समजावून घ्या सेंद्रिय कर्बाचे स्थिरीकरण

मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष हेच पुढील पिकासाठी सेंद्रिय खत असते. त्याचा योग्य वापर महत्त्वाचा आहे.
मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष हेच पुढील पिकासाठी सेंद्रिय खत असते. त्याचा योग्य वापर महत्त्वाचा आहे.

शाश्‍वत सुपीकतेसाठी टिकून राहणारा सेंद्रिय कर्ब जमिनीत पाहिजे असे फक्त सांगून उपयोग नाही, तो सुलभपणे उपलब्ध करून देणे तसेच कमीत-कमी खर्चात उपलब्ध झाला, तरच सर्वसामान्य शेतकरी त्याचा वापर करू शकेल.

आपल्या सध्याच्या शेती पद्धतीमध्ये कर्ब व्यवस्थापनाचे नेहमीच तुटीचे अंदाजपत्रकच आहे. त्यामुळे प्रथम गरजेइतकी पातळी गाठावी लागेल. त्यानंतर त्याची जमिनीत साठवणूक अगर स्थिरीकरणाचा विचार करावा लागेल. या वाटचालीतील सर्वात मोठे अडथळे कोणते याची प्रथम उजळणी करूया. जमिनीमध्ये संपून जाणारा (अस्थिर) आणि टिकून राहणारा (स्थिर) असे दोन प्रकारचे सेंद्रिय कर्ब असतात. आपल्या पारंपरिक सेंद्रिय खत व्यवस्थापनाची संपूर्ण भिस्त शेणखत कंपोस्ट या संपून जाणाऱ्या पदार्थावर ठेवली असल्याने त्याचा कितीही वापर केला तरी एखाद्या चार महिन्यांच्या हंगामी पिकाअखेर त्यातील ८० ते ९० टक्के भाग संपून गेलेला असतो. या संपून जाण्याच्या कामाला दोन गोष्टी मोठ्या प्रमाणावर साह्य करतात, त्या म्हणजे आपले उष्ण कटिबंधातील तापमान व दुसरे पूर्व मशागत. एखाद्या पीक वाढीसाठी जसा वापरला जाऊन सेंद्रिय कर्ब संपतो तसे वर्षातील जास्त काळ चढे तापमान असल्याने त्याचे विघटन होऊन संपून जाण्याचा वेगही मोठा असतो. इथे तापमानावर नियंत्रण आपल्या हातात नाही. जादा तापमानामुळे विघटन होण्याचा नियम फक्त चांगल्या कुजलेल्या खताला लागू पडतो. कुजणाऱ्या पदार्थावर अशा जादा तापमानाचा काहीही परिणाम होत नाही. मग उष्ण कटिबंधातील शेतकऱ्यांनी चांगले कुजलेले खत वापरणे बंद करून कच्चा कुजणारा पदार्थ वापरण्याचे तंत्र विकसित करणे गरजेचे आहे. शीत कटिबंधात विघटनाचा वेग कमी असल्‍याने तेथे आपोआप कर्ब साठत जातो. यामुळे सेंद्रिय कर्बाची कमतरता हा प्रश्‍न तिकडे आपल्या इतका ज्वलंत नाही. आपल्या परिस्थितीशी अनुकूल असे  ‘उष्ण कटिबंधासाठी सेंद्रिय खत व्यवस्थापन' असे स्वतंत्र तंत्र विकसित करणे गरजेचे आहे. पुस्तके वाचत असता, मशागतीमुळे सेंद्रिय कर्बाचा नाश मोठ्या प्रमाणावर होतो असे संदर्भ भरपूर सापडतात. परंतु, यावरील उपाय मात्र सापडत नाहीत. याउलट शून्य मशागत शेतीत सेंद्रिय कर्बाचे संवर्धन होते, असेही भरपूर संदर्भ सापडतात. परंतु, शेतकऱ्यांनी शून्य मशागत शेतीकडे वळावे अशी शिफारस मात्र कृषी विद्यापीठ अगर कृषिखाते करताना दिसत नाही.

