हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ

बाजारपेठेत हरभऱ्याच्या दरात वाढ होत आहे.
बाजारपेठेत हरभऱ्याच्या दरात वाढ होत आहे.

या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू वगळता सर्व शेतमालाचे भाव घसरले. हळदीतील घट नवीन पिकाच्या आवकेच्या अपेक्षेने झालेली आहे. सोयाबीनमधील घट फार नाही. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत मका, साखर व गहू वगळता इतर सर्व वस्तूंचे भाव वाढतील.

या पुढे खरीप पिकाची आवक कमी होत राहील. रब्बीचे उत्पादन समाधानकारक असेल अशी अपेक्षा आहे. गेल्या महिन्यात साखर, हळद, हरभरा व कापसाचे भाव उतरत होते. मका व सोयाबीनचे भाव वाढत आहेत. चालू वर्षी सोयाबीन पेंडीच्या निर्यात मागणीत वाढ झाली आहे. ब्राझीलमध्ये उन्हाळा वाढल्यामुळे तेथील पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याच्या भीतीने व अमेरिका-चीन वादात अजून फारशी प्रगती नसल्यामुळे सोयाबीनचे भाव वाढत आहेत. सोयाबीन पेंडीची निर्यात मागणी वाढती आहे. हरभऱ्याचा व्यापाऱ्यांकडील साठा कमी होत आहे. हरभऱ्याची निर्यात व स्थानिक मागणी वाढती आहे. मात्र शासनाचा साठा भाव वाढीवर नियंत्रण करेल. सोयाबीन भाव वाढीचा परिणाम मक्याच्या वाढीवरपण होत आहे; कारण दोन्ही पिकांचा वापर पशुखाद्य निर्मितीसाठी केला जातो. पशुखाद्याची मागणी वाढती आहे. १ फेब्रुवारीपासून जून २०१९ साठी रब्बी मका, खरीप मका, गहू व गवार बी यांचे व्यवहार सुरू झाले. जुलै २०१९ साठी कापूस, सोयाबीन आणि हरभरा यांचे तर ऑगस्ट २०१९ व सप्टेंबर २०१९ साठी सोयाबीनचेसुद्धा व्यवहार सुरू झाले आहेत. सोयाबीनचे व्यवहार आता पुढील ८ महिन्यांसाठी करता येतील. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढ-उतार खालीलप्रमाणे होते. मका रब्बी मक्याच्या (मार्च २०१९) किमती १८ जानेवारीनंतर वाढत होत्या. (रु. १,३०० ते रु. १,४६२) या सप्ताहात त्या रु. १,५०५ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (सांगली) रु. २,१०० वर आल्या आहेत. हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). बाजारातील किमती आता हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बीचे उत्पादन चांगले होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुढे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील. साखर साखरेच्या (मार्च २०१९) किमती जानेवारीमध्ये घसरत होत्या (रु. ३,०६९ ते रु. ३,०१९). सध्या रु. ३,००९ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. २,९८४ वर आलेल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे.  साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत. सोयाबीन   सोयाबीन फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात वाढत होत्या (रु. ३,२५६ ते रु. ३,८७०). या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ३,८६१ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,८६१ वर आल्या आहेत. नवीन हमीभाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). निर्यात मागणी वाढत आहे. त्यामुळे पुढील महिन्यात किमती वाढण्याची शक्यता आहे. ५ फेब्रुवारी रोजी मार्च, एप्रिल, मे, जून व जुलै डिलिव्हरीसाठी अनुक्रमे रु. ३,८६१, ३,९०३, ३,९४१, ३,९७९ व ४०१७ भाव होते.  

हळद हळदीच्या फ्युचर्स (एप्रिल २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या (रु. ६,७५८ ते रु. ६,३९८). या सप्ताहात त्या गेल्या सप्ताहाच्या तुलनेने ०.८ टक्क्यांनी घसरून रु. ६,३४६ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ६,६२५ वर आल्या आहेत. जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने ०.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ६,५३८). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे; पण आता आवकसुद्धा वाढत आहे. या वर्षी उत्पादन वाढलेले असेल. त्याचा परिणाम किमती कमी होण्यावर होत आहे.   गहू      गव्हाच्या (मार्च २०१९) किमती १७ जानेवारीपर्यंत घसरत रु. २,०७७ पर्यंत आल्या. नंतर त्या काहीशा वाढत आहेत. या सप्ताहात त्या रु. २,११२ वर आल्या आहेत. एप्रिल २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.३ टक्क्यांनी कमी आहेत (रु. २,०२५). रब्बी पिकाच्या अपेक्षेने पुढील काही दिवस मर्यादित घसरण अपेक्षित आहे. नवीन हमी भाव रु. १,८४० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,७३५ होता). एप्रिल-मे मध्ये बाजारभाव हमी भावापेक्षा अधिक असतील. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात रु. ४,२४१  व रु. ४,४६३ या दरम्यान चढ-उतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या १.९ टक्क्यांनी घसरून रु. ४,२९६ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती रु. ४,३०० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा एप्रिल २०१९ मधील फ्युचर्स किमती २.३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३९८). खनिज तेलाच्या आंतर-राष्ट्रीय किमतींवर पुढील घट किंवा वाढ अवलंबून आहे. हरभरा हरभऱ्याच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. ४,४७६ ते रु. ४,२१०). या सप्ताहात त्या रु. ४,२४२ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,१४४ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (बिकानेर) किमतींपेक्षा जून २०१९ मधील फ्युचर्स किमती ६.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,३९९). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. नवीन हमीभाव रु. ४,६२० आहे. (गेल्या वर्षी तो रु. ४,४०० होता). मागणी वाढती आहे. रब्बीची आवक सुरू झाल्यावर बाजारभाव हमीभावाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (मार्च २०१९) किमती जानेवारी महिन्यात घसरत होत्या. (रु. २१,५८० ते रु. २१,१४०). या सप्ताहात त्या रु. २०,८३० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २०,४६५ वर आल्या आहेत. मे २०१९ च्या फ्युचर्स किमती रु. २३,००० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. गुजरातमधील कमी पावसाचा उत्पादनावर परिणाम होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निर्यात मागणी अजूनही अनिश्चित आहे. यामुळे सध्याची घसरण होत आहे. मात्र निर्यात मागणी वाढली तर ही घसरण थांबू शकेल. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किंमत प्रती १७० किलोची गाठी).

 - डॉ.अरूण कुलकर्णी, arun.cqr@gmail.com

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com