मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी विकासासाठी प्रकल्प

‘महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क’ (मॅग्नेट) प्रकल्पातपहिल्या टप्प्यात २५ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ५ मूल्य साखळी गुंतवणूकदारांची निवड केली जाणार आहे. यासाठीच्या अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत २८ जूनपर्यंत असणार आहे. यासाठीच्या अर्जाचा नमुना www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे अर्ज ऑनलाइन आणि प्रत्यक्ष स्वरूपात दाखल करता येतील.
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी विकासासाठी प्रकल्प
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी विकासासाठी प्रकल्प

राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व कृषी उत्पादनांवर प्रक्रियेसह विपणन आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मूल्य साखळ्यांमध्ये खासगी गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने आशियायी विकास बँकेच्या आर्थिक सहकार्याने ‘महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क’ (मॅग्नेट) प्रकल्प राबविण्यात येत आहे. यात पहिल्या टप्प्यात २५ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि ५ मूल्य साखळी गुंतवणूकदारांची निवड केली जाणार आहे. यासाठीच्या अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत २८ जूनपर्यंत असणार आहे. यासाठीच्या अर्जाचा नमुना www.msamb.com  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे अर्ज ऑनलाइन आणि प्रत्यक्ष स्वरूपात दाखल करता येतील. प्रकल्पाची कार्यकक्षा : राज्यातील डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी व मिरची (हिरवी व लाल) व फुलपिके इ. फलोत्पादन पिकांसाठी उत्पादन ते ग्राहक अशी एकात्मिक मूल्य साखळ्यांचा विकासासाठी या प्रकल्पाची आखणी केली आहे. यात सध्या अस्तित्वात असलेल्या व नव्याने निर्माण होणाऱ्या शेतकरी उत्पादक संस्था, निर्यातदार, प्रक्रियादार, संघटित किरकोळ विक्रेते, कृषी व्यवसाय करणारे लघू व मध्यम उद्योजक, वित्तीय संस्था, स्वयंसहाय्यता समूह यांचा सहभाग घेण्यात येईल. यातून फळपिकांचे उत्पादन, उत्पादकता व गुणवत्ता वाढविणे, काढणी पश्चात होणारे नुकसान कमी करणे व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, ही ध्येये साध्य केली जातील. असा आहे निधी

  • या प्रकल्पाचा कालावधी ६ वर्षांचा असून, २०२६-२७ पर्यंत राबविण्यात येणार आहे.
  • हा प्रकल्प १४२.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतक्या रकमेचा असून, त्यापैकी ७० टक्के निधी (१०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) आशियायी विकास बँकेकडून कर्ज स्वरूपात व ३० टक्के निधी (४२.९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) राज्य शासनाचा स्वनिधी असणार आहे.
  • प्रकल्पाचा मुख्य उद्देश : १) राज्यातील निवडलेल्या फळ, भाजी व फुलपिके यांच्या मूल्यसाखळ्यांमध्ये खासगी गुंतवणूक आकर्षित करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे. २) फळे व भाजीपाल्याचे काढणीपश्‍चात नुकसान कमी करणे व त्यांची साठवणूक क्षमता वाढविणे. ३) मागणीनुसार मालाची मूल्यवृद्धी करणे आणि अन्नाची वितरण व्यवस्था कार्यक्षम करणे. ४) शेतकरी उत्पादक संस्थांचा मूल्य साखळीतील सहभाग वाढविणे. प्रकल्पाची व्याप्ती व अंमलबजावणी :

  • डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी व मिरची (हिरवी व लाल) व फुलपिके
  • राज्यातील वरील पिकांचे उत्पादन घेणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रकल्प राबवणार.
  • प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत करण्यात येणार आहे.
  • प्रकल्पाचे घटक व उपघटक : या प्रकल्पात शेतकरी उत्पादक संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना साह्य करण्यासाठी निवडलेल्या फलोत्पादन पिकांसाठी काढणीपश्‍चात पर्यायी बाजारपेठेचे जाळे आणि मूल्य साखळ्या विकसित करण्यात येतील. प्रकल्पाचे प्रमुख तीन घटक निश्‍चित करण्यात आलेले आहेत. १) शेतकरी उत्पादक संस्थांचा क्षमता विकास ः यामध्ये निवडण्यात आलेल्या पिकांसाठी शेतकरी उत्पादक संस्थांच्या शेतकऱ्यांना उत्पादकता व गुणवत्तावाढीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आधुनिक पीक पद्धतींचा वापर, काढणी पश्‍चात हाताळणी, निर्यात व देशांतर्गत बाजारपेठेनुसार अन्न सुरक्षा आणि गुणवत्तांची पूर्तता करणे इ. विषयी प्रशिक्षण देणे. शेतकरी उत्पादक संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर्जेदार रोपांची उपलब्धता, निविष्ठा खरेदी, पीक संरक्षण, हवामान, काढणी, काढणीपश्‍चात हाताळणी, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उपलब्ध बाजारपेठा इ. विषयी मोबाईल आधारित ॲप व तज्ज्ञांमार्फत सल्ला दिला जाईल. शेतकरी उत्पादक संस्था, त्यांच्याकडे उपलब्ध असलेली संसाधने व व्यावसायिक क्षमता विचारात घेऊन विषय तज्ज्ञांकडून व्यवसायाचे आराखडे तयार केले जातील. या संस्था विक्रेते-खरेदीदार संमेलने, आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग अशा विविध माध्यमांतून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय खरेदीदार कंपन्यांशी जोडण्यात येणार आहे. लघू व मध्यम प्रक्रिया उद्योजकांना मोठ्या कंपन्यांच्या मागणीनुसार मालाचा पुरवठा करण्यासाठी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील. २) काढणीपश्‍चात सुविधांसाठी अर्थसाह्य ः

