केळी पीक व्यवस्थापन सल्ला

करपा रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे
करपा रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे

उन्हाळ्यातील अधिक तापमान, वेगाने वाहणारे वारे तसेच गारपीट इत्यांदीचे मृग बागेवर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता केळी संशोधन केंद्राने फेब्रुवारी महिन्यात केळी लागवडीची शिफारस केली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ५ बाय ५ फूट अंतरावर केळीची लागवड करून शिफारशीप्रमाणे पाणी व पोषक अन्नद्रव्याचे योग्य व्यवस्थापन करावे.

फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेली केळी पुढच्या जानेवारी- फेब्रुवारीपर्यंत कापणीस तयार होते. उन्हापासून संरक्षणासाठी केळीच्या लागवडीत दोन ओळींच्या मध्ये ताग किंवा धैंचा ही हिरवळीची पिके घ्यावीत. बागे भोवती २ मीटर अंतरावर सजीव कुंपण करण्यासाठी केळी लागवड करते वेळेस शेवरीची लागवड करावी. त्यामुळे वादळी वाऱ्यामुळे केळीची पाने फाटणे व उन्हाळयातील उष्ण व हिवाळ्यातील थंड वाऱ्यापासून बागेचे संरक्षण होते. वाऱ्यामुळे झाडे कोलमडून होणारे आर्थिक नुकसान टळते.

खत व्यवस्थापन

  •   मृग बागेस लागवडी नंतर २१० दिवसांनी जमिनीतून द्यावयाची नत्राची मात्रा ३६ ग्रॅम प्रति झाड युरियामधून द्यावी. आंतर मशागत करून वाफ्यातील जमीन भुसभुसीत ठेवावी. झाडांना मातीने आधार द्यावा.
  •   नवीन कांदे बागेसाठी खतांचा दुसरा हप्ता ८२ ग्रॅम नत्र युरियामधून द्यावा. मृग तसेच कांदेबागेसाठी दुसऱ्या आठवड्यापासून १७ ते २८ आठवड्यापर्यंत ठिंबक सिंचनातून १ हजार झाडांसाठी १३ किलो युरिया प्रति आठवडा व ८.५ किलो म्युरेट आॅफ पोटॅश प्रति आठवडा द्यावा.
  • पाणी व्यवस्थापन पाण्यातील एकूण विद्राव्य क्षारांचे प्रमाण, सामू, सोडियमचे गुणोत्तर व पिकांची विम्लता सहन करण्याची शक्ती इ. घटकांवर पाण्याची प्रतवारी अवलंबून असते आणि पिकाची पाण्याची गरज ही पिकाच्या वाढीची अवस्था, जमिनीचा प्रकार तसेच हंगाम यावर अवलंबून असते. या महिन्यात मृग तसेच कांदे बागेला लागवडी नंतर ५ ते ९ महिन्यापर्यंत ९ ते ११ लिटर पाणी प्रति झाड प्रति दिवस याप्रमाणे ठिंबक सिंचनातून द्यावे.

    फळाची गुणवत्ता वाढण्यासाठी

  •     या महिन्यात मृग बाग केळी निसवण्यास सुरवात होईल. अशा निसवलेल्या घडातील पूर्ण फण्या उमलल्यानंतर त्याचे केळ फूल वेळीच कापावे व बागेबाहेर नेऊन नष्ट करावे. केळी फणीवरील केळपत्री अलगद काढावी.
  •     घडावर ५० ग्रॅम (०.५ टक्के) पोटॅशिअयम डाय हायड्रोजन फॉस्फेट अधिक १०० ग्रॅम (१ टक्के) युरिया अधिक १० मिलि स्टीकर मिसळून फवारणी करावी.
  •     निर्यातयोग्य केळी मिळण्यासाठी घडावर ८ ते १० फण्या ठेवून घडाची विरळणी करावी. घडाचे व घडदांड्याचे सरंक्षण होण्यासाठी घडावर ६ टक्के सच्छिद्रता असलेल्या पांढऱ्या स्कर्टिंग बॅगने घड झाकावा. पिशवीचे वरील तोंड दांड्याला बांधावे तर खालील तोंड मोकळे सोडावे.
  • करपा रोगाचे नियंत्रण  

  • रोगग्रस्त पानाचा भाग किंवा रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत.
  • फवारणी ः  प्रति लिटर पाणी
  • मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा प्रॉपिकोनॅझॉल १ मिलि.
  • फुलकिडीचे नियंत्रण  

  •  केळी निसवत असताना केळ कमळात फुलकिड्यांचा प्रादुर्भाव होतो. फुलकिडे फळाची साल खरवडतात. त्यामुळे फळावर लालसर डाग दिसतात, फळांची प्रत खालावते. त्यामुळे फुलकिडीच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी या जैविक बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून घडावर फवारणी करावी किंवा
  •  निंबोळीवर आधारित कीडनाशक(१०००० पीपीएम अझाडिरेक्टीन) पाच मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  •  घड निसवतेवेळी ॲसिटामीप्रीड १.२५ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून (नॅपसॅक पंपासाठीचे प्रमाण) फवारणी करावी.
  • -  प्रा. के. बी पवार, ९८२२४४३६९२ (केळी संशोधन केंद्र, जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com