बहुगुणी तेलबिया पीक लक्ष्मीतरू

 वनशेतीमध्ये लक्ष्मीतरू हे तेलबिया पीक उपयुक्त ठरू शकते.
वनशेतीमध्ये लक्ष्मीतरू हे तेलबिया पीक उपयुक्त ठरू शकते.

लक्ष्मीतरू (शास्त्रीय नाव - Simarouba glauca) हे तेलबिया देणारे झाड आहे. त्याचे मूळ स्थान दक्षिण अमेरिकेतील फ्लोरिडा हे असून, तिथे त्याला पॅराडाईज ट्री म्हणजे नंदनवन झाड म्हणून ओळखले जाते. त्याच्या बियामध्ये ६५ टक्के तेल असते. हे तेल खाद्यतेल म्हणून वापरले जाते. त्याचप्रमाणे या वनस्पतीच्या प्रत्येक भागात औषधी गुणधर्म आहे. याला पिवळ्या रंगाची फुले येतात, याची फळे करड्या रंगाची असतात.  भारतामध्येही अलीकडे लक्ष्मीतरूची लागवड केली जात असून, तमिळनाडू, कर्नाटकसह महाराष्ट्रातही लागवड होताना दिसते. लागवड ः

  • सर्व प्रकारच्या ओसाड व पडीक जमिनीवर ही झाडे वाढतात. मात्र, चांगल्या वाढीसाठी काळ्या जमिनीची निवड करावी. १४ ते २० मीटर उंच व ८ ते १० मीटर रुंद वाढतात.
  • साधारणतः पावसाळ्यात मॉन्सूनच्या सुरुवातीला या वृक्षाची लागवड केली जाते.
  • दोन झाडातील अंतर : ५ मी. (पूर्व - पश्चिम) X ४ मीटर (उत्तर - दक्षिण)
  • हेक्टरी ५०० झाडे किंवा एकरी २०० झाडे बसतात.
  • शक्यतो झाडांसाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. पाण्याची बचत शक्य होते.
  • सुरवातीची दोन वर्ष उन्हाळ्यामध्ये या वनस्पतीला जमिनीच्या प्रतिनुसार आठवड्यातून एक किंवा दोन वेळा सुमारे ५ लिटर पाणी देण्याची आवश्यकता आहे.
  • तणनियंत्रणासाठी खतांचा वापर केल्यास वाढ वेगाने होण्यास मदत होते.
  • साधारण ६ ते ८ वर्षाचे झाल्यानंतर झाडाला फळे धरावीत. कलमांपासून लागवड केली असल्यास ३ ते ४ वर्षांनी फळधारणा करावी. पुढे ४ ते ५ वर्षापासून उत्पादनामध्ये स्थिरता येते.
  • दरवर्षी डिसेंबरमध्ये फूलधारणा होऊन ती फेब्रुवारीपर्यंत सुरू राहते.
  • याची फळे गोळा करून धुऊन सुकवली जातात. त्यानंतर तेलघाण्यातून तेल काढले जाते.
  • उत्पादन ः एका चांगल्या वाढलेल्या झाडापासून १५ ते ३० किलोपर्यंत बियांचे उत्पादन मिळू शकते. त्यातून २.५ ते ५ किलो तेलाचे उत्पादन मिळते. प्रति वर्ष हेक्टरी १ ते २ हजार किलो तेलांचे उत्पादन होऊ शकते. साधारण तेवढ्याच वजनाची पेंड उपलब्ध होते. उपयोग –

  • लक्ष्मीतरूच्या बियामध्ये ६५% तेल असते.
  • पेंडीपासून चांगले खत बनते.
  • या फळाच्या गरात ११ टक्के साखर असल्याने गोड लागतात. यात कोलेस्टेरॉलचे प्रमाण अगदी कमी असते. झाडावर फारशी कीड पडत नाही.
  • औषधी गुणधर्म ः लक्ष्मीतरूच्या झाडाची पाने व पानाचा अर्क तापावर उपचार करण्यासाठी वापरतात. पानांचा कडवटपणा नैसर्गिक प्रतिबंधात्मक क्षमता वाढविते. त्यातील जिवाणूविरोधी आणि कर्करोगविरोधी गुणधर्मामुळे कर्करोग व ट्युमरच्या उपचारात उपयोगी ठरू शकतात. विशेषतः पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कर्करोगासाठी फायदेशीर असल्याचे मत आहे. पानांमध्ये असलेल्या क्वासीन या रसायनाचा वापर एकपेशीय सजीवांमुळे झालेली विषबाधा, अतिसार आणि मलेरिया यावरील उपचारात केला जातो. जठराची सूज, अपचन, अतिसार, चिकनगुनिया यावरील उपचारासोबतच भूक आणि पचन सुधारण्यास मदत करते. झाडाचा सालामध्ये ही खूप औषधी गुणधर्म आहेत. फायदे ः

  • लक्ष्मीतरूची झाडे पडीक व ओसाड ठिकाणी चांगली वाढू शकतात.
  • ४०० मिलिमीटर पावसाच्या पाण्यात जोमदार वाढतात.
  • जनावरे या झाडाची पाने खात नाहीत. याच्या गळलेल्या पानांमुळे जमिनीचा कस वाढतो.
  • याच्या लाकडाला वाळवी लागत नाही. तसेच या झाडावर कीड पडत नाही.
  • याचे तेल मुख्यतः बेकरीमध्ये वापरतात. या तेलापासून वनस्पती तूप उत्पादन करता येते. त्याच प्रमाणे साबण, वंगण, प्रसाधने, औषधे यामध्ये या तेलाचा वापर होतो.
  • या झाडाच्या फळापासून शीतपेये तयार करता येतात.
  • याचा लाकडाचा उपयोग फर्निचर बनवण्यासाठी होतो.
  • वनस्पती, बियाणे, कवच, फळे, लगदा, पाने, वाळलेली पाने, फांद्या, झाडाची साल यासारखे वनस्पतींचे सर्व भाग अन्न, इंधन, खत, इमारती लाकूड, औषध इत्यादी उत्पादनासाठी उपयुक्त आहेत. यांच्या पानापासून गांडूळखत बनवता येते.
  • समाधान खुपसे, ९७६६८६४००८ (पदव्युत्तर विद्यार्थी, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, सॅम हिगिनबॉटम कृषी, प्रौद्योगिकी आणि विज्ञान विश्वविद्यालय, प्रयागराज, उत्तर प्रदेश.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com