agricultural stories in Marathi, location for well And borewell | Agrowon

विहीर अन्‌ कूपनलिका नेमकी कोठे खोदावी?

डॉ. उमेश मुंडल्ये
मंगळवार, 4 जून 2019

आपल्या जागेमध्ये विहीर करायची की कूपनलिका करायची हे आपल्या इच्छेवर किंवा हट्टावर अवलंबून नसते. आपली जागा कुठे आहे, भौगोलिक परिस्थिती काय आहे, मातीचा थर किती आहे, कातळ किंवा खडक किती खोलीवर लागतो आहे, उतार कोणत्या दिशेला आहेत, इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून मग त्या ठिकाणी विहीर करायची की कूपनलिका हे ठरवावे लागते, तरच फायदा होतो.

आपल्या जागेमध्ये विहीर करायची की कूपनलिका करायची हे आपल्या इच्छेवर किंवा हट्टावर अवलंबून नसते. आपली जागा कुठे आहे, भौगोलिक परिस्थिती काय आहे, मातीचा थर किती आहे, कातळ किंवा खडक किती खोलीवर लागतो आहे, उतार कोणत्या दिशेला आहेत, इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून मग त्या ठिकाणी विहीर करायची की कूपनलिका हे ठरवावे लागते, तरच फायदा होतो.

करूया जल-मृदसंधारण या लेखमालेतील लेख वाचून राज्यभरातून अनेक लोक त्यांच्या समस्या सांगून उपाय मिळविण्यासाठी संपर्क साधत असतात. त्यांचे सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न एकत्र करून आजच्या लेखात विहीर आणि कूपनलिका नेमकी कोठे खोदावी याबद्दलची चर्चा आजच्या लेखात करीत आहे.

जमिनीखाली ४०० फुटांवर पाणी नाही, पण २० फुटांवर आहे.  हा चमत्कार आहे की नैसर्गिक गोष्ट? ही कथा आहे माझ्या एक मित्राची. त्याची बदलापूरजवळ शेतजमीन होती आणि तिथे वर्षभर पाणीटंचाईचा असायची. त्यांच्याकडे एक कूपनलिका आहे, पण पाणी एका दिवसात फक्त १० ते १५ मिनिटे येते आणि मग बंद पडते. आता दुसरी कूपनलिका करायचा विचार चालू आहे, त्यासाठी माणूस येणार होता. त्याबाबत चर्चा झाली. एक दिवस त्याचा परत फोन आला की आज नवीन कूपनलिका खणतोय, कारण पहिली कूपनलिका पूर्ण कोरडी पडली आहे आणि झाडांसाठी पाणी हवे आहे. मी गेलो, तेव्हा कूपनलिकेचे काम चालू झाले होते. त्यामुळे त्याबद्दल काही न बोलता मी त्याला सांगितले, की काही अडचण आली तर सांग, मी आत्ता तुझ्या जमिनीचे सर्वेक्षण केले आहे आणि माझ्याकडे अजून दोन मार्ग आहेत पाणी मिळविण्यासाठी. रात्री त्याचा फोन आला की थोडे थोडे करत ४०० फुटांपर्यंत खाली गेल्यावरही पाणी मिळालं नाही. शेवटी कूपनलिका खोदणारा वाद घालून निघून गेला. दुसऱ्या दिवशी मी गेलो तेव्हा सगळे हताश होते की ४०० फूट खाली जाऊन पाणी नाही मिळालं, आता पुढे काय? लावलेली झाडं मरणार का? पाणीच नाही मिळालं तर पुढे काय करायचं?

मी केलेल्या त्या जमिनीच्या अभ्यासाप्रमाणे त्यांना सांगितले, की तुम्ही इथे कूपनलिका न करता विहीर करायला हवी होती. विहिरीला पाणी मिळेल. त्या सर्वांना हा मोठा धक्का होता. जिथे ४०० फूट खोल पाणी मिळालं नाही तिथे हा सांगतोय की विहिरीला पाणी मिळेल? त्यावर खूप विचार करून त्यांनी माझ्या सल्ल्यावर विश्वास ठेवला आणि मी काढून दिलेल्या ठिकाणी विहीर खणायला सुरवात केली. दुसऱ्या दिवशी १७ फुटांवर एक झरा मिळालाय आणि परत १९ फुटांवर अजून एक झरा लागलाय. दुसऱ्या दिवसापर्यंत तिथे अंदाजे ४ फूट पाणी जमा झाले होते. मे महिन्यात विहिरीला केवळ २० फुटांवर भरपूर पाणी हा सगळ्यांच्या दृष्टीने आश्चर्य होते, कारण ४०० फूट खोल पाणी नाही आणि २० फुटांवर आहे हे दिसत असले तरी पटत नव्हते. तेव्हापासून त्या विहिरीला आजतागायत वर्षभर पाणी आहे.

