सेंद्रिय, रासायनिक खतांच्या संतुलित वापरातून निर्यातक्षम डाळिंब

सेंद्रिय, रासायनिक खतांच्या संतुलित वापरातून निर्यातक्षम डाळिंब
सेंद्रिय, रासायनिक खतांच्या संतुलित वापरातून निर्यातक्षम डाळिंब

शेतकरी ः राजू जठार नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर पीक ः डाळिंब क्षेत्र ः २५ एकर रासायनिक आणि सेंद्रिय पद्धतीच्या खतांचा संतुलित वापर करत नातेपुते (ता. माळशिरस) येथील राजू जठार हे तरुण शेतकरी सुमारे २५ एकर क्षेत्रावरील डाळिंब बागेचे व्यवस्थापन करत आहेत. खताच्या वापराबाबत जागरूकतेमुळे गेल्या दहा वर्षांपासून डाळिंबाची उत्पादकता आणि गुणवत्ता त्यांनी टिकवून ठेवली आहे. आज स्थानिक बाजारासह युरोप बाजारातही त्यांच्या डाळिंबाला चांगली मागणी आहे. राजू जठार हे पंधरा वर्षांपासून शेती करतात. त्यांच्याकडे मध्यम जमिनीत २५ एकर डाळिंब आहे. डाळिंबातील बहाराचे योग्य नियोजन, पाणी, खताचे योग्य व्यवस्थापन या तिहेरी सूत्रावर त्यांनी डाळिंबाची उत्पादकता, गुणवत्ता टिकवली आहे. ८ एकर क्षेत्रावरील डाळिंबाची ते निर्यात करतात. दुष्काळासह विविध आपत्तीचा त्यांनाही फटका बसत असला तरी नियोजन आणि सातत्यपूर्ण कामे यातून ते तग धरून आहेत. त्यांच्या रेसिड्यू फ्री डाळिंबाला प्रति किलो १०० रुपयांच्या पुढेच दर मिळतो आहे. डाळिंबातील त्यांच्या या कामगिरीने या परिसरात डाळिंब मार्गदर्शक अशी ओळख बनली आहे. एकरी १५ टन उत्पादन डाळिंबासाठी स्थानिक बाजार आणि निर्यात असे वेगवेगळे व्यवस्थापन केले जाते. ८ एकरांमध्ये निर्यातक्षम, तर १७ एकरवरील बाग स्थानिक बाजारासाठी राखून ठेवतात. वास्तविक दोन्ही बागांचे व्यवस्थापन फारसे वेगळे नसले, तरी निर्यातक्षम डाळिंबासाठी त्यांना अधिक लक्ष द्यावे लागते. येथे खत नियोजनासह कीडनाशकांचे अंश राहणार नाहीत, अशा रेसिड्यू फ्री उत्पादनासाठी फवारणीचे नियोजन केले जाते. काटेकोर नियोजनामुळे सर्व क्षेत्रांतून डाळिंबाचे सरासरी १५ टनापर्यंत उत्पादन घेतात. डाळिंबाची निर्यात युरोपमध्ये केली जाते. खत नियोजन अ) बहार धरतेवेळी १) बहार धरतेवेळी सेंद्रिय खतांचे प्रामुख्याने नियोजन केले जाते. त्यात शेणखत ५० किलो आणि कंपोस्ट खत २० किलो, निंबोळी पेंड १ किलो प्रतिझाड दिली जाते. सेंद्रिय खतांसोबत पीएसबी, केएसबी, अॅझोटोबॅक्टर अशा जैविक खतांचा व ट्रायकोडर्मा बुरशीनाशकांचाही वापर केला जातो. २) बहार धरताना प्रथम नत्र, स्फुरद, पालाश मिश्रखतांचा प्रतिझाड ७०० ग्रॅमचा डोस दिला जातो. त्यानंतर प्रतिझाड २०० ग्रॅम या प्रमाणात दुय्यम अन्नद्रव्ये असणारी खते दिली जातात. त्यानंतर प्रत्येकी १०० ग्रॅम या प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा डोस दिला जातो. ब) कळी सेटिंगनंतर डाळिंबाची कळी सेटिंग झाल्यानंतर एनपीकेचे प्रमाण प्रतिझाड ३०० ग्रॅम या प्रमाणात ठेवण्यात येते. तर दुय्यम अन्नद्रव्ये २०० ग्रॅम, सूक्ष्म अन्नद्रव्ये १०० ग्रॅम प्रतिझाड या प्रमाणे हप्ता दिला जातो. निंबोळी पेंड ७०० ग्रॅम प्रतिझाड या प्रमाणात देतात. या सोबत जैविक खतांचाही वापर केला जातो. क) फळवाढीच्या काळात एनपीके मिश्रखते ३०० ग्रॅम, दुय्यम अन्नद्रव्ये १०० ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये १०० ग्रॅम प्रति झाड या प्रमाणे दिले जातात. त्याशिवाय निंबोळी पेंडीचा डोस प्रतिझाड ५०० ग्रॅम या प्रमाणात दिला जातो. कीड रोगाच्या प्रादुर्भावानुसार रेसिड्यू राहणार नाही, अशा प्रकारे फवारणीचे नियोजन केले जाते. संपर्क- राजू जठार, ९९६००५००७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com