कृषी उत्पादन वाढीसाठी मधमाश्या महत्त्वाच्या

डिसेंबर २०१७ पासून संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने २० मे हा ‘जागतिक मधमाशी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. २०२१ च्या जागतिक मधमाशी दिवसासाठी ‘बी एंगेज्ड’ (Bee Engaged) ही थीम असून, त्याद्वारे मधमाशी पालनाविषयी जागरूकता आणि मधमाशीपासून मिळणाऱ्या उत्पादनांचे महत्त्व पटवले जाणार आहे.
कृषी उत्पादन वाढीसाठी मधमाश्या महत्त्वाच्या
कृषी उत्पादन वाढीसाठी मधमाश्या महत्त्वाच्या

जागतिक मधमाशी दिवस विशेष वाढते शेतीक्षेत्र, हानिकारक कीडनाशकांचा वापर यामुळे मधमाश्यांच्या वसाहती वेगाने कमी होत आहे. परदेशामध्ये मधमाशीपालनासंदर्भात मोठी जागरूकता असून, भारतामध्ये त्याचा अभाव जाणवतो. त्याच प्रमाणे भारतामध्ये मध काढताना वसाहती जाळणे, पोळ्यांमधून पिळून मध काढणे यांसारख्या अशास्त्रीय पद्धतीमुळे जंगली मधमाश्यांचे प्रमाणही कमी होत आहे. परिणामी, परागीभवनाचा अभाव व पीक उत्पादनात घट होताना दिसून येते. भारतात ४ प्रजाती आढळतात. त्यामध्ये सातेरी, फुलोरा, आग्या मधमाश्या आणि पोयाच्या म्हणजेच डंखरहित मधमाशी यांचा समावेश होतो. मधमाशीपालनासाठी उपयुक्त म्हणून युरोपियन मधमाशी भारतात आणण्यात आली. आग्या मधमाश्या (Apis dorsata) उंच झाडांवर, डोंगराळ भागात खडकांवर, उंच इमारतींवर किंवा पाण्याच्या टाक्यांवर आढळणारी हा मधमाशी आकाराने सर्वांत मोठी असते. या मधमाशांच्या उंचावर व उघड्यावर राहण्याच्या सवयीमुळे तिला कृत्रिम मधपेट्यांमध्ये ठेवता येत नाही. या माशा एकच पोळे बांधतात. त्यांच्या पोळ्याचा आकार साधारणपणे १ मीटर लांब व ०.५ मीटर रुंद असतो. त्यातून सुमारे ३०-३५ किलो मध आणि २-३ किलो मेण उत्पादन मिळू शकते. माश्यांचा स्वभाव चिडखोर, चावऱ्या असतात. मधसंकलनासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे. त्यामुळे माश्या न मारता त्याच पोळ्यांपासून अनेकदा मध संकलन करता येईल. परपरागीभवनामध्ये या मधमाशा विशेष भूमिका निभावतात. फुलोरी मधमाशी (Apis florea) आकाराने लहान असून, आग्या माश्यांप्रमाणे याही एक पोळे बांधतात. उघड्यावर राहण्याच्या सवयीमुळे त्यांना मधपेट्यांमध्ये पाळता येत नाही. शेताच्या बांधावर अडचणीच्या ठिकाणी या माश्या पोळे बांधतात. यांचे पोळे आग्या माश्यांप्रमाणे उंचावर नसते. त्यांच्या पोळ्यातून ३००-५०० ग्रॅमपर्यंत मध मिळतो. आकाराने लहान असल्याने लांब आकाराच्या फुलांच्या आतापर्यंत जाऊन परागीभवनासाठी उपयुक्त ठरतात. सातेरी मधमाशी (Apis cerana indica) फुलोरी माशीपेक्षा आकाराने थोडी मोठी आणि आग्या माशीपेक्षा लहान अशी ही सातेरी मधमाशी सात ते आठ पोळे बांधतात. प्रामुख्याने अंधाऱ्या ठिकाणी उदा. झाडाचे