agricultural stories in Marathi, for good milk production prevent supt kasdah | Page 2 ||| Agrowon

दूध गुणवत्तावाढीसाठी सुप्त कासदाह टाळा

डॉ. रवींद्र जाधव, डॉ. अनिल भिकाने
मंगळवार, 4 जून 2019

दुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या प्रमाणात दृश्य कासदाह आणि ५६ टक्‍क्यांच्या प्रमाणात सुप्त कासदाह आढळून येतो. या आजाराने बाधित गायींकडून दुधाळ जनावरांमध्ये जिवाणूंचा संसर्ग होऊन कळपामध्ये आजाराचे प्रमाण वाढू शकते. हे लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात.

दुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या प्रमाणात दृश्य कासदाह आणि ५६ टक्‍क्यांच्या प्रमाणात सुप्त कासदाह आढळून येतो. या आजाराने बाधित गायींकडून दुधाळ जनावरांमध्ये जिवाणूंचा संसर्ग होऊन कळपामध्ये आजाराचे प्रमाण वाढू शकते. हे लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात.

 कासदाह आजारामुळे दुभत्या जनावरांची कास व सड यांना सूज येते, खराब दूध येणे (जास्त पातळ किंवा गाठीमिश्रित) व बाधित सडातून दूध उत्पादन घटणे किंवा बंद होणे ही प्रमुख लक्षणे आढळून येतात. हा आजार प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये आढळून येतो. दृश्य (क्लिनिकल) कासदाह या प्रकारामध्ये कास व दुधातील बदलांवरून कासदाह हा आजार ओळखू शकतो. दुसरा प्रकार हा सुप्त कासदाह होय. यामध्ये आजाराची लक्षणे कास किंवा दुधात डोळ्याने दिसतील असे बदल दिसत नाहीत. याउलट दूध उत्पादन घटणे किंवा दुधाची प्रत खालावणे ही प्रमुख लक्षणे असतात. आजाराचे निदान करणे पशुपालकांना शक्य होत नाही. दुधाळ जनावरांमध्ये साधारणपणे १० ते १२ टक्के या प्रमाणात दृश्य (क्लिनिकल) कासदाह आणि ५६ टक्‍क्यांच्या प्रमाणात सुप्त कासदाह आढळून येतो. सुप्त कासदाह या प्रकारामध्ये प्रामुख्याने दूध उत्पादन कमी होते, दुधातील स्निग्ध (फॅट) व एकूण घन घटक (एस. एन. एफ.) यांचे प्रमाण २५ टक्‍क्यांनी घटते, लॅक्टोज प्रमाण १६ टक्‍क्यांनी घटते, प्रथिनांचे प्रमाण ६ टक्‍क्यांनी घटते. त्यामुळे दुधाची प्रत घटून प्रती लिटर दर कमी मिळतो. त्याचप्रमाणे खराब दूध फेकून देणे, प्रतिजैविक अंश, सडामध्ये कायमचे व्यंग येऊन दूधउत्पादन थांबणे व अति तीव्र कासदाह असताना जनावर दगावणे हे सर्व घटक आर्थिक नुकसानास कारणीभूत ठरतात. या आजाराने बाधित गायींकडून दुधाळ जनावरांमध्ये जिवाणूंचा संसर्ग होऊन कळपामध्ये आजाराचे प्रमाण वाढू शकते. सुप्त कासदाह आजाराच्या उपचाराला मर्यादा आहेत तसेच प्रतिजैविक अंश दुधात येण्याची शक्यता या सर्व गोष्टी अडसर ठरतात.

