लिची फळपिकाच्या जाती

लिची फळपिकाच्या जाती
लिची फळपिकाच्या जाती

लालसर आकर्षक रंगाबरोबर आरोग्यासाठीचे फायदे लक्षात घेता लिची फळाची मागणी वाढत आहे. लिचीची लागवड डहाणू भागात होत असून, नवीन लागवड करण्याविषयी माहिती घेऊ. लिचीचे शास्त्रीय नाव लिची चायनेन्सिस असे असून, मूळ स्थान चीन आहे. सतराव्या शतकात हे फळझाड भारतात आले. जागतिक पातळीवर प्रमुख उत्पादक देशांमध्ये भारत आणि चीन आघाडीवर आहेत. भारतामध्ये बिहार राज्यात लिचीची लागवड सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात लिची लागवड प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आढळते. घोलवड येथील दारबशा कावसजी पटेल या शेतकऱ्याने १९२६ च्या सुमारास कोलकत्याहून लिची कलमे आणून प्रायोगिक लागवड केली होती. लिची हे सदाहरित प्रकारातील झाड असून, वर्षभर नवीन वाढीसह फांद्या येतात. झाडाची उंची १० ते १२ मीटर व विस्तार ८ मीटर असतो. लिची फळाचे पोषणमूल्य : लिची फळात ७६ ते ८७ टक्के पाणी, साखर ७ ते १२ टक्के, प्रथिने ०.७ टक्के, स्निग्धांश ०.३ ते ०.५ टक्के व खनिजे ०.७ टक्के असतात. लिची फळामध्ये उष्मांक ६५ कॅलरी असून, जीवनसत्त्व ‘क’ हे ६४ मि.ग्रॅ. प्रति १०० ग्रॅम आहे. हवामान व जमीन : हिवाळ्यात थंड व उन्हाळ्यात उष्ण तापमान तसेच हवेतील आर्द्रता असलेले हवामान लिचीला मानवते. लिची लागवडीच्या प्रदेशात सर्वसाधारण जानेवारी महिन्यात तापमान कमाल १९ आणि किमान ९ अंश सेल्सिअस असते. जुलै महिन्यात तापमान कमाल ३३ आणि किमान २५ अंश सेल्सिअस असते. झाडाला मोहर येतेवेळी जानेवारी महिन्यात सतत पाच सहा दिवस १० अंश सें.ग्रे. च्या आसपास तापमान असावे. वार्षिक पर्जन्यमान १२०० ते १७०० मिमी असावे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जूनमध्ये सर्वसाधारण ८३ टक्के आणि जानेवारीत ६० टक्के असावे. वालुकामय व निचरा होणारी तसेच जलधारण शक्ती अधिक असलेल्या जमिनीत लिचीची लागवड यशस्वी होते. जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ असावा. जास्त सामू असलेली जमीन लिचीला चालत नाही. जाती : लिचीच्या आवश्यक गुणधर्म असलेल्या जाती निर्मितीसाठी फारसे संशोधन झालेले नाही. हवामान आणि जमिनीनुसार रोपांमध्ये निरनिराळे गुणधर्म असलेल्या ८ ते १० जाती आपल्याकडे प्रचलित आहेत. घोलवड लिची : यामध्ये अर्ली व लेट अशा दोन जाती आहेत. अर्ली जात : फळे गुलाबी छटा असलेली हिरवट रंगाची गोल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तयार होतात झाडाची उंची १० मी. विस्तार ८ मी. एका झाडाचे उत्पादन ८० ते ९० किलो लेट जात : फळे हृदयाकृती, गर्द लालसर रंगाची असून, मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात तयार होतात. बी लहान, गराचे प्रमाण जास्त व गोड फळांच्या झुपक्यात ३५ ते ४० फळे उत्पन्न अर्लीपेक्षा जास्त, परंतु पावसात सापडल्यास नुकसान एका झाडाचे उत्पादन ११५ किलो अभिवृद्धी : पूर्वी बियांपासून अभिवृद्धी केली जाई. मात्र अशा झाडाला फळे उशिरा म्हणजे १५ वर्षांनंतर येतात. त्यामुळे आता गुटी कलमापासून लिचीची अभिवृद्धी करतात. अशा रोपांपासून ७ ते ८ वर्षांत उत्पादन सुरू होते. गुटी कलमासाठी पावसाळा सुरू झाल्यावर जूनच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा जुलैमध्ये गुटी कलम बांधतात. याशिवाय लिचीमध्ये दाब कलम पद्धतही वापरतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com