बुंधे, मातीची वारुळे, तसेच दगडी इमारतींच्या भिंतीत असलेल्या पोकळ्यांमध्ये राहतात. या सवयीमुळे त्यांना मधपेट्यांमध्ये पाळता येते. मधपेट्यांमध्ये पाळल्यामुळे त्यांना पिकाच्या परागीभवनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी ने-आण करता येते. या मधमाशांपासून फुलोऱ्याच्या हंगामात एका पेटीतून जवळपास ५-७ किलो मध उत्पादन होते. १ ते २ किलो मेणाचे वार्षिक उत्पादनही होते. पोयाच्या माश्या (Trigona iridipennis) आकाराने अत्यंत लहान असून, बुंदीच्या आकाराचे गोल मेणाची घरे तयार करतात. या नांगी विरहित असून नाकात किंवा कानात घुसून हल्ला करतात. त्यांच्यापासून मिळणाऱ्या मधाचे प्रमाण हे अत्यल्प असले, तरी त्याचा मध खूप औषधी मानला जातो. पॉलिहाउसमधील पिकांच्या परागीभवनासाठी उपयोगी पडतात. युरोपियन मधमाशी (Apis mellifera) भारतात थाय सॅक ब्रूड विषाणू रोगाच्या प्रादुर्भावाने एकेकाळी सातेरी मधमाश्यांची संख्या खूपच कमी झाली होती. मधाचे उत्पादन घटल्याने विषाणू रोगांना प्रतिकारक असलेल्या युरोपियन मधमाशीची भारतात आयात केली गेली. त्यामुळे भारतात मधू क्रांतीला चालना मिळाली. या मधमाशा सातेरीप्रमाणेच निसर्गात अंधाऱ्या ठिकाणी राहतात. १० किंवा त्यापेक्षा जास्त पोळे बांधतात. त्या मधपेट्यांमध्ये पाळता येतात. या आकाराने आग्यामाश्यांपेक्षा थोड्या लहान व सातेरी माश्यांपेक्षा मोठ्या असतात. मधपेट्यांमधून वार्षिक ४०-५० किलोपेक्षा जास्त मध उत्पादन आणि ४ ते ५ किलो मेणाचेही उत्पादन मिळते. रॉयल जेली उत्पादनासाठी या माशा जास्त उपयुक्त ठरतात. मधमाशांची वसाहत मधमाश्यांच्या वसाहतीमध्ये सुमारे ४-५ हजार माशा असतात. त्यामध्ये एक राणी माशी, १००-५०० नर आणि उर्वरित कामकरी मधमाश्या असतात.

  • राणी माशी कडे फक्त प्रजननाचे कार्य असते. राणी माशी व कामकरी माशी या दोन्ही मादी असल्या तरी राणी माशी ही वसाहतीतील एकमेव फलित मादी असते. राणी माशी जन्माला आल्यानंतर ४ दिवसांनी फलित होण्यासाठी तयार होते. राणी माशीचे पूर्ण आयुष्यात फक्त एकदाच नराबरोबर मिलन होते. तेव्हा ती ८-१० नरांबरोबर हवेत मिलन करते. तिच्या जवळपास ३ वर्षे आयुष्यात दररोज ५०० ते १५०० अंडी घालते.
  • नर माशी :  वसाहतीमध्ये नरांची संख्या ही नवीन वसाहत निर्मितीच्या वेळी वाढवली जाते. नरांचे कार्य हे राणी माशीला फलित करण्याइतकेच मर्यादित असते.
  • कामकरी माश्यांमध्ये निसर्गत : अंडकोशाची वाढ झालेली नसते. त्यांना अंडी घालता येत नाहीत.
  • कामकरी माशांची कामे 

  • वसाहतीतील विविध कामांची जबाबदारी त्यांच्याकडे असते.
  • जन्म झाल्यापासून पहिले दोन दिवस त्या पोळ्यांची स्वच्छता करतात.
  • ३-५ दिवस वयात मोठ्या अळी अवस्थेतील पिल्लाना अन्न भरवण्याचे काम करतात.