 उपाययोजना
कासेची निगा, योग्य दोहन पद्धतीचा अवलंब:
दूध दोहना अगोदर सड व कास किमान ३० सेकंद निर्जंतुक करून (टीट डीप) टॉवेलने कोरडे केल्यास कासदाह निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा उपद्रव कमी करता येतो.
दुधाच्या पहिल्या ४ ते ५ धारांमध्ये जीवाणूचे जास्त प्रमाण असल्यामुळे ते काढून फेकावे. दूध काढणाऱ्या व्यक्तीच्या हाताची नखे व्यवस्थित कापलेली छोटी असावीत. हाताची स्वच्छता राखावी. हाताने दूध काढावयाचे झाल्यास पूर्ण हात पद्धतीचा अवलंब उपयुक्त ठरतो कारण या पद्धतीत वासरे ज्याप्रमाणे दूध पितात त्यापद्धतीने दोहन केले जाते. त्यामुळे दूध श्रवण्याची नैसर्गिक प्रक्रिया उत्तेजित होते. ३) दूध दोहनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सडाचे निर्जंतुकीकरण करावे. या निर्जंतुकीकरणामुळे सडाची त्वचा निरोगी ठेवण्यास मदत होते तसेच बाधित गायीपासून निरोगी गायीच्या सडांवर होणारा जीवाणू संसर्ग नियंत्रणात ठेवता येतो. सडामध्ये नवीन होणाऱ्या ५० ते ६५ टक्के संसर्गाला अशा निर्जंतुकीकरणामुळे आळा घालता येतो.

दूध काढणी यंत्राची निगा व व्यवस्थापन

दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर केल्यास कासदाह आजारास आटोक्यात ठेवणे शक्य होते त्यामुळे यंत्र वापरणे उपयुक्त ठरते.
यंत्राची वर्षातून किमान २ ते ३ वेळा देखरेख करावी. यंत्राच्या रबरी भागाची नियमित तपासणी करावी. सडांना होणारी इजा टाळण्यासाठी त्राने जास्त प्रमणात दूध काढणे टाळावे. त्राची स्वच्छता ही काटेकोरपणे ठेवावी जेणेकरून जीवाणूसंसर्ग टाळता येईल.

 दुधातून आटलेल्या जनावरांचे व्यवस्थापन व उपचार

 • दुधातून आटलेल्या जनावरांमध्ये सडातून जिवाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच कमी प्रमाणात कासेमध्ये असणारा जिवाणूंचा संसर्ग हा पुढील विताच्या सुरवातीला तीव्र कासदाह निर्माण करू शकतो. म्हणून दुधातून आटलेल्या जनावरांचा कासदाह आजारासाठीचा उपचार (ड्राय काऊ थेरेपी) करणे आवश्यक आहे.
 • ही उपचारपद्धती कासदाह आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे. कारण, या उपचारपद्धतीमुळे कासेमध्ये असणारा जुना दाह बरा करता येतो तसेच कासेमध्ये दाह निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा होणारा शिरकाव टाळता येतो.
 • उपचारपद्धतीमध्ये गाभण गायीमध्ये शेवटचे दूध काढल्यानंतर सडामध्ये प्रतिजैविक औषधे सोडली जातात, जेणेकरून जुन्या कासदाह आजाराचा नायनाट होतो. नवीन संसर्गही टाळता येतो.

 दुभत्या जनावरांमधील कासदाहाचा योग्य उपचार

 • कासदाह बाधित सडामधील दूध दिवसातून ८ ते १० वेळा काढून टाकल्यास आजाराची तीव्रता कमी करता येऊ शकते.
 • कासदाह निदान झाल्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने तात्काळ उपचार सुरू करावा. उपचारासाठी अनुभवातून योग्य प्रतिजैविक व दाहशामक औषधे निवडावीत. शक्यतो बाधित सडातील दुधाची प्रतिजैविके संवेदनशीलता तपासणी करून प्रतिजैविके निवडल्यास उपचारास यश मिळण्याची सरासरी वाढते.
 • नियमितपणे कासदाह होणाऱ्या जनावरांना कळपातून काढणे
 • एखादी दुभती गाय किंवा म्हैस जर कासदाह आजाराने सारखी आजारी असेल तर तिची उत्पादकता खूप कमी होते. उपचारासाठीही खूप खर्च येतो. आजारी गाय कळपातील इतर गायींना जीवाणूंचा संसर्ग होण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे अशी जनावरे कळपातून वेळीच काढून टाकल्यास होणारे दुष्परिणाम टाळता येतात.