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय महत्त्वाचा  

 • आपल्या जागेमध्ये विहीर करायची की कूपनलिका करायची हे आपल्या इच्छेवर किंवा हट्टावर अवलंबून नसते. आपली जागा कुठे आहे, भौगोलिक परिस्थिती काय आहे, मातीचा थर किती आहे, कातळ किंवा खडक किती खोलीवर लागतो आहे, उतार कोणत्या दिशेला आहेत इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून मग त्या ठिकाणी विहीर करायची की कूपनलिका हे ठरवावे लागते, तरच फायदा होतो.
 •     बरेचदा, कूपनलिका करण्याकडे लोकांचा कल असतो, कारण ती करायला आपल्याला काही करावे लागत नाही, ती विहिरीच्या तुलनेत कमी जागेत, कमी वेळात आणि कमी खर्चात होते. पण केवळ या गोष्टींचा विचार करून पुरत नाही, हे बरेचदा कूपनलिका खोदायचा प्रयत्न फसल्यावर लक्षात येते.
 •     आपल्याला हवी असेल तिथे कूपनलिका किंवा विहीर केली तर तिथे पाणी मिळेल हा ही एक गैरसमज आहे. जिथे जमिनीमध्ये पाणी आहे, तिथे तुम्ही स्रोत तयार केला तर पाणी मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला अपयश येणार आहे, हे अनेकदा लोकांना सांगितलं जात नाही आणि लोकांच्या लक्षात येत नाही किंवा काहींना पटत नाही.
 •     जिथे मातीचा थर चांगला आहे, तिथे विहीर करणे उत्तम. कारण मातीचा थर जेवढा मोठा, तेवढी त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली. भूगर्भात जिरवलं जाणारं पाणी हे एकतर मातीमध्ये साठवता येते किंवा खडकावर किंवा कातळावर साठवता येते. त्यामुळे योग्य तज्ज्ञाचा तांत्रिक सल्ला आणि मार्गदर्शन घेऊनच या गोष्टी कराव्यात.

विहीर आणि कूपनलिका यातील फरक 

विहिरीतील पाणी

 •     जमिनीवर पडलेले पावसाचे पाणी मातीत मुरते. त्यानंतर ते मातीच्या विविध थरांतून खाली जात राहते. माती, मुरूम, दगडगोटे, इत्यादी थरांतून पाणी खालच्या कातळापर्यंत जाऊन थांबते. इथून खाली जायला फारसा मार्ग नसल्याने इथून पाणी जमिनीखाली साठायला सुरवात होते. आपण त्याला भूजल म्हणतो.
 •     पडलेल्या पाण्यापैकी साधारण ८८ ते ९० टक्के पाणी या थरापर्यंत येऊन थांबते. उरलेले १० ते १२ टक्के पाणी खालच्या कातळाला काही ठिकाणी असलेल्या सूक्ष्म भेगांमधून खाली जात राहते आणि खालच्या कातळातील कपारींमध्ये साठत राहते.
 •     जेव्हा आपण विहीर खणतो, तेव्हा आपण या वेगवेगळ्या थरांमधून खाली जातो आणि जेव्हा आपण खालच्या कातळापर्यंत पोचतो, तेव्हा तिथल्या साठून राहिलेल्या पाण्याला बाहेर पडायला मार्ग मिळतो, ज्याला आपण झरा म्हणतो. म्हणजे, विहिरीला मिळणारं पाणी हे पावसाचे जमिनीत मुरलेले आणि भूगर्भात कातळावर साठलेले पाणी असते.

