दर्जेदार कृषी उत्पादनासाठी भूसूक्ष्मजीवशास्त्र उपयुक्त

खोडवे अजिबात न नांगरता टोकण पद्धतीने भाताचे घेतलेले पीक.
खोडवे अजिबात न नांगरता टोकण पद्धतीने भाताचे घेतलेले पीक.

आपण शेती उत्पादनामध्ये बऱ्यापैकी स्वयंपूर्ण झालो आहोत. अशा वेळी केवळ उत्पादकता वाढीकडे असलेले शेतकऱ्यांचे लक्ष आता त्याचा दर्जा वाढवण्याकडे वळवले पाहिजे. दर्जा म्हणजे उत्पादनाची चव, स्वाद, गंध वाढवण्यासाठीही भूसूक्ष्मजीवशास्त्र उपयोगी ठरू शकते.

बहुतांश शेतकऱ्यांचा ओढा हे अधिक उत्पादन घेण्याकडे असतो. अधिक उत्पादन ही एकेकाळी नक्कीच देशाची गरज होती. मात्र, आता आपण अन्नधान्य उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण झालो असून, काही प्रमाणात निर्यातही करीत आहोत. याला फक्त कडधान्ये व तेल बियांचा अपवाद. पूर्वी कडधान्ये व तेलबियाखालील असलेले क्षेत्र बागायतीची सोय होताच ऊस किंवा फळबागेकडे गेले. अद्यापही कडधान्ये, तेलबिया आपल्याला आयात करावे लागतात. ही बाब वगळता सर्व पिकांमध्ये केवळ संख्यात्मक वाढीचा विचार करण्याऐवजी  गुणात्मक वाढीकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे. कोणत्याही शेतीमालाबाबत आपण वयस्कर लोकांशी बोललो, तर पूर्वीसारखी चव, स्वाद, सुगंध आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कस नसल्याची तक्रार ऐकू येते. हा अभिप्राय फळे, धान्ये, भाजीपाला, मसाले अशा सर्व पिकांबाबत असतो.

प्रश्‍न असा पडतो, की हा स्वाद, सुगंध गेला कोठे? तो जाण्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे का?  शेवटी तो परत आणण्यासाठी काय करावे लागेल? हे प्रश्न पुढे येताच अनेक विचारवंत त्याची जोड हरितक्रांती व त्यानंतरच्या रासायनिक खते, कीडरोग, तणनाशके व भरमसाट पाण्याचा वापर याच्याशी जोडतात. यामुळे जमिनीच्या सुपिकतेची वाट लागली. रासायनिक खतामुळे जमिनी जळून गेल्या. जिवाणू मरून गेले. जमिनी क्षारयुक्त झाल्या. परिणामी, पीक उत्पादनाची गुणवत्ता पहिल्यासारखी मिळत नाही. म्हणून मग रसायनांचा वापर बंद करून सेंद्रिय शेती करण्याचा विचार मांडला जातो. त्याला वाढते रोगांचे प्रमाण उदा. कर्करोग होण्याची जोड दिली जाते.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्या उत्पादनवाढीसाठी हे उपाय करायचे, ती उत्पादकता घटत चालल्याचे दिसत आहे. सर्वसामान्य शेतकरी यात भांबावून गेला आहे. शास्त्रज्ञही नेमकेपणाने किंवा ठामपणे फार काही सांगताना दिसत नाहीत. माझ्या अनुभवावरून या प्रश्‍नांची वैज्ञानिक उत्तरे आपल्याला भूसूक्ष्मजीवशास्त्रातूनच मिळू शकतील.

मी खूप वर्षांपासून बासमती भाताचे उत्पादन घेतो. हा चव, स्वाद, सुगंध असणारा जुना भातवाण आहे. मी तांदूळ कधी विकत नाही. एके वर्षी जास्त उत्पादन मिळाल्याने विक्री करण्याच्या उद्देशाने भात भरडून तांदळाचा नमुना व्यापाऱ्याला दाखविला. व्यापाऱ्याने तुम्हाला बासमती भात कोणी लावायला सांगितला, असे म्हणत आपल्याकडे तो चांगल्या दर्जाचा होऊच शकत नाही, असे ठामपणे सांगितले. त्याने माझा नमुना हातात घेण्याचे  औचित्य दाखवले नाही. मी ओळखीतील काही लोकांना हा तांदूळ नमुना खाण्यास दिला. तेव्हा त्यांच्याकडे पंजाबातून येणारा तांदूळ दिसण्यास चांगला असला, तरी तुमच्या तांदळाला  चव, स्वाद, सुंगध अधिक चांगला असल्याचे सांगितले. पंजाब येथील बासमतीला भौगोलिक मानांकन असून, उत्तम दर्जाचा बासमती फक्त पंजाबातच पिकू शकतो, असा त्यांचा दावा आहे. शास्त्रानुसारही ते खरे आहे. पंजाबात खरीप भाताच्या कापण्या नोव्हेंबर, डिसेंबरच्या हवामान थंड असताना होतात. त्यामुळे तांदळातील तैलघटक टिकून राहतात. महाराष्ट्रातील भात कापण्या या सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये उष्ण काळात होत असल्याने तांदळाला सुगंध येऊ शकत नाही.

