डाळिंबबागेतील मररोगाची लक्षणे कसे ओळखाल ?

डाळिंबबागेतील मररोगाची लक्षणे
डाळिंबबागेतील मररोगाची लक्षणे

डाळिंबबागेमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार वेगाने वाढत आहे. झाडांवरील लक्षणांचा व्यवस्थित आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकडे लक्ष द्यावे. डाळिंबबागेमध्ये एखादे झाड वाळलेले आढळल्यास काळजीपूर्वक पाहणी करावी. लक्षणे तपासून खरेच मररोगाचा प्रादुर्भाव झाला अथवा अन्य कारणांमुळे वाळले हे पाहावे. अनेक वेळा अन्नद्रव्यांचा अतिरिक्त अथवा अत्यल्प पुरवठा, निष्काळजी पाणीपुरवठा अशा कारणांमुळेही झाडे पिवळी पडून वाळतात. मररोगासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याआधी झाडांवरील सर्व लक्षणांचा सारासार विचार करावा. लक्षणे :

  • सर्वप्रथम बागेची नियमित काळजीपूर्वक पाहणी करावी. एखादे झाड अथवा झाडाची फांदी पिवळी पडली किंवा वाळली असल्यास किंवा अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे पानांवर दिसत असल्यास अशा निवडक झाडांचे सखोल परीक्षण करावे.
  • झाडाखालील ड्रिपर्स तपासून पाणीपुरवठा योग्य प्रकारे होत असल्याची खात्री करावी.
  • झाडांच्या मुळांवर आतून अथवा बाहेरील बाजूवर बुरशीचा प्रादुर्भाव नसल्याची खात्री करावी.
  • डाळिंबामध्ये अनेक माध्यमांतून मररोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रादुर्भावग्रस्त झाडाची मुळे व जमिनीलगतचे खोड यांचा उभा छेद घेऊन आतील भागांवरील लक्षणे तपासावीत.
  • अ) त्यावर काळपट तपकिरी अथवा काळ्या रंगाच्या बुरशीची लागण खोडाच्या आतील बाजूस दिसून आल्यास ती सिराटोसिस्ट्रीस फ्रीम्ब्रीयटा बुरशी असल्याचे समजावे. प्राथमिक अवस्थेमध्ये मुळांचा रंग हा तांबूस पिवळसर दिसून येतो, तसेच त्याला अल्कोहोलसारखा वास येतो. यामध्ये एकपाठोपाठ एक अशा ओळींमधील झाडांना यांचा प्रादुर्भाव होतो. ब) जर खोडाच्या मध्य भागातील गाभ्यात (झायलेम पेशी) हा तपकिरी रंगाचा आढळल्यास फ्युजारिअम स्पे. या बुरशीचा प्रादुर्भाव असतो. मात्र, डाळिंबात या बुरशीचा प्रादुर्भाव अत्यल्प प्रमाणात आढळतो. क) काळपट तपकिरी रंगाची मुळकूज ही स्केल्रोशियम किंवा मॅक्रोफोमिना या प्रकारच्या बुरशींमुळे होते. याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मुळाजवळील भागात पाण्याचे प्रमाण अतिरिक्त झाल्यामुळे होतो. ड) जमिनीलगत असणाऱ्या खोडावर गाठ अथवा गोलाकार पद्धतीची बुरशी आढळल्यास त्यास फायटोफ्थोरा निकोटिना किंवा रायझोक्टोनीया याचा प्रादुर्भाव असल्याचे समजावे. तो पुढे वाढून मूळकुज होण्याची शक्यता असते. इ) मुळांवर राखाडी रंगाच्या बुरशीचा प्रादुर्भाव आढळल्यास तो रायझोक्टोनिया बुरशीचा असतो. यामागे प्रामुख्याने झाडाच्या लागवडीनंतर तयार करण्यात येणारे गादी वाफे, त्याचबरोबर झाडाच्या खोडांना लावलेली माती ही प्रमुख कारणे होत. ई) खोडाच्या आतील भागांवर तसेच बाह्य भागावर टाचणीच्या आकाराची लहान छिद्रे आढळल्यास मुख्यत्वे शॉट होल बोअरर (खोड भुंगेरा) चा प्रादुर्भाव समजावा. प्रामुख्याने कमजोर झाडांवर व सिराटोसीस्टीस बुरशीची लागण झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या द्रव्याकडे खोड भुंगेरे आकर्षित होतात. फ) झाडाच्या मुळांवर असणाऱ्या गाठी ही सूत्रकृमीची लक्षणे आहेत. यामध्ये झाडाच्या पानांवर अन्नद्रव्यांच्या कमतरतेसारखी लक्षणे दिसून येतात. अशा झाडांमध्ये फुले बहरण्याचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे दिसून येते. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास झाडांना दीर्घ कालावधीमध्ये (एक वर्षापेक्षा जास्त) फूलधारणा होत नाही. अशी झाडे मेलेडोगाइनी इनकाँग्नाटा नावाच्या सूत्रकृमीने प्रादुर्भावग्रस्त असतात. डाळिंबामध्ये रॉटिलेनक्लस, अफेलेनकेक्लस आणि हेलीवटोंनक्लस या परजीवीचा आढळही काही प्रमाणात दिसून येतो. सूत्रकृमींचा प्रादुर्भाव हा मर रोगांच्या प्रमुख्य कारणांपैकी एक आहे. डाळिंबामध्ये वर नमूद केलेली लक्षणे ही स्वतंत्रपणे अथवा दोन किंवा अधिक प्रकारच्या जीवाणूंच्या एकत्रितरीत्या मर रोगास कारणीभूत ठरतात. आपणास अशा लक्षणांवरून व्यवस्थितरीत्या अंदाज न बांधता आल्यास अशा झाडांचे नमुने (खोड, मूळ, माती) जवळच्या शासकीय प्रयोगशाळेमध्ये किंवा संशोधन केंद्रामध्ये तपासून घ्यावेत. अस्तित्व आणि प्रसार :

  • मररोगास कारणीभूत ठरणारी सिराटोसिस्टीस फ्रिम्ब्रीयटा बुरशी ही ५ ते ७ वर्षाहून अधिक कालावधीकरिता जमिनीमध्ये अथवा रोगग्रस्त झाडांच्या अवशेषांवर जिवंत राहू शकते. सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये प्रादुर्भाव असला तरी विशेषत: वालुकामय जमिनी तसेच सच्छिद्र जमिनीमध्ये सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जास्त दिवसांपर्यंत आढळून येतो.
  • मररोगाचा प्रसार हा प्रामुख्याने रोगग्रस्त कलमे, त्याकरिता वापरण्यात येणारी माती आणि सघन पद्धतीची लागण यामुळे होतो.
  • पावसाचे पाणी, खोड भुंगेऱ्यासारखे कीटक आणि बागेमध्ये मशागतीकरिता वापरण्यात येणारी यंत्रे आणि अवजारे हेही मररोगाच्या प्रसाराकरिता कारणीभूत ठरतात. संपर्क ः ०२१७-२३५०२६२ (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, केगाव, सोलापूर.)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com