कूपनलिकेतील पाणी

 •     जमिनीच्या विविध थरांतून पाणी खालच्या कातळापर्यंत जाऊन साठते. त्यातील १० ते १२ टक्के पाणी कातळातील सूक्ष्म भेगांमधून खाली जात राहते हे आपण पाहिलं. या पाण्यापर्यंत पाेचायचे असेल तर आपल्याला कातळाला छिद्र पाडून, खालच्या थरापर्यंत जाणे आवश्यक असते. त्यासाठी कूपनलिका खोदली जाते.
 •     आपल्याकडे असलेला दगड अत्यंत कठीण असल्याने जास्तीत जास्त सहा इंच व्यासाची कूपनलिका केली जाऊ शकते. जोपर्यंत मातीचे विविध थर असतात, तोपर्यंत ही विहीर खणताना, माती ढासळून पडू नये म्हणून केसिंग पाइप टाकला जातो. कातळ लागल्यावर त्यात थेट छिद्र पाडून खालच्या पाण्याच्या साठ्यापर्यंत पोचता येते. म्हणजेच, जोपर्यंत मातीचे थर आहेत, तोपर्यंत केसिंग पाइप असल्याने जमिनीत असलेले पाणी कूपनलिकेमध्ये येऊ शकत नाही. खालच्या कातळाच्या खाली असलेला पाणीसाठा शोधून तिथून पाणी मिळवले जाते.
 •     याचाच अर्थ हा, की आपण जेव्हा कूपनलिका करतो, तेव्हा कातळाच्या वरचे भूजल सोडून देत असतो आणि वर्षानुवर्ष खाली गेलेले पाणी उपसत असतो. याचाच अर्थ हा, की प्रत्येक कूपनलिकाचा साठा मर्यादित असतो आणि आपण बहुतांश वेळा जेवढं पाणी उपसतो, त्याच्या १० ते २० टक्के ही नैसर्गिकरित्या पुनर्भरण होत नाही. म्हणूनच काही काळात कूपनलिका कोरडी होणे किंवा पाणी कमी होणे या गोष्टी घडतात.
 •     एकदा स्रोत तयार झाला की मग त्यातून वर्षभर पाणी मिळावे यासाठीही योग्य उपाय करावे लागतात हे लक्षात ठेवावे. विशेषतः कूपनलिका करताना हे लक्षात ठेवावे, की प्रत्येक कूपनलिकेचे पुनर्भरण केले गेले पाहिजे. ते करताना काय काळजी घ्यावी हे आपण पुढील भागात बघणार आहोत.

 ः डॉ. उमेश मुंडल्ये, ९९६७०५४४६०,

(लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)


फोटो गॅलरी

इतर ग्रामविकास
वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाईसातारा जिल्ह्यातील वेळी गावाने एकजुटीने...
महिला बचत गटातून पूरक उद्योगांना गतीगेल्या वर्षी मी लोकनियुक्त सरपंच झाले....
‘सोशल नेटवर्किंग' मधून ग्राम,आरोग्य अन्...नाशिक शहरातील प्रमोद गायकवाड यांनी विविध...
लोकसहभागातून ग्रामविकासाला दिशासप्टेंबर २०१५ मध्ये मी गावाच्या सरपंचपदाचा...
निसर्ग अन् लोकसंस्कृतीतून ग्रामविकासाला...भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाच्या...
रेशीम शेतीतून देवठाणाच्या अर्थकारणास गतीपरभणी जिल्ह्यातील देवठाणा (ता. पूर्णा) येथील...
शेततळ्यांतील मत्स्यशेतीचे ‘बेडग मॉडेल’जिथं एका एका पाण्याच्या थेंबासाठी वणवण हिंडावे...
वडनेरभैरव ग्रामपालिका उचलणार मुलींच्या...नाशिक : सुरक्षेचा प्रश्न किंवा आर्थिक परिस्थिती...
लोकसहभागातून पुणतांब्याची  विकासाकडे...नगर जिल्ह्यामधील पुणतांबा (ता. राहाता) हे पौराणिक...
ग्रामपंचायत कायद्यात ‘दुरुस्ती’ करतानाच...पुणे : पंचायतराज सक्षमीकरणासाठी राज्यघटनेत ७३ वी...
‘अफार्म’ची जलनियोजनातून कृषिविकासाची...महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांची मध्यवर्ती शिखर...
शेती, ग्रामविकास अन् स्वच्छतेचा जागरअकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जागर फाउंडेशनच्या...
शेती, ग्रामविकासात नांगनूर अग्रेसरमहाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील नांगनूर (ता....
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
पणज गावाने आणली केळी पिकातून सुबत्ताअकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पणज हे छोटे गाव...
पर्यावरण, जलसंवर्धन, व्यावसायिक शेतीचा...वऱ्हा (ता. तिवसा, जि. नागपूर) येथील गावकऱ्यांनी...
लोकसहभागातून शेती, शिक्षणाला दिशा...निरंतर लोकसंवाद, महिला ग्रामसभा, प्रभावी कष्टकरी...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
पर्यावरण संवर्धन, लोक शिक्षणामध्ये ‘...अकोला, वाशीम जिल्ह्यांतील सुमारे तीस...
ग्रामपरिवर्तनाची दिशा दाखविणारे शेंदोळा...जन्म, मृत्यू, विवाहनोंदणी प्रमाणपत्र हवे असेल; तर...