नियोजन खरिपाचे : अत्यल्प खर्चात सेंद्रिय पद्धतीने तुरीचे उत्पादन

अत्यल्प खर्चात सेंद्रिय पद्धतीने तुरीचे उत्पादन
अत्यल्प खर्चात सेंद्रिय पद्धतीने तुरीचे उत्पादन

दादाराव विश्वनाथ शेजूळ बोरगाव अर्ज(गणपती) ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद. संपर्क ः ९४२०४०४२२१, ८३२९४८८३४४ औरंगाबाद जिल्ह्यातील बोरगाव अर्ज (गणपती) (ता. फुलंब्री) येथे तीन वर्षांपासून एक शेतकरी गट सेंद्रिय पद्धतीने तुरीचे उत्पादन घेतो. या गटातील दादाराव विश्वनाथ शेजूळ यांनी अत्यल्प खर्चात सेंद्रिय पद्धतीने तुरीचे उत्पादन घेतात. तुरीपासून डाळीची निर्मिती करून प्रदर्शनाद्वारे विक्री करतात. बोरगाव अर्ज येथील दादाराव शेजूळ यांच्याकडे ४ एकर ३३ गुंठे शेती आहे. या शेतीमधील उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालते. तीन वर्षांपासून कृषी विज्ञान केंद्र औरंगाबादमधील तज्‍ज्ञ व आत्माच्या समन्वयातून बोरगाव अर्ज येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने प्रत्येकी एक एकरवर आंतरपिकांसह तूर उत्पादन घेणे सुरू केले आहे. दादाराव शेजूळ या शेतकऱ्यांपैकीच एक. पूर्वी त्यांच्याकडे नसलेले तूर पीक गेल्या तीन वर्षांपासून नियमित बनले आहे. एक एकर क्षेत्रामध्ये शिफारशीत ‘बीडीएन ७११’ या तुरीच्या वाणाची लागवड करतात. तुरीमध्ये आंतरपीक म्हणून बाजरी, उडीद, मूग अशी पिके असतात. लागवडीची पद्धत दादाराव शेजूळ आपल्या एक एकर शेतात पेरणीयोग्य पावसानंतर टोकन पद्धतीने साधारणत: ६ बाय दीड फूट अंतराने तुरीची लागवड करतात. एकरी सुमारे दीड किलो बियाणे लागते. उगवल्यानंतर अतिरिक्त वाढलेल्या रोपांची विरळणी करतात. दोन तूर ओळीमध्ये बाजरी, उडीद, मूग यांच्या दोन, दोन ओळी घेतात. चवळी व भगरही यांच्या केवळ चार ओळी टाकल्या. सेंद्रिय पद्धतीने नियोजन

  • वर्षांपासून सेंद्रिय तूर पिकाची कास धरली आहे. दादाराव शेजूळ यांनी गांडूळखत, शेणखताचा वापर वाढविला आहे. २०१६-१७ मध्ये पहिल्यांदा त्यांनी एक एकरात दोन ट्रॉल्या शेणखत टाकले होते. २०१७-१८ मध्ये पाच बॅग गांडूळखत व दोन ट्रॉल्या शेणखत टाकले. २०१८-१९ मध्ये २५ बॅग गांडूळखत टाकले. आवश्यक गांडूळ खत स्वत:च तयार करतात.
  • सेंद्रिय पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या तुरीच्या पिकावर निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क व जीवामृताचा वापर ते करतात. तूर पिकामध्ये एकूण कालावधीत तीन वेळा निंबोळी अर्क, दोन वेळा दशपर्णी अर्क व तीन वेळ जीवामृताच्या फवारण्या ते घेतात.
  • मूलस्थानी जलसंधारणासाठी दोन ओळीच्या अंतरात चार फुटावर चर.
  • पाणी उपलब्ध झाल्यास दोन ते तीन संरक्षित पाणी ठिबकने देतात.
  • बाजरी, उडीद, मुगाचे पीक काढल्यानंतर कोळपणी करतात.
  • प्रत्येक तुरीच्या ओळीशेजारी दांड पाडले जातात.
  • पावसाचा खंड पडल्यास वाढीच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाणी दिले जाते.
  • एकरी दोन कामगंध सापळ्यांचा वापर, व्हर्मी वॉशचा उपयोग करतात.
  • तुरीपासून डाळ तयार करून त्याची विक्री करतात.
  • ॲग्रोवन व कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनात सहभाग घेत सेंद्रिय उत्पादनासाठी ग्राहक जोडले आहेत.
  • सेंद्रिय तुरडाळीला मिळाला १०० रुपये प्रतिकिलोचा दर
  • दशपर्णी अर्क, जीवामृत स्वत: तयार करतात.
  • अत्यल्प खर्चात उत्पादन शेणखतांसह सर्व निविष्ठा घरच्या असल्याने एकरी साधारण ६ ते ७ हजार खर्च होतो. गेल्या वर्षी तुरीचे उत्पादन १२.५ क्विंटल आले होते. तर या वर्षी संरक्षित पाणी कमी पडल्याने उत्पादनामध्ये घट होऊन ते केवळ ४.५ क्विंटल मिळाले. अर्थात आंतरपीक मूग, उडिद यांचे दीड क्विंटल, बाजरी ५ क्विंटल उत्पादनासोबत भगर आणि चवळी ४० ते ५० किलो उत्पादन मिळाले. उत्पादन खर्च कमी असल्याने पाण्याअभावी कमी उत्पादन येऊनही नुकसान झाले नाही.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com