माळरानावर भाजीपाला पिकांतून समृद्धी

माळरानावर भाजीपाला पिकांतून समृद्धी
माळरानावर भाजीपाला पिकांतून समृद्धी

लातूर जिल्ह्यातील हाळी खुर्द (ता. चाकूर) येथील गणेश जाधव या तरुणाने आपल्या नऊ एकरांपैकी सहा एकर क्षेत्र भाजीपाला पिकांना दिले. भाजीपाला विषयातील अभ्यासक्रम शिकून तांत्रिक ज्ञान घेतले. सुधारित तंत्र, हंगामानुसार वाणांची निवड व मार्केटचा अभ्यास करून त्यातून आर्थिक समृद्धी मिळवली. याच पीकपद्धतीतून बंधूला उच्चशिक्षण दिले. शेती खरेदी केली. घर बांधले. लातूर जिल्ह्यातील हाळी खुर्द (ता. चाकूर) येथे युवा शेतकरी गणेश जाधव यांची नऊ एकर शेती आहे. पारंपरिक पिकांना भाजीपाला पिकांची जोड दिली तर नक्कीच उत्पन्नात वाढ होईल त्यांनी ओळखले. त्यासाठी आधुनिक पद्धतीने ही शेती करण्याचे ठरवले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील कृषी अधिष्ठान व भाजीपाला लागवड तंत्रज्ञान हे प्रत्येकी एक वर्षाचे दोन अभ्यासक्रम २०१३-१४ मध्ये पूर्ण केले. आज याच ज्ञानाचा उपयोग करीत माळरावानावर उत्कृष्ट भाजीपाला ते पिकवत आहेत. गणेश वयाच्या १५ वर्षांपासून शेतीत आपल्या वडिलांना मदत करीत आहेत. परभणी व पुणे येथे आयोजित कृषी विज्ञान प्रदर्शनाला भेट देत नवे तंत्रज्ञान त्यांनी शिकून घेतले. त्यांना व्यंकटराव जाधव, ॲड. पी. डी. कदम, माजी उपसरपंच संगमेश्वर जनगावे, माजी कृषी सहायक बालाजी कदम, कृषी सहायक एस. टी. पंडगे यांचे मार्गदर्शन मिळत आहे. अशी आहे पीकपद्धती

  • सहा वर्षांपासून भाजीपाला पिकांची नियमित लागवड.
  • खरिपात सहा एकर - यात पुढील पिके
  • टोमॅटो व फ्लॉवर प्रत्येकी दोन एकर
  • वरणा व दोडका प्रत्येकी एक एकर
  • आंध्र प्रदेशातील निजामाबाद येथे वरणा व दोडका यांना चांगली मागणी असते. त्यामुळेच या पिकांची निवड
  • रब्बी व उन्हाळी हंगामात- प्रत्येकी दोन एकरांत टोमॅटो
  • तीनही हंगामांना अनुकूल विविध वाणांची निवड
  • बाजारपेठेत जास्त मागणी असलेला शेतीमाल व कालावधी पाहून त्यानुसार भाजीपाला लागवड व विक्रीचे नियोजन
  • जुलै व ऑगस्टमध्ये फ्लॉवरला मागणी जास्त असते असा आजपर्यंतचा अनुभव.
  • मे व सप्टेंबरमध्ये लागवड केलेल्या टोमॅटोची खरेदी व्यापारी जागेवर करतात. तर उन्हाळी हंगामात
  • स्वतः मार्केटला जाऊन विक्री
  • लातूर, निजामाबाद, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, परभणी या बाजारपेठांना माल पाठवला जातो.
  • पाण्यासाठी विहीर व बोअरचा मोठा आधार आहे. त्याचे पाणी पुरेसे ठरते. मात्र या पाण्याचा काटकसरीने उपयोग होतो. सुमारे पाच एकरांवर ठिबक सिंचन आहे.
  • गादीवाफा, पॉली मल्चिंगचा वापर. त्यामुळे तण आटोक्यात येते. पाण्याचीही बचत होते.
  • जाधव पती-पत्नी शेतात राबतात. मात्र केवळ मजुरांवर विसंबून न राहता स्वतः नेटके व्यवस्थापन ठेवतात.
  • शेतीकडे पाहण्याचा व्यावसायिक दृष्टिकोन
  • नऊ एकरांपैकी पाच एकर शेती पूर्णतः माळरान. दोन तुकड्यांत शेतीची विभागणी.
  • २०१५ च्या दुष्काळात मध्ये चार एकरांवर तलावातील गाळ टाकून ती सुपीक करण्याचा प्रयत्न. यासाठी दोन लाख रुपये खर्च आला.
  • पीक विविधता ठेवल्याने दरांबाबतची जोखीम कमी केली.
  • उन्हाच्या तीव्रतेचा टोमॅटोवर परिणाम होऊ नये यासाठी हिरवे शेड बांधले आहे.
  • दोन कूपनलिकांचे पाणी विहिरीत साठवून ठेवले आहे.
  • विहिरीवरून साधारण दोन किलोमीटर पाइपलाइन करून सर्व जमीन ओलिताखाली आणली.
  • बांधावर ४० आंब्याची झाडे लावली आहेत. त्यात गावरान व केशर आंब्याचा समावेश. या वर्षीपासून उत्पन्न मिळण्यास सुरवात होईल.
  • उत्पादन व उत्पन्न टोमॅटोचे एकरी सुमारे २५ टन, फ्लॉवरचे नऊ टन, वरणाचे सहा टन, तर दोडक्याचे सुमारे सहा टन उत्पादन मिळते. यंदा सुमारे पाचशे क्रेट टोमॅटो स्थानिक व्यापाऱ्यांमार्फत दुबईला पाठवण्यात आला. स्थानिक बाजारात ज्यावेळी क्रेटला ५०० रुपये दर सुरू होता. त्या वेळी दुबईसाठी हाच दर ७०० रुपये देण्यात आल्याचे गणेश यांनी सांगितले. कोबी, वरणा व दोडक्याला प्रतिकिलो २० ते २५ रुपये व कमाल ४० ते ४५ रुपयांपर्यंत दर मिळतो. भाजीपाला पिकातून वर्षभर हाती ताजा पैसा खेळत राहतो. खरिपात सोयाबीन, तूर, रब्बीत ज्वारी, उन्हाळ्यात मेथी असे अन्य नियोजन असते. हा शेतीमाल तातडीने विकण्याची गरज भासत नाही. दरात तेजी आल्यानंतरच विक्री होते. सेंद्रिय शेतीवर भर गणेश सेंद्रिय व रासायनिक अशा दोन्ही पद्धतीने शेती करतात. मात्र सेंद्रिय पद्धतीवर अधिक भर आहे. त्यांच्याकडे दहा जनावरे आहेत. वर्षाला त्यातून सुमारे १५ ट्रॉली शेणखत मिळते. गरजेनुसार १५ ट्रॉली शेणखत व सहा ट्रॉली कोंबडी खत विकत घेण्यात येते. टोमॅटोच्या तीनही हंगाम लागवडीपूर्वी त्याचा वापर गादीवाफ्यात होतो. कडुनिंबावर आधारित कीटकनाशकाचाही ते वापर करतात. शेतीतून साधलेली प्रगती गणेश यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती होती. भाजीपाला शेतीतून अर्थकारण उंचावत त्यांनी पैशांची बचत केली. त्यातूनच माळरानवर चार एकर शेती खरेदी केली. भविष्यातही शेतीचा विस्तार करून भाजीपाला शेतीचा मानस आहे. आपले लहान बंधू महेश यांनाही गणेश यांनी शेतीतील उत्पन्नातूनच उच्च शिक्षण देत संगणक अभियंता बनवले. आज महेश पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीस आहेत. गणेश जाधव - ९१७२९५९७८८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com