गोठ्याची स्वच्छता

 • जनावरांच्या वातावरणातील जीवाणूही कासदाह आजारास कारणीभूत ठरतात. त्यामुळे जनावरांचा गोठा व परिसर स्वच्छ  ठेवावा.
 • गोठ्यामध्ये सूर्यप्रकाश येईल त्यापद्धतीने गोठ्याचे नियोजन असावे.
 • गोठ्यातून पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल यापद्धतीने नियोजन असावे.
 • गोठ्याचा पृष्ठभाग हा एकदम कडक, खडबडीत किंवा असमान नसावा, जेणेकरून जनावर बसल्यावर सड व कासेला इजा होईल. जनावर बसण्याच्या जागेवर नियमित ओलावा किंवा शेण-मूत्र यांचा संचय नसावा. बसण्यासाठी स्वच्छ व सुकलेली जागा असावी.
 • मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब केल्यास कासदाह आजार नियंत्रणात ठेवता येतो. मुक्त गोठा पद्धतीमध्ये गोठ्यातील परिसर कोरडा राहण्यास मदत होते तसेच शेण व मूत्र पूर्णपणे वाळून भुसभुशीत होते त्यामुळे गोठ्यात बसलेल्या जनावरांच्या सड व कासेला इजा होत नाही. त्यामुळे कासदाह आजारास आळा घालण्यास मदत होते.
 • उत्तम व्यवस्थापन पद्धतीमध्ये जनावरांना बसण्यासाठी रबर गादी (मॅट) वापरली जाते ज्यामध्ये सड व कासेला होणारी इजा टाळता येते व त्याचप्रमाणे जिवाणू संसर्ग टाळता येतो.

कासेचे आरोग्य

स्वच्छतेबरोबर दुधाळ जनावरांच्या कासेचे आरोग्यही कासदाह आजाराच्या प्रतिबंधासाठी महत्त्वाचा घटक आहे.  
विल्यानंतर सुरवातीच्या काळामधील आहारातील पोषणघटकांचा महत्त्वाचा वाटा असतो. जस्त, तांबे, सेलेनियम, जीवनसत्व अ व इ इत्यादी सूक्ष्म पोषणद्रव्ये कासेची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे विल्यानंतर सुरवातीच्या काळामध्ये दूधउत्पादन व्यवस्थित टिकवित कासदाह आजारास प्रतिबंध घालण्यासाठी दुभत्या जनावरांच्या आहारात ऊर्जा, प्रथिने व खनिजक्षार व सूक्ष्म पोषणद्रव्ये योग्य प्रमाणात पुरविणे अत्यंत गरजेचे आहे.

टीट डीपिंग

 • दूध काढल्यानंतर, जनावराचे चारही सड निर्जंतुकीकरण द्रावणात त्वरित बुडवणे याला टीट डीपिंग असे म्हणतात.  
 • टीट डीपिंग केल्यामुळे दूध काढल्यानंतर सडातून होणारा जिवाणू संसर्ग टाळून कासदाह आजाराला मोठ्या प्रमाणात आळा घालता येतो. या व्यवस्थापनाच्या घटकाची अंमलबजावणी केल्यामुळे दूध दोहनानंतर सडावर शिल्लक दुधाचा अंश जो जिवाणूंच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो, तो काढता येतो. द्रावणामुळे सडांचे निर्जंतुकीकरण होऊन सडातून कासेत होणारा जिवाणूंचा संसर्ग रोखता येतो.  
 • टीट डीपिंग पद्धत अवलंबल्यास कासेमध्ये होणारा जिवाणूंचा संसर्ग जवळपास ६० ते ७० टक्के एवढा कमी करता येऊ शकतो.
 • दुध दोहनानंतर साधारणपणे अर्धा तास सडाची दुग्धनलिका ही उघडी असते. त्यादरम्यान कासदाह आजाराच्या संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणून दूध दोहनानंतर किमान अर्धा तास जनावर बसणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी दूध दोहनानंतर जनावरास चारा टाकल्यास चारा खाईपर्यंत जनावर उभे राहते.
 • दोहनावेळी संपूर्ण दूध काढणे आवश्यक आहे. सडामध्ये दुधाचा अंश शिल्लक राहिल्यास तो जिवाणूंसाठी अन्न घटक म्हणून काम करतो. त्यामुळे जिवाणू संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
 • सुप्त कासदाह आजारास आटोक्यात आणण्यासाठी दुभत्या जनावरांच्या दुधाची नियमित कॅलिफोर्निया मस्टायटिस चाचणी करावी. या चाचणीद्वारे सुप्त कासदाह आजाराचे निदान करून पुढील संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अंमलात आणता येतात.
 • सडाना जखमा होणार नाहीत यासाठी काळजी घ्यावी. वासरे गायीला दूध पिताना विशेष काळजी घ्यावी. जखमा झाल्यास तात्काळ उपचार करून घ्यावेत.
 • कासदाह झाल्यावर किंवा सडातून दूध येत नसेल तर सडात लवंग घालणे किंवा काडी घालणे असे अघोरी उपाय करू नयेत. याउलट पशुवैद्यकाच्या सल्ल्याने निर्जंतुक टीट सायफन सडामध्ये घालून दूध काढावे.