  • मूल्य साखळीतील अंतर्भूत घटकांना (शेतकरी उत्पादक संस्था, निर्यातदार, प्रक्रियादार, संघटित किरकोळ विक्रेते इ.) काढणीपश्‍चात पायाभूत सुविधा उभारणीसाठी अर्थसाह्य देणे.
  • शेतकरी उत्पादक संस्थांना शेतालगत माल एकत्रित करणे, त्याची स्वच्छता व प्रतवारी करणे, पॅकिंग करणे इ. साठी प्राथमिक पायाभूत सुविधा उभारणीसाठी अर्थसाह्य करणे.
  • लघू व मध्यम प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार व प्रक्रियादारांना मूल्य साखळ्यांतर्गत पायाभूत सुविधा उभारणीसाठी अर्थसाह्य करणे. शेतकरी उत्पादक संस्था व मूल्य साखळीत सहभागी होणारे लघू व मध्यम उद्योजक यांची खेळत्या भांडवलाची व मध्यम मुदत कर्जाची गरज भागविण्यासाठी वित्तीय संस्था निवडण्यात येतील. त्यामार्फत अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध केले जाईल.
  • ३) निवडलेल्या पिकांसाठी मूल्य साखळ्या विकसन ः

  • महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सुविधांचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण करणे.
  • सीताफळ, स्ट्रॉबेरी, केळी इ. पिकांच्या उत्पादन क्षेत्रांमध्ये नवीन सुविधांची उभारणी करणे.
  • मॅग्नेट प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक संस्था, प्रक्रियादार व मूल्य साखळीतील अन्य घटकांच्या क्षमता बांधणीसाठी राष्ट्रीय सुगीपश्‍चात तंत्रज्ञान संस्थेचे बळकटीकरण करणे.
  • प्रकल्पांतर्गत अर्थसाह्य : प्रकल्पाचे उद्देश साध्य करण्यासाठी घटक क्र. २ अंतर्गत प्रस्तावित कृषिविषयक काढणीपश्‍चात हाताळणी व व्यवस्थापन, मूल्यवृद्धी, प्राथमिक/दुय्यम प्रक्रिया, विपणन आदी विविध बाबीसंदर्भातील शेतकरी उत्पादक संस्था व मूल्य साखळी गुंतवणूकदार या लाभार्थ्यांच्या उपप्रकल्पांना Matching Grant या उपघटकांतर्गत जास्तीत जास्त ६० टक्क्यांपर्यंत अर्थसाह्य देय राहणार आहे. तसेच इच्छुक उपप्रकल्पांना Financial Intermediation Loan (FIL) या उपघटकांतर्गत भागीदार वित्तीय संस्थांद्वारे खेळते भांडवल व मध्य मुदत कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध करून देण्यात येईल. यातून प्रकल्पांतर्गत उत्पादक आणि उद्योजकांना नवीन व संघटित बाजारपेठेत प्रवेश मिळवणे सोपे होईल. प्रकल्पाचे प्रमुख फायदे :

  • या प्रकल्पातील विविध उपघटकांच्या अंमलबजावणीमुळे लाभार्थी शेतकरी कुटुंबाच्या वार्षिक निव्वळ उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होईल.
  • प्रकल्पामध्ये सहभागी शेतकरी उत्पादक संस्थाच्या फलोत्पादन पिकांचे काढणीपश्‍चात नुकसान कमी होईल.
  • लोकांना थेट रोजगार/स्वयंरोजगार संधी उपलब्ध होतील.
  • पिकांची गुणवत्ता व अन्न सुरक्षितता मानकांच्या अवलंबामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना वाढीव किंमत मिळू शकेल.
  • मूल्य साखळीतील उत्पादन ते वितरण व्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यावर विशेष भर दिला जाईल. त्यामुळे महिला सशक्तीकरणास बळ मिळेल.
  • या प्रकल्पामुळे उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन, पीक संरक्षण, काढणीपश्‍चात हाताळणी, बाजारपेठ इ. विषयी सेवा उपलब्ध होतील.
  • प्रकल्पात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांकडून सर्व मानकांचे काटेकोर पालन करून घेतल्यामुळे उत्पादित शेतीमालामध्ये कीडनाशकांचे रासायनिक अंश राहणार नाहीत किंवा धोक्याच्या पातळीखाली ठेवण्यात येईल.
  • निवडलेल्या फलोत्पादन पिकांसाठी कार्यक्षम विपणन व्यवस्था निर्माण होईल.
  • बाजाराभिमुख व्यवसाय विकास कार्यक्रम कार्यक्षमपणे राबवून लघू व मध्यम व्यवसायिकांची क्षमता बांधणी होईल.
  • संपर्क ः मा. प्रकल्प संचालक, महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट), प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, ३८६/२, १० वा मजला, शारदा चेंबर्स, शंकरशेठ रोड, पुणे (महाराष्ट्र), पिन कोड ः ४११०३७. ई-मेल - projectadb@msamb.com  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com