  • वयाचे ६-११ दिवस त्यांच्या डोक्यात असलेले हायपोफिरेंजील ग्रंथी राज अन्न (रॉयल जेली) स्रवते. त्या काळात त्या लहान अळी अवस्थेतील पिल्ले व राणी माशीला अन्न भरवण्याचे काम करतात. राणी माशी फक्त रॉयल जेलीचा आहार घेते.
  • वयाच्या १२-१७ या काळामध्ये कामकरी मधमाश्‍यांच्या पाठीवर असलेल्या खवल्यांच्या खाली असलेल्या मेण ग्रंथी मेण स्रवण्याचे काम करतात. या काळात नवीन पोळी बांधण्याचे कामे कामकरी माश्या बजावतात. त्याचबरोबर वसाहतीत विशिष्ट ठिकाणी पराग संचयन करणे, मकरंदापासून मधाची निर्मिती करणे व वसाहतीचे तापमान नियंत्रित ठेवण्याचे काम त्या करतात.
  • वय १८-२१ दिवस वसाहतीच्या रक्षणाचे काम करतात.
  • वयाच्या २२ व्या दिवसांपासून वसाहती बाहेर जाऊन फुलांवरून पराग, मकरंद गोळा करण्याचे काम करतात.
  • मधमाशीपासून मिळणारी उत्पादने मध  मध हे मधमाशांनी फुलांवरून जमा केलेल्या मकरंदापासून तयार केलेले अन्न असून, फुलोरा नसलेल्या काळात खाण्यासाठी वापरले जाते. मधमाश्या मकरंद खातात. आपल्या शरीरात विविध विकरांच्या साह्याने त्यातील सुक्रोज शर्करेचे साध्या ग्लुकोज आणि फ्रुक्टोज शर्करांमध्ये रूपांतर करतात. मकरंदातील पाण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवरून १५ टक्क्यांपेक्षा खाली आणले जाते. त्याचे मधात रूपांतर होते. मानवी आहारामध्ये महत्त्वाच्या अशा १०० ग्रॅम मधातून ३०४ कॅलरी ऊर्जा मिळते. मेद नसल्याने चरबी घटविण्यासाठी मधाचा उपयोग केला जातो. मेण  मधाव्यतिरिक्त मधमाश्‍यांपासून मेणाचे उत्पादन घेतले जाते. या मेणाचा वापर चर्म उद्योग, तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. त्याचबरोबर मेणबत्ती बनवण्यासाठीही मधमाशीच्या मेणाचा उपयोग होतो. बाजारात मेणाला मधापेक्षाही जास्त भाव मिळतो. विष  मधमाशीच्या विषाचा (बी व्हेनम) उपयोग संधिवाताच्या उपचारासाठी केला जातो. संधिवाताच्या रुग्णांना मधमाश्‍यांचा डंख देण्याचीही एक उपचार पद्धती असून तिला ‘एपीथेरपी’ असे म्हणतात. पराग परागामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. मधमाशीपालनात वसाहतीत येणारा जास्तीचा पराग सापळा लावून जमा करता येतो. त्याचा उपयोग बिगर फुलोऱ्याच्या काळात मधमाश्‍यांसाठी अन्न म्हणून करता येतो. तसेच औषधे व प्रथिनांच्या निर्मितीमध्ये उपयोग होतो. राजअन्न (रॉयल जेली) रॉयलजेली हे राणीमाशीचा मुख्य अन्न स्रोत असतो. मानवी प्रजननात दोष कमी करणे, तारुण्य टिकवण्यासाठी रॉयल जेलीचे सेवन उपयुक्त मानले जाते. प्रोपोलिस कामकरी माश्या झाडांमधून स्रवणाऱ्या डिंकापासून प्रोपोलिस हा पदार्थ मिळवतात. वसाहतीतील डागडुजीसाठी उपयुक्त हा पदार्थ औषधी असतो. जखम भरण्यासाठी उपयोग होतो. - गणेश चवरे, ८१०८१३८०८० (कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com