शाश्वत विजेचा पर्याय : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना (संपूर्ण माहिती)

सौर ऊर्जा पंप
सौर ऊर्जा पंप

सौर कृषिपंपामध्ये मुख्यतः सोलर पॅनल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे तसेच इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे. सौर पंपाद्वारे विहीर, नदी, शेततळे, कालव्यामधून पाण्याचा उपसा करून पाइपद्वारे पिकांना पाणी देता येते. कृषिपंप सौर ऊर्जेवर काम करतो. जेव्हा सूर्यकिरणे पंपाच्या सोलर पॅनल्सवर पडतात तेव्हा डीसी (डायरेक्ट करंट) शक्ती निर्माण होऊन सौर पंप कार्यान्वित होतो. पाण्याचा उपसा केला जाऊ शकतो. सौर ऊर्जेमुळे शेतकऱ्यांना दिवसा पाण्याचा उपसा करता येतो.

सौर कृषिपंपाची उपयुक्तता     सौर कृषिपंप चालविण्यासाठी कोणत्याही इंधन किंवा पारंपरिक विजेची आवश्यकता नाही. यामुळे वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाब, सिंगल फेज समस्या, पंप जळणे या समस्याही उद्‌भवत नाहीत. २५ वर्ष टिकणाऱ्या सौर कृषिपंपाचा देखभाल खर्च अत्यंत कमी आहे. लुब्रिकेंट किंवा ऑईलची आवश्यकता नसते. त्यामुळे माती व पाणी दूषित होत नाही.

सौर कृषिपंपाचे फायदे

  •  दिवसा सिंचन करता येणे शक्य आहे. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीजबिलांचा किंवा डिझेलचा खर्च नाही. कमीतकमी व साध्या देखभालीची गरज. विद्युत अपघात होण्याची शक्यता नाही. पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत.
  •  बॅटरी चार्जिंगची सोय असल्याने बॅटरीद्वारे शेतामधील घराला रात्रीच्या वेळी वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.
  • मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना     ज्यांच्याकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व सिंचनासाठी पारंपरिक पद्घतीने वीजपुरवठा नाही अशा शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. तसेच महावितरणकडे कोटेशनची रक्कम भरून कृषिपंपाची वीजजोडणी प्रलंबित शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

    योजनेसाठी अर्ज करण्याची पद्घत

  •     सौर कृषिपंप योजनेसाठी महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल सुरु केले आहे. www.mahadiscom.in या वेबसाईटवर किंवा https://www.mahadiscom.in/solar/ या लिंकवर जाऊन अर्जदार ए-वन अर्ज ऑनलाईन भरायचा आहे.
  •     अर्ज साधा व सोपा असून अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करता येतात. ऑनलाईन अर्ज करण्यास अडचण आल्यास शेतकऱ्यांना महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा. या कार्यालयातून अर्ज दाखल करण्यासाठी विनामूल्य मदत केली जाईल.
  • योजनेतील लाभार्थी हिस्सा

  •  सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांकडून ३ अश्वशक्ती डीसी पंपाच्या आधारभूत किंमतीच्या १० टक्के रक्कम आणि अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांना पंपाच्या आधारभूत किंमतीच्या ५ टक्के रक्कम भरावी.
  •  पारंपरिक वीजपुरवठ्यासाठी रकमेचा भरणा करून प्रलंबित यादीत असलेल्या संबंधीत लाभार्थ्यांची रक्कम यामध्ये समायोजित करण्यात येईल. त्यांना उर्वरित फरकाची रक्कम भरावयाची आहे.
  •  सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांना ३ अश्वशक्तीसाठी २५,५०० रुपये तर ५ अश्वशक्तीसाठी ३८,५०० रुपये आणि अनुसूचित जाती / जमाती लाभार्थ्यांना ३ अश्वशक्तीसाठी १२,७५० रुपये ५ अश्वशक्तीसाठी १९,२५० रुपये भरावे लागणार आहे.
  • पारंपरिक वीजजोडणीपेक्षा लाभार्थी हिस्सा अधिक का?

  •  कृषिपंपाच्या पारंपरिक वीजजोडणीसाठी सुमारे ५५०० रुपये भरल्यानंतर शेतकऱ्यांना ३ किंवा ५ अश्वशक्ती क्षमतेचे कृषिपंप व त्यासाठी लागणारे साहित्य उदा. पाईप, फिटींग स्वखर्चाने घ्यावे लागतात. विद्युत वायरिंग, स्टार्टर, ईएलसीबी, कॅपॅसिटर आदींसाठी एकूण सुमारे २५,००० ते ३०,००० रुपयांचा खर्च येतो.
  •  सौर कृषिपंप, सौर पॅनल, पंप कंट्रोलर, पाईप इत्यादींचा अंतर्भाव आहे. तसेच २ एलईडी बल्ब देण्यात येणार आहे. यासह मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगसाठी सॉकेटची सोय उपलब्ध आहे. इतर आणखी फायद्यांमुळे पारंपरिक वीजजोडणीच्या तुलनेत सौर कृषिपंप हा अत्यंत किफायतशीर आहे.
  • विमा संरक्षण, दुरुस्ती हमी कालावधी

  •  सौर कृषिपंप २५ वर्ष सेवा देऊ शकतो. या कृषिपंपाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ५ वर्ष तर सौर पॅनलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी राहणार आहे. या हमी कालावधीत सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त झाल्यास विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे.
  •  सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त झाल्यास संबंधीत शेतकऱ्यांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राला तात्काळ कळविणे आवश्यक आहे. तीन दिवसांमध्ये तक्रारीचे निवारण करण्यात येईल.
  •  सौर कृषिपंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास त्याची तक्रार नजीकच्या पोलिस ठाण्यात प्रथम खबरी अहवालाद्वारे (एफआयआर) दाखल करावी. त्याची माहिती महावितरण कार्यालयास देण्यात यावी. सौर कृषिपंप आस्थापित करणाऱ्या एजन्सीद्वारे ५ वर्षांच्या कालावधीसाठी पंपाचा विमा काढण्यात येत आहे. त्यामुळे विमा कंपनीकडून संबंधीत लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळेल. सौर पंप आस्थापित करणारी एजन्सी त्यासाठी सहकार्य करेल.
  • नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षा

  • सोलर पॅनल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार केले असल्यामुळे वीज, वादळ, गारा या नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे क्वचितच नुकसान होते.
  •  एखाद्या दुर्मिळ वेळी वीज पडल्यामुळे सौर पॅनलचे नुकसान होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी सौर पंपासोबत वीज संरक्षण यंत्र बसविण्यात येणार आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे

  • योजनेसाठी शेतीचा ७/१२ उतारा, जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमाती लाभार्थ्यांकरिता) या कागदपत्रांची सत्यप्रत आवश्यक आहे.
  •  अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसेल, तर इतर हिस्सेदारांचा / मालकाचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक आहे.
  •  पाण्याचा स्त्रोत डार्कझोनमध्ये असल्यास भूजल सर्वेक्षण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.
  •  संपर्काकरिता अर्जदारांचा मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता (असल्यास), पाण्याचे स्त्रोत व त्याच्या खोलीची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे.
  •  अर्ज केल्यानंतर संबंधीत अर्जदारांना त्यांनी नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे अर्जांची सद्यस्थितीबाबत माहिती कळविण्यात येणार आहे.
  • तक्रार निवारणासाठी टोल फ्री सेवा     सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास किंवा त्यासंबंधीची अन्य काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांना महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक तक्रार सेवा केंद्राशी २४x७ संपर्क साधता येईल. यासाठी १९१२ किंवा १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ हे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. प्राप्त झालेली तक्रार संबंधित एजन्सीकडे पाठविण्यात येईल व एजन्सीकडून तीन दिवसांत तक्रारीचे निवारण करण्यात येईल. (लेखक महावितरण, पुणे  येथे जनसंपर्क अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com