ः डॉ. अनिल भिकाने ९४२०२१४४५३
(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)


इतर कृषिपूरक
जनावरांमध्ये दिसतोय स्नोअरिंग आजारमराठवाड्यातील काही भागांमध्ये (विशेषतः औंढा...
कोंबड्यांतील रोगप्रसार टाळाआजारी कोंबड्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणारी भांडी...
विक्रमी दुग्धोत्पादन देणारी ‘जोगन'गायहरियानातील गालीब खेरी (कर्नाल) येथील पशूपालक...
जनावरांच्या आरोग्याकडे नको दुर्लक्षपावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता अधिक...
शाश्‍वत दूध उत्पादनासाठी ‘टीएमआर'गायीला शरीर वजन तसेच दूध उत्पादनासाठी आवश्यक...
जातिवंत वंशवृद्धीसाठी भ्रूण प्रत्यारोपण...साधारणपणे जातिवंत दुधाळू गाय एका वर्षात एकाच...
जनावरांच्या आहारात असावीत खनिज मिश्रणेखनिज मिश्रणाच्या अभावामुळे होणारे...
स्वच्छ दूध उत्पादनाची तत्त्वेदूध उत्पादनामध्ये भारताने आघाडी घेतली असली तरी...
संकरित गाईंची दूध उत्पादन वाढीची सूत्रेसद्यःस्थितीतील संकरित गाईंची दुसऱ्या-तिसऱ्या...
रेशीम कीटकांवर होणारा हवामानाचा परिणामरेशीम उत्पादनासाठी आवश्यक खर्चाचे प्रमाण अत्यल्प...
रानभाज्यांचे आहारातील महत्त्वशेती न करता नैसर्गिक स्थितीमध्ये उगवलेल्या...
दुधाळ जनावरांसाठी सॉर्डेड सीमेन...अलीकडच्या काळात पशुपालनामध्ये सेक्‍स ...
जनावरे, गोठ्याची ठेवा स्वच्छतापावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याला असलेला धोका...
रेबीज’ची लक्षणे तपासा, उपाययोजना करामनुष्यामध्ये रेबीज विषाणू मध्यवर्ती मज्जासंस्थेला...
जनावरांमध्ये होणारा शिंगाचा कर्करोगशिंगाचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्षे वयोगटातील...
गवळाऊ संगोपनाचे पाऊल पडते पुढेविदर्भामध्ये गवळाऊ दुधाळ गाय आणि शेतीकामासाठी...
जनावरांच्या आहारात मूरघासाचा वापरमूरघासामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा करता...
गाई, म्हशींसाठी संतुलित आहारगाई, म्हशींच्या अवस्थेनुसार पाणी, खुराक मिश्रण,...
दूध व्यवसायाची नव्याने करा मांडणीदेशी गायीचे दूध, फार्म फ्रेश दूध, निर्जंतुक,...
गाई, म्हशीतील माज ओळखागाई, म्हशींचा माज ओळखणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण...