agricultural stories in Marathi, Important points regarding bamboo management | Agrowon

वाढवूया बांबूचे उत्पादन

डॉ. हेमंत बेडेकर
सोमवार, 8 एप्रिल 2019

जगाच्या बाजारात टिकण्यासाठी बांबूची एकरी उत्पादनवाढ ही फार महत्त्वाची गरज आहे. यासाठी  बांबू हे व्यावसायिक पीक आहे याचे भान ठेवून व्यवस्थापन करावे लागेल. सध्या आपण एकरी ५ ते ७ टनांचे उद्दिष्ट ठेवणे अपेक्षित आहे.

जगाच्या बाजारात टिकण्यासाठी बांबूची एकरी उत्पादनवाढ ही फार महत्त्वाची गरज आहे. यासाठी  बांबू हे व्यावसायिक पीक आहे याचे भान ठेवून व्यवस्थापन करावे लागेल. सध्या आपण एकरी ५ ते ७ टनांचे उद्दिष्ट ठेवणे अपेक्षित आहे.

बांबू पिकाला मिळालेली सरकारमान्यता वापरून शेतकऱ्यांनी वार्षिक उत्पन्नात भर घालावी. ज्या ठिकाणी अनिश्चित पावसामुळे हातात काहीच नाही, अशा ठिकाणी कमी पावसातही काहीतरी उत्पन्न मिळावे, नंतरच्या वर्षी लागवडीच्या वेळी हाताशी काही पैसा गाठीशी असावा म्हणून बांबू लागवड करावी असा 'बांबूची शेती' या लेखमालेचा उद्देश आहे. याचवेळी जगभरातील महत्त्वाच्या बांबू उत्पादक देशांबरोबर आपल्याला जाता आले पाहिजे, अशी अपेक्षा आहे.
आज जगात सर्वात चांगल्या प्रतीचे बांबू उत्पादन करणारा आणि एकरी जास्त उत्पादन मिळविणारा देश म्हणजे चीन. भारताचे बांबूचे सरासरी एकरी उत्पादन ०.५ ते १ टन आहे. तर चीनमधील बांबूचे एकरी उत्पादन १५ ते २० टनांपर्यंत आहे. व्हिएतनाम आणि इतर पूर्व आशियाई देश, दक्षिण अमेरिकी देश चीनच्या मागोमाग आहेत. भारत हा चीन खालोखाल बांबू विविधता असलेला देश आहे. याचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे.

उत्पादन वाढविण्याची गरज
भारताचा विचार करता काश्मीर वगळता सर्व प्रांतात बांबूचा नैसर्गिक आढळ आहे. बांबूखालचे सर्वात जास्त क्षेत्र भारतात आहे. मग भारतात दर एकरी उत्पादन कमी का? याचा विचार करणे गरजेचे आहे. जर एकरी १० टनाचे लक्ष आपण ठेवले तर बांबू हा काही लाख कोटी रुपयांची उलाढाल करू शकतो. त्यासाठी हे उत्पादन कसे वाढेल हे पाहणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला बांबू हे व्यावसायिक पीक आहे याचे भान ठेवून त्याची देखभाल ठेवली पाहिजे, निगा राखली पाहिजे. बांबूच्या पीक म्हणून ज्या गरजा आहेत त्या पुरवल्या पाहिजेत. उत्पादन वाढीसाठी आपण काही गोष्टींची चर्चा करुयात. सध्या आपण एकरी ५ ते ७ टनाचे उद्दिष्ट ठेवणे अपेक्षित आहे.

योग्य वेळी तोडणी

  • बांबूची योग्य वेळी तोड महत्त्वाची आहे. दरवर्षी तयार बांबू तोडला की आपोआप बेट सुदृढ राहाते. प्रत्येक बांबूला वाढायला मोकळेपणा मिळतो. हवा खेळती राहाते. किडी, रोग फारसे येत नाहीत.
  • काही ठिकाणी केवळ आळशीपणामुळे सर्व बेट उसासारखे तोडले जाते. हे कधीही घडता कामा नये. त्यामुळे काही बेटे हमखास मरतात. साहजिकच त्याचा एकरी उत्पादनावर परिणाम होतो.
  • चौथ्या वर्षापासून संक्रांतीनंतर तोडणी व्हायलाच हवी. फक्त तयार बांबू तोडण्यासाठी त्यावर रंग पट्टे ओढायची सवय लाऊन घ्यावी.
  • तोड करताना फक्त १/३, तीन वर्षे वयाचे बांबू तोडावेत. काही वेळा कोवळे बांबूही उन्मळून पडतात.

सरळ बांबू वाढविण्याची गरज  
    बांबू जेवढा सरळ तेवढी त्याची बाजारातील किंमत जास्त हे सूत्र कायम लक्षात ठेवावे.बांबू सरळ वाढण्यासाठी योग्य निगा, दरवर्षीची तोड याचबरोबर बांबूमध्ये उंच वाढणाऱ्या देशी झाडांची लागवड देखील तितकीच महत्त्वाची आहे.
    बांबूच्या संख्येच्या किमान १/३ तरी देशी झाडे हवीत. बांबू सोबत आंबा, जांभूळ, ऐन, किंजळ, कडूनिंब ही झाडे लावावीत. मात्र चिंच, वड, पिंपळ, उंबर ही झाडे बांबूबरोबर लावू नयेत. ती बांबूला वाढू देत नाहीत. देशी झाडे लावण्याचे कारण समजून घ्या. वर्षानुवर्षे आपल्या हवामानात वाढणारी ही झाडे सहसा नवीन किडी आणत नाहीत. तसेच त्यांची व बांबूची स्पर्धा ही बांबू सरळ वाढायला कारणीभूत ठरते. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी बांबू व झाड सरळ वाढायचा प्रयत्न करतात. बांबू सरळ वाढला की आपले उत्पादन वाढते. १० ते १२ वर्षानंतर झाडाचे मिळणारे उत्पन्न वेगळेच.

पालापाचोळा महत्त्वाचा
    बांबू दरवर्षी हेमंत ऋतूत पानगळ करतो. ही पानगळ कधीही जाळू नये. आग लागू नये आणि वावटळीने उडून जाऊ नये म्हणून त्यावर माती टाकावी. हा पालापाचोळा बांबूला खत म्हणून उपयोगी ठरतो. जमीन भुसभुशीत ठेवतो, जमिनीवर चांगले आच्छादन करतो. जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन  होत नाही. जमिनीत सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढल्याने बांबूला अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. कालांतराने फारशी खतांची गरज भासत नाही.

 

योग्य व्यवस्थापन

  • गेली अनेक वर्षे सामजिक वनीकरण, वन विभागाच्या मार्फत बांबूची रोपे वाटली जातात. अनेकांनी अशी रोपे लावली आहेत. त्यातील बहुतेकांनी ही रोपे बांध, कुंपण किंवा घराभोवती लावली आहेत. पण ही रोपे लावल्यापासून कधी त्यांच्याकडे बघितलेच नाही. त्यामुळे ही बेटे एकमेकांत गुंतलेली, वाकडी तिकडी अस्ताव्यस्त वाढलेली, काहींना वाळवी लागलेली दिसते. पश्चिमी घाटातून प्रवास करताना काटेरी बांबूची अस्ताव्यस्त वाढलेली असंख्य बेटे दिसतात.
  • एकदा बांबू हे व्यावसायिक पीक म्हणून घ्यायचे ठरवल्यावर त्याचे योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. दरवर्षी द्यावयाची खतमात्रा, कीटकनाशकांची फवारणी आवश्यक आहे. ते तंतोतंत पाळणे जरुरीचे आहे.
  • दरवर्षी पावसाच्या सुरवातीला आणि पाऊस संपल्यानंतर रोपाला खत देणे, निंबोळी पेंड वापरणे आणि मातीची भर देणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे आपले पीक उत्तम येण्यास मदत होईल.
  •  विशेषतः दुसऱ्या वर्षी बारीक वाढणाऱ्या, निरुपयोगी फांद्या काढून टाकाव्यात. त्यामुळे नवीन येणाऱ्या कोंबांची वाढ चांगली होते. निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे सुरवातीपासूनच किडींवर नियंत्रण मिळते. मातीची भर देण्यामुळे कोंब सुरक्षित वाढतात. जसे आपण इतर पिकांबाबत रोग व किडींचे नियंत्रण करतो तसेच बांबू पिकाचेही करावे.
  • पहिल्या वर्षी आंतरपीक अवश्य घ्यावे. त्यामुळे आपला लागवडीचा खर्च काही प्रमाणात निघून येतो. आपोआपच रान स्वच्छ राहते. आंतरपीक घेतल्यामुळे बांबूला सरळ वाढण्याची चाल मिळते.एकरी बांबू बेटांची संख्या हा विषय महत्त्वाचा आहे. दुसऱ्या वर्षी खत देण्यापूर्वी जर काही बेटे मेली असतील तर लगेच त्या जागी दुसरी रोपे लावावीत. दर एकरी अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी बांबू बेटांची एकरी योग्य संख्या असणे महत्त्वाचे आहे.

- डॉ. हेमंत बेडेकर, ९७६७२००९०५,
(लेखक बांबू सोसायटी आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरचे प्रधान संचालक आहेत.)

 


फोटो गॅलरी

इतर वन शेती
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
जाणून घ्या बहुगुणी पळसाबद्दल..!शास्त्रीय नावः ब्युटीया मोनोस्पर्मा वनस्पतीचे...
पारंपरिक बांबू लागवडीचे व्यवस्थापनसहाव्या वर्षानंतर दरवर्षी बांबू बेटातून सरासरी १०...
वनाधिकार कायद्याआधारे ग्रामसभांचे शाश्‍...‘खोज’ संस्थेच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यातील...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...
कन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...
बांबू विकासासाठी धोरणात्मक निर्णयांची...‘राष्ट्रीय बांबू अभियान’नुसार सुचविलेल्या सुधारित...
तंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...
उभारूयात बांबू प्रक्रिया उद्योगलेखमालेतील मागील काही भागांत आपण बांबूची व्यापारी...
गावामध्ये उभारा बांबू आधारित उद्योगआपण बांबूचा औद्योगिक पीक म्हणून विचार केला नाही...
बांबू उद्योग वाढीसाठी हवेत सातत्यपूर्ण...भारताचा जम्मू काश्मीर भाग वगळता सर्व प्रांतात...
बांबू पिकाला आहे व्यावसायिक मूल्य...बांबू हा पर्यावरणरक्षक आहे. याचबरोबरीने बांबू...
बांबू लागवड, व्यवस्थापनातील शंका समाधानबांबू लागवड करताना आपला विभाग, हवामानानुसार जाती...
वाढवूया बांबूचे उत्पादनजगाच्या बाजारात टिकण्यासाठी बांबूची एकरी...
बांबू लागवडीचा ताळेबंदसर्वसामान्य हवामानात एक बांबू दुसऱ्या वर्षापासून...
योग्य पद्धतीनेच करा बांबू तोडणीपरिपक्व बांबू हा दरवर्षी तोडला पाहिजे, तरच त्याला...
अशी करा तयारी बांबू लागवडीची...आपण बांबू लागवड कशासाठी करत आहोत हे निश्चित करावे...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
जमीन, हवामानानुसार बांबू जातीची निवड...वनामधील बांबूची प्रत चांगली नसते आणि वनातला बांबू...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...