आरोग्यास उपयुक्त कुळीथ

आरोग्यास उपयुक्त कुळीथ
आरोग्यास उपयुक्त कुळीथ

आयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी पथ्यकारक मानले आहे. कुळीथ हे प्रथिने आणि इतर पोषक घटकांचा संभाव्य स्रोत आहे. तसेच लोह, मॉलिब्डेनम आणि कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहे. कुळीथास हुलगे असेही म्हणतात. स्थूल व्यक्‍तींसाठी हे फायद्याचे कडधान्य आहे. सर्व कडधान्यांच्या तुलनेत कुळथांमध्ये सर्वांत कमी स्निग्ध पदार्थ आहेत. त्याचबरोबर त्यातील चोथ्याचे प्रमाण अधिक आहे. कुळीथ हे सामान्यत: घोड्यांसाठी खाद्य म्हणून जास्त प्रमाणात वापरले जाते. पारंपरिक आयुर्वेदिक पाककृतीमध्ये कुळीथ औषधी गुणांसह अन्न म्हणून वापरले जात होते. १) कुळीथ चवीला गोड, तुरट असून उष्ण आहे. पचायला हलके आहे. २) हे शरीरामध्ये वात व पित्त दोष वाढवितात, कफ दोष कमी करतात. ३) कावीळ झालेल्या रुग्णांसाठी तसेच वजन कमी करणाऱ्यांसाठी आहाराचा भाग म्हणून कुळीथाचा वापर करावा. ४) कुळीथ हे प्रथिने आणि इतर पोषक घटकांचा संभाव्य स्रोत आहे. तसेच लोह, मॉलिब्डेनम आणि कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहे. १०० ग्रॅम कुळीथामधील पोषक तत्त्वे : १) कर्बोदक (५७.२%), प्रथिने (२२%), आहारातील तंतूमय पदार्थ (५.३%). २) स्निग्ध पदार्थ (०.५०%), खनिज (३.२ ग्रॅम), कॅल्शियम (२८७ मिली.ग्रॅम), फॉस्फरस (३११) मिग्रा), लोह (६.७७ मिग्रा). ३) कॅलरीज (३२१ कि.कॅलरी), थिअमीन (०.४मिग्रा), रिबोफ्लाव्हिन (०.२ मिग्रा) आणि नियासिन (१.५ मिग्रा) ४) स्निग्ध पदार्थचे प्रमाण कमी आहे तसेच ते प्रथिने, आहारातील तंतूमय पदार्थ, विविध सूक्ष्म पोषक घटक आणि उपयोगी रसायनाचा उत्कृष्ट स्रोत आहे. आरोग्यदायी फायदे ः १) आयुर्वेदशास्त्राने कुळथास आजारी व्यक्‍तींसाठी पथ्यकारक मानले आहे. लघवीच्या विकारांमध्ये कुळथाच्या काढ्याचा वापर सांगितला आहे. २) ताकात शिजवलेले कुळथाचे कढण आजारी व्यक्‍तींना देण्याची प्रथा आहे. पूर्वी बाळंतिणीस कुळथाचा काढा दूध वाढण्यासाठी दिला जायचा. ३) आयुर्वेदामध्ये कुळीथ डोळ्यांना हितकर सांगितलेले आहेत. डोळ्यांवर थेट याचा उपयोग करू नये, तर पोटातून घेण्यासाठी याचा उपयोग करावा. ४) कुळीथ हे वातघ्न, कफघ्न आहेत. कुळीथाचे सार रोगी माणसास पथ्यकर आहे. सुजेवरही त्याचा उपयोग होतो. ५) उन्हाळ्यात, शरद ऋतूत आणि पितप्रकृतीच्या माणसांनी याचे सेवन करू नये. कुळथामध्ये कॅलशियमचे प्रमाण चांगले आहे. परंतु, यातील काही घटकांमुळे कॅल्शियमच्या शोषणाला अडथळा निर्माण होतो. ज्या व्यक्‍तींना कॅल्शिअम ऑक्झलेट असलेले मुतखडे आहेत अशांनी कुळीथ खाऊ नये. ६) लोहाची कमतरता दूर करण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते तसेच हिवाळा हंगामात शरीराचे तापमान राखण्यासाठी देखील उपयुक्त आहे. ७) कुळीथाचे गरम कढण तापामध्ये घाम आणण्यासाठी उपयुक्त आहे. ८) शरीरातील मेद कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. ९) कुळीथाचे गरम