केदार तळ्याने ६५ वर्षांनंतर घेतला मोकळा श्‍वास

कांदे येथे पर्यटकांचा ओघ कसा वाढवता येईल, याचा विचार करून तळे सुशोभीकरणाचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी लोकांची साथ मिळत आहे. यातून गावशिवारात पर्यटनाला चालना मिळेल. - सुवर्णा पाटील, सरपंच
कांदे (जि. सांगली) येथील ग्रामस्थांनी एकत्र येत केदार तळ्यातील गाळ काढला. गाळ काढल्याने तळ्यातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.
कांदे (जि. सांगली) येथील ग्रामस्थांनी एकत्र येत केदार तळ्यातील गाळ काढला. गाळ काढल्याने तळ्यातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.

कांदे (ता. शिराळा,जि.सांगली) गावामध्ये लोकसहभागातून दीड महिन्याच्या अथक प्रयत्नांतून केदार तळ्यातील गाळ ६५ वर्षांनंतर काढण्यात आला. यासाठी दोन जेसीबी आणि वीस ट्रॅक्‍टरच्या मदतीने साडेआठ हजार ट्रॉली गाळ काढण्यात आला. एकीच्या जोरावर कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही, हे गावाने दाखवून दिले. "गाळमुक्त तळे, गाळयुक्त शेती'' ही संकल्पना लोकसहभागातून कांदे ग्रामस्थांनी राबवली. गावात प्रवेश करतानाच दिसणाऱ्या केदार तळ्यात वाढलेली जलपर्णी आणि साचलेल्या गाळामुळे साडेचार एकरांचा हा परिसर अस्वच्छ झाला होता. १९५२ सालापूर्वी ग्रामस्थांनी श्रमदानातून गाळ काढला होता. त्यानंतर आजअखेर या तळ्याची कोणीच स्वच्छता केलेली नव्हती. मात्र या वेळी सरपंच सुवर्णा पाटील, उपसरपंच शशिकांत पाटील व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून गाळमुक्तीचा निर्धार करण्यात आला. त्यांच्या हाकेला विक्रम पाटील, राणा पाटील, विशाल पाटील, पंडित पाटील, दिलीप पाटील, सागर पाटील, जयंत पाटील, भोला पाटील, निवास पाटील, धनाजी पाटील, सुनील गोसावी, प्रताप पाटील, संग्राम पाटील, गजानन पाटील, विश्वास पाटील, प्रकाश पाटील, शशिकला कांबळे, माधुरी पाटील, विमल कुंभार, मनीषा कुंभार, अर्चना पाटील, बयाबाई कुंभार यांच्यासह ग्रामस्थांनी साद दिली. अतुल पाटील, संपत पाटील यांनी जेसीबीची मदत केली. तळ्यातील पाणी काढण्यासाठी बाळकृष्ण पाटील यांनी फिटरची सोय केली. स्वच्छतेसाठी गोसावी सामाजाने मोलाची मदत केली. गावातील वीस ट्रॅक्‍टर मालकांनी गाळ वाहतुकीसाठी मदत केली. दीड महिन्याच्या काळात जवळपास साडेआठ हजार ट्रॉलींपेक्षा जास्त गाळ शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला. इतर गावांतील शेतकऱ्यांनीदेखील हा गाळ शेतामध्ये पसरण्यासाठी नेला. सोयीसुविधा उभारणार गाळ काढल्यामुळे तळ्यात पाणीसाठा वाढणार आहे. या तळ्यात येत्या काळात बोटिंग व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच परिसरात बाजार कट्टा, शिवस्मारक आणि गणेश मंदिराची उभारणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी रिंगरोड व बसण्यासाठी बाक, संरक्षक भिंत, पथदिवे, सीसीटीव्ही कॅमेरे, पेव्हिंग ब्लॉक, घाट, बगीचा, मुलांसाठी रेल्वे ट्रॅक, कोळंबी प्रकल्प साकारण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com