भूजलाची कल्पना अन्‌ वास्तव

भूजलाची कल्पना अन्‌ वास्तव
भूजलाची कल्पना अन्‌ वास्तव

पाणीटंचाई सुरू झाली की त्यावर उपाय करताना आपण निसर्गाचं चक्र, त्यावर आपल्या उपायांनी होणारे दुष्परिणाम इत्यादी गोष्टींचा विचारही न करता, केवळ आपल्या सोयीनुसार विचार आणि कृती करून टंचाई वर मात करायचा प्रयत्न करतो. आपणच निसर्गाच्या केंद्रस्थानी आहोत, या गैरसमजापोटी आपले आणि पर्यावरणाचे अपरिमित नुकसान करत आहोत.

मागच्या लेखात आपण पाहिले की, जर जल व्यवस्थापन आणि संवर्धन हे दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून केले गेले, त्यामध्ये श्रद्धा हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल, त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज उरली नाही, तर ते उपाय शाश्वत यश देऊ शकतात. पिढ्यान्‌पिढ्या यशस्वी झालेल्या आणि आजही यशस्वीपणे वर्षभर पाणी देऊ शकणाऱ्या उपाययोजना या केवळ श्रद्धा, परंपरा आणि माणसाच्या स्राेतांचा वापर मर्यादित करण्याच्या भूमिकेमुळे यश देत होत्या किंवा आहेत. बदलत्या जीवनशैलीमुळे आत्ताच्या काळात आपली पाण्याची गरज ही अचानक प्रमाणाबाहेर वाढली आहे. वाढतं नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि त्यात हरवून बसलेल्या समतोलामुळे आपण एकीकडे पाणी वापराचे प्रमाण वाढवतो आहोत तर दुसरीकडे जंगलतोड, शेतजमिनीचा वापर बिनशेती कारणांसाठी करणे, विकासाच्या नावाखाली त्या भागाचं वाळवंटीकरण करणे, इत्यादी प्रकार करून निसर्गाचा समतोल घालवत आहोत. त्याचा पाण्याच्या उपलब्धतेवर नकारात्मक परिणाम दिसत आहे. पाणीटंचाई सुरू झाली की त्यावर उपाय करताना आपण निसर्गाचं चक्र, त्यावर आपल्या उपायांनी होणारे दुष्परिणाम इत्यादी गोष्टींचा विचार न करता, केवळ आपल्या कुवतीनुसार किंवा सोयीनुसार विचार आणि कृती करून टंचाई वर मात करायचा ठिकठिकाणी प्रयत्न करतोय. आपण निसर्गाच्या केंद्रस्थानी आहोत, या गैरसमजापोटी आपण आपले आणि पर्यावरणाचे अपरिमित नुकसान करत आहोत.

 योग्य उपाययोजनांची आवश्यकता

आपल्याकडे सह्याद्रीच्या आसपासच्या प्रदेशात पाऊस साधारण १०० दिवस पडतो, तर बाकी राज्यात यापेक्षाही खूप कमी दिवस पाऊस पडतो. हे पडणारे पाणी योग्य पद्धतीने अडवून, साठवून, जिरवून त्याचा वापर पावसाळ्यानंतरच्या काळात करता यावा, यासाठी उपाययोजना करणे ही आवश्यक बाब आहे. पाऊस पडल्यानंतर पहिल्यांदा पाणी पृष्ठभागावर पडते. जर पृष्ठभाग पाणी मुरण्यासाठी पोषक असेल, तर हे पाणी मातीच्या विविध थरांतून खाली जात राहते आणि कातळापर्यंत जाऊन थांबते. त्यानंतर तिथे भूजल पातळी वाढायला सुरवात होते. जमीन संपृक्त झाली किंवा पाणी जमिनीत जाऊ शकत नसेल, तिथे पाणी पृष्ठभागावरून उताराच्या दिशेने वाहायला सुरवात होते. त्यातूनच ओढे, नाले, नदी यांचा उगम होतो. हे दख्खनच्या पठारावर सगळीकडे साधारण सारख्याच पद्धतीने होते. कोकण भागात मात्र परिस्थिती वेगळी आहे. कोकणात पावसाच्या पाण्याचा प्रवास हा जमिनीवर पडल्यापासूनच समुद्राकडे सुरू होतो. त्याचप्रमाणे, ठिकठिकाणी असलेल्या चढउतारांमुळे पाणी सगळीकडे सारख्या प्रमाणात साठून राहू शकत नाही. भूजल पातळी ही अगदी बाजूबाजूच्या भागांतही वेगळी असू शकते. भूजल, पाणीपुरवठा आणि त्यात होणाऱ्या चुका यांमुळे तयार होणाऱ्या प्रश्नांबद्दल आपण पुढच्या लेखात माहिती घेणार आहोत.

भूगर्भ परिस्थिती लक्षात घ्या

पाणी जमिनीत साठून राहायचे असेल तर त्या भागातील मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि मातीच्या थरांची जाडी आणि एकूणच त्या भागातील भूगर्भ परिस्थिती या गोष्टी महत्त्वाच्या असतात. कारण, पाणी जमिनीत किती साठेल आणि किती काळ साठेल हे याच गोष्टींवर अवलंबून असते. यातल्या जमिनीखालच्या गोष्टी दिसत नसल्याने बहुतेकवेळा त्यांच्याबाबत विचार होत नाही आणि बाकी गोष्टी आपल्याला कळतात, असा बहुसंख्य लोकांचा दृढ समज (प्रत्यक्षात भीषण गैरसमज) असल्याने जल संधारण आणि व्यवस्थापनात काही उपाययोजना करताना त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तीला विचारून काही करावे ही मानसिकताच फार कमी लोकांमध्ये आढळून येते. सगळे उपाय थकले की मग नाईलाजाने माणूस तज्ज्ञाकडे जातो. पण, बरेचदा तोपर्यंत स्राेताचे कायमस्वरूपी नुकसान झालेले असते.

पाणीटंचाईमुळे केले जाणारे घातक उपाय  

  • जेव्हा पाणी पातळी खाली खाली जायला लागते किंवा माणसाची समज आणि सहनशक्ती कमी असते आणि माणसाला आर्थिक फायदा दिसतो तेव्हा माणूस घातक उपायांकडे वळतो. आपण सध्याच्या काळात याची अनेक उदाहरणे बघू आणि अनुभवू शकतो.
  • काही वर्षांपूर्वीपर्यंत लोक पृष्ठभागावरील किंवा जमिनीत कमी खोलीवर उपलब्ध असणारे पाणी वापरत होते. पण, पाण्याचा वापर आणि मागणी वाढल्यानंतर जमिनीतील पाण्याचा उपसा वाढला. यावर सर्वात सोपा उपाय शोधला गेला तो म्हणजे खोल जाणे. विहिरींची खोली वाढली. अतिउपसा झाल्याने जसे भूगर्भातील पाणी खाली जायला लागलं, तशी स्राेतांची खोली वाढायला लागली. जेव्हा कूपनलिका खणायला सुरवात झाली, तेव्हा तर सगळ्याच मर्यादा संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. कमी वेळात होणारा स्राेत, लागणारी जागाही खूप कमी, आपल्याला प्रत्यक्ष काही काम करायची गरज नाही, इत्यादी फायद्याच्या ठरणाऱ्या कारणांमुळे कूपनलिका हा पर्याय एकदम तेजीत आला आणि भूजल पातळी खालावण्यासाठी एक महत्त्वाचे कारण बनला आहे. पाण्याच्या अनिर्बंध उपशासाठी आणखी एक गोष्ट कारणीभूत ठरली, ती म्हणजे पाणी उपसण्यासाठी लागलेले पंप. माणूस आपल्या किंवा प्राण्यांच्या मदतीने पाणी उपसा करत होता तेव्हा ते प्रमाण मर्यादित होते. पण जेव्हा उपसा करायला वेगवेगळ्या इंधनावर चालणारे आणि खोलवर असलेले पाणी उपसू शकणारे पंप तयार झाले तेव्हा उपसा प्रचंड प्रमाणात वाढला, ज्यामुळे भूजल पातळी वेगाने खाली जायला लागली. यावर गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.
  • भूजल पातळीवर माणसाच्या चुकीच्या कामांमुळे होणारा परिणाम

    भूजल उपसा अनिर्बंध केल्याचा परिणाम म्हणजे देशातील अनेक प्रांतांमध्ये सध्या अशी परिस्थिती आहे, की भूजल खूप खोल गेले आहे किंवा जवळपास संपले आहे. कूपनलिकेचा अतिरेक इतका झाला आहे की, अनेक ठिकाणी अगदी ८०० ते ९०० फुटांपर्यंत खोल जाऊनही पाणी मिळत नाही. कित्येक ठिकाणी तर एका ठिकाणी पाणी नाही मिळाले म्हणून दुसऱ्या ठिकाणी कूपनलिकांची खोदाई सुरू आहे.       काही उदाहरणं तर अशी आहेत की गावाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त कूपनलिका करूनही पाणीटंचाई हटलेली नाही, कारण त्यातल्या बहुसंख्य कूपनलिका कोरड्याच निघाल्या. जेवढ्या जास्त कूपनलिका किंवा स्राेत, तेवढं जास्त पाणी हा गैरसमज आणि जमिनीला छिद्र पाडले की कुठेही पाणी मिळते आणि ते अमर्याद असते हा अंधविश्वास अशा उपयांमागे असतो. पण अनेकदा अपयश येऊनही, आपण आपले डोके न चालवता, योग्य तज्ज्ञाच्या सल्ल्याने काम करावं ही मानसिकता दिसूनच येत नाही. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे, जेव्हा भूजल पातळी खाली जात राहते आणि अगदी पावसाळ्यातही परत पूर्वीसारखी होत नाही, तेव्हा त्याचा थेट परिणाम त्या जमिनीच्या उत्पादन क्षमतेवर होतो. बहुसंख्य पिकांची मुळे ही फार खोलवर जात नाहीत. त्यामुळे जर भूजल पातळी खाली राहिली तर या पिकांच्या उत्पादनावर नकारात्मक परिणाम होतो, उत्पादन क्षमता काळजी करण्याइतकी घटते.

     ः डॉ. उमेश मुंडल्ये,९९६७०५४४६०,

    (लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com