गटशेती : काळाची गरज

गटशेती : काळाची गरज
गटशेती : काळाची गरज

शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गटशेती करावी. गटांमार्फत राज्यात यशस्वी शेतकरी उत्पादक कंपन्या तयार व्हाव्या यावर राज्यशासनाचा भर आहे. यासाठी पंतप्रधान कौशल विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या वतीने राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. पुणे येथील सिमॅसिस लर्निंग एलएलपी यांच्याद्वारे या अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे.

सध्या शेतकऱ्याची जमीनधारणा क्षेत्र सरासरी १.१४ हेक्टर इतकी आहे. कुटुंब विभागणीमुळे ती आणखी कमी होत जाणार, हे निश्चित. अल्पभूधारकांना संसाधनाची व साधनांची पूर्तता करणे जिकिरीचे होते. परिणामी, शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. वैयक्तिक शेतकऱ्याला लहान शेतीत मशागतीची कामे, बियाणे, खते, कीडनाशके, अवजारे खरेदी करणे अवघड होत आहे. पीक काढणीनंतर शेतमाल प्रक्रिया करून बाजारापर्यंत पोचविणे व चांगला बाजारभाव मिळविणे हे सुद्धा जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे लहान शेतकऱ्यांनी समूह (समविचारी शेतकरी गट) तयार करून एकत्रितपणे शेती करणे ही आता काळाची गरज बनली आहे. त्यामुळे याच उद्देशाने गटशेतीची संकल्पना पुढे आली व आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी गट तयार करून गटशेती करण्यास सुरवात केली आहे. गटशेतीमुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होऊन बाजारही सुलभ झाला आहे. भारत हा जागतिकीकरणाच्या प्रवाहात सामील झाला. त्यानंतर जगभरातील शेतीमालाची आयातनिर्यात सुरू झाली. बाहेरून येणारा माल स्वस्त दरात विकला जात असल्यास देशातंर्गत शेतीमालाच्या किमती पडतात. आपला उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना जगातील बाजारपेठेशी स्पर्धा करणे अवघड ठरते. यासाठी शेतमालाची आयात व निर्यात या दोन्हीही बाबी समजून घ्याव्या लागतील. कृषी क्षेत्रातील जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी उत्पादन खर्चात बचत व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून निर्यातक्षम उत्पादन हे शिकावे लागेल. भारतातील शेतकरी अल्पभूधारक असून वैयक्तिक पातळीवर ही स्पर्धा शक्य नाही. यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट व समूह तयार करून गटशेती करण्याशिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होतो, वाहतूक सुलभ होते, आधुनिक तंत्रज्ञान वापर सुलभ होतो. निर्यातक्षम शेतीमाल उत्पादनासह देशांतर्गत व परदेशातील बाजारपेठेतून चांगले दर मिळू शकतात. अन्य देशातून आयात होणाऱ्या स्वस्त शेतीमालाशी स्पर्धा करणे शक्य होईल. त्यासाठी गटशेतीतून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी लागेल. या कंपन्यांद्वारे प्रक्रिया व मूल्यवर्धन क्षेत्रात पाय रोवल्यास जागतिक स्पर्धेला तोंड देता येईल. गटशेती म्हणजे काय? समविचारी शेतकरी एकत्र येऊन सामूहिक शेती करणे म्हणजे गटशेती होय. यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. सर्व शेतकरी त्यांच्या कौशल्यानुसार उत्पादन प्रक्रियेत भाग घेत असल्याने उत्पादन कार्यक्षमता वाढते. गटाचा स्वतःचा प्रक्रिया उद्योग उभा केल्यास प्रक्रियायुक्त शेतमालाची निर्मिती करता येते. ही उत्पादने राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाठविण्याची क्षमता निर्माण होते. गटशेतीतून उत्पादक कंपनी स्थापन करून, सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून वैयक्तिक उत्पन्नामध्येही वाढ होते. सोबत शेतीची जोखीम कमी होते. यासाठी यापुढे गटशेती हाच पर्याय उपयुक्त होणार आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांमध्ये गटशेती आणि त्यातून उद्योगाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रमाची आखणी राज्य सरकारने केली आहे. या कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थीना ‘गटप्रवर्तक’ म्हणून सरकारचे प्रमाणपत्र मिळेल. त्यानंतर गटशेती करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे व गट स्थापन करणे हे काम सुलभ होईल. गटशेतीची सुरवात करण्यापूर्वी... १. समविचारी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन समूह तयार करावा. शेतीतील त्यांना भेडसावणारे प्रश्न यावर विचारमंथन करावे. एकत्रितपणे काय करता येण्यासारखे आहे याची यादी बनवावी. २. सर्वसाधारण शेतकरी कुठले ना कुठले एक प्रमुख पीक घेत असतात. त्यात पिकाला अनुसरून समूह शेती करण्यासाठी शेतकऱ्यांनी या अनौपचारिक बैठकीत एकत्रित कृती आराखडा तयार करावा. ३. बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी अन्य शेतकऱ्यांना याविषयी माहिती देत अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग मिळवावा. ४. समूह तयार झाल्यास गटामार्फत सर्व कामे करण्यासाठी उद्दीष्ट ठरवावे. त्यानुसार कृती कार्यक्रम आखावा. ५. पुढील वाटचालीसाठी गटातील प्रत्येक शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असते. त्यामुळे कार्यक्षमता वाढते. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याकडे असलेल्या जमीन, पाणी, अवजारे, जनावरे अशा संसाधनांचा एकत्रितपणे सर्व गटांसाठी वापर करण्याची मानसिकता तयार करावी. ६. गटसमूहाने व्यापारी, सेवावितरक, निविष्ठा पुरवठादार, शेतमाल खरेदीदार, बॅंक यांच्याशी समन्वय ठेवावा. उदा. गटांसाठी कर्ज मिळविणे हे वैयक्तिकरित्या कर्ज घेण्यापेक्षा सोपे होते. कर्ज घेतल्यास त्याचा वापर व्यवस्थितपणे होण्यासाठी सर्वांनी दक्ष असावे. ७. गटसमूहाची योग्य वाटचाल होण्यासाठी नियमितपणे बैठका, विचार विनिमय व एकत्रित निर्णयाची आवश्यकता असते. प्रत्येक उद्देश, केलेला विचारविनिमय व त्यातून घेतलेले निर्णय यांचे इतिवृत्त लिहून नोंद ठेवावी. पुढील वाटचालीमध्ये मागील निर्णयाच्या नोंदी उपयुक्त ठरतात. ८. गटसमूह स्थापन होऊन एकत्र शेती करण्याचा निर्णय पक्का झाल्यास गट नोंदणीविषयी माहिती काढून त्या दिशेने प्रयत्न करावेत. हा बिंदू म्हणजे गटशेतीचा उगम होय. गटशेती नोंदणीकृत संस्था करताना...

  • गटात कमीत कमी दहा व जास्तीत जास्त कितीही शेतकरी सहभागी होऊ शकतात.
  • गट स्थापन झाल्यानंतर गटाचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी गटातील एक सदस्यास ‘‘गट समन्वयक’’ म्हणून मान्यता देऊन नेमणूक करावी. गटाचे कामकाज चालविताना बैठका बोलाविणे, विषयसूची तयार करणे, विषयाची मांडणी करणे, बैठकीचे इतिवृत्त लिहिणे व सदस्यांना सूचना देणे इ. कामाची जबाबदारी गट समन्वयकावर असते.
  • गटातील प्रत्येक शेतकरी त्याच्याकडे असलेल्या कलाकौशल्यानुसार त्याच्या आवडीच्या कामाची जबाबदारी स्वीकारू शकतात. त्यांच्या अनुभवाचा फायदा सर्व गटाला होऊन गटशेतीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचा फायदा होतो.
  • गटशेतीचे फायदे महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या गटामधून अनुभवातून खालील फायदे दिसून येतात.

  • वैयक्तिक शेतकऱ्याच्या तुलनेमध्ये गटशेतीमध्ये काटेकोर शेतीचे नवीन तंत्रज्ञान अवलंबणे शक्य होते. उदा. सूक्ष्म सिंचन, सुधारित अवजारे इ.
  • गटामुळे उत्पादन खर्च कमी करण्यासोबत उत्पादनात वाढ मिळवता येते. यासाठी सामूहिक निविष्ठा खरेदी, सिंचन व्यवस्था व मनुष्यबळाचा वापर हे गट शेतीचे महत्त्वाचे फायदे आहेत.
  • शेतमालाची विक्री व बाजारव्यवस्था ही वैयक्तिक शेतकऱ्यासमोरची सर्वात मोठी अडचण आहे. गटशेतीमुळे बाजार शोधणे, शेतमालाचा योग्य भाव पदरात पाडणे, कमी खर्चात मालाची वाहतूक करणे शक्य होते.
  • गटामार्फत शेतमाल स्वच्छ व प्रतवारी करून तसेच चांगले पॅकेजिंग आणि ब्रॅन्‍डिंग करून बाजारात नेणे शक्य होते. मालाचे मूल्यवर्धन होऊन जास्त दर मिळतो.
  • निर्यातीच्या संधीसुद्धा शोधून त्यासाठी योग्य दर्जाचा माल गटाद्वारे निर्माण करता येतो.
  • एकंदरीत शेतीतील सर्व कामे सुलभ होऊन खर्चाची बचत व जास्त उत्पन्न गटशेतीद्वारे शक्य होते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com