agricultural stories in Marathi, jagane aani jividha part 22 | Page 2 ||| Agrowon

गोष्ट तलावांचा श्वास मोकळा करण्याची...

शालू कोल्हे, मनीष राजनकर
गुरुवार, 6 जून 2019

तलावांमध्ये बेशरम वनस्पतीचा पसारा वाढला तर आवश्यक असलेल्या इतर स्थानिक पाणवनस्पती नष्ट होतात. याचा सरळ प्रभाव पडतो तो पाण्याशी निगडित असणाऱ्या सजीवांवर. स्थानिक पाणवनस्पती नष्ट झाल्यामुळे पाणपक्ष्यांना खाद्य मिळत नाही. तसेच माशांवरही याचा परिणाम दिसतो. हे लक्षात घेऊन लोकसहभागातून या वनस्पतीचे तलावातून निर्मूलन करणे आवश्यक आहे.

तलावांमध्ये बेशरम वनस्पतीचा पसारा वाढला तर आवश्यक असलेल्या इतर स्थानिक पाणवनस्पती नष्ट होतात. याचा सरळ प्रभाव पडतो तो पाण्याशी निगडित असणाऱ्या सजीवांवर. स्थानिक पाणवनस्पती नष्ट झाल्यामुळे पाणपक्ष्यांना खाद्य मिळत नाही. तसेच माशांवरही याचा परिणाम दिसतो. हे लक्षात घेऊन लोकसहभागातून या वनस्पतीचे तलावातून निर्मूलन करणे आवश्यक आहे.

आज महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील अनेक तलावांमध्ये नाल्यांच्या काठाने बेशरम (Ipomoea fistulosa) ही वनस्पती फोफावताना दिसत आहे. नावाप्रमाणेच ही वनस्पती कुठेही उगवते, थोडा ओलावा मिळाला की या वनस्पतीच्या वाळलेल्या काडीलाही कोंब फुटतात. कोणतेही जनावर चारा म्हणून याचा पाला खात नाही, विषारी वनस्पती असल्यामुळे सरपणासाठी उपयोगही नाईलाज असेल तरच केला जातो. या वनस्पतीला इंग्रजीमध्ये मॉर्निंग ग्लोरी असे गोंडस नाव देऊन शोभेची वनस्पती म्हणूनही इंग्रजांनी हिचा वापर केला. आजही अनेक ठिकाणी केला जातो.

तलावात पसरलेली बेशरम वनस्पती ः

पूर्व विदर्भातील झाडीपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पारंपरिक तलाव (मालगुजारी तलाव) मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे बेशरमचा पसाराही येथे जास्त आढळतो. या भागात या वनस्पतीला भोवरी, सदासावली, कानबैरी, बेशरम अशा नावांनी ओळखतात. तलावांमध्ये या वनस्पतीचा पसारा वाढला तर आवश्यक असलेल्या इतर स्थानिक पाणवनस्पती नष्ट होतात. याचा सरळ प्रभाव पडतो तो पाण्याशी निगडित असणाऱ्या सर्व सजीवांवर. स्थानिक पाणवनस्पती नष्ट झाल्यामुळे पाणपक्ष्यांना खाद्य मिळत नाही. स्थानिक माशांच्या जाती काठावरील उथळ पाण्यातील वनस्पतींमध्ये घरटे करतात, त्यांचा लपण (लपायची जागा) म्हणून वापर करतात, खाद्य म्हणूनही वापरतात. या वनस्पती गेल्याबरोबर अनेक स्थानिक माशांच्या जाती त्या तलावातून कमी होतात, तसेच तलावांमधील माशांचे उत्पन्नही कमी होते. गावातील पाळीव जनावरे तसेच लगतच्या जंगलातील वन्यजीवांना तलावांमध्ये मिळणाऱ्या चाऱ्याचे प्रमाणही कमी होते, कारण तलावांमधील स्थानिक वनस्पतींपैकी जवळजवळ ७० टक्के वनस्पती व गवत जनावरे चारा म्हणून खातात. याचा सरळ प्रभाव पडतो तो गावातील पशुधनाच्या चारा उपलब्धतेवर आणि मासेमारी व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या ढिवर समुदायाच्या उपजीविकेवर. शिवाय महिला या तलावांमध्ये कपडे धुण्याकरिता रोज जातात. त्यांना ही वनस्पती विषारी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. कारण याच्या काड्या चुलीत पेटवल्यावर होणाऱ्या धुराने डोळे जळजळणे, खोकल्याचा त्रास होऊन श्वास गुदमरणे हे पाहिलेले आहे. या वनस्पतीमुळे तलावात होणारे नुकसान आणि त्यातील जिवांचे सौंदर्य यांच्यातील ऱ्हास त्या रोज बघत असतात.

लोकसहभागाची गरज ः

बेशरम निर्मूलनाचे हे काम स्थानिक समाजाने प्रायोगिक तत्त्वावर केले. त्याचे अत्यंत चांगले परिणाम निसर्गावरच नाही तर रोजगारावर आणि सामाजिकतेवरही पडलेले आहेत. असे असले तरी बेशरम निर्मूलनाचे काम ग्रामीण भागातील जनतेला नेहमीच श्रमदानातून करणे शक्य नाही. कारण अल्प व अत्यल्प भूधारक असणाऱ्या ७० टक्के ग्रामीण लोकांच्या जगण्याचे साधन मजुरी आहे, जी शेती, बांधकाम, रोजगार हमी अशा माध्यमातून येते. अशा वेळी त्यांनी कायम श्रमदान करण्याची अपेक्षा करणेही रास्त नाही. आणि रोजगार हमीसारखी योजना अस्तित्वात असताना त्याचा गावांना सदुपयोग करून घेता यावा. आज रोजगार हमीच्या अंतर्गत काय कामे करावीत हा प्रश्न आहे. कारण सातत्याने तलाव खोलीकरण, नाला सरळीकरण, शेतीची बांधबंदिस्ती, पांदण रस्त्याची कामे तर संपली आहेत. अशा वेळी पुनरुत्पादित रोजगारनिर्मिती करू शकणाऱ्या कामांचा शोध घेऊन त्यांचा अंतर्भाव रोजगार हमीमध्ये करण्याची गरज आहे.
बेशरम निर्मूलन हे त्यातीलच एक महत्त्वाचे काम ठरेल, कारण याने ‘तलावांची उत्पादकता वाढविणे, जल जैवविविधतेचे संवर्धन व मासे, पक्षी आणि इतर जलचरांच्या अधिवासाची निर्मिती’ अशी बहुआयामी परिणामकारकता साधली जाते. या कामामध्ये सहभागी असणाऱ्या गावांनी, विशेषत: महिलांनी ग्रामसभेमध्ये या कामाचा समावेश रोजगार हमीमध्ये करण्याचा ठराव करून कामगार आयुक्तांकडे पाठवला आहे. पण अजूनही याला प्रतिसाद मिळालेला नाही. हे काम रोजगार हमीमध्ये समाविष्ट झाल्यास त्याचा फायदा महाराष्ट्रातील सर्वच जल भागांमधून एका विनाशकारी आक्रमक वनस्पतीचे उच्चाटन होऊन जलसाठ्यांची उत्पादकता वाढून लोकांच्या उपजीविकेमध्ये भर पडण्यासाठी होईल. जल जैवविविधतेचे संवर्धनही होईल. शिवाय लोकांना रोजगार हमीमुळे कामही मिळेल. वनस्पतीची दाटी कमी, मध्यम विरळ अशा प्रकारची विभागणी करून प्रत्येक ठिकाणी किती मजूर किती वेळात निर्मूलनाचे काम करू शकतात, याचाही सहभागी अभ्यास केलेला आहे. वन्यजीव विभागाने या कामाचे फायदे पाहून नवेगावबांध तलाव परिसरातून यंत्राद्वारे ९० एकरामधून बेशरम निर्मूलनाचे काम केले आहे. पण रोजगार हमीमध्ये हे काम आले तर ग्रामसभा स्वत: या कामाचे नियोजन करून ग्रामपंचायत अंमलबजावणी यंत्रणा म्हणून ग्रामस्थांना रोजगार देत महाराष्ट्रातील तलावांचा कोंडलेला श्वास मोकळा करू शकतील.

