उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योग

फर्निचर आणि घरनिर्मिती उद्योगात बांबू प्लायवूडचा वापर वाढत आहे.
फर्निचर आणि घरनिर्मिती उद्योगात बांबू प्लायवूडचा वापर वाढत आहे.

लेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी तत्त्वावर लागवड आणि बांबू हे एक औद्योगिक पीक म्हणून विचार करण्यासाठी काही गोष्टी जाणून घेतल्या. त्याचबरोबर ग्रामीण स्तरावर कोणते छोटे उद्योग शेतकरी करू शकतात हे पाहिले. आजच्या लेखात आपण देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये बांबू पिकाचे काय महत्त्व आहे हे जाणून घेत आहोत.

बांबूपासून तयार होणाऱ्या आणि व्यापारी तत्त्वावर उत्पादित होणाऱ्या वस्तूंमध्ये कागद, प्लायवूड, व्हिनीअर, फर्निचर, पार्टिकल बोर्ड, कोळसा, वीज, इंधनासाठी अल्कोहोल, सीएनजी गॅस यांचा समावेश होतो. यातील कागद, प्लायवूड आणि व्हिनीअर, वीज, अल्कोहोल या उत्पादनासाठी काही कोटींची गुंतवणूक लागते. अर्थात त्यांचा अर्थव्यवस्थेतील वाटाही खूप मोठा असतो. प्लायवूड उद्योग सुमारे २६,००० कोटी रुपयांचा आहे आणि दरवर्षी तो वाढत आहे. त्यातील २५ टक्के जरी आपण बांबू प्लाय केला तरी खूप फरक पडेल. बांबूचा त्यातील सहभाग लक्षणीय असू शकतो. या सर्व उद्योगासाठी कच्चा माल हा शेतातूनच येणार आहे. त्याचबरोबर हे लक्षात घेतले पाहिजे की, मुख्य उत्पादने निर्माण करताना त्यातील फक्त २० ते २५ टक्के एवढेच मुख्य उत्पादन होऊ शकते. जर १०० किलो बांबू घेतला आणि त्यापासून प्लायवूड करायला गेलो तर फक्त २० किलो प्लायवूड तयार होते, उर्वरित ८० किलो घटक हे प्लाय उद्योगाच्या दृष्टीने निरुपयोगी असतात. इतर उद्योगात अशा घटकांचा थोड्या प्रमाणात वापर करता येतो. बांबू मात्र याला अपवाद आहे. हे घटक कोळसा, ॲक्टिव्हेटेड कार्बन, व्हीनेगार, बांबू बोर्ड अशा उत्पादनांचा कच्चा माल आहे. त्यामुळे बांबू प्लाय निर्मितीबरोबरच हे सर्व पूरक उद्योग चालवले तर काहीही वाया जात नाही. या पूरक उद्योगातून मूल्यवर्धन होते. अर्थातच मुख्य उत्पादनाचा खर्च कमी होतो.

चीनमधील बांबू प्रक्रिया उद्योग

स्पर्धेमध्ये कमी पैशात वस्तूनिर्मिती हे यशाचे एक सूत्र असते. बांबू वस्तू निर्मिती उद्योगात हे सूत्र प्रथम चीनने ओळखले आणि अमलात आणले. जो खरा कच्चा माल एखाद्या उद्योगाचा आहे तो योग्य त्या प्रतीचा, योग्य किमतीत, योग्य वेळी आणि आवश्यक तेवढा जर उद्योगाला मिळाला तर उद्योग सुस्थितीत चालतो. यासाठी आपण प्लायवूड निर्मिती उद्योगाचे उदाहरण पाहूयात.

