भेंडी पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

भेंडीच्या संतुलित वाढीसाठी अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याची आवश्यकता असते. शिफारशीत मात्रा ही योग्य वेळी योग्य प्रकारे विभागून दिल्यास उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ मिळते.
भेंडी पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन
भेंडी पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन

खरीप भेंडी लागवड साधारणतः जून ते जुलैमध्ये केली जाते. भेंडी लागवड साधारणतः ३० × १५ से.मी. अंतरावर केल्यास हेक्टरी १२-१५ किलो बियाणे पुरेसे ठरतात. पेरणीवेळी बियाणांना बियाण्याला ॲझोटोबॅक्टर आणि पी.एस.बी. जिवाणू संवर्धकांची (प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे) बीजप्रक्रिया करण्याची शिफारस आहे. या प्रकारे जिवाणू खते वापरली असल्यास पीक उत्पादनात ७ ते १० टक्क्यांपर्यंत वाढ होत असल्याचे निष्कर्ष आहेत. यामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता वाढते. सेंद्रिय व जिवाणू खते  अधिक उत्पादनासाठी हेक्टरी २०-२५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा १०-१५ टन गांडूळ खत अधिक ट्रायकोडर्मा ५ किलो द्यावे. जमिनीत निसर्गतः अनेक प्रकारचे जिवाणू व ॲक्टिनोमायसेट्स असतात. त्यापैकी काही अद्राव्य स्वरूपात स्थिर झालेले स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम करतात. जमिनीतील अनेक सूक्ष्मजीव हे पिकांसाठी आवश्यक असलेले वाढवर्धक द्रव्ये तयार करण्याचे कार्य करतात. यांच्या वाढीसाठी सेंद्रिय कर्बयुक्त पदार्थांची आवश्यकता असते. प्रयोगशाळेत कृत्रिम पद्धतीने सूक्ष्मजीव वाढवून पी.एस.बी. जिवाणू वर्धके (जिवाणू खत) किंवा नत्र स्थिर करणरी जिवाणू खते तयार केली जातात. यांचा वापर बीजप्रक्रियेद्वारे किंवा सेंद्रिय खतात मिसळून जमिनीतून किंवा ठिबक सिंचनाद्वारे पाण्यात मिसळूनही करता येतो.  लागवडीपूर्वी हेक्टरी ट्रायकोडर्मा ५ किलो, ॲझोटोबॅक्टर २.५ किलो आणि पी.एस.बी. २.५ किलो शेणखतात मिसळून मातीत देता येते. जैविक घटक हे रासायनिक घटकांबरोबर देऊ नयेत. ट्रायकोडर्मा, ॲझोटोबॅक्टर आणि पी.एस.बी. द्रव स्वरूपातही उपलब्ध आहेत. त्यांचा वापर ठिबक संचाद्वारे देखील देऊ शकतो (साधारणतः पायाभूत रासायनिक खताच्या मात्रेनंतर १० दिवसांनी). जमिनीतून येणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी कंपोस्ट खतासोबत बिव्हेरिया बॅसियाना आणि मेटारिझियम ॲनिसोप्ली हे जैविक नियंत्रकही हेक्टरी ५ लिटर किंवा किलो देता येतात. द्रवरूपात उपलब्ध असल्यास ठिबक किंवा आळवणी (ड्रेंचिंग)द्वारे देखील देऊ शकतो. निंबोळी पेंड देखील मातीत मिसळून (हेक्टरी २५० किलो) देऊ शकतो. शिफारशीत खत मात्रा  नत्र १०० किलो (युरिया २१७ किलो), स्फुरद ५० किलो (सिंगल सुपर फॉस्फेट ३१३ किलो) आणि पालाश ५० किलो (म्युरेट ऑफ पोटॅश ८३ किलो) प्रति हेक्टर द्यावे. यातील अर्धे नत्र (५० किलो- युरिया १०९ किलो), पूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडी वेळी द्यावे. उर्वरित नत्र (५० किलो- युरिया १०९ किलो) लागवडी नंतर १, १.५ आणि २ महिन्याने तीन समान हप्त्यात विभागून द्यावे. माती परीक्षणानुसार शिफारशीत मात्रेत असे बदल करावेत. माती परीक्षण अहवालामध्ये जमिनीतील अन्नद्रव्यांच्या उपलब्धता प्रमाण समजते. त्यानुसार अत्यंत कमी, कमी, मध्यम आणि जास्त असे नोंदवलेले असते. त्यानुसार वरील शिफारशीत खत मात्रेत योग्य ते बदल करावेत. १) जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य (किलो/ हे.) प्रमाण मध्यम असेल तर शिफारशीत खतमात्रा द्यावी. २) उपलब्ध अन्नद्रव्य प्रमाण अत्यंत कमी असल्यास, शिफारशीत खत मात्रेपेक्षा ५० टक्के जास्त खतमात्रा द्यावी. ३) जर प्रमाण कमी असेल तर शिफारशीत खतमात्रेपेक्षा २५ टक्के जास्त खतमात्रा द्यावी. ४) जर जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य (किलो/ हे.) प्रमाण जास्त असल्यास शिफारशीत खतमात्रेपेक्षा २५ टक्के खतमात्रा कमी द्यावी. ५) जर जमिनीतील प्रमाण अत्यंत जास्त असल्यास शिफारशीत खतमात्रेपेक्षा ५० टक्के कमी खतमात्रा द्यावी. सूक्ष्म अन्नद्रव्ये ः भेंडी पिकाच्या उत्कृष्ट वाढ आणि विकासासाठी लोह, जस्त, मँगेनीज, बोरॉन इ. सूक्ष्म अन्नद्रव्ये अल्प प्रमाणात पण अत्यावश्यक असतात. त्यांची कमतरता भासल्यास वनस्पतीच्या शरीर व चयापचय प्रक्रियेत बदल होऊ शकतात. त्याचा परिणाम उत्पादन व गुणवत्ता कमी होण्यात होतो. माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास, फेरस सल्फेट आणि झिंक सल्फेट प्रत्येकी २० किलो आणि बोरॅक्स ५ किलो प्रति हेक्टरी लागवडीच्या वेळी जमिनीतून द्यावे. जमिनीतून ही पोषणतत्त्वे देणे शक्य झालेले नसल्यास (कमतरतेच्या लक्षणानुसार), झिंक सल्फेट ०.५ टक्का, फेरस सल्फेट ०.५ टक्का, मँगेनीज सल्फेट ०.५ टक्का (म्हणजे ५ ग्रॅम प्रति लिटर) आणि बोरिक ॲसिड ०.२ टक्का (२ ग्रॅम प्रति लिटर) ------ किंवा बोरॅक्स ०.५ टक्का लागवडीनंतर १ आणि १.५ महिन्याने फवारणी करावी. किंवा पीक लागवडीनंतर १ आणि १.५ महिन्याने सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण ग्रेड-४ (लोह ४ %, जस्त ६ %, मँगेनीज १ %, तांबे ०.५ %, बोरॉन ०.५ %) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्य घटकांचे वेगवेगळे प्रमाण असलेली विविध मिश्रणे उपलब्ध आहेत. त्यातील घटकांच्या प्रमाणानुसार शिफारशीत किचिंत बदल होऊ शकतो. वर उल्लेखलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रणाऐवजी अन्य मिश्रण वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. पाण्यात विरघळणाऱ्या पोषण तत्त्वांची शिफारशीत मात्रेपेक्षा थोड्याही अधिक प्रमाणात फवारली केली गेल्यास पानांवर स्कॉर्चिंग दिसून येते, हे लक्षात ठेवावे. अधिक उत्पादनासाठी... भेंडी लागवडीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी १९:१९:१९ या विद्राव्य खताच्या ०.५ % ( ५ ग्रॅम प्रति लिटर) ---- या प्रमाणे फवारणी केल्यास अधिक उत्पादनात मिळते. सोबत स्प्रेडर स्टिकरचा वापर करावा. फळ तोडणीप्रमाणे १९:१९:१९ देण्याची वेळ वाढवत गेल्यास उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. - डॉ. साबळे पी. ए., ८४०८०३५७७२ सहायक प्राध्यापक (उद्यानविद्या विभाग) के.व्ही.के., सरदार कृषीनगर दांतीवाडा कृषी विद्यापीठ, साबरकांठा, गुजरात.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com