agricultural stories in Marathi, kadvanchi water management success story | Agrowon

कडवंची : जल, मृद्संधारणातूनच रुजलं अार्थिक विकासाचं बीज
अमित गद्रे
रविवार, 21 एप्रिल 2019

कडवंची गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खरपुडी (जि. जालना) येथील कृषी विज्ञान केंद्राने १९९६ मध्ये नाबार्ड पुरस्कृत इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला. लोकांचा मनापासून सहभाग, परिस्थिती बदलण्याची जिद्द आणि प्रयोगशीलता यातून गावाने गेल्या २३ वर्षांत जल-मृद संधारण, पाण्याचा काटेकोर वापर आणि द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पिकातून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याची दिशा दाखवली आहे.

कडवंची गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खरपुडी (जि. जालना) येथील कृषी विज्ञान केंद्राने १९९६ मध्ये नाबार्ड पुरस्कृत इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला. लोकांचा मनापासून सहभाग, परिस्थिती बदलण्याची जिद्द आणि प्रयोगशीलता यातून गावाने गेल्या २३ वर्षांत जल-मृद संधारण, पाण्याचा काटेकोर वापर आणि द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पिकातून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याची दिशा दाखवली आहे.

जालना जिल्हा तसा अवर्षण प्रवण भागातील. या जिल्ह्यातील खरपुडी येथे मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे कृषी विज्ञान केंद्र कार्यरत आहे. या केंद्राने कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी कडवंची गावामध्ये शेतकरी प्रशिक्षणाच्या माध्यमातून जमीन सुपीकता, पिकांच्या विविध जातींच्या लागवडीची प्रात्यक्षिके, खतांचा कार्यक्षम वापर, पीक बदलाबाबत मार्गदर्शनाचे काम सुरू झाले. शेतकरी आणि तज्ज्ञांचा संवाद सुरू झाला. त्यातून भीषण पाणीटंचाईची मुख्य समस्या समोर आली. हे लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्राने १९९६ मध्ये नाबार्ड पुरस्कृत इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला. लोकांचा मनापासून सहभाग, परिस्थिती बदलण्याची जिद्द आणि प्रयोगशीलतेतून गावाने जल, मृद संधारण आणि काटेकोर पाणी वापराचा निश्चय केला.

प्रतिकूल परिस्थिती केली अनुकूल
गावकऱ्यांच्या प्रतिसादाला खरपुडीच्या कृषी विज्ञान केंद्राने चांगली साथ दिली. विजय आण्णा बोराडे यांनी गावकऱ्यांना लोकसहभागातून ग्राम आणि शेती विकासाचे महत्त्व पटवून दिले. गावकरी श्रमदान करण्यास तयार झाले. एकमेकांतील मनभेद आणि मतभेद विसरून शेती आणि आर्थिक विकासाचे स्वप्न गावकऱ्यांनी पाहिले आणि त्यांच्या प्रयत्नांना कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने, कृषी अभियंता पंडित वासरे आणि सहकाऱ्यांनी चांगली साथ दिली. १९९६ ते २००१ या कालावधीत माथा ते पायथा जल, मृद संधारणाची सर्व कामे शास्त्रीय पद्धतीने लोकसहभागातून पूर्ण झाली. पडणारा पाऊस शेतशिवारात मुरला, विहिरीचा झिरपा वाढला, गावातील नाले वाहू लागले. जमिनीत ओलावा टिकून राहिला. प्रतिकूल परिस्थिती हळूहळू अनुकूल होऊ लागली. मराठवाड्यासारख्या भागात द्राक्ष बाग रुजली. याच पिकाने खऱ्या अर्थाने आर्थिक ताकद दिली.

गेल्या २३ वर्षांतील प्रवासाबाबत पंडित वासरे म्हणाले की, कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कडवंची गावामध्ये १९९५ साली आम्ही कृषी तंत्रज्ञान प्रसाराला सुरवात केली. गावात डिसेंबर नंतर पाणीटंचाई ठरलेली. पावसाच्या पाण्यावर जेमतेम पिकांचे उत्पादन. आम्ही गावकऱ्यांना जल, मृद संधारणाचे महत्त्व समजाऊन सांगितले. पाणलोट विकासासाशिवाय गावाला पर्याय नाही हे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी एकजुटीने काम करण्याची तयारी दाखविली. आम्ही प्रत्येक कुटुंबाशी संवाद साधला. गावकऱ्यांची मानसिकता पाहून आम्ही नाबार्ड पुरस्कृत इंडो जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला. या प्रकल्पामध्ये काही अटी होत्या. यामध्ये १६ टक्के श्रमदानाची महत्त्वाची अट होती. आठवड्यातील सहा दिवस गावकऱ्यांनी श्रमदान करणे अपेक्षित होते. लोकांनी ही अट मान्य केली. श्रमदानातून गाव दुष्काळ मुक्त करायचे सर्वानुमते ठरले.

गावाचे प्राथमिक सर्वेक्षण करून पीपीआर (अहवाल) नाबार्डला सादर केला. गावाचे क्षेत्र १९०० हेक्टर. नाबार्ड पुढे प्रश्न होता की, एवढ्या क्षेत्राला प्रकल्प कसा मंजूर करायचा? कारण नाबार्डचे अधिकारी नियमानुसार फक्त हजार हेक्टर क्षेत्रातील पाणलोट कार्यक्रम विकासासाठी निधी द्यायला तयार होते. आम्ही प्रकल्पाबाबत सांगितले की, कडवंची गावाच्या भौगोलिक रचनेनुसार मराठवाड्यातील गावांसाठी हा एक पथदर्शी पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्प होऊ शकतो. त्यादृष्टीने प्राथमिक मान्यता नाबार्डने दिली. आम्ही प्रशासकीय मान्यतेसाठी गावाचे सहाशे हेक्टरचे तीन पाणलोट आराखडे तयार केले. गावातील लोकांचा ग्राम विकास आणि श्रमदानाचा उत्साह पाहून  नाबार्डने संपूर्ण गाव आणि दोन वाड्या मिळून पाणलोट क्षेत्र विकासाच्या प्रकल्पाला मान्यता दिली.  

असे झाले पाणलोटाचे काम
पाणलोटाच्या कामाबाबत पंडित वासरे म्हणाले की, १९९५ मध्ये शेतकरी आणि कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी एकत्र बसून गावाचा पाणलोट विकासाचा एकात्मिक आराखडा तयार केला. हे करताना माथा ते पायथा या सूत्राचा अवलंब केला. डोंगर, डोंगर उतार, पडीक जमीन, शेत शिवार आणि शेवटी नाल्यामधील जलसंधारणाच्या कामाचे नियोजन केले.  पहिले काम गावशिवाराच्या डोंगर आणि डोंगर उतारावर झाले. कडवंचीच्या तिनही बाजूने डोंगर आहे. डोंगर उतार आणि गायरानात सलग समतल चर, खोल सलग समतल चर केले. डोंगर उतारावर गवत, काशीद, शिवण, गिरीपुष्प, येडी बाभूळ आणि बांबू लागवड केल्यामुळे जमिनीची धूप थांबली, चरात पाणी मुरले. गावामध्ये द्राक्ष लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात बांबू लागतो. हा खर्च वाचवण्यासाठी किंवा कमी किमतीत बांबू उपलब्ध होण्यासाठी गायरानात बांबू लागवड केली. सन २०१२-१३ मध्ये कृषी विभागाने गायरानामध्ये चार सीसीटी नंतर एक डीप सिसीटी केल्यामुळे पावसाचे शंभर टक्के पाणी जिरते. या भागातील विहिरीला चांगले पाणी आहे. त्यातील पाणी शेततळ्यात घेतले जाते. तेथून ठिबक सिंचनाने झाडांना दिले जाते.या प्रकल्पासाठी सामाजिक वनीकरण विभागाची मदत झाली. ठिबक सिंचनामुळे झाडे आणि बांबूची चांगली वाढ झाली आहे.

डोंगर उताराची कामे झाल्यानंतर प्रत्येक शेताला बांध बंदिस्ती केली. अति पाऊस झाला तर  शेतीतील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी बांधाला पाईपचे सांडवे केले आहे. हे पाणी प्रत्येक शेतीत मुरत जाऊन शेवटी नाल्यामध्ये जाते. त्यामुळे बांधाची तूट होत नाही, जमिनीची धूप होत नाही. पाणी वाया जात नाही. बांधाच्या सांडव्याची रचना जमिनीचा उतार, प्रकार आणि पावसाची तिव्रता आणि पीक नियोजन लक्षात घेऊन हैद्राबाद येथील क्रीडा संस्थेच्या समन्वयाने करण्यात आली.  शेवटच्या टप्प्यात नाल्यावर साखळी बंधारा बांधले. गाव शिवारात मुख्य चार नाले आहेत. हे  चार नाले शेवटच्या टप्प्यात एकत्र होऊन गावाबाहेर पडतात. प्रत्येक नाल्यावर छोटे सिमेंट बंधारे आहेत. आणि मुख्य नाल्यावर मोठे सिमेंट बंधारे आहेत. सन २००१ मध्ये पाणलोटाचे काम पुर्ण झाले. या मधल्या काळात पावसाचे पाणी जमिनीत मुरू लागले. विहिरीला पाझर फुटला, पाणी टिकून राहिले. जादा झालेले पाणी नाल्यातील सिमेंट बंधाऱ्यात साठून राहिले. त्याचा फायदा पीक बदलासाठी झाला. उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी झाली.

गावाचे वॉटर बजेट
कृषी विज्ञान केंद्राने कडवंचीमध्ये पाणलोट कामे करताना गावाचे वॉटर बजेट तयार केले. त्यानुसार ६०० मिलिमीटर पाऊस पडला तर साधारणपणे प्रत्येक शेतकऱ्यांचे २५ ते २७ टक्के क्षेत्र वर्षभर बागायतीखाली येईल असा अनुमान काढला. १९९५ ते २००१ पर्यंतच्या काळात दर महिन्याच्या पाच तारखेला गाव शिवारातील पाणीपातळी मोजण्यासाठी गावाच्या वरच्या बाजूला तीन, मधल्या भागात तीन आणि खालच्या भागात तीन विहिरींची पातळी मोजली जायची. त्यामुळे पाऊसमान आणि मुरलेले पाणी याचे वॉटर बजेट मांडता येऊ लागले. या दरम्यानच्या काळात एखादे वर्ष पाऊस कमी झाला तरी पूर्णपणे पाणी मुरल्याने विहिरीतील पाणी पातळी वाढल्याचे दिसून आले. पाणलोटाच्या कामामुळे गावशिवारात पूर्वीपेक्षा सात मीटरने पाणीपातळी वाढली. पाणलोट सुरू होण्यापूर्वी गावात कापूस, तूर, बाजरी ही महत्त्वाची पिके होती. पाणलोटानंतर द्राक्ष, डाळिंब, पपई आणि भाजीपाला लागवड वाढण्यास सुरवात झाली. शेतकऱ्यांना खात्री झाली की, जल, मृद संधारण योग्य पद्धतीने झाले असल्याने पावसाचा प्रत्येक थेंब शेत शिवारात मुरून विहिरीत येणार आणि विहिरीतील पाणी ठिबक सिंचनातून काटेकोरपणे शेतीतील पिकाच्या मुळाजवळ जाणार. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचे  एकूण क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र बागायती झाले. शेती हिरवीगार झाली तरी शेतकरी थांबलेले नाहीत. पुढील आव्हाने संपलेली नाहीत. केव्हीके आणि शेतकरी आजही पाणी बचत आणि व्यवस्थापनाची मॉडेल शोधत आहेत, कारण पाण्याचा प्रत्येक थेंब रुपयात बदलणारी पिढी शेतीमध्ये उतरली आहे.

प्रत्येक कुटुंबाशी संवाद
कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी प्रत्येक कुटुंबासोबत शेतावर बसूनच गट निहाय, खातेदारानुसार पाणलोट विकासाचा आराखडा तयार केला. याबाबत पंडित वासरे म्हणाले की, शेतकऱ्याच्या मुलांच्या संख्येनुसार शेताचा पाणलोटाचा आराखडा तयार केला. हे करण्याचे कारण म्हणजे समजा पुढे मुलांमध्ये शेतीची विभागणी झाली तरी त्या शेतीच्या पाणलोट कामाला धक्का बसू नये. या आराखड्याला आम्ही नाव दिले गट सर्वेक्षण. शेतकऱ्यांच्या सूचना लक्षात घेतल्याने पाणलोट कामांना गती मिळाली.
पाणलोटाची कामे सुरू असताना विजयआण्णा बोराडे यांनी सूचना केली की, मजुरांबरोबरीने जे शेतकरी स्वतः शेतीमध्ये पाणलोटाचे काम करत आहेत त्यांना मजुरी द्या. या सूचनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा झाला. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात पाणलोट कामाची मजुरी मिळाली. शेतकऱ्यांनी शास्त्रीय आराखड्याप्रमाणे स्वतःच्या शेतात बांध घातले. समजा शेतात १०० मीटर बांध झाला की, ८४ मीटर कामाची शेतकऱ्यांला मजुरी मिळायची. उरलेले १६ मीटर काम हे श्रमदान म्हणून ठरवले. ज्या शेतकऱ्यांनी शेतात श्रमदान केले नाही त्यांचे श्रमदान धरण्यासाठी जे मजूर काम करतात, त्यातील सोळा टक्के काम श्रमदान धरले. त्या हिशेबाने ही मजुरी शेतकऱ्याने द्यायची. हे शेतकऱ्यांनी मान्य केले. मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी श्रमदानातून शेताची बांधबंदिस्ती केली. याचा हिशेब करायचा झाला गावकऱ्यांनी सुमारे ४५० किलोमीटर अंतराचे बांध गावशिवारात घातले. शास्त्रीय पद्धतीने केलेली बांधबंदिस्ती हेच पाणलोट क्षेत्र विकासाचे यश आहे. आता २३ वर्षे झाली तरी एकही बांध फुटलेला नाही किंवा एकाही शेतकऱ्याने बांध फोडलेला नाही.

जागेवर मुरले पाणी
जल, मृद संधारण उपचाराबाबत पंडित वासरे म्हणाले की, देशाचा विचार केला तर नर्मदेपासून ते कावेरी नदीपर्यंत दख्खन पठार आहे, हे पाणलोटाची कामे करताना कोणी लक्षात घेत नाही. आम्ही जल, मृद संधारणाची कामे करण्यापूर्वी कडवंची पाणलोटाचा भूगर्भीय अभ्यास केला. दख्खन पठाराच्या मर्यादा आहेत. या भागातील जमिनीची खोली, पाणी मुरण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता कमी आहे. जमिनीची खोली ४० फूट ते १०० फुटांची आहे. या खोलीनंतर कठीण बेसॉल्ट आहे. त्यामुळे भूगर्भात फार खोलवर पाणी मुरत नाही. जमिनीच्या वरच्या थरामध्ये पावसाचे पाणी मुरते, साठते. या थरामध्येच जल-मृद संधारणाच्या उपाययोजना करून पावसाचे पाणी मुरवणे गरजेचे आहे. त्यातून आपल्याला पाण्याची गरज भागवायची आहे.

   कडवंची गावातील जमीन हलकी ते मध्यम आहे. पिकाचे उत्पादन कमी होण्यामागचे कारण पाण्याची कमतरता नाही तर जमिनीची सुपीकता आहे. धुपेमुळे जमिनीचा सकसपणा वाहून जात होता. चांगल्या जमिनीतही सेंद्रिय कर्ब पातळी ढासळली होती. सेंद्रिय खताचा वापर कमी होत रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडले होते. भुसभुशीतपणा संपल्यामुळे जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता संपत आली होती. परंतु, प्रत्येक शेताला केलेल्या बांधबंदिस्तीमुळे पावसाचे पाणी जागच्या जागी मुरले. गेल्या २३ वर्षांत जमिनीची सुपीक थर वाहून गेला नाही.

कडवंची गाव अवर्षण प्रवण भागात आहे. येथे सरासरी ६०० मिलिमीटर पाऊस पडतो. जरी पुढे १२०० मिलिमीटर पाऊस पडला तरी हे पाणी पुरणारे नाही, कारण खाली बेसॉल्ट असल्याने पाणी खोल मुरत नाही, जेवढी जमिनीच्या थराची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे तेवढेच रहाते, बाकीचे पाणी जमिनीतून पुढे नाल्यात वाहून जाते. पाऊस काळामध्ये पंधरा दिवस खंड पडला की झरे बंद, नाला वहाण्याचा थांबतो. त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई दिसतेच. आम्ही जमिनीच्या वर्गानुसार बांध बंदिस्ती केली. प्रत्येक शेतकऱ्याच्या विहिरीत पाण्याची उपलब्धता होण्यासाठी अशी बांधबंदिस्ती केली की  शेतात पडलेल्या पावसाचे पाणी त्या विहिरीत पाझरले पाहिजे. प्रत्येक शेती क्षेत्रात पाणी मुरत जाऊन ते शेवटी बंधाऱ्यात जाऊन साठते. पाणलोटामुळे हंगामी पीक लागवडीसाठी पाणी उपलब्ध झाले.

माथा ते पायथा जल, मृदसंधारणाची कामे केली. डोंगर उतारावर वनीकरण, बांबू लागवड केली. प्रत्येकाच्या शेतीची बांधबंदिस्ती केली. त्यातून शेतात पाणी मुरले. विहिरीत झिरपा वाढला. गेल्या पंधरा वर्षांपासून हे आमचे कडवंचीचे जल-मृद संधारण आणि शाश्वत शेतीचे मॉडेल स्थिर झाले आहे. भूगर्भातील पाणी पातळी सात मीटरने वाढली. गरजे इतके पाणी गावशिवारात मुरते. आमच्या अभ्यासानुसार आणि येथील परिस्थितीनुसार अजून पुढील ५० वर्षे हे मॉडेल शाश्वत राहील.

शेततळ्यातील पाणी हे बॅंकेतील ठेव
कडवंची शिवारातील विहिरी ४० ते ५० फुटांच्या पुढे खोल नाहीत. या विहिरीत जमिनीच्या वरच्या थरातून झऱ्याच्या रूपाने अतिरिक्त पाणी जमा होते. हे पाणी शेतकरी शेततळ्याच्या माध्यमातून साठवतात. कारण हे पाणी शेततळ्यात उचलले नाही तर ते पुढे वाहूनच जाणार आहे. येथील जलस्तरातून विहिरीत उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा उपसा शेतकरी करतात.

कडवंची हे गाव शेततळ्याच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या द्राक्ष शेतीसाठी ओळखले जाते. परंतु एक लक्षात घ्या की, सरासरी पर्जन्यमानापेक्षा ५० टक्क्यांच्या आत पाऊस झाल्यासच शेततळ्यातील पाण्याचा उपयोग केला जातो. सरासरी पाऊस (६०० मिमी) झाल्यास शेततळ्यातील पाण्याची गरज पडत नाही. विहिरीतील उपलब्ध पाण्यावरच शेतीचे सिंचन होते. शेततळ्यातील पाणी हे बॅंकेतील ठेव आणि संरक्षित काळातील उपयोगासाठीच आहे.

 याबाबत पंडित वासरे म्हणाले की, पाणलोटाच्या कामामुळे शेतीसाठी पाण्याची शाश्वती झाली. शेतकरी हंगामी पिकाकडून द्राक्ष, डाळिंब, पपई, भाजीपाल्याकडे वळले. २००३ -०४ साली दुष्काळी स्थिती आली. शेतकऱ्यांनी कशाबशा बागा जगवल्या, पीक घेतले नाही. २००५-०६ साली शासनाचे राष्ट्रीय फलोद्यान अभियान आले. या योजनेतून गावातील भगवानराव क्षीरसागर यांनी एक कोटी लिटरचे शेततळे केले. त्यामध्ये प्लॅस्टिक कागद अंथरला. त्यांनी शेततळ्यात विहिरीतील पाणी उपसा करून साठवले. २००६-०७ साली त्यांना उन्हाळ्यातही शेतीला पाणी कमी पडले नाही. कमी पडले त्या वेळी शेततळ्यातील पाणी वापरले. हे जालना जिल्ह्यातील पहिले शेततळे होते.  लोकांनी विचार केला की, एखादं वर्ष पाऊस कमी पडला तरी शेततळ्यातील संरक्षित पाणी फळबागेला वापरणे शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये शेततळे चांगले रूजले. साधारणपणे २००५ साली चार, पाच शेततळी झाली. पुढील वर्षी आखणी १०-१२  आणि २०१२ पर्यंत १०० शेततळी झाली. आता गावात ५०३ शेततळी आहेत. दरवर्षी शेततळ्यांची संख्या वाढत आहे.

२०१२ मध्ये कडवंची परिसरात मोठी दुष्काळी स्थिती. केवळ १९८ मिमी पाऊस. ज्यांनी २०११ मध्ये शेततळ्यात पाणी भरून ठेवले होते, त्यांनी संरक्षित पाणी शेतीला वापरले. २०१२ मध्ये जेवढा पाऊस झाला त्याचे विहिरीत साठलेले पाणी शेततळ्यात साठवले. एवढा कमी पाऊस असूनही शेतकऱ्यांनी काटेकोरपणे शेततळ्यातील पाणी देत बागा जगवल्या, पीक निघाले. यातून शेतकऱ्यांना विश्वास आला की गावशिवारात २०० मिमी पाऊस झाला तरी आपण बाग जगवून द्राक्ष उत्पादन घेऊ शकतो. दुष्काळतही पीक शक्य आहे. यासाठी वॉटर बजेट महत्त्वाचे ठरले.

वॉटर बजेट नुसार असे ठरले की, गावशिवारात २०० मिमी (३० ते ३५ टक्के) पाऊस झाला तर फक्त द्राक्ष बागेचा हंगाम घ्यायचा, बाकी शेती पडीक ठेवायची. संरक्षित पाणी जनावरे आणि कुटुंबापुरते. समजा ४०० मिमी (६० ते ६५ टक्के) पाऊस पडला तर द्राक्ष बागेसाठी शेततळे भरायचे, खरिपाचा हंगाम आणि पुढे चारा पीक घ्यायचे, त्याला एक संरक्षित पाणी द्यायचे. पिण्यासाठी आणि जनावरांसाठी पाणी शेततळ्यात राखीव ठेवायचे. समजा ७०० मिमी (सरासरी पावसाच्या १०० टक्के) पाऊस पडला तर सर्व शेतीला पुरेल येवढे पाणी उपलब्ध होते, पण ते देखील पुढील जुलैपर्यंत काटकसरीने वापरायचे. हे गावाने मांडलेले शेततळ्यचे वॉटर बजेट आहे. बहुतांश लागवड क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे. ठिबक सिंचन केल्याशिवाय रोप लागवड करायची नाही असा ‘पण’ केलेले हे गाव आहे. सध्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीतही गावातील ५०३ शेततळ्यांमध्ये २५० कोटी लिटर संरक्षित पाणीसाठा आहे, हे शेतकऱ्यांचे भविष्यातील पाणी नियोजनाचे गणित सांगते.  

- पंडित वासरे, ९४२२७०१०६५, ७३५००१३१५१, (०२४८२) २३५५८६
(कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी, जि. जालना)

 

 

 

 

 

 

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
शेतात पिकवा ‘हिरवे सोने’केंद्र शासनाने ‘राष्ट्रीय बांबू मिशन’ची स्थापना...
‘पंचनामा’ पूरग्रस्त पशुधनाचाको ल्हापूर, सांगली, सातारा या भागांतील पूर जसजसा...
आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व...
क्षारयुक्त जमिनीत एकात्मिक शेतीचा आदर्श बारामती तालुक्यातील मळद (जि. पुणे) येथील प्रशांत...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...
विदर्भ, कोकणात पावसाची शक्यतापुणे : पावसाने उघडीप दिल्याने राज्याच्या तापमानात...
पूरग्रस्त भागात जनावरांना न्यूमोनिया, ...पुणे : सततचा पाऊस आणि पुराच्या पाण्यात भिजल्याने...
पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील...मुंबई : पुरग्रस्त भागातील एक हेक्टरवरील नुकसानावर...
अण्वस्त्रांविषयी वाचाळता कशासाठी? अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या (नो फर्स्ट...
कृषी परिवर्तनाची नांदीनरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या...
कृषी ‘एमएस्सी’ प्रवेशात भेदभाव नको:...पुणे  : गुणवत्ता यादीत असूनही पदव्युत्तर (...
जमीन मोजणीच्या नोटिसा झाल्या डिजिटल पुणे : राज्यातील तलाठी कार्यालयांकडील जमीन...
सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यात...सांगली ः जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमहांकाळ आणि जत...
महापुराच्या पाण्याने कृष्णा-कोयनेचा...कऱ्हाड, जि. सातारा : कृष्णा-कोयना नद्यांना...
पन्नास हजारांवर पशुधन डोळ्यांदेखत गेले...कोल्हापूर/सांगली : शेतकऱ्यांच्या ...
सांगली : पूरबाधीत सहकारी सोसायट्यांना ‘...सांगली ः ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पावसाने काहीशी उघडीप दिल्याने राज्यात...
कृत्रिम पावसाच्या नुसत्याच अवकाशात...सोलापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना...