गळणाऱ्या बंधाऱ्याची दुरुस्ती शक्य

बंधाऱ्याच्या तळाला चर खणून तळातील चांगल्या कातळापर्यंत जाऊन तिथून बांधकाम केले तर पाणी गळती टाळता येते. त्यामुळे पाणीसाठा वाढतो.
बंधाऱ्याच्या तळाला चर खणून तळातील चांगल्या कातळापर्यंत जाऊन तिथून बांधकाम केले तर पाणी गळती टाळता येते. त्यामुळे पाणीसाठा वाढतो.

सध्याच्या काळातील बंधाऱ्यांची परिस्थिती पाहिली तर असे लक्षात येते की, बहुतांश ठिकाणी गाळ साचलेला आहे. काही ठिकाणी भिंत मोडकळीस आली आहे, तर काही ठिकाणी गळती लागलेली आहे. परंतु, योग्य पद्धतीने तांत्रिक उपाययोजना केल्या तर कमी खर्चात या बंधाऱ्यांमध्ये सुधारणा आणि पाणी साठवण क्षमता पूर्ववत करणे सहज शक्य आहे.

जलसंधारण उपाय म्हटले, की डोळ्यासमोर पटकन येतात ते कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि चेक डॅम. अशा बंधाऱ्यात पाणी आडलेले दिसते. जलसंधारण यशस्वी झाल्याची भावना काही काळ तरी निर्माण करायची ताकद या प्रकारच्या उपायांमध्ये असते. त्यामुळे कोणताही नाला, ओढा, लहान किंवा मोठ्या नदीवर या पद्धतीचे बंधारे राज्यात सर्व ठिकाणी बांधले जातात. अशा बंधाऱ्यांची सद्यःस्थिती पाहिली तर लक्षात येते, की या प्रकारच्या बहुतांश बंधाऱ्यांची अवस्था गाळ साठल्याने बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी या बंधाऱ्यांची भिंत मोडकळीला आलेली आहे. काही ठिकाणी बंधाऱ्याच्या तळातून पाणी निघून जाताना दिसते. याचा अंतिम परिणाम म्हणजे हे उपाय योजूनही आपल्याला हवे तेव्हा, म्हणजे उन्हाळ्यात  बहुतांश बंधाऱ्यामध्ये पाणी नसते. हे का होतं आणि यावर काही उपाय आहे का आणि ते कोणते? हे आपण माहिती करून घेऊयात.

  • सर्व ठिकाणी सारख्याच उपायांचा परिणाम
  • आपल्याकडे बहुतेक सर्व प्रकारचे जलसंधारण उपाय हे सर्व ठिकाणी सारखेच केले जातात. म्हणजे, जिथे ५०० मिमी पाऊस आहे तिथे आणि जिथे ३३०० मिमी पाऊस आहे तिथेही सारख्याच पद्धतीने बंधारे बांधून
  • पाणी अडवण्याचा प्रयत्न केला जातो. यामध्ये तेथील भौगोलिक परिस्थिती, मातीचा प्रकार, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, प्रवाहाचा वेग, इत्यादी गोष्टी विचारात घेतल्या जात नसाव्यात. अशा पद्धतीने ही कामे झालेली दिसतात.
  • सह्याद्री पर्वतरांगेच्या दोन्ही उतारांवर आपल्याला या गोष्टींची जाणीव लवकर होते. अशा ठिकाणी पाऊस भरपूर असतो. डोंगराळ भाग असल्याने प्रवाहाचा वेग जास्त असतो, कोकणात तर पाण्याचा प्रवास समुद्राकडे सतत चालू असल्याने आणि समुद्र कमी अंतरावर असल्याने हाताने काम करायला वेळ आणि जागा मर्यादित असते. तीव्र उतारांमुळे एका ठिकाणी जास्त पाणीसाठा करणे जवळपास अशक्य असते. त्यातच, मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने माती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून बंधाऱ्यात साठते.
  •   कोकणात येणारा आणखी एक प्रश्न म्हणजे, हे बंधारे बांधताना तळाशी करण्यात येणारे सुरुंग स्फोट. इथला तळाचा कातळ अनेक ठिकाणी कच्चा असतो. जेव्हा स्फोट केले जातात, तेव्हा त्या कातळाला सूक्ष्म भेगा पडतात आणि मग त्या बुजवणे अशक्य असते. या भेगांमधून पाणी हळूहळू निघून जाते आणि बंधारा काही काळात कोरडा पडतो.
  •  चुकीच्या ठिकाणी बंधाऱ्याचे बांधकाम अनेक ठिकाणी लोकांच्या मागणीनुसार बंधाऱ्याची जागा निश्चित केली जाते, जेणेकरून तिथल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा. पण यामुळे तो बंधारा अनेकदा चुकीच्या जागी बांधला जातो. मग तो साठवणुकीचा बंधारा न होता पाझर तलावाचे काम करतो. अशा बंधाऱ्यात उन्हाळ्यात पाणी दिसत नाही. बऱ्याच वेळेला अशा बंधाऱ्यांची उंची जमिनीपासून ६ ते ७ फुटांपेक्षा जास्त नसते. आपल्याकडे असलेल्या बाष्पीभवनाचा विचार आणि गणित केले तर लक्षात येते, की वर्षभरात सुमारे दीड मीटरपेक्षा जास्त पाणी वाफ होऊन उडून जाते. त्यामुळे आपल्याला वापरण्यासाठी बांधलेल्या बंधाऱ्याच्या क्षमतेच्या जवळपास निम्म्या क्षमतेचा साठा करणे शक्य होते, जो आपल्याला उन्हाळ्यात उपयोगी पडू शकत नाही. अनेकदा, बंधारा बांधताना केलेल्या काही चुका, त्रुटी आणि अंमलबजावणीत झालेल्या गफलती यांचा थेट परिणाम बंधाऱ्याच्या दर्जावर होतो. त्यामुळे पाणी साठण्यापेक्षा वाहून जाणे जास्त अनुभवायला मिळते.

      ओढ्याची उंची जेव्हा ओढ्याच्या दोन्ही किंवा एखादी बाजू पुरेशी उंच नसते, तेव्हा तिथे बंधाऱ्याची उंची फारशी घेता येत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी पाणी जरी उत्तम साठू शकत असले तरी त्याचा फार काळ उपयोग करून घेता येणे शक्य होत नाही. अशा ठिकाणी असलेले बंधारे फक्त पाण्याचा वाहण्याचा वेग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. काही काळ पाण्याचा वेग कमी झाल्याने काही प्रमाणात पाणी आजूबाजूच्या जमिनीत मुरण्याची शक्यता वाढते.    अशा अनेक कारणांमुळे बहुतांश ठिकाणी बांधलेले बंधारे एक तर गाळाने भरतात किंवा पाणी वाहून किंवा बाष्प होऊन उडून गेल्याने कोरडे पडलेले दिसतात. अशा बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि बळकटीकरण करणे हा एक चांगला आणि कमी खर्चात होणारा उपाय होऊ शकतो. कारण, असे बंधारे बांधताना खर्च झालेला असतो, ती जागा उपायासाठी वापरली असते, त्यामुळे ती जागा सोडून दुसरीकडे काही उपाय करायचा म्हटले तर आधी केलेला खर्च आणि जागा दोन्ही वाया जाते. त्यामुळे शक्य असेल तर अस्तित्त्वात असलेला बंधारा दुरुस्त करणे हा सर्वात उपयुक्त ठरणारा उपाय आहे.

    बंधाऱ्याची दुरुस्ती आणि बळकटीकरण

  • दुरुस्ती आणि बळकटीकरण करताना तळाच्या दगडातील सूक्ष्म भेगा भरून काढणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. अनेकदा, बंधारे बांधताना तळाचा उत्तम कातळ लागेपर्यंत खाली खणण्याचे कष्ट घेतले जात नाहीत. अशा ठिकाणी पाणी बंधाऱ्याच्या खालील मातीतून झिरपून निघून जाते. दुरुस्ती करताना, बंधाऱ्याच्या तळाला चर खणून खालच्या उत्तम कातळापर्यंत जाऊन तिथून बांधकाम केले तर पाणी निघून जाणे टाळता येणे सहज शक्य होते. हा आमचा अनुभव आहे.
  • चेक डॅममध्ये माती आणि गाळ साठतो, याचे कारण प्रवाहाबरोबर आलेला गाळ वाहून जायला जागा नसते. सगळा गाळ त्या भिंतीला अडतो आणि बंधारा पाण्याऐवजी गाळाने भरून जातो. यावर एक चांगला आणि परिणामकारक उपाय करता येतो. पावसाळ्यात वाहून येणारा गाळ साठून राहू नये म्हणून या बंधाऱ्यात सर्वात खालच्या पातळीवर बाहेरून उघडबंद करता येणारे पाइप बसवावेत. पाइप किती असावेत हे त्या ठिकाणील प्रवाहाच्या वेगावर, ओढ्याची रुंदी, खोलीवर आणि जमिनीच्या उतारावर ठरवावे. पावसाळ्यात हे पाइप उघडे ठेवले जातात. त्यामुळे पाण्याबरोबर वाहून आलेला गाळ निघून जातो. पाऊस संपताना हे पाइप बाहेरच्या बाजूने झाकण लावून बंद करावेत. तोपर्यंत पाण्यावरोबरीने वाहून येणारी माती बंद झालेली असते, प्रवाहाचा वेगही बराच मंदावलेला असतो. त्यामुळे अशा बंधाऱ्यात गाळ किंवा माती येऊन साठत नाही. असे बंधारे जास्त पाणी आणि जास्त काळ पाणी साठवून ठेवू शकतात. पाइप किती व्यासाचा असावा हे त्या प्रवाहाच्या वेगावर आणि पाण्याबरोबर मागून येणाऱ्या दगड, गोटे, झाडे, इत्यादी गोष्टींच्या आकारावर ठरवावे.
  • कोल्हापूर पद्धतीने बांधलेले बंधारेदेखील याचप्रकारे दुरुस्त करता किंवा बदलता येऊ शकतात. कोल्हापूर बंधाऱ्यातील प्लेट्स बहुतांश वेळेला चोरीला जातात किंवा हरवतात. काहीही झाले तरी परिणाम एकच असतो, पाणी न थांबणे आणि बंधारा कोरडा पडणे. अशा बंधाऱ्यात बदल करून तिथेही उघड बंद करता येणारे पाइप टाकले तर त्यांची परिणामकारकता निश्चितपणे वाढते असा आमचा अनुभव आहे.
  • चेक डॅम आणि कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्यात वर सांगितल्याप्रमाणे अभ्यासकरून योग्य बदल  केले आणि त्याची अंमलबजावणी बिनचूक झाली तर त्या आधी निरुपयोगी ठरलेल्या बंधाऱ्यात नंतर पाणी दीर्घकाळ अडवणे आणि साठवणे सहज शक्य होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा बंधाऱ्यात गाळ फारसा साठत नाही, त्यामुळे त्यातील गाळ काढायचा खर्च वारंवार करावा लागत नाही. बंधाऱ्यात पाणी साठायला जास्त जागा शिल्लक राहते.
  • - डॉ. उमेश मुंडल्ये,  ९९६७०५४४६०,

    ( लेखक पाणी, पर्यावरण आणि शेती विषयाचे अभ्यासक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com