agricultural stories in Marathi, management techniques in Draught prone area | Page 2 ||| Agrowon

कोरडवाहूमध्ये कमी खर्चात उत्पादनासह जलसंवर्धन आवश्यक
प्र. र. चिपळूणकर
बुधवार, 5 जून 2019

अवर्षण स्थितीमध्ये सर्वांत अधिक फटका हा कोरडवाहू शेतकऱ्याला बसतो. तो कमी करण्यासाठी कोरडवाहूमध्ये खर्चात बचत साधतानाच सुपिकता आणि जलसंवर्धन साधणेही अत्यंत आवश्यक आहे. सध्या केवळ मिश्रपिकांच्या लागवडीची शिफारस केली जात असली, तरी त्यात काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता आहे.

अवर्षण स्थितीमध्ये सर्वांत अधिक फटका हा कोरडवाहू शेतकऱ्याला बसतो. तो कमी करण्यासाठी कोरडवाहूमध्ये खर्चात बचत साधतानाच सुपिकता आणि जलसंवर्धन साधणेही अत्यंत आवश्यक आहे. सध्या केवळ मिश्रपिकांच्या लागवडीची शिफारस केली जात असली, तरी त्यात काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता आहे.

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. मागील वर्षी पाऊस लवकर गेल्याने अनेक जिल्ह्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. कोरडवाहू शेतीत अशावेळी नापिकी होते. पाऊस जाऊन दुष्काळ पडण्याची शक्‍यता लक्षात येईपर्यंत शेतकऱ्यांचा पीक लागवडीसंदर्भातील बहुतांश खर्च झालेला असतो. शेवटच्या टप्प्यात पावसाने दगा दिल्यास संपूर्ण पीक हातून जाते. अनेक वेळा जनावरांना चाराही मिळत नाही. अशा वेळी शेतकरी सर्व बाजूने अडचणीत येतो. दुष्काळ हे एक नैसर्गिक संकट असले, तरी त्यावर काहीच उपाय नाही का?

महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांतील शास्त्रज्ञांचे एकत्रित जॉइंट ऍग्रेस्को नुकतेच पार पडले. त्याच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीसाठी नेमक्या उपाययोजनांची विचारणा विचारवंत करताना दिसतात. यावर शास्त्रज्ञांकडून अद्यापही मिश्रपीक घेण्याची शिफारस केली जाते. या तंत्रात काळानुरूप काही सुधारणा करणे गरजेचे आहे का? यावर आपण या चर्चा करणार आहोत. संशोधन व बदल ही सतत चालणारी प्रक्रिया असून, सदर लेखनातून कोणावरही टीका करण्याचा अजिबात उद्देश नाही.

अवर्षण प्रवण भागातील कोरडवाहू अगर संरक्षित पाणी देण्याची सोय असलेल्या क्षेत्रातील समस्या जाणून घेण्याची आवश्यकता आहे.
१) कोरडवाहूखालील जमिनीचे प्रमाण सिंचित क्षेत्राच्या तुलनेमध्ये प्रचंड आहे.
२) क्षेत्र मोठे असल्याने शिफारशीएवढा सेंद्रिय खतांचा पुरवठा अपवादानेच केला जातो.
३) पावसाचे प्रमाण अनियमित असून, एकावेळी जादा पाऊस पडून सरासरी भरून निघते. दोन पावसाच्या सत्रात मोठे खंड पडून पिके वाळतात.
४) उत्पन्नाची हमी देणाऱ्या पिकांचे प्रमाण अत्यल्प.
५) शेतकऱ्यांची क्रयशक्ती अत्यंत कमी.

शेतीचे प्रमाण मोठे असले, तरी वर्षभर जनावरे सांभाळणे परवडत नसल्याने जनावरांचे प्रमाण कमी होत गेले आहे. बहुतेक कामे ट्रॅक्टर व यंत्राकरवी पार पाडली जातात. घरचे शेणखत उपलब्ध नाही, विकत घेऊन टाकणे परवडणारे नाही. परिणामी, शेतीला सेंद्रिय खतांचा पुरवठा वर्षानुवर्षे होत नाही. कोरडवाहू शेतीमध्ये शेणखत न वापरले जाणे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्‍न असूनही त्यावर फारसे चिंतन होताना दिसत नाही. शेतीबाहेर संपूर्णपणे कुजलेले शेणखत वापरण्याची शिफारस ही सूक्ष्मजीवशास्त्रीय तत्त्वानुसार चुकीची आहे. उलट शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थ कुजत राहिला पाहिजे. याकरिता पारंपरिक पद्धतीत काही बदल करावे लागतील. जमिनीची सुपिकता राखण्यासाठी हे काम स्वस्तातच नव्हे, तर फुकटात झाले पाहिजे. त्यासाठी खालील उपाययोजनांकडे शेतकऱ्यांना वळावे लागेल.

