मोनेरा फाउंडेशन देतेय पर्यावरण, शिक्षण अन् ग्रामविकासाला दिशा

विद्यार्थ्यांना गाव परिसरातील पशुपक्ष्यांची माहिती सांगताना अजिंक्य बेर्डे
विद्यार्थ्यांना गाव परिसरातील पशुपक्ष्यांची माहिती सांगताना अजिंक्य बेर्डे

परिसरातील पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जागृती हा हेतू ठेवून शाहूवाडी (जि. कोल्हापूर) तालुक्यातील महाविद्यालयीन युवक-युवतींनी एकत्र येत २०१२ मध्ये ‘मोनेरा फाउंडेशन’या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. संस्थेतर्फे देवराई संवर्धन, विद्यार्थांसाठी निसर्ग विज्ञान शिबिर, पर्यटन मार्गदर्शन, असे उपक्रम राबविले जातात.

जागतिक वारसा स्थळ असणारा पश्चिम घाट जैवविविधतेने समृद्ध आहे. पश्चिम घाटाचा एक पट्टा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. या जैवविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी शाहूवाडी तालुक्यातील आंबा गाव परिसरात मोनेरा फाउंडेशन (मेंबर्स ऑफ नॅचरल इकोलॉजिकल रिसर्च असोसिएशन) या स्वयंसेवी संस्थेने आपले कार्य सुरू केले. संस्था लोकसहभागातून ग्रामीण भागात जैवविविधता संरक्षण, बालशिक्षण, महिला सशक्तीकरण आणि ग्रामविकासामध्ये कार्यरत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सामाजिक जाणिवेतून समविचारी मित्र-मैत्रिणींना एकत्र करत अजिंक्य बेर्डे यांनी संस्थेची स्थापना केली. वैभव पाटील हे संस्थेचे अध्यक्ष आणि कुमारी प्रज्ञा कांबळे या संस्थेच्या उपाध्यक्षा आहेत. संस्थेचे सदस्य स्व खर्चातून विविध उपक्रम लोकांच्या सहकार्याने राबवितात.  निसर्ग संवर्धनाबरोबर संशोधन अणि प्रबोधन वाढीस लागावे, ग्रामीण भागातून जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षण आणि संशोधन क्षेत्राकडे वळावेत यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. महिलांसाठी प्रशिक्षण शिबिरे, आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते. संस्थेचे सदस्य वाढदिवसानिमित्त दुर्गम वाडी, वस्तीवरील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू देतात.

वन्यजीवांसाठी पाणवठे, प्लॅस्टिकमुक्त जंगल जंगलातील वाढता मानवी हस्तक्षेप वन्यजीव आणि मानव संघर्ष वाढीस नेतो. याचे बारकाईने निरिक्षण केले असता असे दिसून आले, की उन्हाळ्यात जंगलातील पाणीटंचाईमुळे गवे शेतामध्ये शिरतात. गेल्या चार वर्षांपासून संस्थेने आंबा जंगलातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणवठे पुनरुज्जीवन आणि निगा राखण्याचा उपक्रम सुरू केला आहे. संस्थेतर्फे जंगलातील वाघझरा, मानोली धरण, आंबेश्वर देवराई, पावनखिंड परिसरात स्वच्छता मोहिम राबविली जाते. जंगल परिसर स्वच्छ आणि सुंदर राहावा यासाठी जनजागृती केली जाते.

राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन पश्चिम घाट जैवविविधता संवर्धन या विषयासंबंधी नुकतेच एक दिवसीय राष्ट्रीय संमेलन प्रा. डाॅ. एन. डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर, मोनेरा फाउंडेशन आणि प्लॅनेट अर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पश्चिम घाट संवर्धन आणि जतन या विषयी तज्ज्ञांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. देशभरातून आलेल्या निसर्गप्रेमींना या संमेलनाचा चांगला फायदा झाला.

संस्थेचे उपक्रम नैसर्गिक रंगनिर्मिती : रासायनिक रंगांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन संस्थेच्या माध्यमातून विविध गावांतील शाळांमधून दरवर्षी नैसर्गिक रंगनिर्मिती आणि त्यांचे महत्त्व या संदर्भात शाळांमध्ये कार्यशाळा घेण्यात येते. ग्रामोद्यान : ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावाच्या हक्काचे ग्रामोद्यान तयार करावे ही संकल्पना संस्थेने पन्हाळा परिसरातील दिगवडे या गावात राबविली. या ग्राम उद्यानात प्रामुख्याने देशी वृक्षांची लागवड केल्यामुळे जैवविविधता वाढीस लागणार आहे.