बेशरमचे निर्मूलन ः

महाराष्ट्र जनुक कोष कार्यक्रमाच्या माध्यमातून, भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ ही संस्था भंडारा व गोंदिया जिल्ह्यांमध्ये जल जैवविविधता संवर्धनाचे काम लोकांसोबत करीत आहे. लोकांसोबत केलेल्या अभ्यासातून अशा प्रकारे नुकसान होत असल्याचे लक्षात आल्यावर मासेमारांच्या सहकारी संस्था व गावांमधील महिलांच्या स्वयंसहायता गटांनी ही वनस्पती तलावांमधून समूळ नष्ट करणे हा एकमेव उपाय आहे हे सांगितले. पण हिच्या वैशिष्ट्यांवरून जे बेशरम नाव पडले आहे, त्यावरून सर्वांनाच शंका होती की ही नष्ट होऊ शकेल काय?
१) महिलांनी पुढाकार घेऊन ‘काही ठिकाणी बेशरम वनस्पती तलावातून काढून तर पाहू’ असे ठरवले आणि सोबतच तलावांचे नुकसान हे पूर्ण गावाचे नुकसान आहे म्हणून ग्रामपंचायतीकडेही वनस्पती काढण्याचा प्रस्ताव मांडला. पण यासाठी निधी कोणाकडेच उपलब्ध नसल्यामुळे प्रयोगाच्या पातळीवर तलावातील काही भागांतून श्रमदानाने बेशरम नष्ट करून पाहण्याचे पाच गावांमधील महिला गट, मासेमार सहकारी संस्था, स्थानिक जैवविविधता व्यवस्थापन समित्या व ग्रामपंचायतीने ठरविले.
२) नियोजनाप्रमाणे २०१६ च्या उन्हाळ्यात गोंदिया जिल्ह्यातील निमगाव, खामखुरा, सावरटोला, भिवखिडकी व कोकणा या गावांमधील ५ तलावांमध्ये निवडक भागातून बेशरम निर्मूलनाचे काम एकूण ३०२ महिला व पुरुषांनी श्रमदानातून केले. काढलेली बेशरम त्याच ठिकाणी ठेवून उन्हात वाळू दिली व सात दिवसांनी पेटवली, ज्यामुळे जमिनीच्या आतील त्यांची मुळेही नष्ट झाली.
३) बेशरम वनस्पती काढलेल्या जागांवर १० मीटर X १० मीटरचे चौकोन जी.पी.एस.द्वारे निश्चित करून २०१७ मध्ये किती प्रमाणात बेशरम पुनर्जीवित झाली तसेच या बेशरम काढलेल्या जागेवर किती स्थानिक वनस्पती आल्या याचा अभ्यास गावातील महिला व शालेय मुलांनी केला.
४) काही ठिकाणी जेथे बेशरम पुनर्जीवित होत असल्याचे दिसले ती पुन्हा काढली आणि सर्वच जागांवर २०१८ मध्ये पुन्हा मोजणी केली. ही वनस्पती तलावातच पेटवल्यामुळे इतर स्थानिक वनस्पतींना नुकसान झालेले नाही हे अभ्यासातून दिसून आले.
५) सातत्याने दोन ते तीन वर्ष पाठपुरावा करून बेशरम निर्मूलन करणे शक्य आहे, हे सिद्ध झाले. तसेच हेही दिसून आले की, तलावाचा भाग मोकळा झाल्याने स्थानिक वनस्पती पुन्हा आपली जागा नैसर्गिकरीत्या व्यापून घेतात. ज्यामुळे तलावात पाणपक्ष्यांची तर संख्या वाढली, शिवाय स्थानिक माशांच्या जातींची विविधताही वाढली, त्यांचे उत्पन्नही दुपटीने वाढले.

(लेखक भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळामध्ये कार्यरत आहेत.)
लेखमाला संपादन- ओजस सु. वि.

ई-मेल ः shalukulhe@gmail.com, manishrajankar@gmail.com, ojas.sv@students.iiserpune.ac.in


इतर ग्रामविकास
शेती, शिक्षण अन ग्रामविकासामध्ये...समानता, स्वातंत्र्य आणि सहानुभूतीमुळेच व्यक्तीचा...
गाव तसे छोटे, कामांतून झाले मोठेपूर्णा नदीच्या खोऱ्यात सर्वत्र खारपाणपट्टा...
पाण्याच्या स्वंयपूर्णतेकडे सुर्डीची...गावरस्ते, स्वच्छता, शोषखड्डे, वृक्षारोपण,...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
ग्रामीण भागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन शहर वा गाव कोणतंही असो, सांडपाणी व्यवस्थापनाचे...
लोकसहभागातून दुष्काळी पिंपरी बनले आदर्श...पुणे-नगर सीमेलगत पारनेर तालुक्यात सुपे गावापासून...
स्वच्छता, जल व्यवस्थापनात राज्यात आदर्श...नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव)...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
तीर्थपुरी गावाची होतेय मोसंबी पिकात ओळखतीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) भागातील...
पाणीवापर कार्यक्षमतेसाठी शहरांचे आरेखन...शेती, सिंचन आणि ग्रामीण भागातील पाणी वापराच्या...
शेती, आरोग्य विकास अन् पर्यावरण...नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांचे आरोग्य आणि...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...
ग्रामविकास, शिक्षण अन् शेतीतील दिशान्तरआर्थिक दुर्बल, भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी,...
गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी एकात्मिक...गुलाबी बोंड अळ्यांना खाण्यासाठी व पतंगाना अंडी...
पोषणमूल्ययुक्त आहारासाठी पाचशे... बालकांना सकस, पोषणमूल्ययुक्त आहार उपलब्ध...
वनाधिकार कायद्याआधारे ग्रामसभांचे शाश्‍...‘खोज’ संस्थेच्या मार्गदर्शनात अमरावती जिल्ह्यातील...
संशोधक शेतकऱ्याने बनविला जीवामृत फिल्टर...नाशिक जिल्ह्यातील पिंपरी सय्यद येथील प्रयोगशील...
लोकसहभागातून धामणगावने साधला कायापालट लातूर जिल्ह्यातील धामणगाव या छोट्याशा गावाने...
लोकसहभाग, शास्त्रीय उपचारातूनच जल,...आपण  लेखमालेतील आत्तापर्यंतच्या लेखांमध्ये...