सेंद्रिय घटकांची उपलब्धता  

  •  सेंद्रिय खत व्यवस्थापनात संपणारा व जमिनीत टिकून राहणारा अशा दोन्ही प्रकारच्या सेंद्रिय कर्बाची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी गरज आहे, ही गोष्ट शेतकऱ्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. दैनंदिन वापरासाठी संपणारा व शाश्‍वत सुपीकतेसाठी टिकून राहणारा सेंद्रिय कर्ब जमिनीत पाहिजे असे फक्त सांगून उपयोग नाही, तो सुलभपणे उपलब्ध करून देणे तसेच कमीत-कमी खर्चात, नव्हे फुकटात उपलब्ध झाला तरच सर्वसामान्य शेतकरी त्याचा वापर करू शकेल. आज शिफारस असणारे असे मार्ग आहेत का? असा माझा प्रश्‍न तज्ज्ञ मंडळींसमोर आहे. यावर बिना नांगरणीची शेती अगर संवर्धित शेती हा एक उत्तम उपाय आहे.
  •  मागील पिकाचे जमिनीखालील अवशेष हेच पुढील पिकासाठी सेंद्रिय खत. बिना नांगरणीचे दोन प्रकार आहेत. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे फक्त जमिनीखालील अवशेषच राहतात. दुसरा प्रकार म्हणजे जमिनीवरील व जमिनीखालील असे दोनही अवशेष राहातात. उसासारख्या पिकात खोड कारखान्याकडे जाते. आपल्याला फक्त पाचट जमिनीवर तर खोडकी व मुळांचे जमिनीत उपलब्ध होते. धान्य, कडधान्यांचे जमिनीवरील अवशेष वैरणीसाठी वापरले जातात. त्याचा आच्छादनासाठी वापर करा म्हणणे योग्य नाही. गहू-भाताची काढणी, कापणी, मळणी संयुक्त यंत्राने केल्यास फक्त दाणे बाहेर जातात. संपूर्ण काड जमिनीवर तेथेच पडते. ऊस, ज्वारी, तूर अशा काही पिकाचे अवशेष परत परत फुटतात. शून्य मशागत पद्धतीत त्यांना मारावे वागते. जमिनीखालील अवशेषांचे चांगले खत होते, मग आम्ही रोटाव्हेटर मारून ते तेथेच ठेवतो, त्याचे संपूर्ण खत जमिनीला मिळतेच, की असे म्हणणारेही भेटतात. अशा अनेक परिस्थितीत मशागत अजिबात न करता पुढील पिकाची पेरणी करणारी तंत्रे विकसित करणे गरजेचे ठरते.
  • शून्य मशागतीवर पेरणी करणारी यंत्रे पंजाब, हरियाणा राज्यांत आहेत, आपल्याकडे नाहीत. तरीही शून्य मशागत तंत्राचा वापर आपल्याला अपवाद वगळता करता येतो.
  • आज शेतकऱ्यांमध्ये पिकाची जात, खत व्यवस्थापन, रोग-किडी यावर जितकी चर्चा होते त्या मानाने सुपीकतेसंबंधित सेंद्रिय खत व्यवस्थापनावर चालत होत नाही. प्रचलित पद्धतीतील शेणखत कंपोस्ट वापराच्यापेक्षा काही चांगल्या गोष्टी आहेत का? यावर विज्ञानात भरपूर अभ्यास आहे.
  • असा वाढतो सेंद्रिय कर्ब

