पाऊस झालेल्या द्राक्ष बागेतील समस्यांचे निराकरण

गेल्या आठवड्यात बऱ्याचशा बागेत पाऊस झाला. काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस, तर काही ठिकाणी कमी पाऊस झाला, तर ढगाळ वातावरण जास्त काळ टिकून राहिले. अशा परिस्थितीत बागेमध्ये पानांवर काही समस्या आढळून येत आहेत.
पाऊस झालेल्या द्राक्ष बागेतील समस्यांचे निराकरण
पाऊस झालेल्या द्राक्ष बागेतील समस्यांचे निराकरण

गेल्या आठवड्यात बऱ्याचशा बागेत पाऊस झाला. काही ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस, तर काही ठिकाणी कमी पाऊस झाला, तर ढगाळ वातावरण जास्त काळ टिकून राहिले. अशा परिस्थितीत बागेमध्ये पानांवर काही समस्या आढळून येत आहेत. वेलीचा वाढता जोम  पाऊस झालेल्या बागेत दोन ओळींच्या मध्यभागी पाणी साचले होते. त्यानंतर जशी वाफसा स्थिती झाली, त्यानंतर याच क्षेत्रात पांढऱ्या मुळांचे प्रमाण वाढले. ही मुळे अन्नद्रव्ये शोषण्यासाठी कार्यक्षम होतीच, त्याच सोबत त्यांनी संजीवकांची निर्मितीही केली. ती संजीवके वेलीच्या शेंड्यापर्यंत पोहोचवली गेली. परिणामी, वेलीचा जोम वाढला. वेलीची वाढ नियंत्रणात असेल तर त्या वेलीतील शरीरशास्त्रीय हालचालींचा वेगही नियंत्रणात असतो. म्हणजेच सायटोकायनीनचे प्रमाण जास्त राहून जिबरेलिन्सची मात्रा कमी असते. मात्र पावसामुळे या उलट परिस्थिती निर्माण होते. याच वेळी शेंडा वाढ होत असताना पेऱ्यातील अंतर वाढेल. बगलफुटींची वाढही तितक्याच जोमाने होते. परिणामी, काडीची परिपक्वता लांबणीवर जाण्याची समस्या उद्‍भवते. बगलफुटी वाढल्यामुळे कॅनॉपीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त वाढून डाऊनी मिल्ड्यूसारख्या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. या परिस्थितीवर मात करण्यासाठी १) जमीन वाफसा स्थितीत येईपर्यंत पाणी देण्याचे बंद करावे. २) स्फुरद व पालाशयुक्त खतांची फवारणीद्वारे पूर्तता करावी. (उदा. ०-४०-३७ हे खत ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी) ३) बगलफुटी त्वरित काढाव्यात. ४) शेंडा पिंचिंग करतेवेळी शेंडा जास्त खुडण्याचे टाळून फक्त टिकली मारावी. ५) काडी परिपक्व होत असल्याच्या परिस्थितीत फक्त पालाशची (०-०-५०) फवारणी करून घ्यावी. ६) फलाधारित डोळ्याच्या जवळ असलेले छोटे पान सुद्धा काढून टाकावे. यामुळे डोळ्यावर एक सारखा सूर्यप्रकाश पडून घडनिर्मितीत अडचण येणार नाही. पानांच्या वाट्या होणे  जास्त पाऊस झालेल्या बागेमध्ये दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी अचानक पानांच्या वाट्या झालेल्या दिसून येतील. या वेळी प्रत्येक काडीवर अर्ध्यापर्यंत पाने जुनी व परिपक्व झालेली दिसतील, तर पुढील भागात कोवळी पाने असतील. बागेतील जमिनीच्या परिस्थितीनुसार कोणत्या पानाच्या वाट्या होतील, हे ठरेल. ज्या बागेत चुनखडीचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी इतर महत्त्वाच्या अन्नद्रव्यांचे वहन होण्यामध्ये अडचणी येतात. मुख्यतः पालाश, लोह व मॅग्नेशिअम या अन्नद्रव्यांचे वहन होत नसल्यामुळे पानांमध्ये कमतरतेची लक्षणे