  • बांबूच्या ठराविक जाडी आणि ठराविक लांबीच्या पट्ट्या हा या उद्योगाचा कच्चा माल. १०० किलो बांबू घेतला तर त्यातून फक्त २० ते २२ किलो पट्ट्या निघतात. पूर्वी १०० किलो बांबू घेऊन त्यावर प्रक्रिया करून २० किलो कच्चा माल आणि ८० किलो कचरा (प्लायवूडसाठी निरुपयोगी) माल तयार व्हायचा. त्यामुळे या निरुपयोगी मालाची विल्हेवाट लावण्यासाठी जास्त पैसा खर्च व्हायचा. त्याचा सर्व खर्च प्लायवूड उद्योगावर पडायचा. शिवाय अकुशल मजूर पोसावे लागायचे. बांबू आणणे आणि निरुपयोगी मालाची विल्हेवाट लावण्यासाठी वाहतूक खर्च वेगळाच. यामुळे प्लाय उत्पादनासाठी खर्च वाढायचा. चिनी तंत्रज्ञांनी प्री-प्रोसेसिंग हे तंत्र वापरून हा प्रश्न सोडवला.
  • चीनमधील कंपन्यांनी बांबू उत्पादक पट्ट्यात ४० ते ५० किमी परिसरात प्री-प्रोसेसिंग युनिट उभी केली. या युनिटमध्ये परिसरातील हिरवा बांबू आणला जातो. त्याची वर्गवारी करून तुकडे केले जातात. बांबूचा वरच निमूळता ८ ते १० फुटांचा तुकडा फळबागांना आधार देण्यासाठी लगेच विकला जातो. पूर्ण बांबूतील वाकडी तिकडी पेरे कापून चॉप स्टिक्ससाठी बाजूला काढली जातात. सारख्या जाडीचे व सारख्या लांबीचे बांबूचे तुकडे कापून त्याच्या पट्ट्या काढल्या जातात. हाच प्लाय निर्मितीसाठीचा कच्चा माल. त्यावर थोडी प्रक्रिया करून व्यवस्थित वाळवून व पॅकिंग करून प्लाय उद्योगाला पाठवला जातो.
  • प्लायवूड निर्मितीसाठी पट्ट्या करताना जो भुस्सा निघतो तो पार्टिकल बोर्ड किंवा पॅलेट करण्याचा कच्चा माल असतो. हा कच्चा माल संबंधित उद्योगाला पाठविला जातो. यामुळे प्लाय निर्मिती उद्योगासाठी योग्य तो माल आवश्यकतेनुसार योग्य वेळी पोचतो. इतर राहिलेला  निरुपयोगी वाटणारा, पण कोणत्या तरी उद्योगाचा कच्चा माल संबंधित उद्योगांना पाठविला जातो. हे पूरक उद्योग स्वतंत्रपणे चालतात. बांबूची पूर्ण किंमत शेतकऱ्याला मिळते. सर्व उद्योगांना आपापला कच्चा माल मिळाल्याने ते उद्योग सुरळीत चालतात. पूर्ण बांबू वापरला गेल्याने देशाच्या तिजोरीत पैसा पुरेपूर जमा होतो. व्हिएतनाम देशामध्येही बांबू उद्योगासाठी हे सूत्र वापरले जाते.
  • जी गोष्ट प्लाय उद्योगाबाबत, तीच उदबत्ती निर्मितीबाबत आहे. शंभर किलो बांबूमधून फक्त १८ ते २० किलो उदबत्तीची काडी मिळते. उरलेला निरुपयोगी भाग कोळसा करून किंवा त्यापासून व्हीनेगर किंवा ॲक्टिव्हेटेडड कार्बन तयार करून उदबत्ती काडी निर्मितीचा उत्पादन खर्च कमी करणे शक्य झाले आहे. हेच सूत्र इतर उद्योगातही वापरले पाहिजे. खरे तर जेथे प्रक्रिया केली जाते अशा सर्वच
  • शेतमालाबाबतीत हे शक्य आहे.
  • आपल्यालाही बांबू उद्योगात संधी  चीन, व्हिएतनाम देशामध्ये बांबू प्लायवूड निर्मिती तसेच इतर पूरक उद्योगांचा विकास झाला. ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारली. आपल्यालादेखील अशा उद्योगांची उभारणी करणे शक्य आहे, नव्हे तर करावीच लागेल. फक्त त्यासाठी खासगी उद्योगाबरोबरच शेतकऱ्यांना स्वतःच्या पूर्णपणे व्यापारी तत्त्वावर चालणाऱ्या कंपन्या उभाराव्या लागतील. सहकाराने हात पोळले असल्याने पूर्ण विचारांती हा मार्ग शोधला पाहिजे. त्यासाठी नाबार्ड, बँका, उद्योग मंत्रालय आणि वित्तीय संस्था पुढे येताहेत. आजमितीला अशा अनेक कंपन्या अनेक पिकांबाबत उत्तम काम करीत आहेत. बांबू प्रक्रिया उद्योगातील कंपन्या निश्चित यशस्वी ठरतील. या कंपन्या असे सर्व उद्योग ग्रामीण स्तरावर रोजगार तर देतीलच, त्याचबरोबर खेड्यामध्ये आणि शेतकऱ्यांच्या हातात पैसा येईल. आपोआपच ग्रामीण भागात तरुणांना रोजगार उपलब्ध होईल.

    या लेखमालेच्या माध्यमातून बांबूकडे एक व्यापारी पीक म्हणून बघून त्यापासून काय करणे शक्य आहे हे आपण पाहिले. कमी पाण्याची मर्यादा ओळखून, तुलनेने कमी खर्चात येणारे आणि अनेक वर्षे टिकणारे बांबू हे पीक म्हणून आपण आपल्या लागवड क्षेत्रानुसार स्वीकारल्यास चीनच्या तोडीस तोड उत्पन्न मिळवू आणि आपली आर्थिक स्थिती आणि त्याचबरोबर देशाची स्थिती उंचवू याबद्दल खात्री आणि विश्वास वाटतो.

    - डॉ. हेमंत बेडेकर, ९७६७२००९०५,

    (लेखक बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे प्रधान संचालक आहेत.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com