शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना

शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना
शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना

गटशेती स्थिर झाल्यानंतर व गटशेतीतून शेतकऱ्यांच्या कामांमध्ये सुलभता येते. काही प्रमाणात फायदा मिळू लागतो. हा टप्पा शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या स्थापनेसंदर्भात भारतीय कंपनी अधिनियम १९५६ मध्ये २००२ साली कलम १ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार शेतकरी उत्पादक कंपनी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व सहकारी संस्था दोन्हीचे फायदे लक्षात घेऊन निर्माण केली आहे. गटशेती करत असलेल्या शेतकऱ्यांना उत्पादक कंपनी सुरू करणे सुलभ जाते. यातून शेतीपूरक व्यवसाय सुरू झाल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत तयार होतात. गेल्या काही भागांमध्ये आपण गटशेतीचे कामकाज सुरळीत सुरू राहण्यासाठी व्यवस्थापनासंदर्भात माहिती घेतली. एकदा गटशेतीचे कामकाज सुरळीत झाले. त्यातून शेतकऱ्यांच्या कामामध्ये सुलभता येऊन फायदा होऊ लागल्यानंतर आता पुढचे पाऊल म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये अनेक शेतकरी, शेतकरी गट एकत्र येऊ शकतात. साधारणतः उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी १२ ते १५ गावातील ८०० ते १००० शेतकरी एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करावेत. यातून शेतीची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. संघटित प्रयत्नातून मोठे यश मिळवता येते. शेतकरी उत्पादक कंपनीला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्व नियम लागू होतात. परंतु कंपनीच्या आराखड्यामध्ये सहकारी संस्थेला लागू असलेले सर्व तत्त्वे वापरलेली आहेत. यामुळे कंपनीत भागीदारी असलेले सर्व शेतकरी सहकाराच्या तत्त्वानुसार एकत्र येऊन काम करतात. उत्पादक कंपनीमुळे पिकांची मूल्यवर्धक साखळी जोडली जाते. उत्पादक कंपनीमुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी करता येतो. कारण अशा कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात शेतीमाल निर्माण करण्याची क्षमता असते. कंपनीमार्फत निविष्ठांची खरेदी प्रत्यक्ष उत्पादक कंपन्या किंवा मोठ्या व्यापाऱ्याकडून करणे शक्य होते. पर्यायाने खरेदी आणि विक्रीमधील मध्यस्थ कमी करता येतात. पर्यायाने अशा कंपनीमुळे शेतीचे व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. शेतकरी उत्पादक कंपनी आणि सहकारी संस्थातील फरक ः

  • शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी तत्त्वावर व कंपनी कायद्यानुसार चालत असली तरी सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपनी यामध्ये काही मूलभूत फरक आहेत. हे फरक समजून घेणे गरजेचे आहे.
  • उत्पादक कंपनीची नोंदणी कंपनी कायद्याअंतर्गत होते, तर सहकारी संस्था ही सहकार कायद्यानुसार नोंदणीकृत असते.
  • शेतकरी उत्पादक कंपनी त्यांचे अनेक उद्दिष्ट ठरवू शकते. परंतु सहकारी संस्था ठरलेल्या उद्देशावरच काम करते.
  • शेतकरी उत्पादक कंपनीचे कार्यक्षेत्र संपूर्ण देशभर असू शकते. पण सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र मर्यादित असते.
  • उत्पादक कंपनीमध्ये वैयक्तिक समभाग (शेअर) विकता येत नाही, परंतु तो इतरांना त्याच्या मूल्यानुसार हस्तांतरित करता येतो. सहकारी संस्थांमध्ये समभाग (शेअर) विक्री करता येत नाही असे बंधन आहे.
  • -उत्पादक कंपनीमध्ये शेतकरी गट, संघटना, सेवा व उत्पादन संस्था इत्यादी सदस्य होऊ शकतात. पण सहकारी संस्थांमध्ये व्यक्ती हा सदस्य असतो. अन्य सहकारी संस्थाही सभासद होऊ शकतात.
  • शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये प्रत्येक सदस्याला मतदान करण्याचा अधिकार असतो. कंपनी त्याला मतदान करण्यास मनाई करू शकत नाही. सहकारी संस्थांमध्येही प्रत्येक सभासदाला एक मत असते, परंतु सहकार निबंधकांना काही कारणास्तव (उदा : थकबाकीदार असेल) तर मतदानास मनाई करण्याचा अधिकार असतो.
  • उत्पादक कंपनीमध्ये कर्ज घेण्याविषयी स्वातंत्र्य आहे. त्याला मर्यादा नाहीत. असे कर्ज घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, सहकारी संस्थांमध्ये कर्ज घेण्यास मर्यादा आहेत.
  • उत्पादक कंपन्यांना दरवर्षी उत्पन्नाचा काही हिस्सा बचत करणे बंधनकारक असते. पण सहकारी संस्थांना जर फायदा झाला तर ते बचत करू शकतात. सहकारी संस्थांवर सहकार निबंधकांचे नियंत्रण असते परंतु कंपनीवर अत्यंत नगण्य नियंत्रण राहते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com