पूर्व मशागतपासून शून्य मशागतीकडे जाणे ः

महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रात कापूस व तूर ही मुख्य पिके, तर मूग, उडीद, सोयाबीन पिकासोबत रब्बीत हरभरा, करडई अशी पिके घेतली जातात. सध्या कोरडवाहूसाठी असलेल्या शिफारशीनुसार मिश्रपिकाच्या पेरणीसाठी सर्व जमिनीची पूर्व मशागत व पेरणी यंत्राने पेरणी करावी लागते. यापेक्षा पहिल्या टप्प्यात मिश्रपिकाचे क्षेत्र वेगळे ठेवून, तेवढ्या क्षेत्राची मशागत करावी. त्या पिकाची पेरणी यंत्राने पेरणी करावी. मुख्य पिकाची शून्य मशागतीवर फक्त काकर मारून टोकण पद्धतीने पेरणी करावी. पूर्व मशागत खर्चात बचत करणे शक्‍य होईल.

सेंद्रिय खत व्यवस्थापन ः

मुख्य पिकाच्या दोन ओळीत १५० ते १८० सें.मी. अंतर ठेवावे व पिकाचे दोनही बाजूला ३० सें.मी.चा पट्टा स्वच्छ ठेवावा. दोन ओळींमधील ९० ते १२० सें.मी.च्या पट्ट्यात तण वाढू द्यावे. मोठे झाल्यानंतर उलट्या वखराने झोपवून तणनाशकाने मारावे. पुढे त्याचे यथावकाश खत होते. या तंत्रातून एका दगडात अनेक पक्षी आपण मारणार आहोत.
१) जमिनीला दर वर्षी भरपूर सेंद्रिय खत मिळते.
२) अनेक प्रकारच्या वनस्पतीपासून तयार झालेले खत मिळू शकते. लवकर, मध्य व उशिरा कुजणाऱ्या पदार्थामुळे सर्व प्रकारच्या कुजविणाऱ्या जिवाणूंना खाद्य (जैव वैविध्य) मिळते.
३) जमिनीवर आच्छादन झाल्याने बाष्पीभवन रोखले जाऊन ओलावा टिकून राहतो.
४) तणाच्या मुळाकडून जमिनीची आपोआप मशागत होते.
५) जमिनीची जलधारण शक्ती वाढते. मिश्रपीक काढणीनंतर उघड्या जमिनीतून बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर होते. या तुलनेत आपल्या पद्धतीत पाऊस गेल्यानंतर पिकाच्या गरजेइतका ओलावा या तणांच्या माध्यमातून ५०-६० दिवसांपर्यंत टिकून राहतो.
६) मुख्य पिकाच्या जमिनीची पूर्व मशागत, आंतर मशागत न केल्यामुळे निंदणी खर्चासह मनुष्यबळ खर्चात बचत होते.
७) एखादा पाऊस पडल्यास मोकळ्या जमिनीपेक्षा तणांच्या मुळाच्या जाळ्यात कित्येक पट जास्त पाणी धरून ठेवले जाते. जिवंत मुळामध्ये पाणी ८०-८५% असते.
८) तणे मृत झाल्यानंतर हळूहळू ती वाळत जातात. आकसत जाताना जमिनीत अनेक लहानमोठ्या पोकळ्या निर्माण होतात. त्यात हवा खेळती राहते. पिकांसोबत कार्य करणारी सर्व जिवाणूसृष्टी हवेच्या सान्निध्यात काम करणारी आहे. त्यांना खेळत्या हवेमुळे फायदा होतो. एकूणच पिकाच्या उत्पादनवाढीला मदत होते.
९) थेट जमिनीतच सेंद्रिय पदार्थ कुजत राहतात. या प्रक्रियेचा जमिनीला फायदा होतो.
१०) पिकाचा पट्टा व तणाचा पट्टा यामुळे जमिनीची धूप होत नाही.
११) तणाच्या मुळाच्या जाळ्यातून पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचा वेग वाढतो. फार मोठ्या पावसातही रानात पाणी आडवे वाहत नाही. हेच मूलस्थानी जलसंवर्धन. याला कोरडवाहू शेतीत फार महत्त्व आहे.
१२) पिकाच्या कापणीनंतर कापूस अगर तूर या दोन पिकांची खोलवर गेलेली सोटमुळे तशीच जमिनीत ठेवावीत. पिकाच्या वरील भागाचा रोटाव्हेटरने चुरा करावा अगर जळणासाठी घेऊन जावे. अनेक भागांमध्ये वीजनिर्मितीसाठी हे जळण विकत घेतले जाते.
१३) पुढील वर्षी तणाच्या पट्ट्यात पीक, पिकाच्या पट्ट्यात तणाचा पट्टा अशी रचना करावी.
१४) कापूस व तूर या दीर्घ मुदतीच्या पिकाला जितका दीर्घकाळ ओलावा उपलब्ध करून देता येईल, तितके उत्पादन जास्त मिळते. वरील पद्धतीने कोणताही अतिरीक्त खर्च न करता आपण ओलावा मिळवून देऊ शकतो.
१५) अधूनमधून पिकाची फेरपालट करून कमी मुदतीच्या व जास्त मुदतीच्या पिकाचे उत्पादन घ्यावे. त्याने सर्व जमिनी सुपीक होतील.
१६) सर्व खर्चात बचत होत असल्याने उत्पादन खर्च कमी राहतो. तीव्र दुष्काळ स्थितीमध्ये अगदी नापिकी झाली तरी नुकसान पातळी सहनशीलतेच्या मर्यादेत राहू शकते. उत्तम पाऊस असलेल्या वर्षी उत्तम उत्पादन, मध्यम साली किमान गरजेइतके उत्पादन शक्य होईल. यातून कोरडवाहू शेतीमध्ये शाश्‍वतता आणता येईल.
१७) दुष्काळ सांगून येत नाही. चालू वर्षी ९५ ते १००% पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तरीही दुष्काळ गृहित धरूनच पिकाचे नियोजन करणे गरजेचे आहे. मागील वर्षीच्या दुष्काळात अनेक शेतकऱ्यांनी या पद्धतीने चांगले उत्पादन मिळवले. कोरडवाहू शेतीत फक्त पीक उत्पादन केंद्रस्थानी ठेवून शेती करू नये. त्याऐवजी पीक उत्पादन व जलसंवर्धन कमीत कमी खर्चात कसे साधता येईल, याचा विचार झाला पाहिजे.

