agricultural stories in Marathi, kadvanchi garape growers vieiws regarding water management | Agrowon

कडवंची : पाणी व्यवस्थापन, नवतंत्रातून विस्तार
संतोष मुंढे
रविवार, 21 एप्रिल 2019

काटेकोर पाणी आणि खतांचा वापर, पीक व्यवस्थापनात बदल, एकमेकांचे मार्गदर्शन आणि बाजारपेठेचे गणित लक्षात घेतले, तरच आपल्याला शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवणे शक्‍य असल्याची खूणगाठ कडवंचीमधील शेतकऱ्यांनी मनाशी बांधली. यातूनच गावातील द्राक्षाचे क्षेत्र वाढत गेले. याबाबत प्रयोगशील शेतकऱ्यांशी केलेली चर्चा...

काटेकोर पाणी आणि खतांचा वापर, पीक व्यवस्थापनात बदल, एकमेकांचे मार्गदर्शन आणि बाजारपेठेचे गणित लक्षात घेतले, तरच आपल्याला शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवणे शक्‍य असल्याची खूणगाठ कडवंचीमधील शेतकऱ्यांनी मनाशी बांधली. यातूनच गावातील द्राक्षाचे क्षेत्र वाढत गेले. याबाबत प्रयोगशील शेतकऱ्यांशी केलेली चर्चा...

द्राक्षाला मोजूनच पाणी
विष्णू भगवानराव क्षीरसागर यांची ८२ एकर शेती. कडवंचीमधील सर्वाधिक म्हणजेच २४ एकर द्राक्ष लागवडीचे त्यांचे क्षेत्र आहे. याच बरोबरीने तीन एकर पेरू, पाच एकर मका, २७ एकर तूर,१० एकर रब्बी ज्वारी, अशी लागवड असते. एक कोटी लिटरपेक्षा जास्त क्षमता असलेली दोन आणि ९० लाख लिटर क्षमता असलेले एक, अशी एकूण तीन शेततळी आणि नऊ विहिरी त्यांच्या शेतीत आहेत.  यांत्रिकीकरणावर त्यांचा भर आहे.
व्यवस्थापनाबाबत विष्णू क्षीरसागर म्हणाले, की पावसाळ्यात विहिरीतील पाण्याने शेततळे भरून घेतो. जानेवारीपर्यंत विहिरीचे पाणी त्यानंतर मार्चपासून शेततळ्यातील पाणी वापरतो. दररोज एक तास बागेला पाणी मिळेल, असे नियोजन असते. शेततळ्यातील पाणी अर्धा तास विहिरीत सोडले, की त्यावर किमान एक तास ठिबक सिंचनाने पाणी देता येते.  छाटणी झाल्यानंतर फूट दिसू लागली आणि ऊन जास्त असेल, तर अर्धा तास पाणी वाढवितो. बागेत अपेक्षित आर्द्रता कायम ठेवण्यासाठी ओलांड्यावर पाण्याची फवारणी करतो.  

एप्रिल छाटणीनंतर ४० दिवस प्रत्येक दिवशी ठिबकने एक तास त्यानंतर २० दिवस पाऊण तास पाणी देतो. शेततळ्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला आणि ठिबकने पाण्याचा कार्यक्षम वापर वाढविला. पीकवाढीच्या टप्प्यानुसार खत व्यवस्थापन आणि बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतो.
जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी शेणखत, पाचट आच्छादन आणि बायोगॅस स्लरीचा वापर करतो. योग्य व्यवस्थापनातून एकरी १२ टन उत्पादन मिळते. मला प्रतिकिलोस ४० रुपये दर मिळाला आहे.

- विष्णू भगवानराव क्षीरसागर, ९६२३०२०४११

अनुभवातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन...
‘पहिल्यांदा २००२ मध्ये मी द्राक्ष लागवड केली. पीक कळायला पाच वर्षे लागली. या काळात कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ, विविध कंपन्यांतील तज्ज्ञ, नाशिक, सोलापूर, सांगली, सातारा, तासगाव भागातील अनुभवी द्राक्ष उत्पादकांनी केलेल्या मार्गदर्शनातून द्राक्ष शेती कळत गेली. त्यानंतर मी परिसरातील शेतकऱ्यांना  मार्गदर्शन करू लागलो.’

कडवंचीमधील विष्णू रंगनाथ शेळके यांचं हे मनोगत द्राक्ष शेतीने गावातच कसा व्यवसाय मिळून दिला याचे बोलके उदाहरण आहे. गावातून शेताकडे चला, त्याशिवाय प्रगती नाही, हा मूलमंत्र घेऊन विष्णू शेळके यांनी नव्वदच्या दशकात गाव सोडले आणि ते शेतीमध्ये राहायला गेले. कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकारातून गावशिवारात पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झाली. पारंपरिक पिकात बदल करून द्राक्ष लागवडीकडे ते वळले. शेळके यांची दहा एकर शेती आहे. २००२ मध्ये त्यांनी दीड एकरावर द्राक्ष बाग लावली. तेच क्षेत्र आजही कायम आहे. याशिवाय आले एक एकर, कपाशी साडे चार एकर, सोयाबीन एक एकर, गहू दीड एकर अशी त्यांची पीक पद्धती आहे.
द्राक्षबागेच्या व्यवस्थापनाबाबत शेळके म्हणाले, की माझी दीड एकरावर साधी सोनाका जातीची लागवड आहे. शेतीची बांधबंदिस्ती योग्य पद्धतीने केल्याने पावसाचे पाणी शिवारात मुरते. त्यामुळे विहिरीतील पाणीपातळी उन्हाळ्यातही टिकून रहाते. माझ्याकडे शेततळे नाही. शेणखताचा पुरेपूर वापर, पाचटाचे आच्छादन, शेण स्लरीचा वापरावर माझा भर असतो. पांढरी मुळी योग्य प्रकारे कार्यरत राहील, अशा पद्धतीने जमिनीत ओलावा ठेवतो. पाणीबचतीसाठी दररोज रात्री पाऊस तास बागेला ठिबकने पाणी देतो. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन फार कमी होते. मुळाच्या क्षेत्रात जास्त काळ ओलावा टिकून राहतो. पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्यांची उचल होते. त्याचा गुणवत्तेला फायदा होतो. आमच्या भागात द्राक्षाला चांगली गोडी उतरत असल्याने  बागेमध्येच प्रतिकिलोस ४० रुपयांपर्यंत दर मिळतो. सरासरी मला एकरी १२ ते १४ टन उत्पादन मिळते.

तयार केला द्राक्ष बागायतदारांचा गट
जालना, औरंगाबाद आणि बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे ९० ते ९५ शेतकऱ्यांना ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी या काळात द्राक्ष शेती व्यवस्थापनाबाबत विष्णू शेळके मार्गदर्शन करतात. दर आठवड्याला बागेला भेट देऊन पुढील आठवड्यातील नियोजन सांगितले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात चांगली वाढ झाली. त्यांनी शेतकऱ्यांचा गट तयार केला आहे. गटातर्फे शिवार फेरी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले जाते. मार्गदर्शनाच्या बदल्यात शेतकरी त्यांना मेहताना देतात.  पाच एकरांच्या व्यावसायिक मार्गदर्शनापासून सुरू झालेला हा प्रवास ९५ एकरांवर पोचला आहे.

- विष्णू रंगनाथ शेळके ९०४९३९३९३१

शिवारात विविध जातींची लागवड
कडवंचीमधील विष्णू डिगांबरराव क्षीरसागर हे प्रयोगशील द्राक्ष बागायतदार. त्यांची तीस एकर शेती. १९९० मध्ये अर्धा एकरापासून सुरू झालेली द्राक्ष शेती पंधरा एकरांपर्यंत पोचली आहे. याबाबत विष्णू क्षीरसागर म्हणाले, की १९८८- १९९० च्या दरम्यान कडवंची शिवारात द्राक्ष आली. त्या वेळी मी अर्धा एकर द्राक्ष लागवड केली. ओनरुट पद्धतीने घेतली जाणारी ही द्राक्षबाग. परंतु यातून द्राक्षाचा दर्जा चांगला मिळत नव्हता. याबाबत अभ्यास सुरू असताना मी आणि विष्णू क्षीरसागर लातूर येथील सुनील बिराजदार यांच्याकडून डॉगरीजवर कलमीकरणाची माहिती घेतली आणि २००१ मध्ये नवी लागवड केली. यामुळे द्राक्ष मण्याची लांबी, फुगवण, वजन, चकाकी, गोडी सुधारली. वेलीला जमिनीतून आवश्‍यक पाणी व अन्नद्रव्ये मिळू लागली. पूर्वीपेक्षा पाणीदेखील कमी लागू लागले. वैशिष्टयपूर्ण चवीमुळे द्राक्षाची मागणी मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, पंजाब राज्यात वाढली.

 पाणी नियोजनाबाबत क्षीरसागर म्हणाले, की माझ्या शेताजवळून नाला जातो. पावसाळ्यात या नाल्यातून पाणी उचलून शेततळे आणि विहिरीत भरून घेतो. पावसाळा संपपेपर्यंत सातत्याने विहिरीत पाणी भरले जाते. पावसाळा संपला की विहिरीतील पाणी आणि त्यानंतर गरजेनुसार शेततळ्यातील पाण्याचा वापर केला जातो. डॉगरीज खुंटामुळे प्रतिदिन एक ते दीड तास ठिबकने पाणी दिले तरी भागते. जमिनीतील ओलावा ४० टक्‍क्‍यांवर आला की पाणी दिले जाते. जमिनीत योग्य वाफसा राखला जातो. बागेतील सुपिकतेसाठी शेणखत, पालापाचोळा, पाचट आच्छादन, शेणस्लरीचा वापर केला जातो.
विष्णू क्षीरसागर म्हणाले, की कडवंचीमध्ये थॉमसनपासून द्राक्ष लागवड सुरू झाली. ती पुढे सोनाका, माणिक चमन, शरद, सुपर सोनाका, विजय चमन, एसएसएनपर्यंत पोचली आहे. विविध द्राक्ष जाती येथे पाहायला मिळतात. आमचे कोरडे हवामान असल्याने इतर भागांच्या तुलनेत ४० टक्क्यांपर्यंत फवारण्या कमी होतात. द्राक्षाला चांगली गोडी असते. सरासरी एकरी १२ ते १४ टन उत्पादन घेतो. सरासरी मला ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दर मिळतो.

- विष्णू डिगांबरराव क्षीरसागर ः ९१७२५२०१६०

 

 

 

 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
‘ए ग्रेड’ शेवगा पिकविण्यातील मास्टर ठिबक, मल्चिंग, गादीवाफा व बाजारपेठेतील तुटवडा...
सेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची...सेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची अखंड सेवा...
काटेकोर व्यवस्थापनातून बहुविध पीक...नायगाव (ता. मुक्ताईनगर, जि. जळागाव) येथील अशोक व...
दहा एकरांतील जांभूळवनातून समृद्धी नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर...
विना कंत्राट, विना अनुदान  शिवार रस्ते...नाशिक जिल्ह्यात कोळवण नदीच्या काठी वसलेल्या...
दुष्काळाशी झुंजत साधला एकात्मिक शेतीचा...नगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे...
परिश्रम, सूक्ष्म नियोजनातून शोभिवंत...नवे प्रयोग करण्याची वृत्ती, मेहनत, सूक्ष्म नियोजन...
कष्ट अन् जिद्दीतून सालगडी झाला प्रगतशील...नाशिक जिल्ह्यातील हरणशिकार (ता. मालेगाव) येथील...
सुमारे ३२ ग्रेडमधील प्रक्रियायुक्त काजू...जागतिक बाजारपेठ ओळखून रत्नागिरी येथील परांजपे...
मुखवासनिर्मितीतून अर्थकारणाला बळ बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जळगावमधील अनिता दगा...
पुसद वन विभागाचा हायटेक  दर्जेदार...कमी कालावधी, कमी मनुष्यबळ, कमी जागेत आधुनिक...
अडीच एकर क्षेत्राला मोगरा, लिलीचा मोठा...परभणी जिल्ह्यातील करंजी (ता. मानवत) येथील मधुकर...
पाणी व्यवस्थापनातून दुष्काळातही...कल्पकता आणि साधनांचा व्यवस्थित वापर केला तर पाणी...
आदर्श संत्रा व्यवस्थापनासोबत फ्लॉवरची...संत्रा बागेत भाजीपाला लागवडीत सातत्य ठेवत त्या...