चक्रीवादळानंतर फळबागेतील परिस्थितीनुसार उपाययोजना

रविवार -सोमवार (ता. १६ ते १७) उत्तर कोकणामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, यामुळे कोकणातील शेती व बागायतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळानंतर उद्‍भवणाऱ्या फळबागेतील परिस्थितीनुसार उपाययोजना
चक्रीवादळानंतर उद्‍भवणाऱ्या फळबागेतील परिस्थितीनुसार उपाययोजना

प्रादेशिक हवामान केंद्र, भारत मौसम विज्ञान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आज रविवारी (ता. १६) चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या तौत्के वादळाच्या प्रभावामुळे कोकणामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकणात काही भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. रविवार -सोमवार (ता. १६ ते १७) उत्तर कोकणामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, यामुळे कोकणातील शेती व बागायतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी.   आंबा व काजू बाग -

  •   रोगग्रस्त आणि धोकादायक फांद्यांची छाटणी करावी. 
  •   वादळामुळे पडलेली सर्व पक्व व पक्वतेच्या जवळची आंबा फळे गोळा करून जमिनीमध्ये खड्ड्यात खोलवर पुरून टाकावीत. यामुळे भविष्यातील फळमाशीचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होईल.
  •   अधिक वाऱ्याच्या वेगामुळे अपरिपक्व फळे पडण्याची शक्यता आहे. अशा फळांपासून आमचूर तयार करणे शक्य आहे. त्यासाठी अशी फळे गोळा करून घ्यावीत.
  • वाकलेली कलमे  वाऱ्याच्या वेगामुळे कलमे वाकण्याची शक्यता आहे. अशा कलमांच्या उंच वाढलेल्या फांद्यांची तसेच अतिरिक्त फांद्यांची छाटणी करून घ्यावी. ही कलमे उपलब्ध साधनांचा आधार देत उभी करावीत. कलमे उभी करताना मातीमध्ये प्रति झाड ३ ते ४ घमेली कुजलेले शेणखत व २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण घालावे. कलम उभे केल्यानंतर त्यास मातीची चांगली भर द्यावी. या कलमांवर क्लोरपायरिफॉस २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. तसेच १ टक्का बोर्डो मिश्रणाची स्वतंत्र फवारणी करावी.कापलेल्या फांद्या बागेमधून बाहेर काढून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी.  फांद्या मोडून गेलेली कलमे  कलमांच्या फांद्या पिळवटलेल्या असल्यास अशा फांद्या धारदार हत्याराच्या साह्याने कापून घ्याव्यात. कलमांच्या बुंध्यापासून ४ ते ५ पेक्षा जास्त फांद्या असल्यास मध्य फांदी व इतर अनावश्यक फांद्यांची विरळणी करावी. फांद्या कापलेल्या भागावर ब्रशच्या साह्याने काळे डांबर लावावे. त्यावर क्लोरपायरिफॉस २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे संपूर्ण कलमावर फवारणी करावी. तसेच संपूर्ण कलमावर १ टक्का बोर्डो मिश्रणाची स्वतंत्र फवारणी करावी. कापलेल्या फांद्या बागेमधून बाहेर काढाव्यात.  वरीलप्रमाणे पुनर्स्थापित केलेल्या आंबा कलमांवर दर १५ ते २० दिवसांच्या अंतराने पुन्हा एकदा वरील फवारण्या कराव्यात. संपूर्ण उन्मळून गेलेली कलमे  वादळामध्ये संपूर्णपणे उन्मळून जाणाऱ्या कलमांचे पुनर्स्थापन करणे अत्यंत कठीण असते. मात्र अशी कलमे बागेमध्ये पडून राहिल्यास त्यावर खोडकिडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यातून पूर्ण बागेमध्ये खोड किडीचा शिरकाव होऊ शकतो. अशा कलमांच्या फांद्या, खोडे, मुळे इ. भाग धारदार हत्याराच्या साह्याने कापून हे भाग बागेमधून बाहेर काढावेत. पालापाचोळा गोळा करून तो कंपोस्ट खड्ड्यात किंवा गांडूळ खतनिर्मितीसाठी वापरून बाग स्वच्छ करावी. या जागेवर नवीन आंबा कलमांच्या लागवडीसाठी नियोजन करावे.  नारळ, सुपारी 

  • वादळी वाऱ्यामुळे नारळ किंवा सुपारी बागांमध्ये झावळ्या, पेंड्या, शिंपट्या, नारळ, सुपारी इ. मोडून पडण्याची शक्यता आहे. हे सर्व अवशेष गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी. मोडून लोंबकळत असलेल्या झावळ्या तोडून योग्य विल्हेवाट लावावी. बागेतील सर्व झाडांना १ टक्का बोर्डो मिश्रणाची आळवणी करावी. 
  •   वाऱ्याच्या वेगामुळे कमी वयाची नारळ किंवा सुपारी झाडे वाकण्याची शक्यता आहे. अशा माडांना योग्य आधार देऊन सरळ उभे करून घ्यावे. माड उभा करताना प्रति माड ३ ते ४ घमेली कुजलेले शेणखत आणि २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण बुंध्यामध्ये घालावे. माड उभे केल्यानंतर त्यास मातीची चांगली भर द्यावी. ते पुनर्स्थापित होण्यास मदत होईल. 
  •   वादळाने संपूर्णपणे उन्मळून गेलेली झाडे पुनर्स्थापित करणे कठीण असते. अशी झाडे बागेमध्येच पडून राहिल्यास त्यावर सोंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव होऊन पूर्ण बागेमध्ये या किडींचा शिरकाव होऊ शकतो. त्यामुळे माडाचे सर्व अवशेष बागेबाहेर काढून योग्य विल्हेवाट लावावी. 
  •   बाग स्वच्छ करावी. 
  •   बागेतील रिकाम्या झालेल्या जागांवर नवीन नारळ रोपांची लागवड करावी. 
  • कोकम   सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पक्व तसेच अपरिपक्व फळे पडण्याची शक्यता आहे. अशी पडलेली फळे गोळा करून यापैकी पक्व फळे कोकम सरबत किंवा आगळ तयार करण्यासाठी वापरावीत. अपरिपक्व फळे फोडून सुकवून कोकम फोडी करण्यासाठी वापरावीत.  मसाला पिके व अन्य फळबागा 

  •   वाऱ्याच्या वेगाने मसाला पिकाच्या वाकलेल्या झाडांचे उंच वाढलेले शेंडे अर्ध्यावर कापून घ्यावी. त्यांना योग्य आधार देऊन उभी करावीत. झाडे उभी करताना बुंध्याजवळ प्रति झाड ३ ते ४ घमेली कुजलेले शेणखत व २ किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण घालावे. या झाडांना मातीची चांगली भर द्यावी. संपूर्ण बागेवर १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. कापलेल्या फांद्या आणि इतर अवशेष यांनी योग्य विल्हेवाट लावावी. 
  •   जायफळ, लवंग व अन्य मसाला पिकांची झाडे उन्मळून पडली असल्यास त्यांच्या फांद्या, खोड, मुळे इ. भाग कापून बागेबाहेर काढावेत.  त्यांची योग्य ती विल्हेवाट लावावी. पालापाचोळा गोळा करून कंपोस्ट किंवा गांडूळ खत बनविण्यासाठी वापरावा. या रिकाम्या जागेवर नवीन कलमांच्या लागवड करण्याचे नियोजन करावे. 
  • भात खाचरे  मुसळधार पावसामुळे शेताचे बांध वाहून जाण्याची शक्यता आहे. यासाठी शेताच्या बांधाची योग्य प्रकारे बांध बंदिस्ती करून घ्यावी. शेतातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी ठेवलेले चर दुरुस्त करून घ्यावेत. त्यांची स्वच्छता करावी. ०२३५८-२८२३८७ डॉ. व्ही. जी. मोरे, ०९४२२३७४००१ (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com