इतर ग्रामविकास
कन्या वन समृद्धी योजनाशेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली, तर तिच्या...
लोकसहभागातून कुरण विकासाची गरजगवताळ कुरणे मृदा-जल संवर्धनासाठी गरजेची आहेत,...
मांडा जलसंधारणाच्या कामाचे गणितमागच्या भागात आपण नागरी आणि ग्रामीण भागातील...
बहुवीध पीक पद्धतीतून चांडोलीच्या...चांडोली खुर्द (जि. पुणे) हे गाव १९८५ पर्यंत...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
काटेकोर जलव्यवस्थापनाद्वारे खेडी खुर्द...खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील शेतकऱ्यांनी...
जीविधेची जाणीव करून देणारी आनंदशाळाशिक्षण गुणवत्तापूर्ण बनण्यासाठी शिक्षण...
योग्य पद्धतीने करा कूपनलिका पुनर्भरणमागच्या भागात आपण विहीर आणि कूपनलिका यांमधील फरक...
गटशेतीच्या सुलभ व्यवस्थापनासाठीशेतकरी गट स्थापन होऊन गटशेतीस सुरवात करताना पुढील...
गोष्ट तलावांचा श्वास मोकळा करण्याची...तलावांमध्ये बेशरम वनस्पतीचा पसारा वाढला तर आवश्यक...
भाजीपाला पिकातून कळवंडे झाले...रत्नागिरी जिल्ह्यातील कळवंडे (ता. चिपळूण) गाव...
कोरडवाहूमध्ये कमी खर्चात उत्पादनासह...अवर्षण स्थितीमध्ये सर्वांत अधिक फटका हा कोरडवाहू...
विहीर अन्‌ कूपनलिका नेमकी कोठे खोदावी?आपल्या जागेमध्ये विहीर करायची की कूपनलिका करायची...
गटशेतीतील जबाबदाऱ्यांचे वाटपशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
सुधारित शेती, ग्रामविकासाच्या...लहान (ता.अर्धापूर, जि. नांदेड) गावातील...
भूमिगत बंधारा वाढवेल विहिरींची पाणी...सध्या अनेक गावांमध्ये विहिरीचे पाणी लवकर...
गटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
संरक्षित शेतीतून आर्वीतील शेतकऱ्यांची...वाढती पाणीटंचाई आणि  बदलत्या हवामानामुळे...