  •  कोणत्याही पिकाचे जमिनीखालील अवशेष आपण तसेच ठेऊन पुढील पीक घेतो, त्या वेळी त्या पिकाचे मुळांचे जाळे संपूर्ण जमीनभर दाट पसरलेले असते. हे जसे पसरले आहे, त्याच स्थितीत मेले तर त्याचे कुजण्यातून संपूर्ण जमिनीत सेंद्रिय खताचा कारखाना सुरू होतो. या मुळीच्या जाळ्यात वनस्पतीच्या पेशी ज्या असतात, त्यात सेल्यूलोज, हेमी सेल्यूलोज आणि लिग्निन या तीनपैकी लिग्निनचे प्रमाण सर्वात जास्त असते. अशा लिग्निनयुक्त अवशेषापासून आपल्याला स्थिर सेंद्रिय कर्ब मिळतो. ज्याला जमिनीत शेकडो वर्षांचे आयुष्य असू शकते.
  •  जमिनीतील कर्बाचा साठा वाढविणेच्या कामात या लिग्निनचा अभ्यास शेतकऱ्यांना शिकविणे गरजेचे आहे. विज्ञानात या विषयावर काही संदर्भ उपलब्ध आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना समजण्यासाठी इंग्रजी क्‍लिष्ट शब्द टाळून मी मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
  •     कोणत्याही वनस्पतीच्या भागाला किती भार पेलावा लागतो, त्यावर त्यामध्ये लिग्निनची टक्केवारी किती ठेवावी याचे प्रमाण ठरते. या लिग्निनमध्येही हलका मध्यम व भारी असे लिग्निनचे प्रकार आहेत. मऊ लाकूड (शेवगा) हलक्‍या लिग्निनचे प्रमाण जास्त तर कठीण लाकूड (बाभळ) भारी लिग्निनचे प्रमाण जास्त तर मध्यमचे प्रमाण थोडे. लाकडा लाकडामध्ये भरपूर प्रकार असतात. वेगवेगळ्या रसायनांच्या अस्तित्त्वामुळे लाकडाचे गुणधर्म बदलतात. उदा. कलाकुसर, तुळवट, वासे, फळ्या, वेगवेगळे रंग याप्रमाणे लिग्निनचे प्रकार व विविध रसायनांचे प्रमाण बदलत जाते.
  •  कोणत्याही झाडाच्‍या सालीचा थर हा कठीण असतो. आत मऊ धागे असतात. जंगल जमिनीमध्ये सर्व प्रकारच्या पदार्थांचे मिश्रण मिळते. तेथे जमिनीवर आच्छादनरूपात पदार्थ साठत जातात. परिस्थिती जशी अनुकूल मिळेल, तितके कुजतात. बाकी तसेच राहतात. जमिनीची हलवा हलवी नसते. झाडांच्या सावलीखाली व आच्छादनामुळे जमिनीचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढत नाही. इथे दरवर्षी सेंद्रिय कर्ब साठविला जातो.
  •  जंगल जमिनी अगर पडीक जमिनी दीर्घ काळाने ज्या वेळी पिकाखाली आणल्या जातात, त्या वेळी सुरवातीच्या ४-५ वर्षांत त्यात सहज चांगले उत्पादन मिळते. कोरडवाहू जमिनी बागायत झाल्यानंतर हाच अनुभव अनेक शेतकऱ्यांनी घेतलेला असतो. हा सर्व परिणाम जमिनीत नैसर्गिकरित्या साठविलेल्या सेंद्रिय कर्बामुळे प्राप्त झालेला असतो. यावर पुढे उत्पादकता का कमी-कमी होत जाते याचा वैज्ञानिक अभ्यास न करता बऱ्याचवेळा रसायनांच्या वापरावर खापर फोडून विचारवंत रिकामे होतात.
  • सेंद्रिय कर्ब निर्माण करा

  • जंगलनियम शेतीमध्ये आणले तर समस्यांचे निराकरण होईल का? या प्रश्‍नाचे उत्तर मी मागील १३-१४ वर्षांच्या अनुभवातून १०० टक्के  होईल असे देत आहे. यासाठी फक्त पिकाचे उत्पादन जास्तीत जास्त कसे मिळेल इतकाच अभ्यास करू नका. माझ्या जमिनीत सेंद्रिय कर्ब साठत गेला पाहिजे. हा शेतकऱ्यांचा ध्यास बनला पाहिजे. शून्य मशागत अगर गरजेपुरती मशागत हा इथे सर्वांत महत्त्वाचा विषय.
  •     जंगलाप्रमाणे पिकात वैविध्य, एकाच प्रकारचे पीक मोनोकल्चर व स्वच्छ तणमुक्त जमीन अजिबात नको. पिकाबरोबर काही प्रमाणात तणे असलीच पाहिजेत. तणात गवती तणांचे प्रमाण जास्त असावे (ते आपोआप येते) तणे आता उपटून टाकून बाहेर नेणे चुकीचे, जशी वाढली तशी शक्‍य तितकी मोठी करून (मुख्य पिकाला) त्रास होणार नाही अशा युक्तीने) जागेलाच तणनाशकाने मारणे हा उपाय जमिनीच्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम. तणनाशकाच्या वापरासंबंधी भरपूर वैज्ञानिक अभ्यास व शेतातील अनुभवानंतर मी हे विधान करीत आहे. केवळ वापरण्यात सोपे हा मर्यादित उद्देश नाही.
  •     ज्या बिंदूला सेंद्रिय खत द्यावयाचे तेथेच ते तयार करावयास शिका. चार बांधाबाहेरून काहीही चिमटभरही न आणता आत फुकटात मिळणाऱ्या पदार्थातून गरजेपेक्षा जास्त सेंद्रिय कर्ब आपण निर्माण करू शकतो. शेतमालाला प्रत्येक वर्षी भरपूर दर मिळेल, हभीभाव, बांधला भाव, डॉ. स्वामिनाथन शिफारशींप्रमाणे आपल्याला पैसे कधीही मिळणार नाहीत. मंदीतही शेती कशी फायद्यात राहील हे पहा. यासाठी जमिनीची मशागत बंद करा, मेंदूची करा.
  • - प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८,

    (लेखक कोल्हापूर येथील प्रगतिशील शेतकरी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com