मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा किडीची पतंग आणि अळी अवस्था
स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा किडीची पतंग आणि अळी अवस्था

शास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ही कीड मका, ऊस, ज्वारी, कपाशी तसेच भाजीपाला या पिकांवर उपजीविका करते. अळी अवस्था ही पिकांसाठी नुकसानकारक. ही अवस्था सर्वसाधारणपणे १४ ते २२ दिवसांची असते. प्रथम अवस्थेतील अळी अंड्यातून बाहेर आल्यानंतर कोवळ्या पानांवर उपजीविका करते. वाढीच्या टप्यातील अळी खोडास छिद्र पडून खोडात प्रवेश करते.  पाने बाहेरून आतल्या बाजूस कुरतडून खाते. वाढीच्या शेवटच्या टप्प्यात अळीच्या अंगावरील गडद ठिपके स्पष्ट दिसून येतात. तसेच डोक्यावर पांढऱ्या रंगाचा उलटा इंग्रजी Y आकार स्पष्ट दिसतो. या अवस्थेत सुरवातीला अळी मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करते. ही अवस्था साधारणत: ३.५ ते ४ दिवसांची असते. नंतर कोषावस्थेत जाण्यासाठी अळी जमिनीत शिरते आणि तेथेच कोषावस्थेत जाते. किडीचा पतंग हा करड्या रंगाचा असून, मादी पतंग मक्याच्या पोग्यात कोवळ्या पानांवर वरच्या बाजूने पुंजक्यात अंडी घालते. मादीचा जीवनकाळ सर्वसाधारणपणे १० दिवसांचा असतो. एक मादी सरासरी १००० ते २००० अंडी घालते.

नुकसानीचा प्रकार

  • अळी आपली उपजीविका पानांवर करते. सुरवातीच्या अवस्था कोवळ्या पानांवर उपजीविका करते. त्यानंतर पोंग्यात छिद्र पडून आत शिरून आतील भागावर उपजीविका करते.
  • दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेतील अळी काही वेळा पानांच्या कडापासून आतल्या भागापर्यंत खातात.
  • नंतरच्या अवस्था या प्रामुख्याने मक्याचा वाढीचा भाग खातात. त्यामुळे तुरा बाहेर येत नाही. काही वेळा कीड कणसांवरील केस खाते. तसेच  कोवळी कणसेदेखील खाते.
  • एकात्मिक नियंत्रण प्रादुर्भाव ओळखून अळीच्या वाढीच्या पहिल्या तीन अवस्थांमध्ये योग्य उपाययोजना केल्यास नियंत्रण करणे सोपे होते व नुकसान पातळी कमी ठेवता येते.

    भौतिक नियंत्रण शक्य असल्यास अंडीपुंज गोळा करून नष्ट करावेत. प्रादुर्भाव दिसून येताच पोंग्यामध्ये वाळू टाकावी. असे केल्याने अळीला वाढीच्या भागातील खाण्यापासून परावृत्त करता येईल, शेंडा तुटणार नाही.

    जैविक नियंत्रण अंड्यावर उपजीविका करण्याऱ्या ट्रायकोग्रामा ५० हजार अंडी दहा दिवसांच्या अंतराने तीन वेळा शेतात संध्याकाळी सोडावीत. किंवा नोमुरिया रायली २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणात मिसळून फवारणी करावी. किंवा इपीएन ( उपलब्ध असल्यास) किंवा मेटारायझियम अॅनिसोप्ली सहा ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी.

    रासायनिक नियंत्रण (प्रतिलिटर पाणी ) अळीच्या वाढीच्या पहिल्या अवस्थांमध्ये कडुनिंबावर आधारित कीटकनाशक (१५०० पीपीएम) ५ मि.लि. किंवा  थायमेथोक्झाम (१२.६ टक्के) + लॅम्बडा सायहेलोथ्रीन (९.५ टक्के झेड सी)  संयुक्त कीटकनाशकाची ०.५ मि.लि. किंवा  प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट (५ एस.जी.) ०.४ ग्रॅम किंवा स्पिनोसॅड (४५ एस. सी.) ०.३ मि.लि. किंवा   भाताचा भुसा १० किलो आणि गूळ २ किलो पाण्यात एकत्र करून त्याचे गोळे तयार करावेत. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये थायोडीकार्ब (७५ डब्ल्यू.पी.) १०० ग्रॅम मिसळावे. या मिश्रणाच्या लहान गोळ्या तयार करून मक्याच्या पोंग्यात टाकाव्यात.

    - सर्जेराव पाटील, ८२७५४५००६७  - सुशांत महाडिक, ७५८८५७७१२१ (अखिल भारतीय समन्वयित मका संशोधन प्रकल्प, कोल्हापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com