दृश्य जीवशास्त्रांचाही विचार महत्त्वाचा...

दृश्य जीवशास्त्रांचाही विचार महत्त्वाचा...
दृश्य जीवशास्त्रांचाही विचार महत्त्वाचा...

गेल्या काही भागांतून आपण आपल्या दृष्टिआड असणाऱ्या सूक्ष्मजीवांविषयी (मायक्रोबायोलॉजी) माहिती घेतली. यासारखीच जमिनीतील डोळ्यांना दिसणाऱ्या सजीवांविषयी मॅक्रोबायोलॉजी अशी आणखी एक विज्ञान शाखा आहे. या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांच्या अस्तिवातून जमिनीला जिवंतपणा येतो. भू-सूक्ष्मजीवशास्त्राबाबत माहिती घेत असतानाच गांडूळ वगळता अन्य दृश्य शेतीपयोगी सजीवांबाबत फारशी चर्चा होताना दिसत नाही. भू-सूक्ष्मजीवशास्त्राविषयी जागृती करीत असतानाच मॅक्रो म्हणजे डोळ्यांना दिसणाऱ्या प्राण्यांच्या कार्याविषयी पुसटशी चर्चा होताना दिसत नाही. अपवाद फक्त गांडूळ. डार्विनने गांडूळाला शेतकऱ्यांचा मित्र असे जाहीर करून देवत्व देऊन टाकले. हे प्रशस्तिपत्र डार्विनने दिले, हे सामान्य शेतकऱ्यांना माहिती नसले, तरी गांडूळ या प्राण्याचे शेतकऱ्यावर प्रचंड गारूड आहे, हे मात्र नक्की! जमिनीत गांडूळाचे अस्तित्व जाणवल्याबरोबरच शेतकरी एकदम समाधानी होतो. मी हे केल्यामुळे जमिनीत गांडूळांची संख्या वाढली, हे सांगताना त्याचा अभिमान ऊतू जातो. मॅक्रोबायोलॉजी या विज्ञान शाखेत जमिनीत गांडूळाव्यतिरिक्त अनेक प्राणी कार्यरत असल्याचे ज्ञात आहे. मात्र, अन्य प्राण्यांच्या वाट्याला गांडूळासारखे भाग्य लाभलेले नाही. गांडूळे खालच्या थरातील माती जमिनीचे पृष्ठभागावर आणून टाकते. त्यांची विष्टा ही उत्कृष्ट सेंद्रिय खत असल्याचे मानले जाते. त्याच्या खाली-वर होणाऱ्या हालचालीने जमिनीत अनेक पोकळ्या निर्माण होतात. त्यात जमिनीतील हवा खेळते, पाणी मुरण्याचा वेग वाढतो अशी काही कारणे गांडूळांचे उपयोग सांगताना दिली जातात. गांडूळावर संशोधनही मोठ्या प्रमाणावर होत असते. जगभरातील, भारतातील गांडूळाच्या प्रजातींची माहिती दिली जाते. गांडूळ खतामध्ये मूळ पदार्थापेक्षा इतका नत्र, स्फुरद, पालाश जास्त असतो वगैरे, वगैरे. नुसते खत तयार झाले, तर ते १५००-२००० रुपये टनाने मिळते, तेच खत गांडूळाच्या पोटातून आल्यावर त्याचे मूल्यवर्धन होऊन त्याची किंमत ३-४ पट वाढते. गांडूळाच्या पोटात काही नत्र, स्फुरद, पालाश तयार करण्याचे कारखाने नाहीत, हे कोणी लक्षात घेत नाही. खताची उपलब्धता होण्याची प्रक्रिया ः सर्वसामान्य शेणखत कंपोस्टचे कर्ब/ नत्र गुणोत्तर २० असते. याचा अर्थ या खतात १ नत्राच्या अणसूाठी २० कर्बाचे अणू असतात. खतातील सर्व अन्नद्रव्ये कर्बाला जोडलेली असल्याने सेंद्रिय स्वरूपात असतात. सेंद्रिय स्वरूपात म्हणजे पाण्यात न विरघळणाऱ्या अवस्थेत. अशी अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध अवस्थेत नसतात. कुजविणारी जिवाणू सृष्टी मूळ पदार्थातील कर्बाचा वापर आपल्या शरीरवाढ व प्रजोत्पादनासाठी करीत असते. यामुळे मूळ पदार्थातील कर्ब संपत जातो, तो २० पर्यंत आला, की शेणखत कंपोस्ट तयार होते. येथे कुजविणाऱ्या जिवाणू सृष्टीचे काम थांबते. या पुढील वाटचालीत २० ते ० कर्ब पुढील गटाचे जिवाणू वापरतात. त्यांचे उपजीविकेसाठी हा कर्बाचा साठा शिल्लक ठेवून कुजविण्याची क्रिया थांबवितात. आता हेच खत पुढे गांडूळ खताच्या वाफ्यात टाकून आणखी कुजविले जाते. गांडूळे व त्यांच्या पोटातील सूक्ष्मजीवाकडून या २० कर्बापैकी आणखी ८ कर्ब वापरला जातो. गांडूळ खताचे कर्ब नत्र गुणोत्तर १२ पाशी येऊन थांबते. पुढील गटातील जिवाणूंनी कर्ब वापरून संपविला, की त्याला जोडून असणाऱ्या वनस्पतीच्या अन्नद्रव्यांचे सेंद्रियपण संपून ती रासायनिक स्वरूपात रूपांतरित होतात. ती पिकाला उपलब्ध म्हणजेच पाण्यात विरघळणाऱ्या अवस्थेत येतात. साध्या खतातील अन्नद्रव्यांची उपलब्धतेकडे वाटचाल होण्यासाठी २० ते ०, तर गांडूळ खताच्या वाटचालीसाठी १२ ते ० अशा कर्ब टप्पा ओलांडावा लागतो. म्हणजेच गांडूळ खताला कालावधी कमी लागत असल्याने गांडूळ खताचे परिणाम साध्या खताच्या तुलनेत जलद दिसतात. साधे खत काही दिवस अगोदर वापरल्यास दोहोंचे परिणाम सारखेच असतात. साध्या खताची वाटचाल प्रथम २० ते १२, नंतर १०, ५, ० अशी टप्प्याटप्प्याने होत राहते. मात्र, केवळ खत टाकले म्हणून वरील वाटचाल चालू झाली, असे होत नसते. कोणत्याही अन्नद्रव्यांची सेंद्रियकडून रासायनिककडे होणारी वाटचाल ही पिकांनी जिवाणूकडे त्या अन्नद्रव्यांची मागणी नोंदविल्यावरच होते. पीक पोषणातील हे विज्ञान शेतकऱ्यांना माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गांडूळ नेमके काय काम करतो?

  • कुजणाऱ्या पदार्थाचे कुजवून सेंद्रिय खतात रूपांतर करण्याचे काम गांडूळे करतात. मात्र, असे काम करणारे व कुजणाऱ्या पदार्थाचे स्व-सेंद्रिय खत करण्याचे काम निसर्गातील अगणित प्राणी करीत असतात. त्यात डोळ्यांना दिसणारे व न दिसणारे असे अनेक घटक असतात. यातील नेमके हे काम कोणी करावयाचे, हे परिस्थितीकी ठरविते. परिस्थितीकीमध्ये तापमान, आर्द्रता, सामू, क्षारता, कुजणाऱ्या पदार्थाचे कर्ब/ नत्र गुणोत्तर, हवेचे सान्निध्य वगैरे अनेक घटकांचा समावेश असतो. कोणत्याही स्थितीमध्ये हे काम चालू राहिले पाहिजे, इकडे निसर्गाचा कल असतो.
  • सेंद्रिय पदार्थ कुजवण्याचे काम फक्त गांडूळाकडून करून घेण्याच्या इराद्याने आपण कृत्रिमरीत्या अनुकूल परिस्थिती निर्माण करतो. त्यासाठी अनेक कामे करावी लागतात. पर्यायाने यात खर्च वाढतो. गांडूळखतांच्या निर्मितीला कृषी विभागाचे प्रोत्साहन व अनुदान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओढाही तिकडेच असतो.
  • गांडूळखतात काम करणारी गुलाबी गांडुळे जमिनीत वाढत नाहीत. या खतातील गांडूळांचे अंडीपुंज पुढे जमिनीत काहीच उपयोगाचे नसतात.
  • गांडूळखताच्या पोत्यावर त्यात इतके बॅक्‍टेरिया, ऍक्‍टोनोमायसेट्स असतात, असे लिहिलेले असते. बुरशीचे प्रमाण नगण्य असते. हे गांडूळाच्या विष्ठेतील जिवाणू त्यांचा कार्यभाग संपल्याने पुढे मरणारच असतात. तरीही ही सर्व जिवाणूसृष्टी जिवंत राहण्यासाठी खतामध्ये २५% पाण्याचा अंश ठेवून विक्री केली जाते. वास्तविक गांडूळखत कोरडे विक्री होणे गरजेचे आहे. मात्र, नेमके विज्ञान माहीत नसल्याने चुकीची प्रथा आजही चालू आहे. म्हणजेच २५ टक्के पाण्याचे पैसे वाया जातात.
  • जमिनीतील गांडूळे वाढण्यासाठी काय केले पाहिजे? गांडूळांचे खाद्य पदार्थ असलेले कुजणारे पीक अवशेषांचे आच्छादन करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात जमिनीच्या पृष्ठभागावर सतत ओलावा टिकून राहतो. फक्त याच काळात नैसर्गिकरीत्या गांडूळांचे कामकाज चालते. पावसाळ्यानंतर आपण बागायत केले, तरीही ओलीत, पृष्ठभाग वाळणे, परत ओलीत या चक्रात गांडूळे वाढत नाहीत. चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्ट किंवा गांडूळ खत शेतात टाकून जमिनीत गांडूळे वाढणार नाहीत. अशा परिस्थितीत अनेक वेळा मुंग्या, मुंगळे, पैसा कीडा (अनेक पायांच्या जोड्या असणारे प्राणी), वाळवी असे अनेक डोळ्यांना दिसणारे प्राणी सुरवातीच्या काळात कामे करतात. दृश्य आणि अदृश्य जीवसृष्टी आवश्यक शेतीसाठी अदृश्य म्हणजेच सूक्ष्मजीव आणि दृश्य लहान मोठे सजीव आवश्यक आहेत. एका विचारवंताच्या मते, जमिनीत डोळ्यांना दिसणारे प्राणी वाढवा, पुढील सर्व चक्रे आपोआप फिरू लागतील. आपल्याकडे या कोणत्याही विषयाचे काहीच गम्य नाही. शेतकरी मेळाव्यासाठी तज्ज्ञांच्या गटात एक कृषिविद्या, एक रसायन, एक कीटक व एक रोगशास्त्रज्ञ असा संच नेहमी असतो. इथे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाचा कधीच विचार होत नाही. अनेक संशोधन केंद्रावर सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ हे पदच नाही. सूक्ष्मजीवशास्त्र हे विज्ञान फक्त पुस्तकी असून, त्यात संशोधन करण्यासारखे किंवा शेतकऱ्यांना सांगण्यासारखे फारसे काही नसल्याची विचारधारणा सर्वामध्ये रुजलेली आहे. परिणामी, अभ्यास होत नाही. त्यामुळे ग्रंथसंपदा नाही. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या ग्रंथालयात १९६०-६५ सालामध्ये संग्रहित केलेली या शास्त्राची उत्तम ग्रंथ संपदा आहे. त्यानंतर तेथे अगर इतरत्र अगदी कृषी विद्यापीठाच्या ग्रंथालयातही फारसे ग्रंथ खरेदी केलेले आढळत नाही. इतका हा विषय निश्‍चितच दुर्लक्ष करण्यासारखा नाही

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com