दिसून येतात. अशातच जुन्या पानांवर वाट्या झाल्याचे चित्र दिसून येईल. जुने ते नवीन या दरम्यानच्या अर्ध परिपक्व झालेली पाने पिवळसर दिसून येतील. काही स्थितीमध्ये पानांच्या शिरा गुलाबी ते हिरव्या दिसतील व मध्यभाग पांढरा ते पिवळसर दिसून येईल. या परिस्थितीमध्ये लोहाची किंवा मॅग्नेशिअमची किंवा दोन्ही अन्नद्रव्यांची कमतरता असू शकते. बागेत चुनखडीचे प्रमाण किती जास्त आहे, यावर पानातील कमतरतेची तीव्रता वेगवेगळी असेल. दुसऱ्या परिस्थितीत पाऊस संपताच उन्हे येण्यास सुरुवात होते, तसेच आर्द्रताही वाढते. यामुळे पानांची लवचिकताही तितकीच वाढते. रसशोषक किडींचा उदा. फुलकिडे प्रादुर्भाव वाढतो. या वेगवेगळ्या स्थितीतील बागेमध्ये उपाययोजनाही वेगवेगळ्या असतील. १) जुन्या पानांवर वाटी झालेल्या परिस्थितीत स्फुरद आणि पालाश युक्त खतांचा वापर फवारणी व ठिबकद्वारे करावा. (सूक्ष्म घड निर्मिती होत असलेल्या बागेत.) काडी परिपक्व होत असलेल्या बागेत फक्त पालाशयुक्त खतांचा वापर करावा. यासोबत लोहाची पूर्तता करण्यासाठी फेरस सल्फेट ३ ते ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी अशा दोन ते तीन फवारण्या करून घ्याव्यात. तसेच १० ते १२ किलो फेरस सल्फेट प्रति एकर या प्रमाणे ठिबकद्वारे द्यावे. २) मॅग्नेशिअम सल्फेट ३ ते ४ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे दोन ते तीन फवारण्या व जमिनीतून १२ ते १५ किलो मॅग्नेशिअम सल्फेट ठिबकद्वारे द्यावे. ३) जमिनीतील बोदामध्ये ३० ते ४० किलो सल्फर प्रति एकर या प्रमाणे मिसळून घ्यावे. त्यानंतर २५ ते ३० दिवसांनंतर पुन्हा तितक्याच मात्रेमध्ये सल्फर द्यावे. ४) नवीन पानाच्या वाट्या झालेल्या असल्यास नवीन फुटीचा शेंडा पांढऱ्याशुभ्र कागदावर आपटून रसशोषक किडी किती प्रमाणात आहेत, याची खात्री करावी. त्यानुसार शिफारशीनुसार कीटकनाशकाची फवारणी करावी. पानावर स्कॉर्चिंग येणे  बऱ्याच बागेमध्ये पानाच्या वाट्या होत असतानाच पानाच्या कडा जळल्यासारखी लक्षणे दिसते. जुन्या व नव्या अशा दोन्ही प्रकारच्या पानांवर स्कॉर्चिंग दिसून येते. बऱ्याच वेळा बागेत कीटकनाशक, संजीवके व खतांच्या एकत्रित फवारणी करण्याची चुकीची प्रथा पडली आहे. एकापेक्षा जास्त कोणत्याही घटकांचे मिश्रण करून फवारणी केल्यास सुसंगतता (कॉम्पॅटिबिलीटी) नसल्यामुळे वापरलेल्या घटकाचे चांगल्या परिणामाऐवजी विपरीत परिणामच अधिक दिसतात. उन्हामध्ये फवारणी केल्यामुळे पर्णरंध्रांना इजा झाल्याचेही दिसून येते. रसायनांची तीव्रता, एका पेक्षा जास्त घटकांचा समावेश व फवारणीच्या वेळी वाढलेले तापमान यामुळे पानांवरील पेशींना जखमा होतात. परिणामी तेवढा भाग सुप्त व जळल्याप्रमाणे दिसतो. बागेत चुनखडीचे प्रमाण जास्त असेल तर इतर अन्नद्रव्याचा पुरवठा खंडित येतो. त्याचाही ताण वेलीला बसतो. बऱ्याच बागेत काळ्या जमिनीत पाऊस गेल्यानंतर जेव्हा पानाची लवचिकता वाढते, तेव्हा जुन्या पानावर कोळी किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढतो. ही कीड पानातून हरितद्रव्य शोषून घेते, त्यामुळे पाने पिवळी पडतात. काही परिस्थितीत पानाच्या वाट्याही झालेल्या दिसतात. काळ्या जमिनीत पाऊस संपल्यानंतर ही परिस्थिती अचानक निर्माण होताना दिसते. उपाययोजना १) एकापेक्षा जास्त रसायने किंवा खतांचे मिश्रण करून फवारणी टाळावी. २) शक्यतो कमी तापमान असलेल्या स्थितीमध्ये फवारणी करावी. यावेळी पानांची रसायने शोषण्याची क्षमता चांगली असते. ३) पाऊस सुरू होण्यापूर्वी खरड छाटणीच्या ४५ दिवसांनंतर देठ परीक्षण करून घ्यावे. सोबत माती परीक्षण करून घेतल्यास जमिनीची सद्यःस्थिती लक्षात येईल. त्यानुसार आवश्यक त्या अन्नद्रव्याचा पुरवठा करणे सोपे होईल. काडीची अनियमित परिपक्वता  बऱ्याच बागेत काडी परिपक्वतेच्या कालावधीत साधारणपणे पावसाळी वातावरण असते. या वेळी एकतर फुटींची वाढ जोमाने होताना दिसेल. तर काही ठिकाणी काडीची परिपक्वता सुरू झालेली दिसेल. काडी परिपक्व होत आहे, याचा अर्थ सुरुवातीला गुलाबी रंगाची असलेली काडी तळापासून दुधाळ रंगाची होऊन त्यानंतर तपकिरी रंगाकडे वळेल. ही पक्वता टप्प्याटप्प्याने होत नसून, तळापासून एक एक पेरा पुढे सरकत जाते. म्हणजेच या बागेत काडीच्या परिपक्वतेला कोणतीही अडचण नाही, असे म्हणता येईल. मात्र पाऊस झाल्यानंतर काही बागेत काडी एकसारखी परिपक्व होत नसून, त्याच पेऱ्यातील अर्धा भाग हिरवा, तर बाकीचा भाग परिपक्व दिसेल. किंवा एक पेरा तपकिरी, तर शेजारचा पेरा हिरवा असून, पुन्हा तिसरा पेरा परिपक्व झालेला दिसून येईल. यालाच ‘बोट्रीडिप्लोडिया’ असे म्हटले जाते. यासाठी पुढील परिस्थिती कारणीभूत असते. १) खरड छाटणीनंतर या वेलीला पाण्याचा ताण बसला असावा. २) जास्त पावसामुळे मुळे खराब झाल्याने वेलीला पुन्हा ताण बसला असावा. ३) वेलीला पालाशची कमतरता झाली असावी. ४) मागील हंगामात (फळछाटणीनंतर) वेलीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाला असावा. ५) या वेळी जास्त पाऊस झाल्यानंतर बागेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले असेल. अशा कोणत्याही स्थितीमुळे वेलीला ताण बसला असल्यास अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही. वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींवर विपरीत परिणाम होताना दिसतात. काडी एकसारखी परिपक्व होत नाही. अशा वेलीवर उत्पादनात घट येत नसली तरी चांगल्या प्रतिचे उत्पादन मिळत नाही. या स्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना पुढीलप्रमाणे - १) ताम्रयुक्त बुरशीनाशकाची २ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. २) ट्रायअझोल गटातील हेक्झाकोनॅझोल एक मि.लि. प्रति लिटर किंवा डायफेनोकोनॅझोल ०.५ ते ०.७ मि.लि. प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. ३) ट्रायकोडर्मा २ मि.लि. प्रति लिटर प्रमाणे तीन दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या घ्याव्यात. तसेच जमिनीतून चार ते पाच दिवसांच्या अंतराने ट्रायकोडर्मा २ लिटर प्रति एकर प्रमाणे ठिबकद्वारे सोडावे. यामुळे वेलीची रोग प्रतिकारक शक्ती वाढून पुढील समस्या टाळता येतील. डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com