कढण किंवा कुळीथाच्या पिठाचे उटणे लावल्यानेही चरबी कमी होते. १०) अंगाला खूप घाम येत असल्यास त्यावर भाजलेल्या कुळीथाचे पिठाचे उटणे लावल्याने खूप चांगला उपयोग होतो. ११) मुतखडा असल्यास इतर आयुर्वेदिक औषधांबरोबरच कुळीथाचा वापर करावा. त्याचे सूप मूतखड्यामध्ये होणारी पोटातली वेदना कमी करण्यासाठी वापरतात. १२) प्रक्रिया न केलेल्या कच्‍च्या कुळीथ बियाण्यांमध्ये इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करणारे गुण आहेत. १३) पोटात वात धरणे, पोट दुखणे, फुगल्यासारखे वाटणे यावर कुळीथाचा चांगला उपयोग होतो. १४) पोटातील जंतांवरही याचा उपयोग होतो. १५) त्वचेची आग, पुरळ व फोड दूर करण्यासाठी कुळीथाची पावडर पाण्याबरोबर घेणे उपयुक्त ठरते. १६) त्वचेचा रंग उजळविण्यासाठी त्वचेवर कुळीथ बियाणे पेस्ट करून लावावे. १७) खोकला, सर्दी, कफ यावर कुळीथाचा वापर करावा. १८) कुळीथ हे फेरूलीक, क्‍लोरोजेनिक, कॅफिइक, व्हॅनिल आम्ल जेनेस्टीअन आणि माल्वीडीन वनस्पतिजन्य रसायनयुक्त आहे. यामुळे कुळीथ स्निग्ध पदार्थांना अडथळा करते. वजन कमी करण्यात याची मदत होते. १९) कुळीथ रात्रभर पाण्यात भिजवून प्यायल्यास हे एक नैसर्गिक मूत्रल द्रवासारखे उपयोगी आहे. मुतखडा बाहेर घालविण्यास मदत होते. मूत्रपिंडाच्या कार्यात सुधारणा होते, सूज कमी करते. अंगातील ताप कमी करते. २०) सर्दी-पडसे झाले असता छातीतील कफ बाहेर टाकण्यास कुळीथाची भुकटी पाण्यासोबत घेतल्यास मदत होते. २१) कुळीथाच्या नियमित सेवनाने कोलेस्टेरॉलचे प्रमाण घटवून अथेरोस्केलरोसिस, हृदयविकाराचा झटका इ. धोके टाळता येतात. २२) यातील तंतुमय पदार्थामुळे शौचास साफ होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता टळते. २३) कुळीथामधील शर्करा त्वरित रक्तामध्ये वाढल्यामुळे तृप्ती वाढते. पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार खाल्ले जात नाही, त्यामुळे वजनही वाढत नाही, मधुमेहींनाही उपयोगी आहे. कुळीथाचे आहरातील उपयोग : १) कुळीथ+भात खिचडी: चवीला गोड, तुरट, रूक्ष, उष्ण, तृप्तीदायक, भूक वाढविणारी, पचायला हल्की, वातकफ नाशक व पित्तकर. २) कुळीथ कट: चवीला गोड, तुरट, उष्ण, वात पोटातून पुढे सरकवणारा, वात कफ नाशक, भूक वाढविणारा, मेदाचा नाश करणारा, लघवी सुटायला मदत होते. मूतखड्यामध्ये पथ्यकारक. ३) कुळीथ सूप: तुरट, वातनाशक, कफनाशक, पित्तकर, शुक्रधातू नाशक, रक्त वाढविणारा, पचायला हलके, उष्ण असते. ४) कुळीथ पिठले: पचायला हलके, वातकफनाशक, पित्तकर, वात पुढे सरकवणारे, भूक वाढविणारे, उष्ण असून चवीला तिखट, तुरट असते. ५) कुळीथाची गोड पिठी: पचायला जड, वातनाशक, कफ व पित्त वाढविणारी, उष्ण, शक्तिवर्धक, धातूवर्धक, तृप्तीदायक, चवीला तुरट गोड असते. कुळीथ अतिप्रमाणात खाल्ल्यास रक्तपुष्प होते. ॲसिडीटी होते. कुळीथ खाऊन अजीर्ण झाल्यास खडीसाखर खावी. संपर्क ः कुंती कच्छवे, ९५१८३९७९७४ ( अन्न रसायन आणि पोषण विभाग, अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com