भूसूक्ष्मजीवशास्त्र महत्त्वाचे गुणवत्ता ढासळण्याचा सर्व दोष रासायनिक खते, कीटकनाशकांना दिला जातो. विज्ञानानुसार बहुतेक सर्व रासायनिक खते ही आम्लधर्मी आहेत. त्यामुळे जमिनी खराब झाल्या असत्या, तर त्या आम्लधर्मी झाल्या पाहिजेत. मात्र, त्या अल्कधर्मी होत आहेत. त्याअर्थी हा रासायनिक खतांचा दोष वाटत नाही. सेंद्रिय पदार्थ जागेला कुजत असता बाकी रसायनांचे शेषभाग नष्ट पावतात. याला जमिनीचे जैविक शुद्धीकरण असे म्हणतात. या सर्व बाबी फक्त भूसूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासानेच समजू शकतात. भूसूक्ष्मजीवशास्त्रीय ज्ञानाला अंधारात ठेवन इथे शेतकऱ्यांचेच नव्हे, तर सर्व समाजाचेच नुकसान होत आहे.

जमिनीच्या गुणवत्तेवर ठरतो पिकाचा दर्जा

अभ्यास करताना अधिक खोलात गेल्यानंतर असे लक्षात आले, की चव, स्वाद, सुगंध हे गुणवत्तेचे गुणधर्म फक्त अनुवंशिक जातीच्या गुणधर्मावरच अवलंबून नाहीत. ते पिकवीत असलेल्या जमिनीची गुणवत्ताही महत्त्वाची असते. सातत्याने लागवडीखाली असलेल्या जमिनी खराब होतात. त्यात विम्लक्षार साठत जातात. जमिनी बागायती झाल्यानंतर १५ ते २० वर्षांत त्यांचा सामू ८ ते ८.५ असा विम्लतेकडे जातो. यातील काही क्षार वनस्पतींद्वारे शोषले जातात. ते मूळ अनुवंशिक चव, स्वाद, सुगंधाचे गुणधर्म बदलून टाकतात. भूसूक्ष्मजीवशास्त्रानुसार, पिकाचे अवशेष जागेवरच जमिनीत कुजविले पाहिजेत. जमिनीबाहेर तयार झालेले चांगले कुजलेले खत वापरणे चुकीचे ठरते. मी १९९० पासून चांगले कुजलेले खत वापरणे बंद केले असून, कुजणारे पदार्थ जागेवर कुजवीत आहे. या कुजण्याच्या क्रियेतून अनेक सेंद्रिय आम्ले तयार होतात. ही आम्ले विम्ल क्षारांचे उदासीनीकरण करतात. अशा जमिनीत घेतलेले कोणतेही उत्पादन हे उच्च गुणवत्तेचे मिळते. माझ्या निष्कर्षानुसार, पिके वाढविणे ही विम्लधर्मी क्रिया आहे, तर पिकाचे शेषभाग कुजविणे ही आम्लधर्मी क्रिया आहे. या दोन्हीही क्रिया एकाच ठिकाणी सतत चालू ठेवल्या तर जमीन आपोआप उदासीन (७ सामू) राहते. आपण आम्लधर्मी क्रिया जमिनीबाहेर करतो, तर विम्लधर्मी क्रिया म्हणजे शेती जमिनीत करत आलो आहे. यामुळे जमिनीचा सामू विम्लतेकडे जात आहे. जागेला सेंद्रिय पदार्थ कुजणे, वनस्पतींची वाढ होणे अशा दोन्ही क्रिया मानवी हस्तक्षेप नसलेल्या जंगलात हजारो वर्षे होत आल्या आहेत. तेथील जमिनी खराब झाल्याचे दिसत नाही. मात्र, केवळ १५  ते २० वर्षांच्या शेतीनंतर शेतजमिनी खराब झाल्याचे दिसतात.  जंगलातील वरील नियमाचे पालन न केल्यानेच ही समस्या उद्भवत आहे. जमिनीत सेंद्रिय पदार्थ कुजविणारे व पिकाला अन्नपुरवठा करणारे सूक्ष्मजीवांचे गट कार्यरत आहेत. हे कुजवणाऱ्या गटातील जिवाणूसृष्टी जमिनीत वाढली पाहिजे. त्यांच्यासाठी कुजणारा पदार्थ जमिनीत उपलब्ध केला पाहिजे. त्यांनी कुजवून तयार केलेल्या सेंद्रिय खतावर पुढील अन्नपुरवठा करणाऱ्या गटाचे कामकाज आपोआप चालते. यातून जमिनीत जैववैविध्य जोपासले जाते. आपण चांगले कुजलेले खत टाकल्याने पहिल्या गटाला काम उरत नाही. किंवा ते  शेतजमिनीबाहेर संपते. फक्त दुसऱ्या गटाचे काम जमिनीत चालते. हेच जमिनीची उत्पादकता व उत्पादनाची गुणवत्ता कमी होण्यामागील मुख्य कारण आहे.

सुधारली गुळाची गुणवत्ता असाच अनुभव मला गूळ उत्पादनातही आला. कोल्हापूर गूळ बाजारात आता शुद्ध गोड चवीचा गूळ अपवादात्मक सापडतो. प्रथम गुळाची गोडी कमी होत गेली. मूळ शुद्ध चवीचाच गूळ देणाऱ्या अनेक शेतामधील गूळ आता खारट होऊ लागला आहे. याउलट शेतातच सेंद्रिय पदार्थ कुजवू लागल्यापासून माझ्या शेतातील गुळाची गोडी दर वर्षी वाढत चालली आहे. मी रसायनविरहित गूळ तयार करून स्वतः विकतो. माझा गूळ खाल्लेले गिऱ्हाईक परत बाहेरचा गूळ घेत नाही. त्यांच्या मागणीइतका पुरवठा कसा करावयाचा, हा प्रश्‍न आहे. केवळ गुणवत्तेवरच आपण कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवू शकतो. म्हणून केवळे उत्पादन वाढीमागे धावण्याऐजी गुणवत्ता वाढीकडे लक्ष दिले पाहिजेत.

 - प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८,

(लेखक कोल्हापूर येथील प्रगतिशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com