३० क्विंटल मिळाले असून, त्याला २२ रु. प्रतिकिलोप्रमाणे दर मिळाला. कांदा बीजोत्पादन ः पारंपरिक पिकांच्या सोबतीने दीड एकर क्षेत्रामध्ये कांदा बीजोत्पादनही घेतले. त्यापासून चार क्विंटल उत्पादन हाती आले असून, अद्याप विक्री केली नाही. कांदा बियाण्याला २५ हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळण्याची अपेक्षा आहे. पूरक व्यवसाय ः

  • शेतीसोबतच कडकनाथ कोंबडीपालन व दुग्धव्यवसायही सुरू केला. सध्या कडकनाथ जातीच्या १०० कोंबड्या पाळल्या आहेत. त्यापासून नुकतेच उत्पादन सुरू झाले असून, प्रतिदिन ३० ते ३५ अंडी मिळत आहेत. अंडी व कोंबड्यांची विक्री मागणीनुसार करतात.
  • त्यांच्याकडे दोन गायी व दोन म्हशी आहेत. घरगुती दुधाची सोय होण्यासोबतच उर्वरित १० लिटर दुधाची विक्री ५० रुपये प्रतिलिटरप्रमाणे करतात.
  • शेणखतापासून गांडूळ खतनिर्मितीचा प्रकल्प राबवला असून, त्यासाठी २२ फूट बाय ६० फूट आकाराचे शेड बांधले आहे. त्यातून दर तीन ते चार महिन्यांनी सुमारे ७ ते ८ टन गांडूळ खत मिळते. त्याचा वापर शेतामध्ये केला जातो.
  • नर्सरी क्षेत्रात पाऊल ः सातत्याने नवे काही करण्याच्या वृत्तीमुळे रोपवाटिका व्यवसायातही लक्ष घातले आहे. प्रथमच गादीवाफ्यावर मिरचीची रोपे तयार केली आहेत. ओलावा व्यवस्थापनासाठी ओल्या पोत्याचा वापर केल्यास रखरखत्या उन्हातही ९० टक्क्यांपर्यंत उगवण झाली. भविष्यामध्ये पॉलिहाउस उभारणी करून पिकांसह नर्सरी व्यवसाय वाढवण्याचा मानस गजानन कानडजे यांनी व्यक्त केला. एक एकर क्षेत्रामध्ये आले आणि हळद लागवडही केली आहे. पाण्याची उपलब्धता केली

  • कमी पाऊसमानामुळे सिंचनामध्ये अनेक अडचणी येत होत्या. पाण्याची सोय करण्यासाठी पाच किलोमीटर अंतरावरील धरणापासून जलवाहिनीद्वारे पाणी आणले आहे. उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटेकोर वापर केला जातो. बहुतेक पिकांसाठी ठिबक सिंचन केले आहे.
  • शेतीच्या सर्व प्रयोगांमध्ये मुलगा श्रीकांतची मदत होते. श्रीकांत यांनी एमए बीएडपर्यंत शिक्षण घेतले असून, पूर्ण वेळ शेतीवर लक्ष केंद्रित केले. दुसरा मुलगा दीपक हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, हैदराबाद येथे नोकरी करतो. पत्नी, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे.
  • गजानन पांडुरंग कानडजे, ७७९८३९१७५७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com