निसर्ग विज्ञान शिबिर : विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाची आवड निर्माण होण्यासाठी संस्था दरवर्षी दिवाळी सुटी आणि मे महिन्यात निसर्गविज्ञान शिबिराचे आयोजन करते. विज्ञान आणि निसर्ग यांची सांगड घालून निसर्गाच्या सहवासात राहून वैज्ञानिक दृष्टिकोन कसा निर्माण करायचा या संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येते. आनंदवर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे अभ्यासात्मक खेळ घेतले जातात. संस्थेच्या उपक्रमाची प्रेरणा घेऊन आता जळगाव शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी पर्यावरण संवर्धन आणि शैक्षणिक उपक्रमांना सुरवात करणार आहेत.

कापडी पिशव्यांबाबत जागृती : प्लॅस्टिकचे पर्यावरण तसेच मानवी आरोग्यावर होणारे परिणाम लोकांपर्यंत पोचविण्यासाठी विविध गावांत कार्यशाळांचे आयोजन केले जाते. महिलांना कापडी पिशव्या बनवण्याची सोपी पद्धत शिकवली जाते. गावामध्ये तसेच शाळांमधून कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात येते.

पावनखिंड अभ्यास दौरा : शालेय विद्यार्थ्यांना इतिहासाचे महत्त्व समजावून देण्यासाठी अभ्यासक्रमाला अनुसरून पावनखिंड अभ्यास दौरा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येतो. यामध्ये विद्यार्थ्यांना पारंपरिक वेशभूषेत पावनखिंड या ठिकाणी रणसंग्राम विषय शिकवला जातो.

मोनेरा रेस्क्यू टीम कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर असलेला आंबा घाट हा कोकण आणि घाटमाथा या दोन भौगोलिक प्रदेशांना जोडतो. घाटामध्ये दुर्दैवी अपघातात सापडलेल्या व्यक्ती आणि वन्यजीवांना त्वरित मदत करण्यासाठी मोनेरा रेस्क्यू टीम सदैव कार्यरत असते. आंबा ते विशाळगड रस्त्यावर रात्रीच्या वेळी वन्यपशूंचे होणारे अपघात लक्षात घेऊन हा मार्ग रात्रीच्या वाहतुकीसाठी बंद व्हावा, अशी मागणी संस्थेने केली आहे.

अभ्यासपूर्ण पर्यटन मार्गदर्शन संस्थेचे सदस्य विविध विषयांत प्रावीण्य मिळविलेले आहेत. रोहित पाटील हा भूगर्भशास्त्र तर अजिंक्य बेर्डे, रतन मोरे, पांडुरंग बागम हे वनसस्पतिशास्त्र आणि सतपाल गंगलमाले हा पक्षी निरीक्षणामध्ये पारंगत आहे. हे सर्व सदस्य आंबा राखीव जंगल क्षेत्राला भेट देणाऱ्या पर्यटकांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करतात. यातून मिळणाऱ्या रकमेतील काही भाग हा विविध सामाजिक कामांसाठी वापरला जातो.

देवराई संवर्धन, निर्माण अभियान

हजारो वर्षांची परंपरा असलेल्या देवराया दुर्लक्षामुळे नष्ट होत आहेत. शाहूवाडी परिसरातील देवरायांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी संस्था गावांच्यामध्ये जाणीव जागृतीसाठी उपक्रम राबविते. विविध गावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी सातत्याने देवराई अभ्यास दौरा आयोजित केला जातो. संस्थेने  देवराई संवर्धनासाठी काही बाबी निश्चित केल्या गेल्या. त्यातून देवराई निर्माण अभियानाची संकल्पना पुढे आली. तालुक्याचा अभ्यास करून जिथे मंदिर आहे पण देवराई नाही, अशा ठिकाणांची यादी निश्चित केली. संस्थेने चार वर्षांपासून ग्रामस्थांच्या सहभागातून मलकापूर जवळील मुठकलवाडी येथील मुठकेश्वराच्या टेकडीवर देवराई निर्माण अभियानाची सुरवात केली. येत्या काळात संस्थेने निवडलेल्या गावातील मंदिर परिसरात देवराई, नक्षत्र वन, पंचवटी वनांच्या उभारणीचे नियोजन केले आहे. या माध्यमातून वनसंवर्धनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. विविध उपक्रमांची दखल घेत मोनेरा संस्थेला कोल्हापूर येथील डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशनतर्फे राजलक्ष्मी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

- अजिंक्य बेर्डे ः ९४२१४७१८१८   (लेखक मोनेरा फाउंडेशनचे संस्थापक सदस्य आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com