ढगाळ वातावरणामुळे उद्‍भवणाऱ्या समस्यांकडे लक्ष द्या

एक तर ढगाळ वातावरणामुळे बागेत आर्द्रता वाढली असेल किंवा जास्त पाऊस झाला असल्यास जमिनीमध्ये ओलाव्याचे प्रमाण वाढले असेल. सध्या उपलब्ध स्थितीमध्ये बदलत्या वातावरणात द्राक्ष बागेमध्ये करावयाची कार्यवाही पुढील प्रमाणे..
ढगाळ वातावरणामुळे उद्‍भवणाऱ्या समस्यांकडे लक्ष द्या
ढगाळ वातावरणामुळे उद्‍भवणाऱ्या समस्यांकडे लक्ष द्या

सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. एक तर ढगाळ वातावरणामुळे बागेत आर्द्रता वाढली असेल किंवा जास्त पाऊस झाला असल्यास जमिनीमध्ये ओलाव्याचे प्रमाण वाढले असेल. सध्या उपलब्ध स्थितीमध्ये बदलत्या वातावरणात द्राक्ष बागेमध्ये करावयाची कार्यवाही पुढील प्रमाणे... वेलीची वाढ जोमात होणे ढगाळ वातावरण किंवा पाऊस यामुळे तापमानात घट होऊन आर्द्रता जास्त प्रमाणात वाढते. अशा वेळी वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग वाढतो. वेलीत जिबरेलिन्सचे प्रमाण जास्त वाढते. परिणामी, वेलीची अधिक वाढ होते. बऱ्याचशा बागेत काडीच्या परिपक्वतेचा हा कालावधी आहे, या वेळी जर वाढ जोमात होत असल्यास पेऱ्यातील अंतर वाढेल, पानांची संख्या वाढेल व परिपक्व होत असलेली काडी हिरवी राहण्याची शक्यता असेल. काडी परिपक्व होणे म्हणजे त्या वेलीची वाढ नियंत्रणात आहे. काडीचा काप घेतल्यानंतर काडीचा पीथ गडद तपकिरी रंगाचे असेल. ज्या बागेत फुटींची वाढ जोमात होत आहे, तिथे हा पीथ पांढरा असेल. अशा परिस्थितीतील बागेत फळछाटणी घेतल्यास फुटी लवकर निघतील. अगदी घडसुद्धा बाहेर पडतील. मात्र हिरव्या काडीमध्ये अन्नद्रव्याचा साठा कमी असल्यामुळे निघालेला घड कमकुवत असेल. त्याचे रूपांतर गोळी घडामध्ये किंवा काही अंशी बाळीमध्ये होण्याची शक्यता अधिक असेल. ही स्थिती टाळण्यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात. १) बागेत फुटीची वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न आवश्यक असतील. त्यासाठी शेंडा पिचिंग करून घ्यावे. २) या वेळी बागेत जास्त प्रमाणात बगलफुटी आढळून येतील. यामुळे पानांची गर्दी होऊन काडीवर आवश्यक तो सूर्यप्रकाश पडणार नाही. यासाठी बगलफुटी काढून घ्याव्यात. ३) कॅनॉपीत वाढलेल्या आर्द्रतेमुळे रोगांचाही प्रादुर्भाव वाढू शकतो. काड्या तारेवर मोकळ्या बांधून घ्याव्यात. ४) ०-०-५० हे खत पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा ०-९-४६ हे खत अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे तीन ते चार फवारण्या कराव्यात. तसेच जमिनीतून सव्वा ते दीड किलो प्रति एकर या प्रमाणे ठिबकद्वारे द्यावे. पाने पिवळे पडण्याची समस्या बऱ्याचशा बागेमध्ये पाऊस झाला असल्यास बाग एक तर निस्तेज झालेली दिसेल किंवा पाने पिवळी पडल्याचे दिसून येईल. एकाच क्षेत्रातील बागेमध्ये वेगवेगळी परिस्थिती आढळून येईल. काही ठिकाणी वेल सशक्त किंवा तंदुरुस्त दिसून कोणतीच अडचण नसेल. तर चार ते पाच वेलीनंतर काही वेली पिवळ्या पडलेल्या दिसून येतील. बऱ्याचदा बागेत शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्याचे नियोजन करूनही अशी परिस्थिती का निर्माण झाली, हे बागायतदारांना समजत नाही. मात्र बागेतील मातीचे परीक्षण केलेले असल्यास त्या बागेतील जमिनीत चुनखडीचे प्रमाण कमी अधिक असल्याचे दिसून येते. आपण एकसारखे अन्नद्रव्य दिलेले असले तरीसुद्धा ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी बागेत चुनखडी किंवा त्यासोबत पाण्यातील क्षाराचे प्रमाण या दोन्ही गोष्टी कारणीभूत असू शकतात. चुनखडीचे प्रमाण जिथे जास्त आहे, अशा ठिकाणी वेलींच्या पानावर अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येईल. यामध्ये प्रामुख्याने पालाश, मॅग्नेशिअम व लोह या अन्नद्रव्यांची कमतरता आढळते. अशक्त झालेल्या वेलीची पाने कमकुवत होतात. ही पाने रोग व किडींना बळी पडतात. त्या करिता पुढील उपाययोजना महत्त्वाच्या असतील. १) पालाशची फवारणी ः ०-०-५० हे खत ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा ०-४०-३७ हे खत २ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा ०-९-४६ हे खत १ ते १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. २) माती परीक्षण अहवालानुसार चुनखडीचे प्रमाण लक्षात घेऊन जमिनीतून सल्फरची उपलब्धता करावी. माती परीक्षण केलेले नसलेल्या ठिकाणी पाने पिवळी पडून वाट्या झालेली दिसत असल्यास ७० ते ८० किलो सल्फर प्रति एकर जमिनीत बोदामध्ये मिसळून घ्यावे. ज्या बागेत पाने थोडीफार पिवळी दिसतात, अशा बागेत सुद्धा ४० ते ५० किलो सल्फर प्रति एकरी देऊन घ्यावे. ३) हिरवळीची खते म्हणून ताग, धैंचा यांची लागवड करून घ्यावी. ती फुलोरा अवस्थेपूर्वी बोदामध्ये गाडून घ्यावे. रोगनियंत्रण बदलत्या वातावरणामुळे नवीन फुटी जास्त जोमात निघतील. त्यावर नियंत्रण ठेवता आले नसल्यास करपा, जिवाणूजन्य करपा आणि डाऊनी मिल्ड्यू या प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. पाऊस वाढत असल्यास करपा रोगाचे रोगकारक घटक या वातावरणामध्ये जास्त प्रमाणात पसरतात. डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव झालेल्या बागेत पानाच्या खालील बाजूला तेलकट डाग दिसून येतील, तर जास्त प्रादुर्भावाच्या स्थितीत पानावर पावडरचा थर दिसून येईल. अशा परिस्थितीत वेलीमधील हरितद्रव्याचे प्रमाण कमी होऊन पान अशक्त होईल. काही परिस्थितीत पाने पिवळी होऊन गळून पडतील. करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या परिस्थितीत पानामध्ये शिरकाव होऊन हिरव्या काडीच्या आत प्रवेश करून परिपक्व काडीमध्ये सुद्धा प्रादुर्भाव वाढू शकेल. कोवळ्या पानामध्ये सुरुवातीला तपकिरी रंगाचे ठिपके दिसून कालांतराने पानाला छिद्र पडलेले दिसते. या परिस्थितीमुळे वेल अशक्य होते. पाने गळून पडली नसली तरी पिवळी होतील किंवा सुकतील. करपा रोगाचे नियंत्रण झालेले नसल्यास फळछाटणीनंतर निघालेल्या घडावर आणि मण्यावरसुद्धा काळे डाग दिसून येतील. घडावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास घडाची वाढ होत नाही. असे घड खाण्यालायक राहत नाहीत. हे टाळण्यासाठी पुढील उपाययोजना महत्त्वाच्या असतील. १) वेलीची प्रत्येक काडी तारेवर मोकळी राहील, याची काळजी घ्यावी. यामुळे कॅनॉपीमध्ये आर्द्रता कमी करण्यास मदत होईल. परिणामी रोगाचा प्रसार कमी होईल. सोबतच फवारणीचे कव्हरेज चांगले होईल. २) कोवळ्या फुटी काढून टाकाव्यात. यामुळे रोगाचा पुढील प्रसार थांबेल. फळछाटणीनंतर घड खराब होण्याची समस्या उद्‍भवणार नाही. ३) बागेत मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी घ्यावी. किंवा काडीच्या तळातील चार ते पाच पेरे परिपक्व एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करता येईल. ४) करपा नियंत्रणासाठी, थायोफिनेट मिथाईल १ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. ५) या वेळी ढगाळ वातावरण किंवा पाऊस असल्यामुळे बागेत आर्द्रतेचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा अधिक असेल. अशा वेळी जैविक नियंत्रणावर भर द्यावा. त्यात ट्रायकोडर्माची (मांजरी वाइनगार्ड) फवारणी २ मिलि प्रति लिटर पाणी किंवा बॅसिलस सबटिलिस २ मिलि प्रति लिटर या प्रमाणे फवारणी करावी. फायदेशीर ठरेल. डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com